(साभार: ‘कर्तव्य साधना’- चार्वाक लेखमाला भाग – १०)
– सुरेश द्वादशीवार
गौतम बुद्ध आणि महावीर या दोन धर्मसंस्थापकांचा काळातच (इ.स.पू. सहावे शतक) अजित केशकंबली व मक्खाली घोषाल या आणखीही दोन विचारवंतांचा जन्म झाला. त्यांना अनुयायी मिळाले नाहीत आणि त्यांच्याकडे समाजाचे तेव्हा फारसे लक्षही गेले नाही. आजही ते बरेचसे दुर्लक्षित राहिले आहेत. बुद्ध आणि महावीर यांच्या यशापुढे त्यांचा प्रभाव फारसा पडला नसल्याचेही कारण त्यामागे असावे.
बुद्ध व महावीर यांच्याप्रमाणे अजित केशकंबली व मक्खाली घोषाल या दोघांच्या विचारांचाही चार्वाकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न नंतरच्या काळात काहींनी केला आहे. त्यांच्या विचारांच्या मागचे एक कारण बुद्धाच्या विषयात जसे आहे तसे ते त्यांच्या विचारातील वैफल्य, निराशा व पराभव यांच्या मांडणीतही आहे. वैफल्य, निराशा व अंधाऱ्या भविष्याची स्वप्ने समाजाला कधी आकृष्ट करत नाहीत. त्यातून अजित केशकंबली हा स्त्री-पुरुषांच्या केसांची विणलेली, टोचणारी व उष्ण कापडे वापरायचा. मख्खालीची वागणूकही चमत्कारिक म्हणावी अशी होती.
या काळात बुद्ध समाजाला उज्ज्वल भविष्याची, सुखी वर्तमानाची व भूतकाळाच्या उदात्तीकरणाची स्वप्ने दाखवत होता. त्याच्या शिकवणीमुळे त्याच्या मागे मोठ्या संख्येने लोक गेले. ऱ्हिस डेव्हिडसारखा अभ्यासक म्हणतो ‘बुद्धाच्या अनुयायांत जातिभेद नव्हता. सारा परिवार सारखे सामाजिक अधिकार वापरत होता. त्याच्या शिष्यांत राव आणि रंक सारखे होते… परंतु ओल्डेनबर्गसारखे इतरही इतिहासकार या परिवाराचे चित्र वेगळे रंगवतात. त्यांतील जातीयवाद, वरिष्ठ व कनिष्ठ जातींतले भेद, श्रीमंतांना मिळणारी वागणूक व गरिबांच्या वाट्याला येणारे त्या परिवारातले भोग ते सांगतात.
इस्लाममध्ये मशिदीत एकाच पातळीवर गुडघे टेकून सारेच अल्लाचे स्मरण करतात… मात्र मशिदीबाहेर त्यांचे वागणे वेगळे व विषमतेचे असते. तसाच काहीसा प्रकार बुद्धाच्या भिक्षू संघात व संघाबाहेरही होता. मराठी संतांचेही असेच होते. ज्ञानेश्वरांसोबत साऱ्या उच्चनीच जातींचे संत होते. त्यांची ती मांदियाळीच होती… पण तरीही नाथा घरी पांडुरंगाचा नाच रंगात आलेला असताना, पायरीशी कैसे शिवू, असे चोखोबाला म्हणावेच लागले होते. बरे झाले देवा, कुणबी केले, नाहीतरी दंभे मेलो होतो असे तुकोबाही त्याचमुळे म्हणाले.
