खबर लहरिया… महिलांनीच चालवलेलं देशातलं एकमेव न्यूजपोर्टल

‘खबर लहरिया’च्या ब्युरो चीफ मीरा देवी यांच्याशी संवाद…

……………………………………

साभार:’कर्तव्य साधना’

(मुलाखत व शब्दांकन – हिनाकौसर खान-पिंजार)

‘ये तो कम जात औरत है, इनमें क्या दम है सवाल पूछने का?’ प्रश्नकर्त्या महिलेला उलट प्रश्न करणारी ही कडवी पुरुषी-जातीय व्यवस्था… त्या व्यवस्थेत झिरपत गेलेली पारंपरिक, अरुंद मानसिकता… जिथं पुरुषांनी ठरवलेल्या चौकटीत स्त्रियांनी राहणं आणि तिची वाहक होत राहणं अग्रगण्य मानलं गेलं. याला याच व्यवस्थेतल्या दलित, आदिवासी, मुस्लीम स्त्रियांनी आव्हानं दिलंय. ही तोडून टाकण्यासाठी या महिलांनी लेखणीचा हात धरला आणि बघता-बघता आपल्या अस्तित्वाची ‘खबर’ ‘लहरिया’ करून टाकली.  

खबर लहरिया देशातलं एकमेव न्यूजपोर्टल जे फक्त महिलांनीच चालवलंय. रिपोर्टिंग, एडिटिंग, प्रॉडक्शन आणि मग सोशल माध्यमांवरून त्याचा प्रचार… सारं काही महिलाच करतात. 2002मध्ये ‘खबर लहरिया’ हे प्रथम छापील स्वरूपात साप्ताहिक बातमीपत्र म्हणून प्रकाशित झालं. उत्तर प्रदेशमधल्या चित्रकूट जिल्ह्यातल्या कारवी या गावातून ‘खबर लहरिया’चा पहिला अंक निघाला. संपादक कविता देवीनं आपल्या वर्तमानपत्राच्या कामकाजाची रचना महिलाकेंद्री ठेवली… तीही दलित, मुस्लीम, आदीवासी अशा उपेक्षित महिलांना घेऊन. याचं दुसरं विशेष असं की, हे बातमीपत्र हिंदी भाषेच्या बुंदेली या बोलीभाषेतून निघायचं. 2012मध्ये बुंदेली, अवधी, भोजपुरी या भाषांतून उत्तरप्रदेशमधल्या महोबा, लखनौ, वाराणसी, बांदा जिल्ह्यांतही हा अंक प्रकाशित व्हायला लागला. बिहारमध्येही स्थानिक भाषेत प्रकाशित व्हायला लागला. सुरुवातीला चार पानी असणारा अंक अल्पावधीतच आठपानी झाला.

खबर लहरियाची टीम2016मध्ये या बातमीपत्रानं पूर्णतः डिजिटल रूप धारण केलं. त्यासाठी खबर लहरियाचं व्हिडिओ चॅनेल आणि व्हिडिओ रिपोर्टिंग सुरू केलं. तीन महिलांनी सुरू केलेलं हे बातमीपत्र आज तीस जणांच्या स्टाफसह काम करत आहे. त्यात उत्तरप्रदेशातल्या आणि मध्यप्रदेशातल्या मिळून एकूण 13 जिल्ह्यांचं वार्तांकन केलं जातं.

स्त्रीवादी दृष्टीकोन आणि ग्रामीण पत्रकारिता ही त्यांची बलस्थानं आहेत. आज खबर लहरियांच्या महिला पत्रकारांनी पितृसत्तेशी प्रचंड संघर्ष करत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. चमेली देवी जैन पुरस्कार, युनेस्को पुरस्कार, लाडली मिडिया पुरस्कार, कैफी आझमी इंटरनॅशनल पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवलं गेलंय. इतकंच नव्हे तर ‘खबर लहरिया’वर झालेल्या ‘रायटिंग विथ फायर’ या डॉक्युमेंटरीला 2021च्या सुदान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ऑडिअन्स अ‍ॅवॉर्ड’नं पुरस्कृतही करण्यात आलं.

साधना साप्ताहिकाच्या आणि कर्तव्य साधनाच्या वर्धापनदिनानिमित्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर ग्रामीण पत्रकारितेसाठी झोकून दिलेल्या ‘खबर लहरिया’विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी ‘खबर लहरिया’च्या ब्युरो चीफ मीरा देवी यांच्याशी संवाद साधला. मीरा देवी स्वतः गेल्या पंधरा वर्षांपासून खबर लहरियामध्ये कार्यरत आहेत. पॉलिटकल सायन्समधून एमए केलेल्या मीरा देवी यांचा शोधपत्रकारिता हा विशेष आहे.

प्रश्न – मीरा देवी,‘खबर लहरिया’ या बातमीपत्राचा जन्म कसा झाला?

