-शेखर पाटील
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बहुप्रतिक्षित ‘फाईव्ह-जी’ सेवेची घोषणा केली. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी ‘करलो दुनिया मुठ्ठी मे !’ असा नारा बुलंद करत मोबाईल क्षेत्रात आगमन केलेल्या रिलायन्सने दोन दशकात यात मारलेली मुसंडी अतिशय विलक्षण अशीच आहे. आज त्यांनी केलेल्या घोषणांचे सर्व तपशील हे प्रसारमाध्यमांमधून आपल्यासमोर आले आहेच. याची पुनरावृत्ती टाळून रिलायन्स जिओने केलेल्या आज घोषणांचे दृश्य-अदृश्य परिणाम आणि एकूणच आपल्याआयुष्यावर याचा नेमका कसा परिणाम होऊ शकतो याबाबतचे विवेचन ……………………………………………………………………………………….
रिलायन्सने फाईव्ह-जी लॉंच करण्याआधी अतिशय जय्यत तयारी केली होती. हे तंत्रज्ञान दोन प्रकारातून साकर होत आहे. एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर अर्थातच पायाभूत यंत्रणा. यात गतीमान नेटवर्कसाठीची उपकरणे, टॉवर्स, गॅजेटस् आदींची तयारी करण्यात आली. यानंतर अलीकडेच म्हणजे गत महिन्यात भारत सरकारच्या स्पेक्ट्रमच्या लिलावात त्यांनी सर्वात मोठी बोली लावली. खरं, तर देशातील अन्य कंपन्यांनाही स्पेक्ट्रममधील वाटा मिळाला. पण, जिओने सर्वात गतीमान, सुरक्षितआणि सुलभ मानल्या जाणार्या ७०० मेगाहर्टझचा महागडा मार्ग निवडला.
आता हे सोप्या पध्दतीत समजून घ्या. मला जळगावहून भुसावळला जायचे आहे. यातील ‘फोर-लेन हायवे’चा मार्ग म्हणजे रिलायन्स जिओ ! तर अन्य कंपन्या म्हणजे यापेक्षा खराब रस्ते होत. अर्थात, एकीकडे पायाभूत सुविधांमध्ये जबरदस्त गुंतवणूक करतांना जिओने स्पेक्ट्रमसाठीही प्रचंड खर्च केला. याचा त्यांना फायदा असा झाला की, त्यांना फाईव्ह-जी सेवेसाठी अन्य कुणा कंपनीकडे मदत मागण्याची गरज पडली नाही. याचाच उल्लेख मुकेश अंबानी यांनी ‘स्टँडअलोन फाईव्ह-जी’ या संज्ञेच्या माध्यमातून केला. याचा साधा-सोपा अर्थ म्हणजे अथ पासून इतिपर्यंतची ‘एकीकृत सेवा’ !
‘फाईव्ह-जी नेटवर्क’ हे स्मार्टफोनमधून वापरता येईल हे तर सर्वांना माहित आहेच. पण आज मुकेश अंबानी यांनी अनेकदा एयर फायबरचा केलेला उल्लेख हा लक्षात घेण्यासारखा आहे. ‘एयर फायबर’ म्हणजे कुठेही वापरता येण्याजोगा वाय-फाय हॉटस्पॉटचे उपकरण. नावातच नमूद असल्यानुसार हवेतून अगदी ऑप्टीकल फायबर इतक्या गतीचे इंटरनेट पोहचवणारे हे डिव्हाईस असणार आहे. आपल्यापैकी अनेकांनी रिलायन्सचेच ‘जिओफाय’ हे उपकरण वापरले असेल. याचीच पुढील आवृत्ती ‘एयर फायबर’ असून ते होम नेटवर्कींगसाठी उपयोगात येणार आहे.
एयर फायबरच्या माध्यमातून घर, ऑफिस वा अगदी कुठेही तब्बल १ गेगाबाईट प्रति सेकंद इतक्या गतीचे वाय-फाय इंटरनेट नेटवर्क वापरता येणार आहे. अर्थात, एकीकडे स्मार्टफोनच्या माध्यमातून प्रचंड गतीमान इंटरनेटची सेवा देतांना होम आणि ऑफिस स्पेस देखील काबीज करण्याची रिलायन्स जिओची रणनिती दिसून आली आहे. फाईव्ह-जी नेटवर्क हे हॉम ऑटोमेशनला मोठ्या प्रमाणात चालना देणार आहे. यातून अनेक उपकरणे हे एकमेकांशी कनेक्ट होणार असल्याने आगामी काळात प्रत्येक घरातील आत्मा हा त्यातील एयर फायबर असेल ही बाब आपण समजून घेतली पाहिजे.
एयर फायबरच्या मदतीने कुणीही आपले घर वा कार्यालयातील अनेक महत्वाची कामे एकाच वेळी करू शकतो. यात व्हिडीओ गेम्स, स्ट्रीमींग आदींचा वापर करता येईल. यातील एक मनोरंजक बाब ही आयपीएलच्या सामने पाहतांना अनुभवता येणार आहे. एयर फायबरच्या मदतीने पुढील आयपीएल हे कुणीही युजर त्याला हव्या असणार्या कॅमेर्यातून पाहू शकेल. अर्थात, लाईव्ह प्रक्षेपण करणार्यांच्या मर्जीनुसार नव्हे तर तो स्वत: हव्या असणार्या अँगलमधून सामना पाहू शकेल. यात एकाच वेळेला तो अनेक ( तब्बल १६ !) कॅमेर्यातील दृश्ये देखील पाहू शकतो. एका अर्थाने ‘इमर्सीव्ह’ मनोरंजनाच्या दिशेने टाकलेले हे दमदार पाऊल असेल.
