अशी गर्दी रस्त्यावर का उतरत नाही? याचे सरळ आणि सोपे कारण की, त्यासाठी लागणारे नेतृत्त्व समाजात असावे लागते. त्यासाठी त्या नेतृत्त्वावर विश्वास असणारे लोक असावे लागतात. नेतृत्त्व करणाऱ्यावर विश्वास असावा लागतो आणि नेत्याच्या मागे येणाऱ्या जनतेवरही नेत्याचा विश्वास असावा लागतो. शांततामय मार्गाने या महाराष्ट्रात किती प्रचंड आंदोलने झाली. याची अनेकांना आज आठवणही नसेल. किंबहुना ज्या संपादकांनी अग्रलेखातून हे प्रश्न विचारले त्यांनी अशी आंदोलने पाहिलीही नसतील. तो त्यांचा दोष नाही. पण, समुदायाचे आंदोलन नेत्याशिवाय होत नाही. आजचा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सगळ्यात मोठा दुष्काळ, समाजाचे नेतृत्त्व करणारे त्या विश्वासाचे आणि त्या ताकतीचे नेतेच नाहीत. त्या नेत्याचे नाव काय? ‘सत्ताधारी असलेला’ हा सत्तेचा प्रमुख असतो. त्याची सत्तेची कवच-कुंडले गळून पडल्यानंतर त्याच्या मागे किती लोक आहेत, अशी असंख्य सत्ताधाऱ्यांची नावे सांगता येतील की, सत्ता गेल्यानंतर त्यांच्या मागे, समाज नाही… लोक नाहीत… त्यामुळे लोकांचे प्रश्न गेल्या ५० वर्षांत अधिक उग्र झाले असताना…. ५० वर्षांपूर्वीसारखी आंदोलने आता होत नाहीत, याचे मुख्य कारण त्या आंदोलनाला तो आवाका असलेला आणि लोकांचा विश्वास असलेला नेता राहिलेला नाही. त्या नेत्याला जे सामाजिक चारित्र्य लागते ते सामाजिक चारित्र्यही शिल्लक राहिलेले नाही. त्या योग्यतेची जाणीव असलेला नेता नाही आणि त्याला मानणारे अनुयायी नाहीत. ही अवस्था सर्वात वाईट अशी अवस्था असते. एक प्रकारची ती निर्णायकी असते. राजकीय परिभाषेत बोलायचे तर आज लोकांचे नेतृत्त्व करेल, असे शरद पवारांसारखे अपवादात्मक एखादा नेता आहे. पण दुसरे कोणते नाव आहे ?
क्रिकेटचा आणि जयेश शहाचा काय संबंध? अशिष शेलार यांचा काय संबंध? पण, हा प्रश्न त्यांना कोण विचारू शकणार? हे सर्व कोणत्या शक्तीने होते? या शक्ती समाजाच्या आजच्या स्थितीला कारणीभूत आहेत. विवेकावर जेव्हा पैसा मात करतो त्यावेळी सामाजिक प्रश्नावर चळवळ उभी राहू शकत नाही. मग, मध्यमवर्गीयांची मानसिकता अशा ठिकाणी गर्दी करण्याची तयार होते. परवाच्या गर्दीचा तोच अर्थ आहे. त्यातील क्रिकेट समजणारे किती? हा भाग वेगळा. क्रिकेट या देशात लोकप्रिय आहे, यातही दुमत नाही. पण त्या क्रिकेटमध्ये पैसा शिरल्यामुळे इव्हेंट तयार झाला. ५० वर्षांपूर्वी बापू नाडकर्णी सांगायचा… ‘पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात ५० रुपये मिळायचे. रोजचे दहा रुपये याप्रमाणे… अगदी पंच असलेल्या माधव गोठस्कर यांनासुद्धा.’ कारण त्यावेळी पैशासाठी खेळ नव्हता. आनंदासाठी खेळ होता. आता सगळेच चित्र बदललेले आहे. जाहिराती आणि सामन्याची बक्षिसे यांची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली. त्यामुळे तो ‘इव्हेंट’ होणारच. घरी होणाऱ्या सत्यनारायणाच्या पुजेची कोणी जाहिरात करत नाही. पण ताजमध्ये होणाऱ्या पार्टीची आमंत्रणे द्यावी लागतात. मानसिकतेमधील हा फरक आहे. त्यामुळे जमलेल्या गर्दीचे विश्लेषण करताना या गर्दीतील लोक रस्त्यावर उतरून त्यांच्याच प्रश्नासाठी चळवळीला तयार होतील, हा प्रश्न कितीही समयोचित वाटला तरी, भाबडा आहे. कारण, नेतृत्त्व असल्याशिवाय आंदोलन होत नाही आणि आज महाराष्ट्रापुरते बोलायचे तर जीवन-मरणाच्या प्रश्नावर लोकांना रस्त्यावर उतरवण्याची ताकद असलेला नेता नाही. प्रश्न आहेतच… आंदोलनाला रस्ते आहेत… लोकशाहीमध्ये आंदोलन आवश्यक आहे. पण, ते आंदोलन उभे करणारा नेता कोण?