उत्तर प्रदेशमधल्या चित्रकूट जिल्ह्यातल्या कारवी या छोट्या गावात ‘खबर लहरिया’चा पहिला अंक निघाला. दिवस होता 30 मे 2002. ‘खबर लहरिया’च्या संपादक कविता देवी, मीरा देवी जटाव या दोघींनी हा अंक काढला होता. कविता देवींच्या गावी प्रौढ शिक्षणासाठी एक संस्था आली होती. तिथं ‘महिला डाकिया’ नावाचं एक न्यूजलेटर निघायचं. त्यात हातानंच लेखन केलेलं असायचं आणि चित्रं काढलेली असायची. लेखन बुंदेली भाषेत आणि तिथल्या स्थानिक घडामोडींविषयीचं असायचं. मात्र काही कारणास्तव हे न्यूजलेटर बंद पडलं. पण देसी भाषेत असल्यामुळं लोकांना ते आवडलं होतं. कविता देवींनी त्या न्यूजलेटरचं काम केलं होतं. ते पुन्हा सुरू व्हावं अशी मागणी यायला लागली. मग ‘निरंतर’ या एनजीओचा अथक पाठपुरावा करून त्यांच्या मदतीनं चार पानांचं ‘खबर लहरिया’ सुरू झालं. सुरुवातीला तीनच महिला होत्या. कविता देवी, मीरा जटाव आणि शांती. वेगवेगळ्या स्थानिक मुद्द्यांवर आणि स्थानिक भाषेत अंक निघत असल्यामुळं लोक तो वाचायला लागले. संघर्ष करत-करतच व्यापही वाढला. ऑफिस मिळालं. उत्तरप्रदेशातल्या आणि मध्यप्रदेशातल्या 13 जिल्ह्यांमध्ये प्रसार झाला. 2016मध्ये छापील अंक बंद करून पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर उतरलो.

प्रश्न – ‘खबर लहरिया’ची खासियत ही आहे की, पूर्वी प्रिंट किंवा आताचं डिजिटल पोर्टल… इथं फक्त महिलांची टीम आहे. त्यामागची भूमिका काय?

बिलकुल, ए टू झेड सर्व कारभार महिलाच बघतात. पुरुषप्रधान व्यवस्थेत आम्हाला महिलांची वेगळी जागा निर्माण करणं आवश्यक वाटत होतं. आम्ही आमच्या कार्याची आणि उद्दिष्टांची घटना ‘लहर’ या नावानं डॉक्युमेंट करून ठेवली आहे. यामध्ये आमच्या भूमिका, उद्देश लिहून ठेवलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आमच्या भागात पत्रकारितेला महिलांचं क्षेत्र मानलंच जात नाही. शिवाय इथं त्यांना घराच्या चौकटीतच बंद करण्यात धन्यता मानली जाते. त्यांनी कुठलं काम करायचं, कुठलं नाही याचीही एक चौकट तयार असते. त्यांनी जॉब केला तरी त्यांची मानिसकता तशीच पारंपरिक. तिनं नोकरीही विशिष्ट पद्धतीचीच करायची. ती काय फार तर टिफीन बनवू शकते, शिक्षिका किंवा नर्स होऊ शकते. म्हणजे अगदी ठरावीक पद्धतीच्याच नोकर्‍या. स्त्रियांच्या अशा विशिष्ट प्रतिमेला छेद देण्यासाठी, पारंपरिक मानसिकता तोडण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच फक्त स्त्रियांना समाविष्ट केलं. आमच्या संस्थेत रिपोर्टिंग करणाऱ्या कमी शिकलेल्या महिलासुद्धा आहेत. अर्थात अलीकडं उच्च शिक्षण घेतलेल्या महिलासुद्धा आहेत.

आणखी एक गोष्ट म्हणजे, बर्‍याचदा समाजात उच्च मानल्या जाणार्‍या जातवर्गातल्या व्यक्तींनाच नोकर्‍यांमध्ये किंवा पत्रकारितेत काम मिळतं, स्थान मिळतं. आम्ही खबर लहरियामध्ये मात्र गावाकडच्या, कमी शिकलेल्या, दलित-आदिवासी असणार्‍या स्त्रियांनाही जागा देणं महत्वाचं मानतो. नुसतीच जागा नव्हे तर या स्त्रियांचा स्वतःचा विकास कसा होईल, त्यांची आर्थिक उन्नती कशी होईल, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा कशा रुंदावतील हेही बघतो… महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरातून, गावातून बाहेर काढतो. त्यांना समाजात मानसन्मान मिळेल; समाजाचा दृष्टीकोन बदलेल; त्यांच्याविषयीच्या पारंपरिक धारणांचं उच्चाटन होईल यासाठी व्यासपीठ देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मुख्यत्वेकरून मुख्य प्रवाहात स्त्रियांना सशक्तपणे आणणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

