– प्रा. हेमंत खडके
‘ अफेअर ‘ हा शब्द कानावर पडताच कान टवकारले जातात, मनाला गोड गुदगुल्या होतात ; आणि मेंदूत कुतूहलाचा कल्लोळ उठतो !… कोणाचे अफेअर ? कोणाशी ? कसे ? केव्हापासून ? कुठवर?…
अफेअर हा विषय आपण आजवर गावगप्पांचा ( गॉसिपिंगचा ) करून ठेवला ; आणि त्यात गुंतणार्यांना अनैतिक ठरवून मोकळे झालो ! त्यामुळे , अफेअर हे चांगल्या सहजीवनाची शक्यता असणाऱ्या अनेक जोडप्यांचा संसार विस्कटून टाकू शकते , या विध्वंसक वास्तवाकडे आपले दुर्लक्षच झाले ! या पार्श्वभूमीवर प्रस्तुत पुस्तकाचे वेगळेपण विशेषत्वाने पटणारे आहे. अफेअर हा विषय संशोधनाच्या गंभीर पातळीवर हाताळला असल्याने प्रस्तुत पुस्तकाला , अफेअरच्या वादळात सापडलेली संसारनौका सुखरूप किनाऱ्यावर आणणार्या नावाड्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे . अनेक जोडप्यांच्या आयुष्यात उद्भवलेल्या प्रकरणांचा दोन दशकांहून अधिक काळ शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून आणि त्या अभ्यासाला मानसशास्त्राची जोड देऊन डॉ . विजय नागास्वामी यांनी हे पुस्तक लिहिल्याने त्याची मौलिकता अधिकच वाढली आहे .
पुस्तकाच्या पूर्वार्धात अफेअरचे स्वरूप, कारणे आणि प्रकार समजून दिले आहेत , तर उत्तरार्धात अफेअरमधून तरुन जाऊन सुखी सहजीवनाच्या पुनश्च उभारणीवर भर दिला आहे .” विवाहबाह्य संबंध नैतिकतेच्या किंवा कायद्याच्या चौकटीत कुठे बसतात हे मला तपासायचे नाही, तर यात गुंतलेल्या व्यक्तींच्या मानसिक भावनिक आंदोलनांचा आणि त्यांच्या वैवाहिक नात्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास अनुभवांच्या आधारे मला मांडायचा आहे “, अशा शब्दांमध्ये लेखकाने पुस्तक लिहिण्यामागील हेतू स्पष्ट केला आहे. लेखकाची निरीक्षणे जशी मार्मिक आणि उद्बोधक आहेत तशी ती गंभीर इशारा देणारीही आहेत. लेखक लिहितो , तीनपैकी एका जोडप्याला या समस्येला तोंड द्यावे लागते . त्यांच्यातील एकाचे अफेयर असते किंवा दुसऱ्याला तसा संशय तरी असतो . शेकडा नव्वद टक्के प्रकरणे हमखास उघडकीला येतात. त्यांपैकी नव्वद टक्के लोक आपला संसार वाचवण्याला प्राधान्य देतात , अफेअर सर्वांनाच तापदायक ठरतात – अशी मार्मिक आणि उद्बोधक निरीक्षणे नोंदवून लेखक भाष्य करतो की, ” इतकी मानसिक उलघाल करणारी आणि वेदना देणारी आपत्ती माणसे स्वतःवर कशी काय ओढवून घेतात याचे मला आश्चर्य वाटते ! ”
लेखकाच्या मते स्त्री-पुरुष संबंधात १.भावनिक जवळीक २. लैंगिक संबंध ३.गोपनीयता ४.अपराधी भाव ५. अवलंबनाची गरज – या पाचपैकी किमान दोन किंवा तीन बाबी जर असतील, तर त्याला निश्चितपणे अफेअर म्हणता येते . असे अफेअर म्हणजे वैवाहिक जीवनाच्या प्रवासातील विश्वासाला लागलेला मोठा धक्का असतो अफेअरविषयीच्या काही दंतकथांचीही लेखकाने चांगली चिकित्सा केली आहे . बिघडलेल्या संसारातच अफेअर होते , एकदा अफेअर करणारी व्यक्ती पुनःपुन्हा अफेअर करते , अफेअरनंतर पतिपत्नीचे नाते पहिल्यासारखे राहात नाही , फक्त पुरुषच लफडी करतात – अशा अनेक धाररणांमधील सत्यासत्य लेखकाने संतुलित दृष्टीने तपासले आहे . प्रकरण होण्यामागील कारणे तपासताना लेखकाच्या असे लक्षात आले की , वैवाहिक जीवनातील असमाधान , संसारातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने दुरावत जाणारे नाते , जीवनाच्या रुटीनचा व एकूण जीवनाचाच आलेला कंटाळा , यातून बाहेर पडण्यासाठी बदल हवासा वाटणे , समवयस्कांचे अनुकरण , कामपूर्तीचे व्यसन – अशा अनेक कारणांनी प्रकरणे होतात .या संदर्भात लेखकाचे भाष्य असे की , ” प्रकरण होण्यामागचे तुमचे समर्थन काहीही असो ; पण प्रकरण हा तुमचा निर्णय असतो .त्याची जबाबदारी तुम्ही दुसऱ्यावर टाकू शकत नाही . ”
लेखकाने या प्रकरणांचे काळानुरूप वर्गीकरण केले आहे .त्यामुळे या प्रकरणांची विविधता लक्षात येते . शारीर आकर्षणाची प्रकरणे , भावनिक आकर्षणाची प्रकरणे , शारीरिक – भावनिक एकत्रित प्रकरणे , केवळ रोमॅण्टिक कल्पनात्मक ( प्लेटॉनिक ) प्रकरणे , सायबर प्रकरणे , ऑफिस प्रकरणे , समलिंगी प्रकरणे , मध्यम वयाची प्रकरणे , सुटका प्रकरणे – या वर्गवारीवरूनही प्रकरणांच्या व्यापक स्वरूपावर प्रकाश पडतो. आमचे प्रेम पवित्र आहेत, त्यात शारीरिक आकर्षणाचा अंश नाही असे समर्थन करणार्यांना लेखकाने इशारा दिला आहे की , सुरुवातीला केवळ भावनिक असलेले नाते शारीरिकतेकडे वाटचाल करू शकते आणि केवळ शारीरिक आकर्षणाची परिणती भावनिक जवळीकतेत होऊ शकते .
