वैदिक धर्म आणि चार्वाक

(साभार: ‘कर्तव्य साधना’- चार्वाक लेखमाला  भाग – ११)

– सुरेश द्वादशीवार

वेद व विशेषतः ऋग्वेद हा जगातला पहिला लिखित ग्रंथ मानला जातो. त्याचा आरंभ केव्हा, कसा, का व कोणी केला याविषयी इतिहास अनभिज्ञ आहे. प्रत्यक्षात त्याचे लेखन शेकडो वर्षे सुरू होते व दर शतकात त्यात नव्या अध्यायांची व सूक्तांची भर पडत होती. काळ बदलत गेला… पण वेदांच्या विचारात त्यामुळे फरक पडला नाही… कारण विचार करा पण तो वेदानुकूलच करा अशी वैदिक धर्माची आज्ञा होती.

या ग्रंथात ईश्वराची स्तुती आहे. त्याच्याकडे केलेल्या भौतिक मागण्या आहेत. वैदिक देवतांचे पराक्रम व त्यांनी युद्धात मिळवलेले विजय आहेत. त्यांनीच अवैदिकांना असूर, राक्षस वा दस्यू ठरवले आहे. इंद्राच्या नेतृत्वात देवांनी त्यांचा केलेला पराभव वर्णिलेला आहे… शिवाय मानवी उन्नयनाएवढ्‌याच त्याच्या पतनाच्याही कथा आहेत. त्यांतल्या काही आपल्या आजच्या नीतिशास्त्रात न बसणाऱ्या, भाऊ-बहीण संबंधांच्याही कथा आहेत.

वेदांना वैदिकांनी व पुढे हिंदू धर्माच्या अनुयायांनी आपले आद्य व ईश्वरी ग्रंथ मानले. त्यांतली सूक्ते तेव्हाच्या ऋषी-मुनींनी लिहिली नाहीत तर ती त्यांना साक्षात्कारासारखी दिसली असे म्हटले आहे. ती मानवी नसल्याने व साक्षात्कारातून उपलब्ध झालेली असल्याने ईश्वरी ठरली आहेत. (प्रत्यक्षात वेदाच्या प्रत्येक सूक्ताच्या आरंभी ते रचणाऱ्या ऋषीचे नाव आहे… पण त्या ऋषीलाही ते साक्षात्कारातून मिळालेले सूक्त आहे असे मानले गेले आहे.)

हे वेदही आरंभी मौखिक परंपरेने चालत आलेले आहेत. फार उशिरा त्यांना ग्रंथरूप मिळाले. कौरव-पांडवांच्या युद्धाच्या अखेरीस मी वेदांचे संपादन केले असे व्यास म्हणतो. ते खरे मानले तरी वेदांची लिखित आवृत्ती इ.स.पू. 2000 वर्षे मागे न्यावी लागते. एक गोष्ट मात्र या ग्रंथांच्या बाजूने सांगण्याजोगी… त्यांतील मूळ स्वरूप, त्यांतील शब्द व सूक्तांच्या रचनेचे क्रमांकबद्ध संपादन निघंटू या सायनाचार्याच्या ग्रंथामुळे कायम राहिले असे म्हटले गेले.

जगातील इतर धर्मांबाबत असे म्हटले जात नाही. कुराण हा ग्रंथ पैगंबराच्या पश्चात बऱ्याच काळानंतर तेव्हाच्या खलिफाने आपल्या नियंत्रणात संपादित करून घेतला. मौलाना आझादांच्या मते त्यातील क्रमवारीत काळाच्या सोयीप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. त्यातील पाठांचे व आयतींचे क्रमांकही काळाच्या सोयीप्रमाणे बदलून घेतले गेले आहेत. एक गोष्ट मात्र महत्त्वाची… मौलाना आझादांचे हे मत परंपरेला मान्य नाही. आजचे कुराण व पैगंबराचा मूळ पाठ हे दोन्ही एकच व एकाच स्वरूपाचे आहे असे परंपरा मानते.

बायबलची रचनाही येशूच्या नंतर चारशे वर्षांनी कॉन्स्टंटाईन राजाच्या काळात धर्मगुरूंनी केली आहे. ही रचना करत असताना त्यांच्यासमोर बायबलचे 84 पाठ होते. त्यांतून त्यांनी आत्ताचे चार पाठ निवडले व इतर पाठ जाळून टाकले. या चारशे वर्षांच्या काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी झाल्या… पण त्या साऱ्या सांभाळून आजच्या बायबल व ख्रिश्चन धर्मांतील सणांच्या परंपरा सुरू झाल्या. त्याचे जे 80 पाठ नाहीसे केले गेले… त्यांतला एक पाठ मेरी मॅगडेलिनीचा होता. ही मेरी वेश्या नसून प्रत्यक्ष येशूची पत्नी होती असे आत्ताचे संशोधक सांगू लागले आहेत.