…शिवाय अशी कितीतरी दैनिकं/माध्यमं आहेत जिथं मोठ्या प्रमाणात पुरुषच पत्रकार आहेत. स्त्रियांना तिथं स्थान नाही. असलंच तर ते प्रमाण फार कमी आहे. याही कारणानं आम्ही आमचा प्लॅटफॉर्म फक्त आणि फक्त स्त्रियांसाठीच ठेवायचं ठरवलं आहे. काही  वेळा आम्हाला यावरून विचारणा होते, तुम्ही पुरुषांना का डावलताय, त्यांना नजरअंदाज करताय, यामागं काही छुपा हेतू आहे का अशा शंकाही उपस्थित केल्या जातात. अशा लोकांना समजावणं फार अवघड असतं. अर्थात काही जण खरोखरच जाणून घेण्याच्या उद्देशानं विचारतात. पण बऱ्याचदा लोक निर्भर्त्सना करण्याच्या उद्देशानं हसत, मजा घेत खिल्ली उडवतात. एकूण असं चित्र असलं तरी आम्ही आमचं स्वरूप बदलणार नाहीयोत. आम्ही महिलांच्याच सोबतीनं आमचा प्रवास करणार आहोत.

प्रश्न – तुमचा उद्देश महिलांना सोबत घेऊन पुढं जाण्याचा आहे हे तर स्पष्ट आहे मात्र सुरुवातीच्या काळात महिलांना घराच्या चार भिंतींमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले का?

खूप आव्हानं होती आणि खूप लढाया लढाव्या लागल्या, अजूनही खूप लढायच्या आहेत. सर्वात आधी तर स्वतःशीच लढावं लागतं. स्वतःलाच चौकटीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आता बघा, मी घरातून बाहेर पडतीये, इतर चार लोकांशी बोलतीये-हसतेय तर लोकांना हे सगळं गैर वाटतं…आणि कामाचं स्वरूप असं आहे की, कधी सुरू होईल आणि कधी संपेल याचं नेमकं उत्तर माहीत नाही. एखाद वेळेस रात्र होऊ शकते किंवा रात्रीच अचानक जावं लागतं. त्यात मी इतर कुणाला तरी सोबत घेते. त्यांनाही म्हणते,’ ‘चलाऽ तुम्हीपण सोबत चला’ तर… हे पारंपरिक विचार करणार्‍यांना पचणं शक्यच नाही. मुळातच स्वतःसाठी उभ्या राहणार्‍या स्त्रियांविषयी समाज वाईटच बोलतो. आमच्या सारख्यांच्या सभ्यतेवर, चालचलनावर प्रश्न उपस्थित केले जातात, इज्जतीवर चिखलफेक केली जाते. या स्त्रिया घरातल्या इतर स्त्रियांना, मुलींना बिघडवत आहेत असे आरोप केले जातात. या मानसिकतेचा प्रचंड सामना केलाय. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपांतल्या अपमानाचा आणि अडथळ्यांचा सामना केलेला आहे. अजूनही करत आहोत.

काही वेळा मग सरळ जाऊन भांडणं केली तर काही वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. अलीकडं आमच्याविषयीचा उपहास थोडासा कमी झालाय. दुरावा कमी झालाय. गेल्या काही वर्षांत ‘खबर लहरिया’ला, तिच्या प्रतिनिधींना पुरस्कार मिळत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे. ‘खबर लहरिया’ची चर्चा सुरू झालीये तसा विरोधाचा सूर कमी होऊ लागला आहे. ज्या कुटुंबीयांनी सुरुवातीला त्यांच्या घरातल्या स्त्रियांना पत्रकारीतेसाठी विरोध केला त्यांनाही आता त्यांच्या मुलींचा/स्त्रियांचा अभिमान वाटत आहे.

अर्थात तरी सगळं आलबेल झालं असं नाही. स्त्रियांपुढची आव्हानं ही दीर्घ पल्ल्याची लढाई आहे. आम्ही लढलो आणि संपलं किंवा मी माझ्या घरात खूप संघर्ष केला आणि संपलं हे असं इतकं सोपं नाहीये. प्रत्येक काळात त्याचं रूप बदलत चाललंय पण लढाई तर अजून चालूच आहे आणि माहीत नाही किती काळ ती चालूच राहणार आहे.

प्रश्न – आणि प्रत्यक्ष फिल्डवरची काय स्थिती आहे? घटनास्थळी किंवा रिपोर्टिंगच्या वेळेला या पत्रकारांना ‘महिला’ म्हणून काही वेगळे अनुभव येतात का?

अलीकडच्या काळात महिलांना विरोध करण्याचे, डावलण्याचे किंवा कमी लेखण्याचे प्रकार कमी झालेत. अनुभव शून्यावर गेले नसले तरी बदल होतोय. मात्र सुरुवातीच्या काळात खूप वाईट अनुभव आले म्हणजे आम्ही सुरुवात केली तेव्हा तर लोक आम्हाला रिपोर्टर मानायलाच तयार नव्हते. लोकांना वाटायचं,’ ‘छ्याऽ स्त्रिया कुठं पत्रकार असतात का? त्यांच्यात इतका दमच नाही की, त्या कुठल्या प्रश्‍नावर आवाज उठवू शकतील, कुणा व्यक्तीविरोधात उभ्या राहतील… मग पोलीस-प्रशासन, सरकारला प्रश्न करतील, जाब विचारतील एवढी क्षमता आहेच कुठं त्यांच्याकडे? त्या गरीब आहेत, कमी शिकलेल्या आहेत. त्यात दलित समाजातून आल्या असतील तर आणखीच अवघड.’ अनेकदा तर लोक घटनास्थळी उभंही राहू द्यायचे नाहीत.