बुद्धाच्या जवळ असणाऱ्यांत सम्राट आणि राजे होते. मगधचा सम्राट बिंबिसार हा त्याचा मित्र व शिष्य होता. त्याच्या म्हातारपणी त्याला तुरुंगात टाकून त्याची गादी बळकावणारा त्याचा पुत्र अजातशत्रू हाही बुद्धाचा मित्र होता. बुद्ध त्याला राजकीय सल्लाही देत असे. या अजातशत्रूला कैदेत टाकून त्याची गादी हिसकावून घेणारा त्याचा मुलगा विदूदभा हा कमालीचा आक्रमक, अहंकारी व दुष्ट होता. राज्याचा विस्तार करत असताना त्याने थेट बुद्धाच्या कपिलवस्तू या नगरराज्यावरच हल्ला चढवला व त्याच्या एकजात सर्व मुलामाणसांसोबत स्त्रियांचीही कत्तल केली. बुद्धाला त्यावर काही करता आले नाही.
बुद्धाला वेळूवन व जेटवन भेट देणारे त्याचे शिष्य कमालीचे धनवंत व उच्च जातीचे होते. ओल्डेनबर्ग यांनी बुद्धाच्या भिक्षू संघातील त्याच्या शिष्यांच्या नावाची मोठी यादीच दिली आहे. ही यादी जातिनिहाय आहे. भिक्षू संघात प्रार्थनेसाठी समता असली तरी त्या बाहेर या शिष्यांच्या जाती शिल्लक होत्या व त्यांत विषमताही होती. समतेची व त्यातही सामाजिक समतेची निर्मिती हे धर्मगुरूंचे वा संतांचे कामच नव्हे. ते समाजसुधारकांचे व समाजातील सर्व स्तरांचे नेतृत्व करणाऱ्या महात्म्यांचेच उत्तरदायित्व आहे.
श्रद्धेचा व धर्माचा व्यवसाय करणारे तपुसा व भल्लीक हे बुद्धाचे आरंभीचे शिष्य होते. बनारसचा धनवंत यश हा त्या परिवारात होता. तिथे एक हजार ब्राह्मणांनी भिक्षू संघात प्रवेश केला. सारीपुत्र मोग्गलायन व कंचन हे ब्राह्मण, आनंद राष्ट्रस व अनिरुद्ध हे व्यापारी त्याचे शिष्य होते. बुद्धाने जाती नाहीशा केल्या ही कविता आहे. हे शक्य नाही. वैदिकांमधील विषमता त्याच्या व महावीराच्या धर्मातही शिल्लक राहिली.
जगातला कोणताही धर्म सामाजिक विषमता नाहीशी करू शकला नाही हे विचारात घेतले तर बुद्धालाही त्यासाठी दोष देता येत नाही. बुद्धाला सर्व जातिवर्गांतून मोठ्या प्रमाणावर अनुयायी मिळाल्याचे एक कारणही याचबाबत नोंदवले पाहिजे. पिवळी वस्त्रे चढवून भिक्षू संघात सामील होणाऱ्यांना सैन्यभरतीतून सुटका मिळत असे. तो सारा युद्धकाळ लक्षात घेतला व त्यातली हिंसा विचारात घेतली की सैन्यातून सुटका होणे ही कोणालाही हवीशी वाटणारी बाब होती. अजातशत्रू व बुद्ध यांचा एक संवाद इथे नोंदवला पाहिजे.
अंगावर पिवळी वस्त्रे चढवून भिक्षू संघात प्रवेश मिळवणाऱ्याला सैन्याची सेवा करावी लागत नसे म्हणून अनेक जण संघात येतात अशी तक्रार अजातशत्रूने बुद्धाजवळ केली तेव्हा यासाठी जी माणसे संघाचा आश्रय घेतील त्यांना प्रवेश नाकारण्याची काळजी आपण घेऊ असे बुद्धाने राजाला सांगितले. याच ठिकाणी बुद्धाचे राजकीय शहाणपण व त्याचे राजगुरूपण सांगणेही आवश्यक आहे.