वेदांबाबतही अशा शंका घेतल्या जात असत… कारण निघंटू हा ग्रंथ सिद्ध करणाऱ्या सायणाचार्यांचा काळ इ.स. चौदावे शतक हा आहे. वेदांची निर्मिती त्याआधी किमान साडेतीन हजार वर्षापूर्वी झाली आहे. या साऱ्या गोष्टींचा उल्लेख इथे असा करण्याचे कारण धर्मग्रंथांची संशयास्पद विश्वसनीयता हे आहे. (धर्मग्रंथांबाबत ऐतिहासिक आधारांवर घेतली जाणारी ही संख्या झपाट्‌याने बदललेला त्यांच्या रचनेचा काळ आणि मानवी जीवनातील श्रद्धा व विचार यांची सुरू असलेली स्पर्धा या सगळ्याच गोष्टींमुळे घेतली जाते.)

ग्रंथकार बदलले, त्यांची रचना मूळ स्वरूपात राहिली नाही… मात्र माणसांचे आयुष्य, त्यांच्या गरजा व जीवनाविषयीची दृष्टी कालमानाप्रमाणे बदलत गेली. ग्रंथांचा शब्द कायम आणि माणसांचे जीवन मात्र बदलणारे… या स्पर्धेमुळे विश्वसनीयता, जीवन की लिहिलेला शब्द ही तेढ उभी राहिली. आजही ती तशी आहे. जेव्हा जीवन अधिकाधिक वेगाने बदलत होते तेव्हा ती आजच्याहून अधिक तीव्र राहिली असणार.

वेदांच्या रचनेचा काळ हा समाजाच्या रानटी अवस्थेतून पशुपालकांच्या व शेती संशोधनाच्या काळात येण्याचा आहे… त्यामुळे वेदांच्या रचनेत कालमानानुसार पशू (विशेषतः गाय) व शेतीविषयीची सूक्ते व ऋचा अधिक प्रमाणात येतात. पशुपालकांचे व कृषिधारकांचे सारे जीवन उपजीविकेच्या त्या दोन बाबींनी अंतर्बाह्य व्यापलेले होते. ते त्यांच्या वागण्याबोलण्यात येते. त्यांच्या प्रार्थना व मागण्याही त्याचविषयीच्या होत्या.

आजही जगात काही ठिकाणी असे जीवन जगणाऱ्या जमाती आहेत. अफ्रिकेत डिंका व भारताच्या दक्षिणेला निलगिरी पर्वताच्या उतारावर राहणारी तोडा जमात अजून त्याच अवस्थेत आहे. त्यांचे जीवन समजून घेतले तर वेदकालीन समाजाचे जगणे व विचार करणे समजू लागते. काही मानववंश शास्त्रज्ञांनी या जमातीचे जीवन अभ्यासून तिचे वैदिकांच्या जीवनाशी असलेले साम्य दाखवून दिलेले आहे. जगात अनेक जागी अशाच अवस्थेतल्या आदिम जमाती आहेत. त्यांचे जगणे हे वैदिक समाजाच्या जगण्यासारखेच आढळले आहे. या जमातींचा अभ्यास वेदांचे व वैदिकांचे खरे स्वरूपही उघड करणारा आहे.

पशुपालकांच्या अवस्थेत जगणाऱ्या जमातींत पशूंचे व वन्यप्राण्यांचे महत्त्व अधिक असणार हे उघड आहे. वैदिकात धन किंवा गोधन का वाढत होते याचा विचार याचसंदर्भात करणे गरजेचे आहे. अफ्रिकेतील डिंका व काफीर आणि भारतातील तोडा या पशुपालकांच्या जीवनातही गायीगुरांचे स्थान दैवतांएवढेच मोठे आहे. वैदिकांनी आपल्या वंशाला गोत्र असे नाव दिले. पुढे जाऊन गायीच्या उदरातूनच सर्व दैवते जन्माला आली म्हणून तिला गोमाता म्हटले.

निघंटू गाय हा शब्द पृथ्वीचा समानार्थी असल्याचे म्हटले आहे. अदिती म्हणते की, पृथ्वी, गाय व इला हा वेदातला शब्दही काया, वाचा, मन व अन्न यांचा समानार्थी व गायीशी जोडलेला आहे. पृथ्वी व स्वर्ग यांतील अंतर एक हजार गायींएवढे, त्या एकीवर एक ठेवल्या तर होईल एवढे आहे असे ‘पंचवीष ब्राम्हण’ या ग्रंथात म्हटले आहे.