…आणि जेव्हा सरकारविरोधी, शक्तिशाली व्यक्तींविरोधी बातम्या असायचा किंवा काही प्रश्न दडपण्याचा प्रयत्न असायचा तेव्हा तर प्रचंड आव्हानं असायची. अजूनही आहेतच. धमक्या येतात. पूर्वी तर आमचं दैनिक बंद पाडण्याच्या धमक्या यायच्या. काही वेळा लोक म्हणायचे, ‘तुमचा खप किती पाचसहा हजार आहे नाऽ तर मग त्याच्या 20 टक्के अधिक रक्कम आम्ही तुम्हाला देतो, पण बातमी येता कामा नये.’ काही वेळा लोक आमच्या रिपोर्टर्सच्या घरापर्यंत पोहोचले. चांगले, प्रतिष्ठित आणि शक्तिशाली लोक पोहोचलेत. घरी येऊन धमक्या दिल्यात.’ ‘बघून घेऊ, घाबरून राहा.’ अशी भाषा वापरण्यात आली आणि आता तर आम्ही डिजिटलवर आलोय तर इथं तर प्रचंड ट्रोलिंग केलं जातं. आज आमच्यासाठी’ ‘ट्रोलिंग’ ही खूपच मोठी डोकेदुखी झाली आहे. आम्ही कितीही दुर्लक्ष केलं तरी ते सुरु आहे हे सपशेल विसरता कसं येईल.  एकूणच अशा प्रकारची आव्हानं आणि अनुभव नेहमीच राहिलेत.

पुरुष पत्रकारांकडून मिळणाऱ्या एका खेदजनक अनुभवाविषयी सांगायचं राहिलंच. बऱ्याचदा मोठमोठ्या रॅलीज निघतात तेव्हा तिथं रिपोर्टर्ससाठी एक खास दालन किंवा व्यासपीठ केलेलं असतं. आता अशा ठिकाणी बर्‍याच वेळा मी एकटीच महिला पत्रकार असते. अर्थात अलीकडं खूप मुली पत्रकारितेत येत आहेत आणि प्रत्येक माध्यम वेगवेगळ्या बीटसाठी एकतरी प्रतिनिधी नेमतो. मात्र अजूनही राजकीय रिपोर्टिंग करणार्‍या महिलांची संख्या कमीच आहे. हाऽ तर तिथं भांडणं होतातच. पुरुष रिपोर्टर त्यांचे मोठेमोठे कॅमेरे, मोठे स्टँड्‌स ऐसपैस लावून बसतात. त्यांच्या चॅनेल्सची मोठमोठी नावं असतात, त्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांना गर्व असतो. अशा ठिकाणी खूप भांडणं होतात. असं नाही की, ते आहेत म्हणून आम्ही पुढं जाणार नाही. कसंही करून बातमी तर आम्ही मिळवूच पण खूप जद्दोजहद करावी लागते. अलीकडं खूप ठिकाणी आम्हाला जागा मिळते आणि खूप ठिकाणी आम्हाला हिसकावून घ्यावी लागते. तर हे असे अनुभव आजही आहेत. अधिकार्‍यांकडे, पक्षाच्या लोकांकडे गेल्यावर कुठल्याही पुरुष पत्रकारांना जी जागा मिळते ती आजही आम्हाला नाही. मी असं म्हणत नाहीये की, हे प्रत्येक ठिकाणी घडतं. उलट बरेच अधिकारी आम्ही ‘खबर लहरिया’कडून आलोय म्हटलं की घाबरतात कारण त्यांना माहीत आहे की, कुठलीही हयगय न करता आम्ही सत्य दाखवतो त्यामुळं बर्‍याच अधिकार्‍यांना ‘खबर लहरिया’शी सामना होऊ नये, त्यांना उत्तर देण्याची वेळ येऊ नये असंच वाटतं. ‘खबर लहरिया’चा प्रभाव वाढत असल्यामुळं पूर्वीइतके टोकाचे अनुभव कमी झालेत.

प्रश्न – स्त्रिया म्हणून येणारे अनुभव तर आहेतच… शिवाय उत्तर प्रदेशात जातअभिमानही खूप आहे. अशा स्थितीत तुमच्या दलित, आदिवासी, मुस्लीम रिपोर्टर्सना फिल्डवर जातिभेदाचा अनुभव येतो का?

