‘औडकचौडक’ हा ताराबाईंचा (डॉ. तारा भवाळकर) आवडता शब्द. आपलं लेखन-वाचन आणि जगणंही औडकचौडक झालंय, असं बोलताना त्या अनेकदा सांगत असतात. त्यांच्या बोलण्यातील हे ‘औडकचौडक’ म्हणजे काय? तर- आडवंतिडवं-वाकडंतिकडं कसंही. शिस्तबद्ध किंवा आखून-रेखून असं काही न केलेलं. अर्थात त्याची ताराबाईंना बिलकूल खंत नाही. उलट आपल्या या औडकचौडक लेखन-वाचनाने आणि वागण्या-जगण्यानेच आपल्याला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. किंबहुना त्यांच्या अशा औडकचौडक जगण्यामुळेच आजच्या बहुआयामी, बहुपेडी, बहुप्रातिभ ताराबाई मराठी सारस्वताला गवसलेल्या आहेत. केवळ त्यांच्यामुळे मराठी लोकसाहित्यातल्या-लोकसंस्कृतीतल्या अनेक अनवट अशा वाटा मराठी वाचकांना उमजल्या आहेत, आकळल्या आहेत. त्यांच्याप्रमाणे लोकसाहित्याच्या क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्रात इतरही अनेक मान्यवर होते आणि त्यातले काही आजही आहेत. परंतु ताराबाईंचं वेगळेपण हे की त्यांनी परंपरेनं चालत आलेल्या लोकसंस्कृतीला मातृसंस्कृतीशी जोडून घेतलं. लोकसाहित्याचा-लोकसंस्कृतीचा अभ्यास त्यांनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून केला. परिणामी लोकसंस्कृतीच्या मुळाशी असलेलं स्त्रीतत्त्व नव्यानेच मुखरित झालं. लोकसंस्कृतीच्या अभ्यासाला एक नवा आयाम मिळाला.
मराठीत लोकसाहित्याच्या शास्त्रीय अभ्यासाची पायाभरणी करणाऱ्या दिवंगत विदुषी दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्याच्या अभ्यासकांना एक इशारा देऊन ठेवला होता. त्या म्हणाल्या होत्या- ‘लोकसाहित्याचा खूप मोठा भाग अत्यंत हिडीस, कंटाळवाणा व जनतेच्या बुद्धीस मागे खेचून धरणारा आहे. लोकसाहित्याचा कृत्रिम उमाळा केवळ त्या विषयालाच नव्हे, तर आमच्या अभिरुचीला व प्रगतीला अंती मारक ठरणारा आहे. तेव्हा लोकसाहित्याची छाननी, त्याचे सर्व घटक अलिप्तपणे तपासून व्हायला हवी.’ ताराबाईंनी दुर्गाबाईंचा हा इशारा केवळ शिरोधार्य मानला नाही तर त्या त्यापेक्षा एक पाऊल पुढेच गेल्या. म्हणून तर त्या म्हणतात- ‘पारंपरिक जीवन हा माझा जिव्हाळ्याचा विषय असला तरी तो माझ्या अंधश्रद्ध उमाळ्याचा विषय कधीच नव्हता. उलट मी त्याकडे सतत चिकित्सक वृत्तीनेच पाहत आले आहे. जुने ते सर्व सुंदर-आदर्श असे जे एक स्वप्नचित्र उभे करण्याची प्रथा आहे ती चिकित्सक विवेकाच्या विरोधात जाणारी आहे.’
गंमत म्हणजे चित्रावशास्त्री आणि बोकीलमास्तरांप्रमाणे विवेकाची शिकवण देणारी, थेट नास्तिकच म्हणता येईल अशी एक व्यक्ती ताराबाईंच्या घरातच होती. मुद्दाम यमाच्या दक्षिण दिशेला पाय करून झोपणारी. आलाच यम न्यायला तर त्याला लाथेने उडवता तरी येईल, असं म्हणणारी. या साऱ्या अनुभवांच्या प्रभावातूनच ताराबाईंनी पुढील आयुष्यात विवेकवादी भूमिका जपली आणि निभावलीही. ‘सुगावा प्रकाशन’चे विलास वाघ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, नरहर कुरुंदकर, नारायण सुर्वे यांच्याशी ताराबाईंचं मैत्र जुळलं ते या त्यांच्या विवेकवादी भूमिकेतूनच. म्हणूनच त्यांनी एके ठिकाणी म्हणून ठेवलंय- ‘बोकील मास्तरांनी शिकवलेले पाढे आणि गणितं मी कधीच विसरले. पण त्यांनी दाखवलेला विवेकाचा दिवा मात्र पुढे आयुष्यभर वाट दाखवत राहिला आहे. केवळ कोणीतरी म्हणतं म्हणून एखाद्या गोष्टीचा विनातक्रार स्वीकार करायला पुढं मन कधीच तयार झालं नाही. प्रश्न, शंका, फाटे फोडणं हे होतंच राहिलं. त्यात भरकटणं, त्रास होणं अटळ होतं. राजमार्ग सोडून विचार करणारांना जे एकाकीपण येतं तेही आलं. पण पुन्हा प्रत्येक वाटेवर एकेक प्रकाशदाता भेटत गेला!’
