ही अशी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत काय?

-डॉ. प्रदीप पाटील

दंगे झाले म्हणून “बुलडोझर फिरवण्याची” मानसिकता असो…

अमुक जातीच्या विरोधात बोलला म्हणून त्याला “मारून टाकण्याची” मानसिकता असो…

अमुक धर्म “संपवून टाकण्याची” भाषा करण्याची मानसिकता असो…

कोणत्याही धार्मिक विधीला “जाऊ नका व बहिष्कार टाका” असे एखाद्या उच्च जातीचे म्हणणे असो…

दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याला “मारून टाका” असे सांगणे असो…

दुसर्‍या पक्षाचा आहे तर त्याला “संपवून टाका” असे म्हणणार्‍यांची मानसिकता असो…

धर्मांतर करा नाहीतर “मृत्यूला सामोरे जा” अशी मानसिकता असो…

आमचे ऐकले नाही तर तुमचे राष्ट्र “उद्ध्वस्त करू” अशी मानसिकता असो…

आमचाच धर्म-आमचाच पक्ष श्रेष्ठ असे म्हणत “तलवारी- बंदुका- हत्यारे फिरवत राहणाऱ्यांची” मानसिकता असो…

आमचीच संस्कृती “सर्व जगात एकमेव आणि थोर” असा डंका पिटणाऱ्यांची मानसिकता असो…

अशा, “मानसिकतेचे”पीक सध्या सगळीकडे जोमदारपणे फोफावले आहे!

खास करून धर्म आणि राजकारण यांच्यात अशा मानसिकतेचे “पुंड आणि गुंड” सोकावलेले आहेत…

सगळा समाज त्यांनी ताब्यात घेतला आहे.

सामान्य लोकांना त्यांनी वेठीस धरले आहे.

वेगवेगळे विषय काढून समाजात सगळीकडे विष कालवायला हे आघाडीवर असतात.

अशा मानसिकतेचे हे लोक मानसविज्ञाना प्रमाणे..

“मनोविकृत”  समजले जातात.

वर वर आपणास या सर्वांमध्ये खोटारडेपणा, हिंसकपणा, दहशतवादी वृत्ती, आणि सगळे कायदे पायदळी तुडविणे ही लक्षणे दिसतात. पण…

त्यांच्या मेंदूत मात्र मोठा बिघाड असतो.

धर्माचा जयजयकार करत हिंसा करणारे लोक असोत नाहीतर आपल्या राजकीय पक्षाचा उदोउदो करत दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे असो यांच्या मेंदूत गंभीर दोष आढळतात.

पहिला दोष असतो “स्मृती दोष.”

जेव्हा आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवतो आणि ती प्रत्यक्ष कृतीत आणतो तेव्हा लक्षात ठेवणे आणि त्याप्रमाणे कृती याच्यामध्ये भयंकर तफावत आढळते. याला वर्किंग मेमरी डेफिसिट म्हणतात.

दुसरा मेंदू दोष म्हणजे यांची “पाच इंद्रियं बिघडलेली” असतात. आपल्या पंचेंद्रियातून आपण माहिती गोळा करून मेंदूत पाठवून त्याला अर्थ देत असतो. हे जे ‘अर्थ देणे’ आहे ते पूर्ण बिघडलेले असते. यामध्ये पुढील काही गोष्टी येतात…

पहिला म्हणजे,

कुठल्याही व्यक्तीचे अचूक मूल्यमापन करणे याविषयी सगळा अंधार असतो! एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीविषयी जर मत बनवायचे झाले तर हलक्या कानाने आणि आंधळ्या डोळ्याने मत बनवले जाते.

दुसरे म्हणजे,

स्वतःच्या गटातील, धर्मातील, किंवा पक्षातील माणसे सोडली तर दुसऱ्या गटातील व्यक्तींविषयी आस्था, ममत्व, आणि काळजी याचा मागमूसही नसतो. जर दुसऱ्या धर्मातील व्यक्तीने स्वतःच्या धर्मातील आचार-विचार याविरुद्ध काही कृती केली तर त्याला मारून टाकणे हा देवाचा-धर्मगुरूचा आदेश किंवा हक्क मानला जातो. किंवा स्वतःच्या तत्वांची परिपूर्ती मानली जाते.

तिसरी गोष्ट म्हणजे,

आपल्या विरुद्ध असणाऱ्यांविषयी पूर्णतः किंवा जाणवेल इतपत नकारात्मक दृष्टिकोन कृतीतून व्यक्त केला जातो. दुसऱ्या धर्मातील व्यक्तीच्या व्यवसायाच्या ठिकाणी न जाता त्यांच्यावर बहिष्कार टाकणे किंवा तयार केलेले पूर्वग्रह मनात बाळगून त्यांच्या प्रतिकांवर हल्ले चढवणे चालू राहते.

चौथी गोष्ट म्हणजे,

जर विरुद्ध गटातील व्यक्तींनी काही चांगल्या गोष्टी केल्या तरीही तिकडे कानाडोळा करणे आणि त्यांच्याविषयी चांगले मत बनविण्यास पूर्ण नकार देणे. उदाहरणार्थ, दुसऱ्या धर्मातील व्यक्तीने जर स्व धर्मातील व्यक्तीला कोणत्याही स्वरुपाची मदत केली तरी त्यावर संशय व्यक्त करून त्याच्या हेतुस बदनाम करणे.