अरेऽऽऽ काय सांगू तुम्हाला! समजाऽ आमची मुस्लीम रिपोर्टर आहे तर तिनं प्रश्न करताना मुस्लीम असणं विसरता कामा नये असं आपल्या समाजाला वाटतं. मी उदाहरण देऊन सांगते म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. आम्ही काही व्हिडिओ शोज्‌ करतो. त्यातलाच एक आहे’ ‘बोलेंगे बुलवायेंगे, हँसकर सब कह जायेंगे’. या शोमध्ये पारंपरिक विचारधारेला छेद देणारे, टिपिकल मानसिकतेवरचे प्रश्न केले जातात. विषय गंभीर असला तरी सादरीकरण हलकंफुलकं आहे. हसतखेळत एखादा मुद्दा काढून घ्यायचा आणि आपला विचार मांडायचा. हा शो आमची रिपोर्टर नाझनीन रिजवी करते. तिनं एकदा घुंगटपद्धतीवर शो केला तर ती लगेच ट्रोल झाली की, तिनं बुरखा विषय का घेतला नाही? मुस्लीम आहे म्हणून हिंदू संस्कृतीवर प्रश्न करणार का? हिंदू खतरे में है… असं खूप काही. शिव्या, टिप्पणी आणि असं बरंच काही.

…तर आमच्या रिपोर्टर्सना जातिभेदाचे खूप अनुभव येतात. स्वतःला उच्च जातीचं मानणारी मंडळी बरेचदा तुमच्या प्रश्नांची उत्तरंच देत नाहीत. त्यांच्याकडून माहीती काढून घेणं अतिशय चॅलेंजिंग असतं. मलाही माझ्या दलित असण्यावरून हिणवलं जातं. पूर्वी त्रास व्हायचा पण आता नाही. मी ती लढाई जिंकली. हां! तरीही काही वेळा लोक जात विचारतात. आम्ही सांगितली नाही तर अंदाज बांधायला लागतात. अ‍ॅट्रोसिटीच्या घटनांचं वार्तांकन करताना त्रास होतो मात्र तटस्थपणे त्याचं वार्तांकन करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आमचे रिपोर्टर्स अशा अनुभवांतून पुढे वाटचाल करत आहेत.

प्रश्न – रिपोर्टर्सच्या कामाचं सर्वसाधारण स्वरूप कसं असतं?

कुठल्या वेळेला निघू आणि कुठल्या वेळेला येऊ ही पत्रकारितेत सांगता न येण्यासारखी गोष्ट आहे. आता दूरच्या जिल्ह्यात जायचं असेल तर सकाळी पाच वाजताच निघावं लागतं. समजा की, एखादं ठिकाण दीडशे किलोमीटर अंतरावर आहे तर तुम्ही तिथं पोहोचणार कधी, वाहतूक कशी आहे, तिथून येण्याचं काही नियोजन असू शकतं का… की तिथंच थांबावं लागेल हे काहीच आधी ठरवून ठेवता येत नाही… शिवाय आपल्याकडची वाहतूक व्यवस्था! त्यात बिघाड असेल किंवा कमी बस असतील तर वेगळेच प्रश्न. मग काही वेळेला कुठंतरी उतरून कुठपर्यंत तरी चालत जाणं भाग असतं. मग पुन्हा स्थानिक वाहतुकीची मदत घ्यायची असते… तर अशा सगळ्या अभावांशी लढत आमचं काम चालतं. अर्थात हे काही रोजच्या रोज नसतं. काही वेळा तर रात्रीच काही घटना घडली तर तेव्हाच निघावं लागतं आणि तुम्हाला ग्रासरूटच्या बातम्या करायच्यात म्हटल्यावर हे करावंच लागतं आणि जेव्हा ग्रासरूटविषयी बोलताय,  ग्रामीण पत्रकारिता म्हणताय  तेव्हा आपल्याकडची गावं, तिथली वाहतूक, तिथले रस्ते, पायी चालणं, राहण्याची व्यवस्था, सुरक्षेची व्यवस्था हे सगळंच विचारात घ्यावं लागतं. खूप सार्‍या गोष्टींच्या अभावात आमचे रिपोर्टर्स काम करतात.

…पण सर्वसाधारणपणे असं समजा की, नऊ ते सहा तर फिल्डवर काम करावंच लागतं. मग त्यानंतर पुन्हा घरात किती काम करायचं हेही आहेच कारण आता सगळं डिजिटल होत आहे. फिल्डवरून आल्यावर आपलं फुटेज पाठवणं, त्याचं स्क्रिप्ट लिहिणं, त्याचं शेड्यूल ठरवणं, आमच्या प्रॉडक्शनशी बोलणं, चर्चा करणं हेही असतंच त्यामुळं असं ठरावीक काही वेळमर्यादा नाही. उलट आता तर वेळेचं अधिक अस्थिर झालंय. काही वेळा रात्री-अपरात्रीही स्क्रिप्ट्स पाठवाव्या लागतात कारण दुसर्‍या दिवशी ते लाइव्ह होणार असतं… तर साधारण असं आम्ही काम करतो.

प्रश्न – आणि 13 जिल्ह्यांत मिळून एकूण किती स्टाफ आहे? 