साम्राज्याचा विस्तार करताना इतर राज्ये सहजपणे गिळता येतात… पण गणराज्यांचा पाडाव करता येत नाही अशी तक्रार अजातशत्रूने बुद्धाजवळ केली. तो काळ गणराज्यांचाही म्हणजे गणप्रमुखांच्या राज्यांचाही होता. बुद्धाचे त्यावरचे उत्तर हे की, गणराज्ये ही आप्तसंबंधाने व रक्तसंबंधाने बांधलेल्या जमातींची राज्ये आहेत. या संबंधांचा पाडाव करणे आवश्यक असते. तो करायचा तर त्यांच्यात फूट पडेल असे राजकारण करावे लागते… महाभारतात मगधचा सम्राट जरासंध याने आपल्या दोन मुली कंस या मथुरेच्या राजप्रमुखाच्या मुलाला देऊन त्या गणराज्यांत फूट पाडली व ते ताब्यात घेतले ही कथा इथे आठवावी…
तत्कालीन राज्यकर्त्यांनी पाणिनी, पतंजली व माधवाचार्य या वैदिक धर्मपंडितांसारखा बुद्धाचाही उपयोग करून घेतला व त्यालाही त्यांना उपदेश करणे आवडले असेच अशा वेळी मनात येते. कोणताही धर्म राजाश्रयाखेरीज वाढू शकत नाही. जगातल्या सर्व प्रमुख धर्मांनी राजांचा आश्रय घेतला. (हिंदू धर्माने सगळ्या प्राचीन हिंदू राजांचा, बुद्धाने बिंबिसारचा व अजातशत्रूचा, ख्रिश्चन धर्माने कॉन्स्टंटाईनचा आश्रय घेतला, इस्लाम हा धर्मच राजाचा होता.) याउलट चार्वाकांना सत्तेचा आधार नव्हता व तो मिळण्याची शक्यताही नव्हती. राजा व ईश्वर या धर्माच्या दोन कुबड्या आहेत. चार्वाकांजवळ यातली एकही नव्हती.
वैदिक यज्ञात होणारी प्राण्यांची हिंसा, त्या धर्मातील विषमता, त्यातील ईश्वराविषयीची अनभिज्ञता व अविश्वास आणि राजांचे दुर्व्यवहार या साऱ्यांविरुद्ध बुद्धाने केलेली क्रांती व परिवर्तनाचा प्रभाव यशस्वी झाला. देशाच्या उत्तरेला, पूर्वेला व दक्षिणेतील अनेक भागांत त्याला राजाश्रय व लोकाश्रयही मिळाला. देशात ठिकठिकाणी भिक्षू संघ स्थापन झाले. त्यांचे आश्रम आले. त्यांना अर्थबळ मिळाले व अल्पावधीतच… अवघ्या तीनशे वर्षांत बौद्ध धर्माची पताका सर्वत्र फडकताना दिसली.
अशोकांनी त्याचे प्रचारक देशोदेशी पाठवले. त्यांनी चीन, जपान, तिबेट, ब्रह्मदेश, श्रीलंका इत्यादी देशांतही त्या धर्माची शिकवण व पताका नेली. त्याने अल्पावधीत मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाचे रहस्य नेमके त्याच्या शिकवणीत आहे की तत्कालीन राजकीय व सामाजिक स्थितीत?
बुद्धाचा काळ हा देशात सर्वत्र लहानलहान गणराज्ये असण्याचा काळ आहे. थेट रामायणाच्या व महाभारताच्या काळापासून या देशात गणराज्ये अस्तित्वात होती. रामाजवळ केवळ अयोध्येचे गणराज्य होते तर त्याच वेळी दक्षिणेत वालीचे व रावणाचे साम्राज्य विकसित होताना दिसले.
महाभारतात मगध व हस्तिनापूर यांसारखी काही मोठी साम्राज्ये होती. उलट सारा देश 212 छोट्या राजांच्या राज्यांत वाटला गेला होता. ही राज्ये लहान असावीत वा ती गणराज्ये असावीत. काशीप्रसाद जयस्वाल आणि देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी या गणराज्यांचे सविस्तर वर्णन त्यांच्या ग्रंथांत केले आहे.