विंटरनिट्‌जच्या मतेही गाय व बैल हीच वैदिकांची खरी संपत्ती होती. डिंका, काफीर व तोडा या जमातीही गायींना सर्वस्व मानत असे तो म्हणतो. या साऱ्याचा अर्थ एवढाच की, ईश्वर व परमेश्वर म्हणजे दुसरेतिसरे काही नसून उपजीविका देणारे साधन होते व ते अन्नाएवढेच पूज्यही होते. गायी जमवणे, त्यासाठी इतरांशी युद्धे करून त्यांच्या गायी पळवणे हेच तत्कालीन युद्धांचे प्रमुख कारण (गाविस्ती) होते. मोनिएर विलियम्सच्या मते गोसू या शब्दाचा अर्थही गायींसाठी युद्धाला सिद्ध होणे हाच होता. ही स्थिती डिंका व तोडा या जमातींची आजही आहे.

गायींसाठी होणाऱ्या युद्धांचा उल्लेख महाभारतातही आहे. पांडव अज्ञातवासात द्रुपदाच्या राज्यात राहत होते. कौरवांनी त्या राज्यावर गायी मिळवण्यासाठी हल्ला केला होता. त्या युद्धात भिष्म, द्रोण व कृपही सामील होते. अर्जुनाने बृहन्नडेच्या वेशात त्या सर्वांचा पराभव केला हा उल्लेखही महाभारतातलाच.

ययाती हा राजा त्याच्या अतिविलासीपणामुळे पुढे कफल्लक व कर्जबाजारी झाला. आपले कर्ज चुकवायला त्याने आपल्या माधवी या कन्येला दैवतांकडे व ऋषींकडे काही काळ गहाण ठेवण्याची दुर्दैवी शक्कल काढली. या स्थितीत तो याज्ञवल्क्याकडे गेला व त्याला त्याने एक हजार गायींच्या मोबदल्यात आपली मुलगी एक वर्षासाठी देऊ केली. याज्ञवल्क्य हा महान ऋषी म्हणून वैदिकात ख्याती मिळवलेला विद्वान होता… पण माधवीच्या मोहाने तो ययातीला म्हणाला ‘माधवीच्या मोबदल्यात मी तुला याहून अधिक गायी देऊ केल्या असत्या.’

दूधदुभते, त्यापासून तयार होणारे इतर खाद्यपदार्थ, बैलांची व खोंडांची उपज आणि त्या साऱ्यांचे मांस हा पशुपालकांच्या उपजीविकेचा व जगण्याचा विषय (आधार) होता… त्यामुळे त्यांची सारी दैवते जीवनावश्यक बाबींवर आधारलेली म्हणून गायीच्या रूपात आढळतात. वेदांत आलेल्या देवांच्या व असुरांच्या लढायाही गायींचे कळप पळवण्यासाठी व राखण्यासाठी झाल्या. कोकणात नारळाची, लष्करात व क्षत्रियांत शस्त्रांची, धनवंतांत लक्ष्मीची, स्त्रियांत पतिदेवाची व श्रमिकांत त्यांच्या अवजारांची पूजा होते. एवढेच नव्हे तर शेतकरी शेतात येणाऱ्या पिकांचीही पूजा शेतजमिनीएवढीच करतात.

उपजीविका व ती पुरवणारी जमीन हाच समाजाच्या श्रद्धेचा व पूजेचा विषय होतो. यातला श्रद्धेचा भाग धर्माचा तर उपजीविकेचा भाग उपयुक्तता व जीवन हा असतो. आपल्या संतांपैकी एक सावतामाळी म्हणतो, ‘कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी.’ उदरभरण हेच यज्ञकर्म आणि अन्न हेच पूर्णब्रह्म याचाही अर्थ नेमका हाच आहे.

श्रद्धा, धर्म व दैवते यांची निर्मिती ही सगळ्याच निर्मितींसारखी मानवी गरजेतून होते. त्यातही उपजीविका ही माणसाची सगळ्यात मोठी गरज आहे. आजच्या वर्तमानातही सगळी माणसे कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली असतात… त्याचेही कारण उपजीविका हेच असते. आपल्या कामाचे व कष्टाचे फळ स्वतःकडे न घेता कोणा ईश्वराकडे सोपवणे हा त्यांच्यावरील धर्माच्या संस्काराचा भाग असतो.

संकटाचा सामना करताना, दुष्काळांना तोंड देताना, थंडीवाऱ्यापासून बचाव करताना माणसे ईश्वराचे नामस्मरण करतात. डिंका जमातीत तर बैलाचा बळी देऊन आपल्या इष्ट देवतेचे स्मरण केले जाते. काम आपण करायचे, दुःखे आपण सोसायची आणि ते करण्याची ताकद दिल्याबद्दल दैवतांचे आभार मानायचे हा प्रकार सार्वत्रिक आहे. एवढ्‌यावरही हे थांबत नाही. आपल्या श्रमाच्या कमाईचा काही भाग… मग तो थोडा का असेना… ईश्वरासाठी माणसे राखून ठेवतात. मोठे उद्योगपती तर देवाला आपल्या धंद्यात एक वा दोन टक्क्यांचे भागीदारही बनवतात. भारतातील व एकूण जगातील श्रद्धास्थाने यांतूनच श्रीमंत झाली.