आमचा एकूण 30 च्या आसपास स्टाफ आहे. त्यापैकी वीसेक रिपोर्टर्स आहेत. चित्रकूट आणि बांधा या जिल्ह्यांत तीन-तीन जणांची टीम आहे. आम्ही ब्लॉकप्रमाणे जिल्ह्यांची विभागणी केलेली आहे. बांधामध्ये आठ ब्लॉक्स आहेत. ते तीन रिपोर्टर्समध्ये वाटले जातात म्हणजे एका रिपोर्टरकडे किती मोठा परिसर असतो आणि तो किती व्यग्र असतो हे लक्षात येईल. अन्य जिल्ह्यांतही अशीच रचना आहे. आपसांत नियोजन करून वार्तांकन करतो. अर्थात आमच्याकडूनही काही गावं सुटून जातात. मोठी, महत्त्वाची काही घटना घडल्यास आम्ही ती कव्हर करतोच पण रोजच्या रिपोर्टिंगमधून काही गावं राहून जातात. भविष्यात प्रत्येक गाव कव्हर होईल इतके रिपोर्टर्स नेमण्याचा आमचा विचार आहे.

करोना काळातही आमचं काम थांबलं नाही. उलट याच काळात आम्ही अधिक रिपोर्टिंग केलं. रेशन, औषधं पोहोचवली. मदतीचं काम केलं. दानशूर व्यक्ती आणि गरजवंत यांच्यातला दुवा होण्याचं काम केलं शिवाय याच काळात आमची टीम अधिक सशक्त आणि मजबूत झाली.

प्रश्न – कुठल्या कुठल्या मुद्द्यांसाठी आणि प्रश्नांसाठी ‘खबर लहरिया’ काम करतं?

आमच्या रिपोर्टिंगचा मध्यवर्ती दृष्टीकोन हा स्त्रीवादी आहे. ग्रामीण पत्रकारितेवर आमचा फोकस आहे. आम्हाला कुठलाही विषय वर्ज्य नाही मात्र मुख्य माध्यमांतून जे मुद्दे, प्रश्न कव्हर होत नाहीत, उलटपक्षी ते या प्रश्नांना ‘प्रश्न’च मानत नाहीत असे मुद्दे आम्ही प्राधान्यानं लावून धरतो. महिलांचे प्रश्न तर लावून धरतोच शिवाय ज्यांना अजिबात आवाज नाही… अशा उपेक्षित लोकांचे प्रश्नही मांडतो. अनेकदा मुख्य माध्यमांमध्ये उपेक्षित माणसं आणि प्रश्न कमी जागेत किंवा चॅनेल्सवर एखाद्या पट्टीत येऊन जातात. अशा लोकांचा आवाज अधिक बुलंद करणं आम्हाला गरजेचं वाटतं.

…आणि आम्ही स्वतःला निष्पक्ष मानतो. त्यामुळं सर्व तर्‍हेच्या बातम्यांचं वार्तांकन करतो. आम्ही कुठल्याही जाहिराती यासाठीच घेत नाही की, कुणाचं मिंधेपण नको. म्हणून तर आमच्या कार्यपुस्तिकेत जाहिरातीमागची भूमिका स्पष्ट लिहून ठेवलीय. जाहिराती घेणं म्हणजे तुम्ही निष्पक्ष नाहीत असंच मानलं जातं, आम्हाला आमची तशी  प्रतिमा करायची नाहीये.

प्रश्न – ‘खबर लहरिया’ आणि मुख्य माध्यमं यांतल्या ग्रामीण पत्रकारितेत काय फरक दिसतो?

प्रचंड फरक आहे. मी जसं आधी सांगितलं की, जी माध्यमं एखाद्या बाईटमध्ये किंवा एखाद्या तुकड्यात बातमी लावून ग्रामीण भागातले प्रश्न कव्हर करतात त्यांच्यापेक्षा आमची पत्रकारिता खूप निराळी आहे. मुख्य माध्यमं किरकोळीत काढत असलेले मुद्दे आम्ही महत्त्वाचे म्हणून मांडतो. नुसता तो मुद्दा मांडून थांबत नाही तर त्यासाठी प्रशासनाला धारेवरही धरतो. त्यांना उत्तरदायी मानतो. त्यासाठी पाठपुरावा करतो.

प्रश्न – ग्रामीण स्तरावरच्या सरकारी योजनांचे दावे आणि वास्तव यांच्यांतलं अंतर मांडत राहणं हे ‘खबर लहरिया’ महत्त्वाचं मानतं पण ‘जिथं राहायचंय तिथंच लढायचं’ ही स्थिती असल्यावर अशा कामांत किती जोखीम जाणवते?

उदाहरण देते. उत्तर भारतात विशेष करून गोरक्षा हा खूप महत्त्वाचा मुद्दा झालाय त्यामुळं राज्य सरकारनं जबाबदारी घेऊन गावागावांत गोशाळा तयार केल्या. यासाठी व्यवस्थित मंजूर केलेला सरकारी निधी आहे. गोशाळेचा उद्देश गायींचं रक्षण, देखभाल, भरणपोषण हा होता मात्र प्रत्यक्षातली स्थिती फारच वाईट होती. गायींना चारापाणी नाही. त्यांना बांधून टाकल्यामुळं त्या स्वतः चाऱ्याचा शोध घेऊन जगू शकत नाहीयेत त्यामुळं काही गायींचा मृत्यू झाला. आमच्या रिपोर्टरनं ती बातमी केली तर गोशाळांची स्थानिक जबाबदारी असणार्‍या माणसांनी आधी तिला विचारलं, तू हे का रिपोर्ट करतेय? मग तिचा जातिवाचक उल्लेख केला. तू अजून कुमारिका आहेस असं म्हणायला लागले. याउपरही रिपोर्टर पाठपुरावा करत राहिली तर घरी जाऊन, ‘तुझ्या घरात आणखीही मुली आहेत. तुमचं घराबाहेर पडणं अवघड होईल.’ अशा स्वरूपात धमकावायला लागले पण रिपोर्टर घाबरली नाही. तिनं स्थानिक प्रशासनाकडं जाऊन तक्रार केली आणि धमकावणार्‍यांचं तोंड बंद केलं.

