अमेय तिरोडकर
कर्नाटकमध्ये असं काय वेगळं झालं जे आधी कधी झालं नव्हतं? याआधी आमदार कधी फोडले गेले नाहीत? आमदार, खासदारांना पैसे, पदं देऊन सोबत घेतलं गेलं नाही? याआधी आमदार कधी किडनॅप झाले नाहीत? याआधी राज्यपालांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या पक्षाच्या हितानुसार निर्णन दिले नाहीत? मग असं काय झालं कर्नाटकात जे आधीच गलिच्छ असणाऱ्या या तोडफोडीच्या राजकारणाला अधिक ओंगळवाणं बनवणारं ठरलं? तर ते आहे मिडियाचं वर्तन !
टाईम्स नाऊ चॅनेलवर जेव्हा तुमच्याकडे नंबर्स नाहीत तर तुम्ही कसं सरकार बनवणार या प्रश्नाला आमच्याकडे अमित शहा आहेत (we have amit shah) असं उत्तर राम माधव यांनी दिलं तेव्हा अँकर्स नाविकाकुमार आणि राहुल शिवशंकर यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू ही कर्नाटकमध्ये खेळल्या गेलेल्या विकृत राजकारणाची डीफायनिंग मूमेंट आहे.
आमदार फोडाफोडीच्या याआधीच्या सगळ्या घटनांमध्ये माध्यमं नैतिकतेचा प्रश्न उपस्थित करत होती. ज्यांच्याकडून आमदार फोडले जात आहेत त्यांना प्रश्न विचारले जायचे. यावेळी माध्यमांमधला एक मोठा भाग आमदार फोडणा-यांना प्रश्न विचारणं सोडाच, प्रोत्साहन देत होता.
एका अँकरने ट्विट केलं.
“First wicket of Congress in KPL. Sources claimed that BJP is in touch with Congress MLA.”
विकेट? केपीएल? अरे आमदार फोडाफोडी म्हणजे आयपीएलचा लिलाव आहे काय? लोकशाही म्हणजे ट्वेन्टी ट्वेन्टी मॅचेस आहेत काय?
काही जणांनी बातम्या दिल्या. “काँग्रेसचे 12 आमदार भाजपच्या संपर्कात,” “काँग्रेसचे 3 बडे नेते भाजपच्या संपर्कात”. बरं, यांना ही माहिती कोण देत होतं? ‘सूत्रं’. हे सूत्र म्हणजे एक मजेदार प्रकार आहे आमच्या व्यवसायात.
आजकाल जे गावठी चाणक्य गल्लोगल्ली उगवलेत ना, आणि लायकी नसताना मोठं पद मिळालंय म्हणून टर्रेबाजी करत असतात त्यांना एक गोष्ट माहिती असते. अश्या गडबडीच्या राजकारणाच्या वेळी सगळे संबंधित लोक त्यांच्या त्यांच्या ठिकाणी टीव्ही बघत असतात. याहीवेळी काँग्रेस – जेडीएसचे आमदार असे टीव्ही बघत बसले होते. त्यांच्या मनात संशय आणि संभ्रम निर्माण करण्याची गरज होती. तो कसा करणार? तर मग ही सूत्रं ! या अँकर्सना सांगायचं की ‘एक मोठा आमदार आमच्या संपर्कात आहे.’ बरं, हा आमदार कोण, कुठला हे विचारायची हिंमतच नसल्यामुळे मग ही ‘सूत्रं’ थेट ब्रेकिंग न्यूज म्हणून लोकांसमोर येतात.
आता बदमाशीची यापुढची पायरी.
एक बातमी अशीच ‘सोडली’ गेली की डी के शिवकुमारच काँग्रेस सोडतोय. आता हे तर खतरनाकच होतं ! एकतर डिके काँग्रेसच्या सगळ्या मूव्ह ऑपरेट करत होता. आता तोच फुटतोय म्हटल्यावर सगळा गोंधळच ना ! डिके फुटले का ? मग अश्या बातम्या देऊन आपले श्रीमुख फोडून घेण्याचे काय कारण असावे बरे?
बदमाशीचा कळस तर तेव्हा झाला जेव्हा कोणीतरी सिद्धरामय्याच फुटू शकतात असा ‘अंदाज’ वर्तवला. हे अंदाज नसतात. ही शुद्ध बदमाशी असते. भाजपसाठी केलेली. का ओ, या बातम्या देणाऱ्याना का असा अंदाज वर्तवता येत नाही की एखादा बीजेपीचा नेता, जो आता त्यांचं सरकार बनत नाही हे लक्षात आलं म्हणून फुटू शकतो ? अंदाज नेहमी भाजपला मदत करणारेच कसे असतात ओ ?
ही वरती सांगितलेली संशय थेअरी आहे. ही पिकते चाणक्याचं नाव बदनाम करणाऱ्या ठगांच्या डोक्यात. ती झिरपत जाते आणि मग प्रेक्षक, वाचक ती सहन करतात !
हे इतक्यावरच थांबले नाहीत. पोलिसांनी जेव्हा काँग्रेस आमदारांच्या हॉटेलला दिलेलं संरक्षण काढलं तेव्हा डिके शिवकुमारांनी बाऊन्सर्स बोलावले (यांचा पण आपल्या आमदारांवर किती विश्वास आहे बघा !) तेव्हा, अनेक ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला की काँग्रेस आपल्या आमदारांना मोकळं का सोडत नाहीये?
दरोडेखोर गावभर फिरत आहेत. बँकेच्या बाहेर उभे आहेत. बँकेने सिक्युरिटी गार्ड का ठेवलाय ? दरोडेखोरांना बँक लुटायचा अधिकार आहे !! ????????????????????
कर्नाटकने एक बरं केलं. 2019 ला देशासमोर काय वाढून ठेवलं आहे त्याची झलक दाखवली. आणि त्यावेळी स्वतःला निःपक्षपाती आणि तटस्थ वगैरे म्हणवणा-यांनी कसं वागायचं आहे त्याची रिहर्सल ठगांनी आता त्यांच्याकडून करवून घेतली आहे !!
जमुरे,
इ लोकतंत्र का खेल बन गया है । तू जितना नाचेगा उतना मजा आयेगा ।
(लेखक ‘एशियन एज’ या दैनिकाचे विशेष प्रतिनिधी आहेत)
9899395561