-अशोक मानकर
मिस गिराड हे तिचं नाव.
दिसायला सुंदर अशी ही ब्रिटिश तरुणी होती.
बाप जंगल खात्यात वरिष्ठ अधिकारी होता.
पत्नी तिकडे इंग्लंडमध्येच निवर्तली होती की काय कोण जाणे, पण तो हिंदुस्तानात येताना या मुलीला सोबत घेऊन आला होता.
यथावकाश ती मोठी होत गेली.
वयात आली.
मग लग्न बिग्नं करावं की नाही?
आणि करावं तर कुणाशी?
दरम्यान आपला हा देश तिला खूप आवडला होता.
मेळघाट तर जीव की प्राण बनला होता. इथली साधी भोळी व सरळ माणसे खूप भावली होती आणि त्यांचं निसर्गाशी अनुरूप जगणं आत्यंतिक आवडलं होतं.
हे आवडणं यथावकाश इतकं हावी होत गेलं, की तिनं मरेपर्यंत इथंच राहण्याचा निर्धार केला.
पुढे वडील सेवेतून निवृत्त झाले.
मग म्हातारे झाले आणि त्यांचं निधन झालं.
पण तिनं ना आपला मुक्काम हलवला ना लग्नं केलं.
त्यानंतर कितीतरी वर्षे ती इथंच राहिली.
विशेष म्हणजे तिचं वागणं, बोलणं, चालणं, पेहेराव सगळं कसं शैलीदार आणि अत्यंत टापटिपीचं होतं.
थोडीफार चित्रकलाही अवगत होती.
ती रानोमाळ भटकायची.
राहायला स्वतंत्र बंगला होता.
पदरी अनेक नोकर चाकर होते.
या नोकरांना राहायला काही खोल्या बांधून दिलेल्या होत्या.
त्यांनी शेवटपर्यंत तिची चाकरी केली.
काळाची पाने उलटत गेली.
अखेर ही बाई म्हातारी झाली आणि याच जागेत तिनं शेवटचा श्वास घेतला.
या घटनेला आता पन्नास वर्षे होत आहेत.
आणि होय, मिस गिराड जिथं राहत होती तो बंगला आजही तिची साक्ष देत उभा आहे. घटांगकडून कुकरू -खामला जाताना उजव्या बाजूला हा उजाड बंगला दिसतोय.
नोकरांच्या खोल्याही आहेत.
पण हे सगळं भग्नावशेषात आहे आणि सध्या तिथं कुणीच राहत नाही.
हे आपल्या मेळघाटात आहे.
हे सुद्धा नक्की वाचा-
मेळघाट भ्रमंती – डाक बंगलाhttps://mediawatch.info/melghat-bhramanti-dak-bangla-an-interesting-and-thrilling-story-by-ashok-mankar/
मेळघाट भ्रमंती : तुकईथडची हडळ https://mediawatch.info/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%9f-%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%81magical-melghat-tukaithads-hadal-by-ashok-mankar/
(अशोक मानकर नामवंत कथा लेखक आहेत)
8087105357









