शेखर पाटील
आपल्या देशात ज्येष्ठांना मानाचे स्थान आहे. मात्र बर्याच जणांना गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रमतील सीमारेषा समजतच नाही. यामुळे आपण समाजाला मार्गदर्शन करण्याच्या वयात आलो तरी हातात आहे ते काम सोडण्याची इच्छा बहुतेकांना टाळता येत नाही. अर्थात भारतीय समाजात कुणीही आपली कारकिर्द भरात असतांना सहसा निवृत्ती स्वीकारत नाही. याचे सर्वात भेदक उदाहरण म्हणजे मसणात गोवर्या गेल्या तरी पदांना चिपकुन बसणारे अनेक राजकारणी होत. हेच चित्र थोड्याफार फरकाने सगळीकडे दिसून येते. आम्हा पत्रकारांनीही नाकाने कांदे सोलण्याची गरज नाही. कारण अनेक बहाद्दर आपली सद्दी कधीचीच संपून गेली तरी लेखणी खाली ठेवण्यास तयार नसल्याचे आपण पाहतच असतो. अनेक पाश्चात्य राष्ट्रांमध्ये मात्र बरेचसे प्रतिभावंत सर्वोच्च शिखरावर असतांना आपल्या कारकिर्दीस अलविदा करत असतात. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे अर्थातच एबी डिव्हिलयर्स या गुणवान क्रिकेटपटूने केलेली आकस्मिक निवृत्तीची घोषणा होय.
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….
काही दिवसांपूर्वीच आयपीएलचा एक सामना पाहत असतांना बॅटमनने मारलेला चेंडू सीमावरून जाणार असे दिसत असतांनाच चमत्कार घडला. कुणी जिम्नॅस्ट अथवा डोंबार्याने हवेत कलाटणी मारून तो चेंडू अलगदपणे अक्षरश: हवेतून आपल्या हातात खेचून आणला. आणि माझ्या हातातील घास तोंडात टाकण्याचे भानदेखील मला उरले नाही. काही मायक्रो सेकंदापर्यंत अवघे जग स्तब्ध झाले आणि अर्थातच टाळ्यांच्या कडकडाटात तो खेळाडू उठून उभा राहिला तेव्हा त्याला अक्षरश: सॅल्युट करावासा वाटला. ओ..हो ! क्या बात है…शानदार…सुपर्ब असे चार शब्द माझ्याच घराच्या चार ठिकाणाहून आले. तोच वीर म्हणजे एबी डिव्हीलीयर्स ! इतक्या अप्रतिम पध्दतीचे शारिरीक चापल्य आणि अर्थातच याच्या जोडीला अफाट गुणवत्ता असणारा एबीडी वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी क्रिकेटमधून रिटायर्ड होतोय. यार, झाले तरी काय याला ? अजूनही तीन-चार वर्षे तो अगदी आरामात खेळू शकला असता. नाही तर आमच्याकडे पहा, कपिलदेवच्या शेवटच्या कालखंडात यष्टीरक्षकापर्यंत चेंडू दोन टप्पे खायचा. मात्र विक्रमवीर असल्यामुळे बोलणार कोण? हाच प्रकार सचिनच्या बाबतही घडण्याच्या मार्गावर असतांना त्याने शुध्द पकडली. त्या तुलनेत लक्ष्मण आणि द्रविड यांनी बर्यापैकी भरात असतांना खेळाला रामराम ठोकला. इतरांच्या नशिबात तर सेंड ऑफचा सामनादेखील आला नाही. सौरव गांगुलीच्या चाहत्यांना तर त्याला संघात घेण्यासाठी संप करावासा लागला. मात्र काळाची पावले ओळखता आली नाही तर कोणत्याही क्षेत्रातील कितीही उत्तुंग व्यक्तीमत्व असले तरी वेळेत निरोप घेतला नाही तर त्याची शोकांतिका अटळ असते. यामुळे एबीडी हा मला अन्य क्रिकेटपटूंपेक्षा आज किती तरी श्रेष्ठ वाटतोय.
खरं तर दक्षीण आफ्रिकेचा क्रिकेट संघ शापीत असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. नियमित सामन्यांमध्ये देदीप्यमान कामगिरी करणारा हा चमू महत्वाच्या सामन्यांमध्ये अवसान गाळून हरतो. मात्र या देशातील क्रिकेटची गुणवत्ता ही अतिशय उच्च प्रतिची आहे. याआधी एबीडीप्रमाणे जॅक कॅलीसनेही याच पध्दतीत ऐन भरात असतांना निवृत्ती जाहीर केली होती. बरं, या दोघांनीही कसोटी, एक दिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारांमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली आहे. यात एबीडीचा बाज हा आक्रमकतेचा होय. त्याची नेहमी विवीयन रिचर्डस्सोबत तुलना होत असे. रिचर्सडसप्रमाणे तोदेखील मस्तपैकी गोलंदाजांची धुलाई करायचा. अर्थात ‘३६० डिग्री बॅटसमन’ म्हणून ख्यात असणार्या एबीडीच्या भात्यात ‘द ग्रेट’ रिचर्डस्पेक्षा जास्त फटके होते. मैदानाच्या चारही बाजूंना अतिशय नयनरम्य फटक्यांची आतषबाजी करणारा एबीडी आता मैदानावर दिसणार नाही. तथापि, त्याने कोट्यवधी क्रिकेट रसिकांना दिलेला आनंद आणि अर्थातच त्याच्या नावासमोर असणारी विक्रमांची रास कोण हिरावून घेणार ?
अर्थात एबीडी गेलाय तो नवीन एबीडीला जागा मिळावी म्हणून. आपल्या कडे जागा अडवून बसलेल्या असंख्य ढुढ्ढाचार्यांच्या मनात इतरांना संधी देण्याचा विचार तरी येणार का हो ?
(लेखक दैनिक ‘जनशक्ती’च्या जळगाव आवृत्तीचे संपादक आहेत)
9226217770