साऱ्यांना धर्माचे सांगणे एकच असते- ‘नेकी कर और दरिया में डाल.’ तू प्रामाणिकपणे जग आणि जे मिळवायचे ते मिळव… मात्र त्याचे श्रेय व काही भागही ईश्वराला दे. यात ईश्वर हा मागणाराही नसतो, त्याच्या नावाने मागणारे दलाल व पुरोहित हे कमावणाऱ्यांचीच कमाई खात असतात.

डेंगडिट ही डिंका या अफ्रिकन जमातीची मूळची पुरुष देवता आहे. दैवताचे स्वरूप येण्याआधी ती लोकनेत्याच्या व समाजाच्या पालकाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारी होती. समाज सर्वस्वी तिच्या आज्ञेत व तिच्या भरवशावर जगणारा होता. त्याच्या काळात अन्नधान्य, फळफळावळ, दूधदुभते, गायी व मांस यांची समृद्धी होती. या समृद्धीची प्राप्ती डेंगडिटमुळे व त्याच्या मार्गदर्शनानुसार वागण्यातून आली आहे असे समाज समजत होता. या लोकनेत्याला कालांतराने पुढच्या पिढ्यांनी दैवताचे रूप दिले. त्याची पूजा केली जात नाही… पण त्याविषयीची पूज्य बुद्धी साऱ्यांच्या मनात आहे. आजच्या आपल्या संपन्नतेसाठीही त्याची कृपाच कारणीभूत आहे असे तो समाज मानतो.

इ.स.पू. आठव्या शतकात झालेला आपला पाणिनीही म्हणाला, ‘समाजातील कर्त्या पुरुषांनाच समाज आपले देवत्व बहाल करतो. कृष्ण व अर्जुन ही त्याचीच उदाहरणे आहेत. वेदांमध्येही वरुणाचे स्वरूप या डेंगडिटसारखे आले आहे. पाऊसपाणी समाधानकारक, पिके चांगली, गुरेगायी, दूधदुभते व मांस हे सारे मुबलक होते. सबब वरुणाला वैदिकांनी आपले आद्य दैवत मानले. पुढे जीवनावश्यक गोष्टींसाठी व विशेषतः गायींसाठी त्यांना लढाया कराव्या लागल्या तेव्हा त्यांनी वरुणाची जागा इंद्र या लढाऊ नेत्याला दिली.

डेंगडिट आणि वरुण यांचे साम्य इथे लक्षणीय आहे… मात्र वरुण हा देव झाला, डेंगडिट आजही समाजाचा आद्य व कर्ता पुरुष राहिला आहे. पशुपालकांच्या जमातींची समृद्धी व त्यांच्यावर येणारी दुष्काळी आपत्ती त्यांच्या दैवतात जे बदल घडवते ते मानवाकडून होणारी ईश्वराची निर्मिती सांगणारे आहे.

तोडा या निलगिरीवरील जमातीची स्थितीही अशीच काहीशी आहे. तेऊ हे त्या जमातीचे दैवत. ते मुळात या जमातीचे आद्यपुरुष आहे. जमातीतील इतरांसोबत तेही गायींची गुरे व म्हशींचे कळप बाळगणारे आहेत. त्याच्या नेतृत्वात तोडा समाजातील सगळ्या चालीरिती व वागणुकीचे नियम निश्चित झाले आहेत. आरंभी जमातीचे सगळे पुरुष तेऊ असत. त्यांच्या बैठकी होत. त्यांत समाजाचे नियम निश्चित होत. पुढे सामान्य माणसेही त्यात सहभागी व्हायला लागले. (नक्की काय म्हणायचंय?) दीर्घकाळपर्यंत तेऊ व साधे तोडा एकत्र राहिले… मात्र तेऊंना तोडांनी ईश्वर मानले नाही, माणूस मानले. इथे त्यांची तुलना वैदिक देवतांशी करता येणारी आहे.

ऋग्वेदात सामान्य माणूस इंद्राला पाचारण करताना ‘मी इंद्र या मानवाला पाचारण करतो…’ असे म्हणतो. इंद्राला देवांच्या राजाचे व सर्वश्रेष्ठ ईश्वराचे रूप येण्याआधी रचलेल्या या ऋचा आहेत हे उघड आहे. पाणिनीच्या म्हणण्यानुसार समाजाच्या नेत्यांचे म्हणजे माणसांचे ईश्वरीकरण करण्याचाच हा प्रकार आहे. तो सार्वत्रिक आहे. रामायणातील रामही स्वतःचे वर्णन अहम्‌मानुषम्‌मन्ये (मी माणूस आहे…) असेच करतो. कृष्ण ही तर ऐतिहासिक व्यक्तीच आहे. थोरामोठ्यांचे पुतळे (मोठ्या मूर्ती) लावण्यामागची माणसांची मानसकिता याहून वेगळी नसते.