लहानपणी चित्राव शास्त्र्यांच्या वाड्यात राहल्यामुळे तेथील मंदिरात होणाऱ्या देवाच्या सर्व धार्मिक विधी-विधांनांतील नाट्यात्मकता ताराबाईंना लहानपणीच भावली होती. पुढच्या काळात कदाचित त्यांतूनच त्या नाटकाच्या अभ्यासाकडे वळल्या. केवळ अभ्यासाकडे नाही, तर त्या नाट्यचळवळीत सामील झाल्या. नाट्यलेखन-दिग्दर्शनापासून ते थेट अभिनयापर्यंत त्यांनी रंगभूमी गाजवली. नोकरीच्या निमित्ताने पन्नास वर्षांपूर्वी सांगलीत येऊन स्थिरावल्यावर त्यांनी सांगलीतच एक प्रायोगिक नाट्यसंस्थाही सुरू केली. विशेष म्हणजे त्यांना राज्यस्तरावरील नाट्यस्पर्धेत अभिनयासाठी पुरस्कारही मिळाले आहेत. नाटकाच्या या आवडीतूनच त्यांनी पीएच.डीसाठी ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण : प्रारंभापासून १९२० पर्यंत’ हा विषय निवडला. पीएच.डीसाठी या विषयाचा अभ्यास करतानाच त्यांची गाठ पौराणिक मिथकांपासून लोकरंगभूमीवरील विविध घटकांशी पडली आणि त्यांच्यासमोर अभ्यासाचं एक वेगळंच क्षेत्र अवचितपणे खुलं झालं. त्यानंतर मग त्यांचा पीएच.डीचा अभ्यास कधीच पूर्ण झाला, लोकसाहित्य-लोकसंस्कृतीचा अभ्यास मात्र आजतागायत सुरू आहे. लोकसाहित्याच्या क्षेत्रात काम करणारे, करू इच्छिणारे त्यांच्याकडे कायमच मार्गदर्शक म्हणून पाहतात. ताराबाई मात्र आजही स्वतःला लोकसाहित्याची विद्यार्थिनी समजतात. कारण लोकसाहित्य-लोकसंस्कृती ही प्रवाही गोष्ट आहे. ती कधीच थांबत वा संपत नाही. काळाच्या ओघात वेगवेगळी समकालीन रूपं धारण करून ती वाहत राहते. तेव्हा त्या त्या काळात लोकसंस्कृतीचा मागोवा घेऊन तिचा समकाळाशी सांधा जोडणं ताराबाईंना महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच आजही त्या लोकगीतं-लोककथा-लोकश्रद्धा यांची आधुनिक काळाशी सांधेजोड करीत असतात.
महत्त्वाची बाब म्हणजे ताराबाई कुठलीही गोष्ट अंधपणाने स्वीकारत नाहीत, मग ती गोष्ट प्राचीन असो वा अर्वाचीन. म्हणूनच जेव्हा १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्त्री-मुक्ती वर्ष भारतातही जोरदारपणे साजरा होत होतं, तेव्हा ‘स्त्री-मुक्तीची कल्पना निदान आपल्याकडे तरी नवीन नाही’ असा मुद्दा त्यांनी मांडला होता आणि त्यासाठी मध्ययुगात होऊन गेलेल्या संतस्त्रियांचे दाखले दिले होते. विठ्ठलाकडे आई-बाप-भाऊ या नात्यांपलीकडे जाऊन सखा, प्रियकर म्हणूनही पाहणाऱ्या संतस्त्रियांच्या क्रांतिकारकत्वाची त्यांनी नव्यानेच महाराष्ट्राला ओळख करून दिली. त्यातूनच आकाराला आलेलं ‘स्त्री-मुक्तीचा आत्मस्वर’ हे त्यांचं पुस्तक मध्ययुगातील स्त्री-मुक्ती संकल्पनेची स्त्रीवादाच्या अंगाने अभ्यासपूर्ण मांडणी करणारं आहे. पण केवळ संतस्त्रियांपुरता स्त्री-मुक्ती किंवा स्त्रीवादाचा पुरस्कार करून ताराबाई थांबल्या नाहीत. नंतरच्या काळात त्यांनी एकूण लोकसंस्कृतीचाच त्या अंगाने मागोवा घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की- ही लोकसंस्कृती खरंतर मातृसंस्कृती आहे. ‘लोकसंचित’, ‘लोकसाहित्यातील स्त्री-प्रतिमा’ यांसारख्या पुस्तकांतून त्यांची लोकसाहित्याची स्त्रीवादी मांडणी पाहायला मिळते.