पुस्तकाच्या उत्तरार्धात लेखकाने अफेअरच्या गौप्यस्फोटानंतरच्या भावनिक-मानसिक उलथापालथींचा फार खोलात जाऊन शोध घेतला आहे .लेखकाच्या मते जोडीदाराचे अफेअर हे कोणासाठीही धक्कादायकच ठरणारे असते , मात्र ते उघड झाल्यानंतर थेट वकील गाठणे, जोडीदाराच्या प्रेमपात्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे , त्याचा संसार मोडण्याचा प्रयत्न करणे, त्याला शिवीगाळ करणे – या गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळल्या पाहिजेत. कारण त्यामुळे जोडीदार आणि प्रेमपात्र जास्त जवळ येऊ शकतात . आपल्या जोडीदाराचा व्यभिचार बघत त्याच्यासोबत संसार रेटा , असे लेखक म्हणत नाही . त्याच्यामते जोडीदारासोबत राहण्याचा निर्णय असो की , त्याला सोडायचा , तो भावनेच्या भरात घेतला जाऊ नये . तो विवेकनिष्ठ भूमिकेतून संतुलित मन:स्थितीत घेतला जावा . मात्र मनावर आघात करणाऱ्या अशा परिस्थितीत शांत राहायचे कसे? आणि विवेकनिष्ठा जागृत ठेवायची कशी ?
या पुस्तकाचा हेच तर विशेष आहे की ,अशा मन:स्थितीतून बाहेर पडायचे कसे आणि निर्णय घेताना विवेकनिष्ठा सांभाळायची कशी , याचे फार उपयुक्त आणि मार्मिक मार्गदर्शन हे पुस्तक करते . त्याला अनुभवाचा आणि शास्त्रीय ज्ञानाचा आधार आहे . त्यामुळे पुस्तकातील एकेका गोष्टीचे मोल फार मोठे आहे .अफेअरच्या व्याख्यांपासून लक्षणांपर्यंत ; कारणांपासून परिणामांपर्यंत , प्रकारांपासून प्रतिक्रियांपर्यंतची आणि सावरण्यापासून सांभाळण्यापर्यंत विस्तृत, साधार आणि सोदाहरण चर्चा या पुस्तकात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ अफेअरपुरते मर्यादित राहत नाही , तर ते वाचकाला विवाह, सहजीवन यांविषयी नव्याने सकारात्मक विचार करायला भाग पाडते . अत्यंत विपरीत परिस्थितीतही तुम्ही विवेकनिष्ठ विचारसरणीचे वर्तन कसे ठेवावे, याचा वस्तुपाठ देणारे हे पुस्तक आहे .अफेअर ही संसाराची मृत्युघंटा नसून संसार सावरण्यासाठी वाजलेली धोक्याची घंटा आहे , असा विश्वास हे पुस्तक निर्माण करते . त्यामुळे हे पुस्तक समंजस, सुखी आणि आनंदी सहजीवनाच्या वाटेवर दीपस्तंभासारखे उपयोगी पडेल , याचा मला विश्वास वाटतो.
पुस्तकाचे मूळ लेखक डॉ. विजय नागास्वामी (चेन्नई )हे मानसोपचारशास्त्रातील मोठे अभ्यासक असून जागतिक आरोग्य संघटनेचे ( WHO ) सल्लागार राहिले आहेत. विवाहविषयक समुपदेशनाची त्यांची अनेक पुस्तके बेस्टसेलर ठरली असून प्रस्तुत पुस्तक हे त्यांच्याच ‘ 3 ‘s a Crowd ‘ या मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या प्रसिद्ध पुस्तकाचे भाषांतर आहे. मूळ पुस्तक फार अवघड इंग्रजीत आहे. त्याचे साध्या ,सोप्या ; पण अस्सल ‘मराठमोळ्या ‘ शैलीत भाषांतर करताना डॉ .मोहना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी खूप परिश्रम घेतले . त्या अमरावती (विदर्भ )परिसरातील ख्यातनाम डॉक्टर व समुपदेशक आहेत.’ स्वानंद ‘ समुपदेशन सेवेच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
(पुस्तकाचे मुखपृष्ठ – गजानन घोंगडे , अकोला -9823087650)
(लेखक नामवंत समीक्षक व वक्ते आहेत)
९८२२८४११९०
…………………………………………..
अफेअर..विवाहबाह्य संबंध…आणि नंतर….हे पुस्तक बुकगंगा व अॅमेझाॅनवर उपलब्ध आहे…
अॅमेझाॅन लिंक