विसाव्या शतकातील माल वाहतुकीची अनोखी सोय!

-ज्ञानेश्वर मुंदे

यवतमाळ – दारव्हा मार्ग. पंचवीस तीस वर्षापूर्वीची पावसाळी रात्र. अर्धी रात्र उलटून गेलेली. किर्र अंधारात केवळ काजव्यांचा लुकलुकता प्रकाश. अशात नर्सरी घाटात कानावर येते घुंगरांची मंद किणकिण अन्  नजरेस पडतो झुलता कंदील. अगदी जवळ गेल्यावर दिसते ती बैलगाड्यांची लांबच लांब रांग. एक दोन नव्हे तर वीस-पंचवीस. आता तुम्ही म्हणाल हे काय? ही होती बैलगाड्यांची रांग. १९७० ते २००५  च्या काळात या मार्गावरून रविवारी रात्री जाणाऱ्या मार्गस्थांसह परिसरातील गावकऱ्यांनी अनुभवलेली बैलगाडीतून होणारी माल वाहतूक. कामठवाडा, चाणी, वारज, बोरज, जामवाडी, तिवसा, चिकणी, आमशेत, लिंगा, बाणायत आणि लाडखेड येथील शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांची माल वाहतुकीची ही सोय. ती वेगवान नव्हती पण खात्रीशीर अन् विश्वासनीय होती.

७० दशकात मालवाहतुकीची यांत्रिक साधने असली तरी ती शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या आवाक्याबाहेर होती. मात्र शेतात पिकलेला माल शहरात गेला पाहिजे आणि शहरातील जीवनावश्यक साहित्य गावात आले पाहिजे या दुहेरी उद्देशातून सुरु झालेली ट्रान्सपोर्टिंगची सुविधा अर्थात भाड्याची बैलगाडी. आता ही कोणाच्या डोक्यातील सुपीक कल्पना होती, हे कुणालाही सांगता येणार नाही. पण गरज ही शोधाची जननी आहे हे म्हणतात, ते येथे तंतोतंत खरे होते. लाडखेड, चाणी, कामठवाडा येथील काही हुकमती लोकांनी अर्थाजनासाठी सुरू केलेली ही सुविधा त्या काळी लाख मोलाची होती.

शनिवारी सायंकाळी या बैलगाड्या परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला घेऊन यवतमाळकडे निघायच्या. शेतकऱ्यांकडून वाजवी भाडे घेतले जायचे. साधारणतः एका पोत्यात पाच किंवा सात रुपये. भाजीपाल्याने भरलेल्या गाड्या पहाटेपर्यंत यवतमाळच्या भाजीमंडीत पोहचायच्या. तेथे पोत्यावरील चिठ्ठी बघून दलालांच्या ठेक्यावर माल उतरुन दिला की झाले काम. सकाळ झाली की या गाड्या तहसील कार्यालयाच्या बाजूने उभ्या केल्या जायच्या. बैलांना चारापाणी केला की गाडीवान मस्तपैकी आजुबाजूच्या हाॅटेलात मिसळ आणि रस्याच्या आलुबोंड्यांवर ताव मारायचे. दुपार होत आली की लाडखेड, कामठवाडा परिसरातील व्यापारी खरेदीसाठी यवतमाळात पोहचायचे. सायंकाळपर्यंत खरेदी केली की दुकानाच्या चिठ्ठ्या गाडीवानाच्या हवाली करायचे. प्रत्येक गाडीवान दुकाना-दुकानात जाऊन सर्व माल एकत्र करुन आपल्या बैलगाडीत रचायचे. एकदा गाडी भरली की मग सुरु व्हायचा परतीचा प्रवास.  दारव्हा मार्गावरील (आताच्या महावीरनगरसमोर) एका हळ्यावर बैलांना पाणी पाजले की हळूहळू मार्गक्रमण सुरु.

तीस वर्षापूर्वीच्या अरुंद डांबरी रस्त्यावर एकमागोमाग बैलगाड्या निघायच्या. सर्वात पुढे असलेल्या बैलगाडीच्या जुवाला उजेडासाठी कंदील बांधला राहायचा. मिणमिणत्या प्रकाशात गाड्या कठीण घाट उतरत सकाळपर्यंत आपापल्या गावी पोहचायच्या. बैलाकडून  वढा भार ओढून नेण्याच्या विषयात गाडीवानाचा नाईलाज असयचा. पोटापाण्यासाठी त्यांना हे सर्व करावं लागायचं. पण ते आपल्या बैलांवरही तेवढीच माया करायचे. पोटच्या गोळ्याप्रमाणे बैलांची काळजी घ्यायचे. कारण त्यांच्या खांद्यावरच त्यांच्या पोटाचा आणि संसाराचा गाडा असायचा. कामठवड्यातील रामा परचाके हा तसा धाडधिप्पाड गडी. अंगापिंडाने मजबूत अगदी एक क्विंटल सामानाचे पोतं सहज गाडीतून उचलून किराणा दुकानात चढवायचा. वयाच्या अगदी पंचविशीत असतांनाच त्याला कुटुंबाचा आर्थिक ताळमेळ बसवण्यासाठी भाड्याच्या गाडीचा व्यवसाय पत्करावा लागला. त्याची पांढरा रंगाची जोडी दिसायला देखणी आणि अंगापिंडाने त्याच्याच सारखीच मजबूत होती.