सरकारी योजनांविषयी आम्ही खूप सजगपणे रिपोर्टिंग करतो. प्रशासनाला वाटतं आम्ही हे का करतो? ताजं उदाहरण सांगते, बांधा जिल्ह्यात दोन नद्या आहेत… यमुना आणि केन. सध्या या नद्यांना पूर आल्यानं गावच्या गाव पाण्याखाली गेलं. आम्ही संपतपूर गावाला भेट दिली. ज्याला आम्ही 2019च्या पुरात ही भेट दिली होती आणि 2016, 2013च्या वेळेसही. दर तीन वर्षांनी चार वेळेस हे गाव पाण्याखाली गेलं. पूर आला की गावातले लोक गावातच एक किल्ला आहे तिथं जाऊन आश्रय घेतात. दर वेळेला प्रशासन सांगतं की, पूर ओसरला की गावकर्‍यांना आवास योजनेखाली घरं बांधून देऊ पण तसं आजपर्यंत घडलं नाही. या वेळेस पुन्हा तोच मुद्दा मांडला तर अधिकारी आम्हालाच विचारतात तुमचा प्रोब्लेम काय? का तुम्ही योजनांच्या मागे हात धुऊन असता? आम्ही त्यांना म्हणतो, ‘सरकारची जबाबदारी आहे.’ तर म्हणतात, ‘मग सरकारची आहे नाऽ तुम्ही का चिंता करताय? इतकंच वाटतं तर करा मदत.’ ही अशी मानसिकता. या अशा जोखमी आहेत.

प्रश्न – प्रिंट माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्म… या ट्रान्झिशनचं कारण काय?

मुख्यत्वेकरून आर्थिक कारण. आम्ही संपूर्णपणे जाहिरातींच्या बळावर दैनिक चालवणार नाही हे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं. त्यामुळं जाहिरातींना मर्यादा होती. बर्‍याचदा सणासुदीलाच अधिक जाहिराती असायच्या मात्र त्यातही पारंपरिकतेला आणि स्त्रीशोषणाला बळकटी देणार्‍या सणांच्या जाहिराती घ्यायच्या नाहीत हेही ठरवलेलं होतं. त्यामुळं आमचं आर्थिक नुकसानही खूप झालं. त्यामुळं व्हायचं असं की, दोन रुपयांच्या आमच्या प्रत्येक अंकामागे आम्हाला 20 टक्के अधिकचा खर्च स्वतःच भरून काढावा लागत होता. अशा परिस्थितीत दैनिकाचा कारभार सांभाळणं अवघड व्हायला लागलं. दुसरीकडं सगळं जग डिजिटलच्या मागे धावत आहे तर आपण का मागं राहावं असंही वाटत होतं. त्यामुळं आम्ही 2016मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलो.

प्रश्न – तुम्ही तुमच्या पत्रकार महिलांची निवड कशी करता? पत्रकारितेचं प्रशिक्षण बंधनकारक मानता का?

आमच्याकडच्या महिला पत्रकार या गाव-खेड्यातल्या, कमी शिकलेल्या आहेत. सुरुवातीला त्यांना वेगळं प्रशिक्षण असं दिलं गेलं नाही. डिजिटल झालो तेव्हाही सुरुवातीला छोटे कॅमेरे वापरले. मग स्मार्ट फोन वापरायला लागलो. त्यासाठी थोडं प्रशिक्षण दिलं मात्र आता डिजिटल झाल्यामुळं आम्हाला काही बाबतींत प्रशिक्षित स्टाफची गरज भासायला लागली. तेव्हा मग आम्ही न्यूजरूमला आणि प्रॉडक्शन रूमला आवश्यक अशा प्रशिक्षित मुलींना घेतलं. अगदी अलीकडं आम्ही तीन महिन्यांचा कोर्सही डिझाईन केला आहे. आम्हाला जेव्हा रिपोर्टर्सची गरज भासते तेव्हा आम्ही आमच्याच प्लॅटफॉर्मवर तशी जाहिरात करतो. आलेल्या अर्जातून निवड झालेल्या मुलींना कशा तर्‍हेनं पत्रकारिता केली पाहिजे, त्यासाठी कॅमेरा कसा धरायचा, कोणकोणत्या गोष्टींची गरज असते, स्वतःची सुरक्षा कशी करायची असं सात दिवसांचं बेसिक प्रशिक्षण देतो आणि मग सिनिअर रिपोर्टरबरोबर तीन महिन्यांसाठी प्रशिक्षणाला पाठवतो. प्रत्यक्ष फिल्ड अनुभवानंतरही ज्या मुलींना आमच्यासोबत काम करायचं आहे त्यांची निवड करतो.