एयर फायबरच्याच मदतीने कुणीही ‘व्हर्च्युअल पीसी’ (याचे नाव क्लाऊड पीसी असेल ) वापरून आपल्या जुन्या संगणकाला अगदी क्षणार्धात ‘अल्ट्रा हाय स्पीड’ संगणकात परिवर्तीत करू शकणार आहे. याच्या मदतीने जुने संगणक वा लॅपटॉप न बदलता त्यांना अद्ययावत करता येणार आहे. अर्थात, यासोबत शॉपींग, मनोरंजन आदी बाबीसुध्दा यातून शक्य होतील.
खरं तर आज जिओचा फाईव्ह-जी नेटवर्कवर चालणारा स्मार्टफोन लॉंच करण्याची शक्यता होती. अंबानी यांनी स्पष्ट शब्दात हे मॉडेल लवकरच लॉंच होणार असल्याचे सांगितले. मात्र याची जास्त माहिती दिली नाही. विविध लीक्सच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन दहा हजार रूपयांच्या आत-बाहेर मूल्याचा असेल. रिलायन्स जिओने हे मॉडेल गुगलशी करार करून तयार केले आहे. यात जिओ आणि गुगलच्या सर्व सेवा प्रिलोडेड अवस्थेत असतील. तर अँड्रॉईडपासूनच विकसीत केलेल्या प्रगती या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असेल.
फाईव्ह-जी नेटवर्क वापराचे मासिक मूल्य नेमके किती असेल याचे सूतोवाच अंबानी यांनी केलेले नाही. तथापि, सुमारे चारशे ते पाचशे रूपयांपासून याचे प्लॅन्स सुरू होतील असा अंदाज आहे. म्हणजेच किफायतशीर स्मार्टफोन आणि मंथली प्लॅन यांच्या माध्यमातून देशातील मोठी बाजारपेठ काबीज करण्याचा रोडमॅप जिओने आखल्याचे दिसून येत आहे.
आज जिओतर्फे करण्यात आलेल्या घोषणांमधील लक्षणीय बाब म्हणजे जगभरातील मातब्बर कंपन्यांसोबत त्यांनी केलेले करार होत ! ते फेसबुकसोबत मेटाव्हर्समध्ये काम करणार आहेत. वर नमूद केल्यानुसार गुगलसोबत स्मार्टफोन तयार केलाय. व्हाटसअपसोबत तर त्यांनी जिओमार्टला पूर्णपणे कनेक्ट करण्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता या मॅसेंजरवरून कुणीही किराणा खरेदी करू शकणार आहे. एका अर्थाने, ‘सोशल कॉमर्स’मधील हे जिओचे दमदार पाऊस असणार आहे. याच्या मदतीने अमेझॉन, फ्लिपकार्ट आदींसारख्या कंपन्यांशी जिओ टक्कर घेणार आहे. सोबत ‘नेटमेड’ ही ऑनलाईन फार्मसी कंपनी देखील त्यांनी टेकओव्हर केली आहे. याचा सरळ फटका हा मेडिकल स्टोअर्स चालकांना बसणार आहे.
पुन्हा एकदा त्रोटक आढावा घ्यायचा झाला तर रिलायन्स जिओने एक पूर्णपणे ‘इंटिग्रेटेड फाईव्ह-जी नेटवर्क प्रणाली’ लॉंच करण्याची तयारी केली आहे. त्यांच्याच भाषेत बोलायचे तर ‘ट्रु-फाईव्ह जी’ हे नेटवर्क आपले जीवन बदलणार आहे. यातील मोबाईल इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप/संगणक आदी गॅजेटस् आणि याच्याशी संबंधीत सर्व सेवा या फक्त आणि फक्त जिओच्याच राहणार आहे. म्हणजेच, एकदा माणूस जिओच्या प्लॅटफॉर्मवर आला की, त्याला अन्य दुसर्या कोणत्याही घटकाची तयारी राहणार नाही अश सज्जता मुकेश अंबानी यांनी केल्याचे दिसून येत आहे. आणि अर्थातच, फाईव्ह-जी नेटवर्कला स्मार्टफोनच्या पलीकडे नेण्याचे त्यांचे मनसुबे देखील कुणापासून लपून राहिलेले नाहीत.
मुकेश अंबानी यांनी आज आपल्या रोडमॅपमधून पुढील वर्षाच्या डिसेंबर पर्यंत देशाच्या कान्याकोपर्यात फाईव्ह-जी नेटवर्क पोहचवण्याचा संकल्प केला आहे. यात थोडा विलंब जरी झाला तरी २०२४ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत आपल्या हातात, घरात, कार्यालयात एक जबरदस्त गतीमान असे इंटरनेट नेटवर्क असेल. यातून आपले जीवन हे किती प्रमाणात बदलेल याची आज आपण फक्त कल्पनाच करू शकतो. अर्थात, वाट पहाणे हेच आपल्या हातात आहे.
(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)
9226217770