रामा इकडून जाताना शेतकऱ्याचा माल भरायचा आणि कामठवाड्याच्या थोडं पुढे गेलं की बिनधास्त गाडीत अंगावर घोंगड घेऊन ताणून द्यायचा. पहाटे यवतमाळातील यादवचे हळे आले की बैलांचे पाय आपोआप थांबायचे. रामाच्या लक्षात यायचे की बैलांना तहान लागली. रामा बैलांच्या खांद्यावरून  जू काढायचा. बैलांना भरपेट पाणी पाजायचा. पुन्हा जुवाला बैल जुतले की यवतमाळच्या मार्केटात घेऊन जायचा. परतीच्या वेळी कामठवाडा आणि चाणी येथील  दुकानदाराचा किराणा त्याच्या गाडीत भरायचा. जवळपास तो पंधरा-वीस क्विंटल माल असायचा.  बैलांना तो पोटभर खाऊ घालायचा आणि सायंकाळ झाली की हळूहळू तो कामठवाड्याच्या दिशेने निघायचा. पुन्हा त्याच हळ्यावर बैलांना पोटभर पाणी पाजायचा आणि घाट संपला की गाडीवान गाडीतच झोपून जायचे. तोच नाही तर सोबतीने असलेल्या सर्व बैलगाडीवान झोपायचे अन् बैलाच्या भरोश्यावर पुढचा प्रवास सुरु व्हायचा. बैल सवयीने मार्गक्रमण करत राहायचे. समोरुन प्रखर प्रकाशाचे वाहन आले की, बरोबर बाजूलाही व्हायचे.  सलग तीस ते पस्तीस वर्ष ही अव्याहत वाहतूक सुरु होती पण कधी अपघात झाला नाही की कधी चोरी.

सवयीने बैलगाडी सरळ कामठवाड्यात पोहचायची. तर लाडखडेच्या गाड्या पुढे निघायच्या. कामठवाड्यात शिरलेल्या बैलगाड्या थेट दुकानाजवळ थांबायच्या. जणू काही बैलांना सुद्धा आपल्याला कोणाकोणाच्या दुकानांमध्ये माल उतरवायचा आहे याची आठवण मालकाप्रमाणेच  असायची. या बैलांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की कामठवाडा, चाणी, चिकणी, लाडखेड या ठिकाणच्या भाड्याच्या गाड्या कितीही अंधार असला तरी त्या आपापल्या गावातच जायच्या. गाडीवान बिनघोर झोपलेला असला तरी  बैल कधी रस्ता चुकले नाहीत. लाडखेडच्या गाड्या कधी कामठवाडा वा चिकणीच्या रस्त्याला उतरल्या नाहीत. तर कामठवड्याच्या गाड्या कामठवाडा सोडून पुढे लाडखेडला गेल्या, असे कधीच झाले नाही. कितीतरी वर्षापासून दर आठवड्याला बैलांचा हाच प्रवास असल्याने त्यांना ते पक्क ठाऊक झालं होतं की या गावानंतर आता आपल्याला या ठिकाणी वळायचं आहे.

 मालक जोपर्यंत झोपेतून उठत नाही तोपर्यंत बैल निवांतपणे गाडीचं ओझं खांद्यावर घेऊन निवांतपणे त्या दुकानासमोरच थांबायचे . गाडीवान जागा व्हायचा तेव्हा बैल दुकानासमोर थांबलेले  असायचे. गाडीवान जाग आल्याबरोबर चपळाईने बैलाच्या खांद्यावरुन जू काढायचा खालच्या खुंटावर गाडीला आधार द्यायचा.  दुकानातला माल उतरवून बैलाचं ओझं थोडं थोडं कमी करत राहायचा या संपूर्ण प्रवासात बैलांचे हाल व्हायचे, पण त्या काळी कुणाचा इलाज नव्हता. ९० च्या दशकात माल वाहतुकीची साधने वाढली. खेडोपाडी छोटा हत्ती (मालगाडी) पोहचला आणि हळूहळू हा व्यवसाय बंद झाला. एका चांगले झाले की बैलांचा  छळ थांबला. पण आजही रविवारच्या रात्री कामठवाड्यावरुन यवतमाळला जाताना बैलांच्या गळ्यातील घुंगराची किणकिण मनाला साद घालते.

(लेखक पत्रकार व ग्राम जीवनाचे अभ्यासक आहेत )
9923169506

Previous article‘ते’ महाराष्ट्र राज्य नेमके कुठे आहे?
Next articleपवार, ठाकरे, फडणवीस, शिंदे यांची झाकली मूठ !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.