पाचवी गोष्ट म्हणजे,

विरुद्ध गटातील व्यक्तींशी थेट संवाद साधण्याऐवजी थेट वाद निर्माण करणे आणि हल्ले करणे हे तंत्र वापरले जाते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांनी आंदोलन केले तर संवादाऐवजी वाद निर्माण करून शेतकऱ्यांना बदनाम करणे.

सहावी गोष्ट म्हणजे,

स्वतःच्या प्रतीकांना श्रद्धांना कोणी काही बोलू लागले, टीका केली तर आपल्या विरुद्धच्या गटांविषयी बोला असे सुनावले जाते आणि तसे न झाल्यास अत्यंत हिंसक होणे. उदाहरणार्थ, अघोरी प्रथा जर असतील तर आमचे आम्ही बघून घेऊ असे म्हणणे आणि दुसऱ्यांच्या प्रथांविषयी बोलण्याची हिम्मत दाखवा अशी धमकी देणे.

या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या पंचेंद्रियांच्या आधारे आपण जी माहिती गोळा करतो त्या माहितीचा व्यवस्थित अर्थ काढणे जे घडायला हवे ते या पुंड आणि गुंड लोकात घडत नाही. यास ‘पर्सेपच्युअल स्ट्रॅटेजी’ असे म्हणतात. खासकरून आपल्या स्वतःचा धार्मिक उन्माद आणि उन्मादी राष्ट्रवाद या बिघाडामुळे सतत थैमान घालत राहतो. या व्यक्ती म्हणूनच मनोविकृत बनत जातात.

या व्यक्तींचा प्रमुख तिसरा दोष म्हणजे “विरुद्ध गटातील खटकणाऱ्या साध्या साध्या गोष्टींवरुन पेटून उठणे आणि काहीतरी थ्रील करण्याचा प्रयत्न करणे. हे सर्व आपल्या शहाणपणा निर्माण करणाऱ्या मेंदूतील भागाच्या दोषांमुळे घडते. ज्याला ‘कॉग्निटिव्ह डिसाॅर्डर’ म्हटले जाते.

या व्यक्तींचे चौथे लक्षण म्हणजे “यांची मते श्रद्धाळू बनलेली असतात “. म्हणजेच त्यांच्या मतांमध्ये काडीचा देखील बदल करण्यास ते तयार होत नाहीत. जगाबद्दलचा, व्यक्तींबद्दलचा, त्यांचा दृष्टिकोन फिक्स असतो. उदाहरणार्थ,

देव आहेच.

आमचाच धर्म श्रेष्ठ आहे.

आमचा राजकीय नेता जगात सर्वश्रेष्ठ आहे.

….आणि याविषयी जर पुरावे मागितले तर त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसतात आणि वर ते असे म्हणतात की आमच्या या भावना आणि श्रद्धा आहेत, त्याला तुम्ही हात लावाल तर याद राखा! याला ‘डॉगमॅटीझम’ म्हणतात.

राजकारणात अशा व्यक्ती असतील तर त्यांना पुराणमतवादी राजकारणी किंवा पॉलिटिकल काँझरव्हेटीझम म्हणतात.

पाचवे लक्षण म्हणजे अशा गुंड-पुंडांचे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण नसते. श्रद्धा ही भावना आहे. भक्ती ही भावना आहे. आणि ती जेव्हा पक्की होते तेव्हा तिला रोखणे हे जेव्हा जमत नाही तेव्हा ते दहशतवादाकडे वळतात. याला ‘पुअर इमोशनल रेग्युलेशन स्किल’ म्हणतात.

मनोवैज्ञानिकांना असे आढळले आहे की हे काँझर्व्हेटिव्ह किंवा बिघडलेले विचार व समजुती मेंदू बथ्थड करून सोडतात. आणि मुक्त विचारांचे शत्रू बनतात. त्यातून ते सनकी बनतात. ज्याला इंपल्सिव्ह असे म्हटले जाते.

केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले आहे की यातून राजकीय आणि धार्मिक दहशतवाद निर्माण होतो. आणि हिंसाखोरीपणा जन्माला येतो.

देशीवाद किंवा नॅशनॅलिझम आणि राजकीय दहशतवाद हा व्यक्तीच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेच्या दोषातून निर्माण होतो. डिसिजन मेकिंग किंवा निर्णय घेण्याची क्षमता यांच्यात अतिरेकी सावधगिरी बाळगली जाते तेव्हा देशी दहशतवादी तयार होतात!!

भारतात आणि जगभरात सध्या अशा बिनडोक्यांची भरमसाठ वाढ होत असून सारा समाज त्यामुळे विकृतीकडे ढकलला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतात तर हे प्रकर्षाने जाणवते आहे.

अशा या मनोविकृतांच्या हातातले आपण खेळणे व्हायचे का याचा निर्णय सुबुद्ध लोकांनी घेणे गरजेचे आहे.

खरेतर या लोकांना मानसोपचाराची गरज असून अत्यंत टोकाला गेलेल्या मनोविकृतांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. मग ते कोणत्याही धर्माचे वा पक्षाचे असोत.

जर असे लोक आजूबाजूला वागणारे आढळले तर त्यांना विकृत समजावे आणि स्वतःला वाचवावे.

नाहीतर..

“चक्रमांचा खुळा बाजार,

विकती येडपट आजार”

इथले कायमचे गिऱ्हाईक व्हाल!!

Previous articleश्रीलंकेच्या दिवाळखोरीतून मिळणारा धडा 
Next articleअमेरिका…आहे मनोहर तरी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here