कपिलवस्तू, तक्षशिला, वैशाली, नालंदा, अवध ही सारी तेव्हाची उत्तरेकडील गणराज्ये संपन्न व शक्तिशालीही होती. या गणराज्यांत आजच्यासारखी लोकशाही वा गणतंत्र मात्र होते. बहुतेक गणराज्यांत गुलामगिरी मोठ्या प्रमाणावर होती. तिकडे अथेन्स आणि स्पार्टा या ग्रीक गणराज्यांची माहिती दिली जाते. त्या दोन्ही गणराज्यांतील लोकसंख्येत दोन तृतीयांशाहून अधिक लोक गुलाम होते. एकतृतीयांश व्यापारी लोकांना मताधिकार नव्हता. सत्ता केवळ नागरिकांपाशी होती आणि त्यांची संख्या राज्यात जेमतेम वीस टक्क्यांएवढी होती. त्यांनी पाठवलेले प्रतिनिधी व तेथील कुटुंबप्रमुख एकत्र येऊन राज्याचे निर्णय घेत.
भारतात कुटुंबप्रमुखांनी एकत्र येऊन राज्याचे विषय हाताळण्याची अशीच पद्धत होती. गुलामांना आत्मा नसतो असे ॲरिस्टॉटल म्हणायचा. त्यांचा जन्म नागरिकांचे कष्ट उपसण्यासाठी होतो असे त्याचे म्हणणे होते. तीच स्थिती भारतातही होती. अगदी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मध्यभारतात गुलामांचे बाजार भरत होते.
कुटुंबप्रमुखांची व त्यांतही धनवंत कुटुंबांच्या प्रमुखांची ही गणराज्ये होती. तीत राजकीय निर्णय हे प्रमुख एकमेकांचा सल्ला घेऊन व शक्यतो एकमताने वा ते न जमल्यास बहुमताने घेत… मात्र एकदा निर्णय झाला की तो साऱ्यांना बंधनकारक असे. गुलामांच्या श्रमावर व समृद्धीच्या बळावर ही गणराज्ये चालत. लोकसंख्या कमी, त्यातही मर्यादित संख्येने परस्परांच्या रक्तसंबंधानी जुळलेल्यांची संख्या मोठी.
हीच स्थिती गणराज्यांचीही होती. त्यांची अंतर्गत व्यवस्था चांगली व चांगल्या संबंधांची होती. रक्तसंबंधांमुळे त्यांत मतभेद वा राजकीय वाद कमी होते. एकजूट असल्याने ती शक्तिशाली होती व सामान्यपणे युद्धात पराजित न होणारी होती. परचक्राच्या वा साम्राज्यांच्या आक्रमणाच्या वेळी ही गणराज्ये संघटित होतानाही दिसत.
शांततेत, समृद्धीत व समाधानात जगणाऱ्या या गणराज्यांची पहिली मोडतोड महाभारतात जरासंघाने केल्याचे आढळते. बुद्धाच्या काळात प्रथम बिंबिसाराने व नंतर अजातशत्रूने ते आक्रमण पुढे नेऊन अनेक गणराज्यांचा बीमोड केला. विदूदभ्याने तर कपिलवस्तूच जमीनदोस्त केले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून देशातील इतर सम्राटांनीही त्यांच्या राज्य विस्ताराला सुरुवात करून सभोवतीची छोटी गणराज्ये बुडवण्याचा ध्यास घेतला. या प्रयत्नात उत्तरेतील अनेक गणराज्ये पराभूत होऊन ती साम्राज्यात सामील झाली.