… पण आता स्त्रिया बोलू लागल्यात. अगदी रामायण-महाभारतातल्या, पुराणातल्या स्त्रियाही! आपलं दुःख, आपल्या वेदना सांगायला त्या स्वतः अस्तित्वात नाहीत, पण त्यांच्या दैवतीकरणामागे दडलेल्या दर्दभऱ्या कथा-कहाण्यांना आता वाचा फुटलीय. आताच्या समविचारी स्त्री-पुरुषांच्या माध्यमातून त्या आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल समाजपुरुषाला जाब विचारतायत. ताराबाईंची सीता त्यापैकीच एक! अर्थात ताराबाईंनी केवळ लोकसाहित्य वा लोकसंस्कृतीबद्दलच लेखन केलंय असं नाही. कथालोखन, ललितलेखन, विनोदीलेखन असं त्यांनी विपुललेखन केलं आहे. त्यांची सुमारे पंचेचाळीसेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यातही त्यांचा एक अलक्षित राहिलेला पैलू म्हणजे, त्या उत्तम अनुवादकही आहेत. प्रसिद्ध दिवंगत हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या कवितासंग्रहाचा त्यांनी उत्तम मराठी अनुवाद केलेला आहे आणि तो प्रकाशितही झालेला आहे. मात्र असं विविधांगी लेखन ताराबाईंनी केलेलं असलं तरी त्यांची खरी ओळख लोकसाहित्य-लोकसंस्कृतीच्या भाष्यकार अशीच मराठी जनमनसात रुजलेली आहे. कारण त्यांच्या प्रकाशित साहित्यावर नजर टाकली तर त्यांची ‘यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा’, ‘लोकनागर रंगभूमी’, ‘मिथक आणि नाटक’, ‘लोकसंचित’, ‘लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा’, ‘स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’, ‘लोकसाहित्य वाङ्मयप्रवाह’, ‘मायवाटेचा मागोवा’, ‘लोकपरंपरा आणि स्त्री-प्रतिभा’, ‘पायवाटेची रंगरूपे’, ‘लोकांगण’, ‘लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा’, ‘मातीची रूपे’, ‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा’, ‘कथा जुनी तरी नवी’, ‘मुक्ती मार्गाच्या प्रवासिनी’ आणि ‘महामाया’ (रा. चिं. ढेरे यांच्यासह) ही लोकसाहित्य-लोकसंस्कृतीवर मूलगामी प्रकाशझोत टाकणारी पुस्तकं पटकन नजरेत भरतात. संस्कृतीचं उत्खनन आणि विश्लेषण हा ताराबाईंचा स्थायी भाव आहे. ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे एकप्रकारे डॉ. तारा भवाळकर यांच्या विलक्षण आणि विचक्षण अभ्यासवृत्ती-संशोधनवृत्तीला मिळालेली दादच आहे. तसंच ताराबाईंचा हा गौरव म्हणजे लक्षार्थाने लोकसाहित्य-लोकसंस्कृतीचा गौरव आहे नि ताराबाईंच्या औडकचौडक जगण्याचाही!
अन् तरीही ताराबाईंसाठी कोणत्याही पुरस्काराच्या-सन्मानाच्या दशांगुळे वर असलेल्या एका सन्मानाचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. व्यवसायाने घरात कुलकर्णीपण असल्यामुळे ताराबाईंच्या घरातल्या सगळ्यांचंच आडनाव कुलकर्णी आहे. फक्त ताराबाईच काय त्या एकमेव भवाळकर आहेत. कारण पहिल्यांदा शाळेत नाव घालताना त्यांचं नाव तारा भवाळकर असं लिहिलं गेलं. आपण आता कुलकर्णीपण करत नाही तर ते आडनाव कशाला लावा, असं बाईंच्या शाळाप्रवेशाच्या वेळी त्यांच्या काकाच्या मनात आलं. म्हणून त्याने ताराबाईंच्या नावापुढे भवाळकर हे आपलं मूळ आडनाव लावलं. मात्र कालांतराने इतर मुलांच्या शाळाप्रवेशाच्या वेळी या गोष्टीचं विस्मरण झालं आणि बाकीची सगळी भावंडं-कुटुंबीय कुलकर्णीच राहिले. साहजिकच ताराबाईंची आई देखील कुलकर्णी हेच आडनाव लावायची. पण पुढे कधी तरी वयाची पन्नाशी उलटल्यावर थोरल्या लेकीच्या म्हणजेच ताराबाईंच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटून त्यांच्या आईने आपल्या कुलकर्णी आडनावाऐवजी भवाळकर आडनाव लावायला सुरुवात केली. आज वडिलांऐवजी किंवा त्यांच्यासोबत आपल्या आईचंही नाव लिहिणाऱ्यांची कमी नाही, पण मुलीचं नाव आईने लावण्याचं हे बहुधा एकमेव उदाहरण असावं! ताराबाई अखंड लोकसाहित्यातील मातृसंस्कृतीचा-स्त्रीसंस्कृतीचा गौरव करतात. आईने आपल्या लेकीचं नाव लावावं यापेक्षा स्त्री-त्वाचा महान गौरव दुसरा कुठला असू शकतो?