बबनरावांच्या आक्रमकतेची विधिमंडळाच्या इतिहासात नोंदवली गेलेली आणखी एक घटना राजदंड पळवण्याची आहे . मंडल आयोगाच्या शिफारशीवर राज्य सरकारनं चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत लावून धरली . पण सरकार ढिम्म होतं . वातावरण तापलं . इतकं तापलं की, विरोधी पक्षांचे सदस्य संतप्त झाले . बबनरावांना तर इतका राग आला की, त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर ठेवलेला राजदंडच सभागृहाबाहेर पळवून नेला . मध्यम उंची , निमगोरा वर्ण , काहीशी स्थूल म्हणता येईल अशी शरीरयष्टी असणारे बबनराव तसे चपळ (Astute) होते . त्यामुळे राजदंड घेऊन त्यांनी सभागृहाबाहेर धूम ठोकल्यावर सुरक्षा रक्षकांची तो राजदंड परत मिळवतांना बरीच दमछाकच झाली . सुरक्षा रक्षकांनी तो राजदंड जागच्या जागी ठेवल्यावर जणू काही घडलंच नाही अशा हसतमुखानं सभागृहात प्रवेश करणारे बबनराव अजून आठवतात . तेव्हापासून हा राजदंड कुलूपबंद करण्याची सोय करण्यात आली .