साम्राज्य आले म्हणजे सम्राट आला आणि सम्राट येणे म्हणजे लोकशाही जाणे होते. पूर्वीच्या गणराज्यांतील शांतता संपली, समृद्धी लयाला गेली आणि अनेक गणराज्यांतील स्त्री-पुरुषांच्या क्रूर कत्तलीही झाल्या. अशा गेलेल्या गणराज्यांच्या व त्यांतील सुखासमाधानाच्या स्मृतीच मग मागे राहू लागल्या. त्या पुन्हा येणार नव्हत्या आणि तेथील नागरिकांना त्यांचे मतस्वातंत्र्यही मिळणार नव्हते.
सगळे सम्राट कमालीचे सत्ताग्रही, जुलमी व नागरी जीवनावर पूर्ण अंमल गाजवणारे व समाजाला चहूबाजूंनी नियंत्रित करणारे होते. त्यांनी प्रजेवर प्रचंड कर लादले, तिच्या उत्पन्नाचा मोठा वाटा हिरावून घेऊन तो साम्राज्याच्या खजिन्यात जमा केला. सम्राट, सरदार व त्यांचे सहकारी धनवंत होत गेले व पूर्वीच्या धनवंतांच्या वाट्याला गरिबी आली. त्यातून होती नव्हती ती समता जाऊन, स्वातंत्र्य गेले व बंधुताही नाहीशी झाली. जे गमावले ते फिरून मिळवता येत नसल्याने निराश झालेल्या लोकांना आशेचा एक लहानसा का होईना… पण किरण हवा होता. हा किरण बुद्धाने त्यांना पुरवला.
बुद्धाचा भिक्षू संघ हा तो किरण होता. त्यात आरंभी सर्व पुरुषांना प्रवेश होता. जातीपातीची आडकाठी नव्हती, पिवळी वस्त्रे चढवायची आणि संघाचे सभासद व्हायचे होते. संघात सभासदांना समता लाभायची. अनेक संघांना राजाश्रय असल्याने त्यांचे उत्पन्न मोठे होते. परिणामी कष्टाची गरज नव्हती.
बुद्धाने घालून दिलेले संघाचे नियम पाळले की भिक्षूंची त्यात सोय व्हायची. आरंभी त्याचे नियम कडक होते. त्यात खानपानावर निर्बंध होते. पशुहत्या होत नव्हती. मद्यपान निषिद्ध होते. स्त्रियांना प्रवेश नसल्याने नीतिमत्ता कायम होती असा समज होता… शिवाय भिक्षू झालेल्यांना सैनिक सेवेतून मुक्तता मिळत असल्याने भिक्षूंचे युद्धातल्या मरणाचे भय संपले होते. हे संघ राजकारणात उघडपणे नसल्याने त्यांना इतरांच्या आक्रमणाची भीती नव्हती.
वैदिक धर्माला उतरती कळा आली होती. यज्ञयाग हे चेष्टेचे विषय झाले होते. त्यांतून पशुहत्येची निंदा सारेच करत होते… शिवाय उपनिषदांनी यज्ञांना फुटक्या नौका म्हटल्याने वैदिक कर्मकांडांविषयी एक अश्रद्ध भावना निर्माण झाली होती. तिकडे महावीराचा धर्म संपूर्ण अहिंसेची भाषा बोलत होता. तेवढी अहिंसा समाजाला पेलणारी नव्हती. बुद्धाने पशुहत्या वर्ज्य केली होती… मात्र मेलेल्या पशुंचे मास खाण्याला त्याचा आक्षेप नव्हता… त्यामुळे शांतता, समृद्धी, कष्टमुक्ती, युद्धमुक्ती आणि खानपानाचे लवचीक नियम लोकांना भावणारे होते. भिक्षू संघात प्रवेश घेणाऱ्यांची रांग व गर्दी त्यामुळे मोठी होती.
