गुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’!

  © सुमित्र माडगूळकर

पंचवटी च्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध निळ्या कोचावर बसले होते,फाटकातून दोन व्यक्ति आत शिरल्या,त्यातले एक तेजपुंज व्यक्तिमत्व पांढरा परिवेश,धारधार नाक,गदिमांचे त्यावेळचे स्विय सहाय्यक बाबा पाठक स्वागताला पुढे झाले,’या गुरुदत्तजी!’.

हिंदीचित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक-निर्माता ‘गुरुदत्त’ आपल्या सहाय्यका सकट गदिमांच्या भेटीस आले होते,’माडगूलकरजी आपका बहोत नाम सुना है,आप अगर हमारे लिये स्टोरी लिखिंगे तो ये हमारा सौभाग्य होगा,हमारे लिये कोई स्टोरीहो तो बताईयेगा’ गदिमा ‘जरुर गुरुदत्तजी’ इतकचे म्हणाले व कथा सांगायला सुरवात केली ‘एक शायर असतो,त्याला शेरो शायरी चा खुप नाद असतो,पण त्याला फारशी कींमत कोणी देत नसते,तो अनेक प्रकाशकांच्या पायर्‍या चढतो पण त्याचे पुस्तक छापायलाच कोणी तयार होत नसते,शेवटी वैतागून तो आपल्या काही कविता रद्दित पण विकतो….’

गदिमांची कथा हळू हळू रंगंत चालली होती व गुरुदत्त च्या चेहर्‍यावर संतुष्ठी चे भाव स्पष्ट दिसत होते…’वा माडगूलकरजी बहोत खूब’,असे म्हणून त्यांनी सहाय्यका कडून स्वताचे चेकबुक घेतले व गदिमांच्या नावाने १०,००० रु चा चेक फाडला, ‘माडगूलकरजी बहोत अच्छी स्टोरी हे ये,सुपरडुपर हिट तो होनी ही हे,आपसे गुजारीश है के आप ये स्टोरी गुरुदत्त फिल्म केलीये लिखिये’.

मराठी चित्रपटातून गदिमांची दिंगंत किर्ती गुरुदत्त या बड्या निर्मात्या जवळ पोहोचली होती व आज हा हिंदी कलावंत गदिमांना साईन करत होता!.गदिमांनी होकार दिला,पुढे काही दिवस गेले गदिमांनी कथेवर काम सुरु केले,हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रथेप्रमाणे एक दिवस गुरुदत्तची स्टोरी डिपार्टमेंटची काही माणसे गदिमांजवळ आली,गदिमांबरोबर चर्चा केली व काही मसालेदार बदल सुचवले.

आपल्या कथेत कोणी बदल केलेला गदिमांना आवडत नसे,एका चित्रपटाच्या वेळी,अमराठी धंदेवाईक निर्मात्याने चक्क ‘माडगूळकरजी सीतेच्या तोंडात एक फक्कड लावणी टाकूया’ म्हणताच,गदिमांनी त्याचे ज्या पद्धतीने स्वागत केले असेल याची कल्पना न केलेलीच बरी!,तर सांगायचे असे की गुरुदत्तच्या धंदेवाईक टीमचे बदल गदिमांना रुचले नाहीत व त्यांनी त्याच वेळी गुरुदत्तने दिलेले १०,००० रु चेकने त्यांच्याकडे परत दिले व सांगीतले की गुरुदत्तना कळवा की हे काम मी घेऊ शकत नाही!.

आपल्याला पोटापाण्यासाठी-पैशासाठी आपले साहित्य विकावे लागते याची गदिमांना खूप खंत होती पण त्यासाठी वाटेलती तडजोड त्यांनी कधीच केली नाही,एका कवितेत ते म्हणतात

‘गीत हवे का गीत?,एका मोले विकतो घ्यारे विरह आणखी प्रित!……’

याच कवितेत शेवटी म्हणतात
‘मी हसण्याने तुमच्या हसलो बोलू नये ते गूज बोललो,तुमच्या दारी रोजच बसणे माल मला खपवित..गीत हवे का गीत?’

पुढे १-२ वर्षे गेली व सगळीकडे गुरुदत्त फिल्म चा नवा चित्रपट ‘प्यासा’ अशी पोस्टर्स झळकली,’प्यासा’ ची कथा गदिमांचीच घेतलेली होती,पण त्याने गदिमांना याचे श्रेय कधिच दिले नाही,गुरुदत्त म्हंटल्यावर पहिले चित्रपटाचे नाव डोळ्यासमोर येते ते ‘प्यासा’ आणि याचे संपूर्ण श्रेय आपल्या गदिमांना आहे,गंमत म्हणजे गदिमांचा ‘जोगीया’ हा काव्यसंग्रह काढून पहा,पान १०६ ते ११७ अशी १२ पानांची ‘चोर बाजार’ नावाची गदिमांची दिर्घ कविता आहे ती ‘प्यासा’ ची कथा आहे,इतकेच काय कोणाला प्यासा चा दुसरा भाग काढायचा असला तरी पुढची स्टोरी तुम्हाला त्याच संग्रहात दुसर्‍या एका कवितेत मिळेल!.

मराठी चित्रपटसृष्टीचे चे भाग्य म्हणा की हिंदी चित्रपटसृष्टीचे दुदैव पण गदिमा त्या वातावरणात फारसे रमले नाहीत,गुरुदत्तने त्यांना श्रेय दिले नाही पण याऊलट स्क्रीन मासिकातून सजंय लिला भंसाळी यांनी एक खूलासा केला होता की अलिकडेच खूप गाजलेल्या ‘अमिताभ बच्चन’ व ‘राणी मुखर्जी’ यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाची मूळ कल्पना ग.दि.माडगूळकरांची होती,त्यांनी गदिमांना त्यांचे श्रेय दिले आहे.

गदिमांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकृती दिल्या ते पुन्हा कधितरी! पण ‘प्यासा’ च्या गुरुदत्तना सुद्धा ‘चोर बाजार’ करावासा वाटला हे दुदैव!’.

(काही ‘Untold Stories’ असतात ज्या आपल्या समोर कधी येतातच असे नाही ,ही त्यातलीच एक गोष्ट .. गदिमांचे स्विय सहाय्यक व लेखक/दिग्दर्शक कै.बाबा पाठक यांनी माझे वडील श्रीधर माडगूळकर यांना सांगितलेल्या वैयत्तिक आठवणी वर आधारित आहे.)

(लेखक ग. दि. माडगूळकरांचे नातू आहेत )

Previous articleएकवार पंखावरूनी फिरो तुझा हात….
Next articleनेमका खिळा शोधला पाहिजे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here