(साभार: साप्ताहिक साधना)
-शेखर गुप्ता
पी.व्ही. नरसिंह राव हे काही आपले सर्वाधिक मितभाषी पंतप्रधान नव्हते. तो मान डॉ.मनमोहन सिंग यांच्याकडे जातो, आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवणारे अर्थमंत्री या नात्याने त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. पण राव हे ऑन रेकॉर्ड बोलण्यासाठी सर्वाधिक नाखूष असलेले दुसरे पंतप्रधान म्हणता येतील. ज्यांच्याशी माझी व्यक्तिशः ओळख होती असे ते पहिले पंतप्रधान. ते पंतप्रधान असताना त्यांनी मला ‘इंडिया टुडे’मध्ये छापण्यासाठी एक मुलाखत दिली होती, पण त्यातील बराच भाग त्यांना आधी प्रश्न पाठवले आणि त्यांनी त्याची लिखित उत्तरे पाठवली असा होता; त्यानंतर अर्धा तास अनौपचारिक संवाद व छायाचित्रे काढण्यासाठी दिला होता. पण त्यांचा अनुभव, त्यांची बुद्धिमत्ता आणि आनंददायक असे खोडकर वाक्प्रचार किंवा वाक्यप्रयोग करण्याची त्यांची सवय, यामुळे त्यांच्याशी झालेला प्रत्येक संवाद माझे एक प्रकारचे शिक्षण ठरायचा.
भारतातील आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राचा संपादक म्हणून काम करीत असतानाही माझे शिक्षण चालूच आहे. त्यामुळे नरसिंह राव यांच्याशी मी संपर्क ठेवून होतो, ते सत्तेवरून पायउतार झाल्यावर आणि काँग्रेस पक्षाने त्यांना अडगळीत टाकल्यावरही. अखेर माझी चिकाटी फळाला आली आणि ते या मुलाखतीसाठी तयार झाले. कॅमेऱ्यासमोर त्यांनी दिलेली, पूर्ण लांबीची म्हणावी अशी ही पहिली मुलाखत आहे. नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी घेतलेली ही इंग्रजी मुलाखत 8 मे 2004 रोजी एनडीटीव्ही वरून प्रसारित करण्यात आली. ते विविध विषयांवर मोकळेपणाने बोलले, त्यात शहाणपण होते. पण वेगवेगळ्या प्रकारे विचारूनही एका प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. तो प्रश्न असा की, ‘1995 मध्ये तुम्ही पंतप्रधान असताना भारताने अणुचाचण्या करण्याचा घेतलेला निर्णय, अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी आणलेल्या दबावामुळे रद्द केला का?’ त्या प्रश्नावर त्यांनी मला एक वाक्य ऐकवून गप्प केले. ते वाक्य असे, ‘अरे भाई, कुछ तो मेरे साथ चिता मे जलने दो!’
………………………………………………..