चार्वाकांना बुद्धाच्या जवळ नेऊन बसवण्याचे अनेक अभ्यासकांचे कारण, बुद्धाचा अज्ञेयवाद हे आहे. बुद्धाला ईश्वर मान्य नव्हता… मात्र त्याचे म्हणणे असे की, जो दिसत नाही, अनुभवाला येत नाही आणि जो असल्या-नसल्याचा आपल्यावर परिणाम होत नाही त्याचा विचार करायचाच कशाला? हीच भूमिका त्याने पुनर्जन्म, पूर्वजन्म, मृत्यूनंतरचे जीवन इत्यादींबाबतही स्वीकारली होती.
त्याचा हा अज्ञेयवाद चार्वाकांजवळ जाणारा दिसला तरी तो त्यांच्याहून भिन्न होता. चार्वाक अज्ञेयवादी नव्हते… ते ईश्वरासकट पूर्वजन्म, पुनर्जन्म व मृत्यूनंतरचे जीवन स्पष्टपणे नाकारणारे होते. ‘भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनम्कुत:।’ ही त्यांची भूमिका अजाणाची नाही, ज्ञातपणे सारे नाकारण्याची आहे… शिवाय त्यांना धर्मनियम, त्यांतील धर्मकांडेही अमान्य होती. भिक्षू संघातील व त्या बाहेरील लोकांत फरक करण्याची बौद्धांची पद्धतही त्यांना मान्य नव्हती. माणूस आणि मनुष्यधर्म, माणसाचे सुख व समाधान यांची सांगड असलेला विचार धर्म वा धम्म यांच्या बंधनात अडकणाराही नसतो.
चार्वाकांची ही भूमिका बुद्धाला उच्छृंखल व उनाड वाटत होती. ‘चार्वाकांचे ग्रंथ वाचू नका व त्या पंथापासून दूर राहा…’ हा बुद्धाने शिष्यांना केलेला उपदेश त्याच्या चार्वाकांवरील रोषाचाच पुरावा आहे. बुद्ध विरोधात असल्याने बुद्धाला मानणाऱ्या राजसत्ताही चार्वाकविरोधी असणार हे उघड आहे.
बोधिवृक्षाच्या छायेत तप करणाऱ्या बुद्धाला ज्ञानाचा साक्षात्कार झाला असे त्याचे चरित्रकार सांगतात. साक्षात्कार, दर्शन वा अध्यात्माचा स्पर्श या साक्षीपुराव्याने वा प्रत्यक्षाधारित अनुमानाने सिद्ध होणाऱ्या गोष्टी नाहीत. त्याविषयी सांगणाऱ्यांचा शब्द प्रमाण मानूनच त्यावर विश्वास ठेवायचा असतो.
तुकोबांसाठी वैकुंठातून विमान आले असे म्हणतात… पण मग रामाने शरयूत प्रवेश करून प्राणत्याग का केला? वा कृष्णाला एका सामान्य व्याधाच्या बाणाला बळी का पडावे लागले? हेच पुन्हा श्रद्धेचे व पुरावा न देऊ शकणारे विषय आहेत. ते अर्थातच चार्वाकांच्या शिकवणीत व मांडणीत बसणारे नाहीत.
बुद्धाने आरंभी स्त्रियांना भिक्षू संघात प्रवेश देण्याचे नाकारले होते. पुढे त्याचा पट्टशिष्य आनंद याच्या विनवणीवरून व त्याने घातलेल्या समजुतीनंतर बुद्धाने संघात स्त्रियांना घ्यायला परवानगी दिली. असा पहिला प्रवेश त्याच्या मातेचा झाला… मात्र त्याच वेळी बुद्धाने खंत व्यक्त केली की, इथून धर्माच्या व संघाच्या अधःपतनाला सुरुवात झाली.