इंद्रासारखे वैदिकांनी अग्नीलाही मानव मानले आहे. त्याच्याकडे संपत्तीची, पुत्राची व गोधनाची मागणी केली आहे. मित्राला आणि वरुणाला त्यांनी घरे मागितली आहेत. इंद्राला आणि विष्णूलाही सुखे व संपन्नता द्यायला विनवले आहे. अश्विन आणि अगस्त्य यांनाही मानवश्रेष्ठ म्हटले आहे. पशुपालकांचे देव असे मानवी असतील वा समाजाने आपल्यातील श्रेष्ठ व पराक्रमी पुरुषांना दैवी ठरवले असेल तर त्यातून बरेच आधुनिक अर्थ संभवणारे आहे. इतर धर्मांतील दैवतांचे मग वैज्ञानिक अर्थ लावता येणारे आहेत.

Iconography of the Vedic Deities | Red Zambalaऋग्वेदात इंद्राच्या पराक्रमाचे व संरक्षण क्षमतेचे वर्णन फार मोठ्या प्रमाणात आले आहे… मात्र त्याच वेळी त्याचे सामान्यजनात मिसळणे त्यांच्याकडून सोमरस व मेजवान्या घेत. त्यांच्यात रमणे व त्यांच्यात राहणेही त्यात आले आहे. युद्धात तो राजा व सेनापती असला तरी इतर वेळी तो समाजाचा नेताच राहिला आहे. इंद्राला युद्धात मरुताची मदत होते व त्याच्या साहाय्याने तो शत्रूचा पराभव करतो असे म्हटले आहे.

सायणाचार्यांच्या मते हे मरुत गणात राहणारे, समता पाळणारे, देवांना साहाय्य करणारे साधे मर्त्य पण शूर लोक होते. कालांतराने त्यांनाही दैवताचे रूप व दर्जा या गोष्टी प्राप्त झाल्या. हीच गोष्ट रिभू या दैवत रूपाला दिलेल्या माणसाची आणि तीच अश्विनाचीही. देव म्हणवणारी बाब मानवश्रेष्ठांची प्रचिती असेल तर ईश्वर ही कल्पना गाठते व ती माणसांच्या जवळ येऊन त्याची होते.

डिंका किंवा अफ्रिका या जमाती तोडासारख्याच अशा नेत्यांकडे विनवण्या करणाऱ्या आहेत… पण त्यांना प्रार्थनेचे वा ईश्वरोपासनेचे रूप नाही. त्या सामान्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या मागण्याच आहेत. याचा एक अर्थ हा की, डिंकांचे नेते देव व्हायचे राहिले आणि वैदिक पशुपालकांच्या नेत्यांना ईश्वराचा दर्जा प्राप्त झाला. ईश्वराचे हे मानवी रूप लक्षात घेतले की मग त्याच्याभोवती गुंतलेल्या भक्ती व ईश्वरी वरदानांच्या कथाही जुळत जातात.

अग्नीचे खरे स्वरूप लक्षात आले की, त्यातली देवता जाते आणि पावसाचे खरे आकलन झाले की वरुणाचे दैवतपण जाते. इंद्राचे माहात्म्य अधूनमधून जाणवते… मात्र शांततेच्या काळात तेही लोप पावते. कैलासावर बसलेला व जगाच्या संहाराची व्यवस्था करणारा शंकर मग तिथल्या लोकांचा भाग होतो. समुद्राच्या तळाशी शेषनागावर झोपून जगाच्या कल्याणाची काळजी करणारा विष्णू पोथ्यांमध्ये येतो आणि ब्रह्मदेव कधी कवितेचा तर कधी त्याचे चारित्र्य समजले तर तुच्छतेचाही भाग येतो. मग गणपती ही ज्ञानाची देवता न राहता जेत्यांचे कुलचिन्ह होते आणि सरस्वतीचा ज्ञानाधिकार संपतो.

असला प्रकार पाश्चात्त्यांच्या धर्मग्रंथांमध्येही आहे. समुद्राची भरती व ओहोटी हा पेसोकेन या दैवताच्या लहरीचा परिणाम आहे असे तिकडे मानले गेले… पण भरतीचे व ओहोटीचे नाते पौर्णिमेचे व अमावस्येचे आहे. हे लक्षात येताच त्या समाजाने पेसोकेनला सुट्टी दिली. आपल्याकडेही प्रभू रामचंद्र आणि त्याची तीन भावंडे  प्रत्यक्ष कशी जन्माला आली असती, सीता भूमिकन्या कशी झाली असेल, कौरवपांडवांचे जन्म कसे झाले असतील आणि द्रौपदी व तिचा भाऊ कसा जन्माला आला असेल हेच मग उघड होते. कंसाचा, द्रोणाचार्यांचा व कृपाचार्यांचा जन्मही मग स्पष्ट होतो.

