महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकणारे… फक्त १८ जागांवर अडकले आहेत. त्या १८ मध्ये भाजपाच्या नेमक्या किती? मुंबईत काय फजिती झाली… मुबई भाजपाचे अध्यक्ष कोणी आशिष शेलार नावाचे आहेत… त्यांनी जाहीर केले होते की, ‘महाविकास आघाडीला एकूण १८ जागा मिळाल्या तर मी राजकारण सोडून देईन.’ त्यांनी राजकारण सोडले की नाही, हे अजून जाहीर झालेले नाही. सामान्य माणसांना अती मोठे केले की, पक्षाचे हसू कसे होते, त्याचे हे उदाहरण आहे. देशात जे काही घडले ते नंतर पाहू. महाराष्ट्रात हे असेच घडणार होते. हे या जागेवर गेल्या ५-६ महिन्यांत अनेकवेळा लिहिलेले आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशीसुद्धा लिहिलेल्या लेखात महाविकास आघाडी ३० जागा जिंकणार, असेच लिहिलेले आहे. परंतु भाजपा नेते हवेत होेते. ते सगळे आता जमिनीवर आले.
अशोक चव्हाण यांच्याबद्दल लिहिल पाहिजे… नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण निवडून आले. हा फार मोठा विजय आहे. भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर पराभूत झाले पण हा पराभव त्यांचा नाही… ज्या अशोक चव्हाण यांच्या घरात ५० वर्षे शंकरराव काँग्रेसमुळे सत्तेत होते आणि अशोकराव चव्हाण ३९ वर्षे सत्तेत होते त्या अशोकरावांनी पक्षाशी गद्दारी करून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांचे नाक या पराभवाने तळापासून कापलेले आहे. उभे न राहिलेले अशोक चव्हाण विरुद्ध उभे राहिलेले वसंतराव चव्हाण अशा लढाईत अशोकरावांना नांदेडमध्ये तोंड दाखवायला आता जागा नाही. पक्षाने एवढे दिल्यावर कृतघ्न होऊ नये. पण अशोकराव यातून काय शिकणार…. वेळ निघून गेलीय…. नांदेडच्या मतदारांचे अभिनंदन….