बुद्धाचे ते भाकित तेव्हा खरे झाले नाही… मात्र पुढल्या शतकात भिक्षू संघात अनाचार माजले. त्यांना मान्यता देणाऱ्या वज्रयान व सहजयान यांसारख्या परंपरा त्यात निर्माण झाल्या. नंतरच्या काळात हे संघ त्यांतील अनिष्टांमुळे संपत गेले व आता तो इतिहास झाला आहे. स्त्रियांच्या सहभागामुळे भिक्षू संघात जाण्याचा ओघ वाढला हे मात्र खरे नाही.
अनाचार ही दुष्प्रवृत्ती आहे. ती स्त्री-पुरुष अशा साऱ्यांत असू शकते. काही इतिहासकारांनी बुद्ध धर्माच्या अवनीतीचे एक कारण अनाचार असल्याचे म्हटले असले तरी ते त्याचे वास्तव नाही. वास्तव हे आहे की, पाचव्या व सहाव्या शतकाच्या काळात सर्वच धर्म अनाचाराने ग्रासले होते. वैदिकांचा वर्ग आणि कापालिक व शाक्त यांसारखे त्यांचे संप्रदायही अनाचाराला पाठबळ देणारे होते.
बुद्ध धर्माचे भारतातून नाहीसे होणे फार पूर्वीचे, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातलेच आहे. सम्राट अशोकाचा नातू सहदेव हा अतिशय दुबळा राजा होता. त्याला त्याच्या गदीवरून दूर करून पुष्यमित्र शुंग या वैदिक पंतप्रधानाने त्याची जागा घेतली. योगाचार्य पतंजली हा त्याचा सल्लागार व मुख्य प्रधान होता. त्या दोघांनी पुन्हा यज्ञधर्म जागा केला. वैदिकांना प्रोत्साहन देत व बुद्धराजांचा पराभव करून त्या धर्मातील भिक्षूंना देशोधडीला लावले.
बुद्ध धर्म भारतातून गेला… त्याचे खरे कारण पुष्यमित्र शुंग व पतंजली यांचा प्रभाव हे आहे. काही इतिहासकारांनी त्या पराभवासाठी शंकराचार्यांना जबाबदार धरले आहे… मात्र शंकराचार्यांचा काळ आठव्या शतकाचा म्हणजे बुद्ध धर्म भारतातून नाहीसा झाल्यानंतर अकराशे वर्षांनी येणारा आहे.
चार्वाकांना स्त्री-पुरुष समता मान्य होती. मनुष्य मात्र तेवढा एक असे ते म्हणत. बुद्धापासूनचे त्यांचे वेगळेपण या उदाहरणानेही स्पष्ट होईल. श्रद्धा, भक्तिभाव, प्रश्न न विचारता वा विचार बाजूला सारून केलेल्या गोष्टी त्यांना मान्यच नव्हत्या. परिणामी वैदिकांच्या आचारधर्माप्रमाणे त्यांनी बुद्धाच्या व महावीराच्या आचारधर्माकडेही पाठ फिरवली.
चार्वाकांना देव व त्यांची मंदिरे वा आश्रम नव्हते. सामान्यपणे स्वतंत्र विचार करणारी माणसे कळपात व समुदायात राहत नाहीत. आपला विचार करत व तो मांडत समाजाला शिकवण देणाऱ्या ग्रीसमधील सोफिस्टांसारखाच त्यांचा समाजात वावर होता. फरक एवढाच की, सोफिस्ट आपल्या शिकवणीचा मोबदला घेतात. चावार्कांनी असा मोबदला कधी घेतला नाही… शिवाय त्यांच्या वाट्याला तुच्छता व तिरस्कारच अधिक आला आहे. ते धर्मश्रद्धांविरुद्ध लढणारे आहेत. आपल्या आगरकरांपर्यंतची काही माणसे हेच अपमान अनुभवत जगली.
(चार्वाक लेखमालेतील अगोदरचे भाग ‘मीडिया वॉच’ वर उपलब्ध आहेत . ही लेखमाला पुस्तकस्वरुपात येत्या २० तारखेला साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. )
(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.) 98224 71646