जन्म, मृत्यू, आजार, वृद्धत्व व वंध्यत्व, पुत्रप्राप्ती, औषधी द्रव्ये, पिके, निसर्गातील फेरबदल, ऋतूंचे चक्र, मन, बुद्धी, मेंदू, हृदय इत्यादी गोष्टींबाबतची सगळी प्राचीन मते व प्रमेये तर्काच्या एकेका पावलासोबत उलगडत गेली. त्यांची दैवी रूपे लोपत जाऊन त्यांची मानवी अवस्था साऱ्यांना जाणवू लागली. नंतरच्या काळात विज्ञानाचा प्रत्येक शोध ईश्वरविषयक एकेक उपपत्ती वा धर्मातील एकेक संत उडवून लावू लागला.

गॅलिलिओने पृथ्वी सूर्याभोवती फिरते व ती गोलाकार असल्याने व स्वतःभोवती फिरत असल्याने तिच्यावर दिवस व रात्रही होतात असे म्हटले तेव्हा बायबलातले ईश्वराने दिवस व रात्र उत्पन्न केले हे म्हणणे चुकीचे ठरले. आरंभी ते श्रद्धावानांना स्वीकारणे जड गेले… पण पुढे श्रद्धाच विज्ञानापुढे नमते घेताना दिसते. फार दूर जाण्याचे कारण नाही. भारतात रेल्वे आली तेव्हा खेड्यातील माणसे गाडीच्या इंजिनाची पूजा करून त्याच्याच पुढे नवस बोलताना दिसली. वाफेने चालणारे हे इंजीन आत्मशक्तीच्या बळावर गाडी ओढते हाच तेव्हाचा त्यांचा समज होता.

सूर्य, चंद्र, तारे, ग्रह या साऱ्यांसंबंधी विज्ञानाने लावलेले शोध त्यांचे ईश्वरी रूप नाकारत गेले व त्यांचे ‘जगत्‌ सत्यम्‌’ असे स्पष्ट करत राहिले… मात्र धर्मश्रद्धा आणि ईश्वर या संकल्पनेवरचा आंधळा विश्वास जगातील अनेक सुशिक्षितांना व पदवीधरांनाही त्यांचे हे खरे स्वरूप संपूर्णपणे अजूनही स्वीकारू देत नाही आणि नाइलाजाने त्यांनी ते स्वीकारले तरी या नव्या सत्यांच्या बाजूने एकही बोलत नाही.

भारतात खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, औषधी विज्ञान व वैद्यकशास्त्रच नाही तर शस्त्रक्रियेचेही ज्ञान एके काळी लोकमानसात होते व त्याचा उपयोगही होत होता. पुढे धर्मश्रद्धांनी या साऱ्यांवरच आपला भगवा रंग फासून त्या संपवल्या किंवा धर्माश्रयी केल्या. चमत्कार ही ढोंगाची निर्मिती आहे असे संतांनीही नंतरच्या काळात म्हटले. चमत्कार करणाऱ्यांना व सांगणाऱ्यांना संतांनी कमालीची अभद्र नावेही ठेवली… पण श्रद्धांचा प्रभाव संतांचाही पराभव करून गेला. तिकडे गॅलिलिओपासूनचे संशोधक बायबलवरील श्रद्धेने पुढे येऊ दिले नाही. अरबस्तानात तत्त्वज्ञान होते. गणित, विज्ञान, बीजगणित, अल्गोरियन, भूमिती, झेनिथ, एलिक्झे, अल्कोहोल ही सारी त्यांचीच निर्मिती… पण इस्लामने ती झाकोळून टाकली.

धर्म व धर्मश्रद्धा विज्ञानाला व तर्कविचारांना जगात सर्वत्र अशा मागे रेटत राहिल्या. सत्य धर्माऐवजी धर्मसत्याचीच बाब त्या समाजमनावर ठसवत राहिल्या. या संघर्षात सत्य अजून पूर्णपणे विजयी होत नाही. श्रद्धांचा पगडा, ईश्वराचे गारुड, मंदिर-मशीद आणि चर्चेसचे मानवी मनावरचे ओझे अजून उतरत नाही. या ओझ्यात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यांची ताकद मोठी आहे. धर्म, सत्ता, परंपरा आणि मानसिकता यांचे त्यांच्या पाठीशी असलेले बळ मोठे आहे… शिवाय हा संघर्ष संपणाराही नाही. दर वेळी नवनवीन संशोधने तो जागवत राहणार आहे आणि त्यांना दडपून टाकू पाहणाऱ्या शक्तीही त्यांचे बळ वाढवत नेणार आहेत. समाजाला काही बाबींसोबत जगावेच लागते असे म्हणतात. हा संघर्ष ही त्यातली सर्वात मोठी व महत्त्वाची बाब आहे.