प्रश्न – प्रिंट आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांत तुम्ही काम केलंय… तर यांच्या परिणामकारकतेत काय फरक दिसतोय?
आम्ही आमचं काम स्त्रीवादी भूमिकेतून करतोय… मात्र महिलांपर्यंत पोहोचणं हे आमच्यासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिलंय. ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो त्यांच्यापर्यंतच पोहोचू शकत नाही अशी अवघड स्थिती होती. आम्हाला वाटायचं की, त्यांच्यापर्यंत आपलं दैनिक पोहोचावं, त्यांनी ते पाहावं, वाचावं, त्यांन समाजातले प्रश्न कळावेत, समजावेत, त्यांनाही समाजभान यावं… मात्र ग्रामीण भागात एवढी साधी गोष्ट होणंही कठिण. जर त्यांना वर्तमानपत्र पाहण्याचंच स्वातंत्र्य नसेल तर त्या वाचणार कुठून? या पार्श्वभूमीवर त्यांच्यापर्यंत आमचं म्हणणं कसं पोहोचणार? आणि समजा वर्तमानपत्रं पोहोचतही असतील तर आमच्यासोबत किती जणी आहेत? आमचं दैनिक किती जणी वाचतायेत याचा आकडा काही आम्हाला मिळत नव्हता. पण जेव्हा डिजिटलवर आलो तेव्हा मात्र बदल दिसायला लागला. प्रत्येक घरात एक तरी स्मार्ट फोन आहेच आणि मग त्यांच्या सोयीच्या वेळात का होईना स्त्रिया आमच्या बातम्या वाचायला लागल्या. त्याचा प्रभावही जाणवतोय. याच काळात ‘खबर लहरिया’ मोठ्या प्रमाणात विकसित झालंय. आमच्या स्थानिक ठिकाणाहून उठून आमचा देशभर आणि देशाबाहेरही प्रसार झाला. आम्ही देशपरदेशी लोकांपर्यंत पोहोचू शकलो. इंटरनेट, सोशल मिडिया यांमुळं लोक आमच्या बातम्या सीमांची बंधनं तोडून वाचू शकत आहेत. लोक स्वतःहून आमच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत या खूप जमेच्या बाजू आहेत.

आमच्यासाठी भाषेची एक समस्या आहे. म्हणजे सुरुवातीला ‘खबर लहरिया’ स्थानिक बुंदेली भाषेत होता. लोक आजही त्या देसी भाषेची मागणी करतात. आमचे दोनतीन शो फक्त बुंदेली भाषेत होतात. मात्र लोक त्या भाषेत वर्तमानपत्रच मागत आहेत. त्यामुळं पुढं जाऊन यावर काय उपाय करता येईल याचाही आम्ही विचार करू.

प्रश्न – इतका संघर्ष आणि अडथळे असतानाही ‘खबर लहरिया’नं आता स्वतःचं स्थान निर्माण केलंय. तुमच्या रिपोर्टर्सवर आणि जनमानसांवर ‘खबर लहरिया’चा एकूणच काय प्रभाव आणि परिणाम दिसतोय?
मी माझ्या घरापासून सुरू करते. मी एम.ए. पॉलिटिकल सायन्स केलंय म्हणा पण समजा, मी घरातच राहिले असते तर मीही पत्नीच्या विशिष्ट चौकटीतच अडकून पडले असते. आज लोक माझ्या कुटुंबाला माझ्या नावानं ओळखतात. माझ्या मतांना घरात मान आहे. माझ्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जात नाही. माझं हे जे काही स्थान आहे ते ‘खबर लहरिया’शिवाय निर्माणच होऊ शकलं नसतं. मी कितीही शिकले असते किंवा कुठलंही काम केलं असतं तरी नाहीच. आज आम्ही इतरही महिलांना सोबत घेत आहोत. त्यांनाही आर्थिक स्वावलंबनासाठी तयार करत आहोत. त्यांना पाहून इतर दुसऱ्या महिलासुद्धा प्रेरणा घेताहेत आणि त्याही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आम्ही अशा गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहत आहोत. आमच्या बातम्यांचा, विचारांचा प्रभाव पडत आहे आणि त्यातून काही जणी घराबाहेर पडू लागल्या आहेत ही आम्हाला खूप मोठी गोष्ट वाटते.

(मुलाखतीतील काही छायाचित्रे Black Ticket Films च्या सौजन्याने)

[email protected]

(ही मुलाखत ‘कर्तव्य साधना’ च्या https://kartavyasadhana.in/ या वेब पोर्टलवरून घेतला आहे .अनेक विषयांवरील उत्तमोत्तम लेख/मुलाखती वाचण्यासाठी या पोर्टलला नियमित भेट द्यायला विसरू नका.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here