चार्वाकांची परंपरा जेवढी जुनी तेवढ्याच नास्तिकांच्या जुन्या परंपरा साऱ्या जगात व सगळ्या काळात झाल्या. त्यांचे अवशेष अजून बाकी व इतिहासाच्या स्मरणात आहेत… मात्र त्यांना श्रद्धेवर निर्णायक विजय मिळण्याची शक्यता सोळाव्या शतकापासून म्हणजे विज्ञानयुगाच्या आरंभापासूनच सुरू झाली… पण त्या विजयाचे अखेरचे पर्व अजून दूर व अज्ञातात आहे.

तोडा जमात म्हशींचे पालन करत. म्हशी व त्यांची पिल्ले सुरक्षित राहावीत, त्यांची संख्या वाढावी, त्यांच्या दुधाने समाजाला समृद्धी यावी अशा प्रार्थना त्यांनीही केल्या आहेत… मात्र त्यांच्याकडेही ईश्वर नाही. त्यांना जगवणाऱ्या म्हशींचे संवर्धन करणाऱ्या शक्तीच तेवढ्या त्यांच्यात पूजनीय आहे. म्हशींचे व त्यांच्या रेडकूंचे कल्याण होवो, त्यांना पुराचा व अन्य नैसर्गिक संकटांचा त्रास न होवो किंवा गवत भरपूर उगवू दे यासारखी त्यांची गीते व वैदिकांनी गायींसाठी ईश्वराकडे केलेल्या प्रार्थना यांतले साम्य भरपूर बोलके आहे.

डिंकांच्या अशा प्रार्थना मौखिक आहेत… कारण त्यांची लिपी अद्याप निर्माण झाली नाही… मात्र तोडा, डिंका आणि प्रचंड धार्मिक वाङ्‌मय निर्माण करणारे वैदिक, आर्य या साऱ्यांची मागणी उपजीविकेची व ती पुरवणाऱ्या प्राण्यांची व व्यवस्थापनाची आहे हे उघड आहे.

ऋग्वेदातील एक तृतीयांशाहून अधिक ऋचा अन्नाची, संपत्तीची, सुखसोयींची व पराक्रमी पुत्रांची मागणी करणारे आहे. वेदांच्या उत्तरकालीन भागात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आले आहेत… (वैदिकांना जडवादाच्या म्हणजे उपजीविकेच्या उपासनेची आराधना करण्याच्या जवळ नेणाऱ्या अशा किमान तीन हजार ऋचा ऋग्वेदात दाखवून देता येतात…) मात्र यांतील अर्थ व काम या पुरुषार्थांना मानणाऱ्यांना धर्म व मोक्ष यांहून कमी दर्जाचे ठरवण्यात आले आहे. प्रत्यक्षात वेदांच्या आरंभीच्या भागात मोक्ष हा शब्दही आला नाही. त्याऐवजी येणारा ब्रह्म हा शब्द अन्न या अर्थाने वापरला गेला आहे. या सर्व बाबी वेद व वैदिक यांचेही आरंभीचे स्वरूप जडवाद्यांचे व जगाच्या सुखसमृद्धीची आराधना करणाऱ्यांचेच आहे हे स्पष्ट करणारे आहे.

मोक्षासारख्या उत्तरकालीन कल्पना समाजाला स्थैर्य, समृद्धी व सुरक्षितता लाभल्यानंतरच्या काळातील आहेत. याच काळात कष्ट करणारे व कष्टकऱ्यांवर नियंत्रण ठेवणारे दोन वर्गही निर्माण झाले आहेत. त्यांच्यातील विषमताही तेव्हाचीच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे वर्ग वरचे तर क्षुद्र व क्षुद्रातीत क्षुद्र हे कष्टकरी खालचे ठरवण्यात आले आहेत. पुढील काळात या कनिष्ठ वर्गांना वेदांचे अध्ययनही वर्ज्य ठरवले गेले. त्यामागे जी कारणे आहेत… त्यांतील एक महत्त्वाचे कारण त्या वर्गाला वरिष्ठांची आरंभीची कष्टकरी अवस्था व ती मागे टाकून त्याने मिळवलेले नंतरचे वरिष्ठपण त्यांच्या लक्षात येऊ नये हेही आहेच.

कोणत्याही समाजाची उत्पादकता वाढते व तो आपल्या गरजेहून जास्तीचे उत्पादन करू लागतो तेव्हा त्याला जास्तीच्या उत्पादनाचे रक्षण, सोय व त्याच्या व्यवस्थेसाठी संस्था लागतात. या संस्थाच साऱ्या एकात्म कष्टकरी समाजात वर्गवादी निर्माण करतात. उत्पादन करणारे व उत्पादनाचे रक्षण करणारे हे रक्षणकर्तेच मग पुढे त्याचे मालक, व्यापारी, दलाल व साठेबाज होतात. त्यांच्या रक्षणासाठी ते राज्य, सत्ता व धर्म यांसारख्या सोयी उभ्या करतात. या जन्मात शिक्षेची तर मृत्यूनंतर नरकाची भीती मनात भरवून मग कष्टकऱ्यांना नमवले जाते.

वर्गहीन समाजाचे वर्गीय समाजात असे रूपांतर झाले की मग देव, धर्म, श्रद्धा व पूजा या साऱ्या गोष्टी निर्माण होतात. धनवंतांचे वर्ग आपल्या सुखसोयी सांभाळायला त्यांचा आधार घेतात तर वंचितांचे वर्ग किमान आपले जीवन मृत्यूनंतर तरी आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून त्याचा आसरा घेतात. जरा काळजीपूर्वक आपल्या वर्तमानकाळातील पूजाअर्चा व त्यांतील प्रार्थना पाहिल्या तर काय निघते?

ही सारी नुसती नसलेल्या ईश्वराकडे सोपवलेली मागणीपत्रेच तेवढी असतात. सुखाची रक्षा कर, दु:खाचे निराकरण कर, संपत्तीत वाढ कर, पीक चांगले येऊ दे, पाऊस चांगला पडू दे अशाच मागण्या त्यात असतात. अगदी ज्ञानेश्वरांसारखी विश्वाची चिंता वाहणारे संतही त्यांच्या पसायदानात दुरितांचे तिमिर जावो, विश्व सधर्म सूर्ये पाहो। असे म्हणून अखेर वरिष्ठांना चांगले वागव आणि मलाही सुखी कर असे म्हणतो. सगळे संत, महंत व पोथ्यापुराणे याचसाठी लिहिली जातात. साध्या धार्मिकांच्या मनात ते धर्मग्रंथ व तीच ईश्वरोपासना असते… मात्र प्रत्यक्षात त्यात वर्गही दडलेले असतात हे कोणी लक्षात घेत नाही.

दुर्गे दुर्घट भारी, तुजवीण संसारी म्हणून मज कोण तारी असे देवीच्या आरतीत किंवा सुखकर्ता, दुःखहर्ता असे गणपतीच्या उपासनेत का म्हटले जाते? ही मागणी नसते तर दुसरे काय? शिवाय ज्या ईश्वराकडे ती केली जाते ते दैवत ते पूर्ण करायला फारसे सक्षम नसते हे ज्ञानी माणसांनाही कळत नसते काय? की परंपरा टिकवायची म्हणून हे करायचे असते… शिवाय अश्रद्ध ही अजूनही आपल्या समाजात शिवी मानली जाते. धर्माची सांगड अकारण नीतीशी जोडल्याने अशी माणसे मग अनैतिक ठरवली जातात. तसे होण्यापेक्षा ‘जा एकदा त्या देवाला शरण…’ हे करणे सोपे असते.

एक गोष्ट या जागी चपखलपणे बसणारी नसली तरी नोंदवण्याजोगी आहे. वर्ग जेवढे लहान तेवढा त्यांच्या दैवतांचा जन्म लवकर होतो व त्यांच्याविषयीची लोकश्रद्धाही टोकाची असते. मोठे धर्म त्यांच्या वर्गवार वा जातवार दैवतांची उभारणी करतात. साऱ्या धर्माचा एक ईश्वर उभा केला तरी कोणी प्रेषित असतो. तो बहुधा त्या परमेश्वराहून अधिक मोठ्या निष्ठेचा मालक होतो. इस्लाममध्ये पैगंबर, ख्रिश्चनांमध्ये येशू, ज्यूंमध्ये मोझेस ही त्याची उदाहरणे आहेत.

हिंदू धर्मात काही देव साऱ्यांचे असले तरी प्रत्येक जातिवर्गाचे स्वतःचे देव आहेत… तर काही गावांच्याही इष्टदेवता आहेत. हिंदूंच्या दैवतांची संख्या तेहतीस कोटी आहे असे म्हटले जाते. या दैवतांनी समाजाचे रोजचे जीवन बांधलेले असते. त्यावर उठायचे तर जवळच्यांशी व आप्तांशीही वैरे घ्यावी लागतात.

विज्ञानाला दैवत नसते. ती एक बरीचशी अधार्मिक, अश्रद्ध पण कमालीची विश्वसनीय बाब असते. दुःख याचे की, ती कधी श्रद्धेचा विषय होत नाही. तसे तिने होऊही नये ही यथाकाल एक उपयुक्त बाबच तेवढी असते.

(चार्वाक लेखमालेतील अगोदरचे भाग ‘मीडिया वॉच’ वर उपलब्ध आहेत . ही लेखमाला पुस्तकस्वरुपात येत्या २० तारखेला साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. )

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)
98224 71646

Previous articleमोदी, मिर्दाल आणि ‘आयडिया ऑफ इंडिया’
Next articleमाझ्या महिला सहकारी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here