चार पुरुषांच्या चार शोकांतिका!

-अमोल उदगीरकर
घरात एखादा उत्तुंग , प्रचंड कर्तबगार पुरुष /स्त्री असण्याचे जितके फायदे असतील ,त्याच्यापेक्षा जास्त तोटे असण्याचीच जास्त शक्यता असते . सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्या कर्तबगार माणसाच्या छायेत त्याच्या परिवारातले इतर सदस्य खुरटून जातात . आणि वटवृक्षाच्या पारंब्यांना लटकत राहण्याचं भागधेय त्या कर्तबगार माणसाच्या पुढच्या पिढ्यांच्या नशिबी येतं .कानेटकरांच्या याच विषयावर असणाऱ्या नाटकाचं नावं ‘सूर्याची पिल्लं’ असं समर्पक होतं . देशात किंवा महाराष्ट्रात सामाजिक ,राजकीय , खेळाच्या किंवा मनोरंजनाच्या क्षेत्रात असणाऱ्या तालेवार घराण्यांची यादी काढून बघा . सूर्याची पिल्लंच जास्त दिसतील . दोष त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा नसतो आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा पण नसतो .नियतीच्या कुठल्याश्या फटकाऱ्यानी (Strange stroke of luck ) ही लोक एका छताखाली येतात . पुरात वाहत जाणारी भांडी एकमेकांवर आपटतात . मातीची भांडी फुटतात आणि लोखंडाची भांडी टिकतात . दुर्दैव हे की तुम्ही कुठल्या प्रकारचं भांड असावं हे तुमच्या हातात नसतं .अभिनेता इम्रान खानसंबंधीची (जाने तू जाने तु या जाने ना आणि डेली बेली ) एक बातमी वाचून आमिर खानच्या घरातल्या चार चार वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या पुरुषांची शोकांतिका पुन्हा याच नियमावर गडद ठप्पा मारते या कल्पनेने काळजात चर्रर्र झालं .
आमिरचे वडील ताहीर हुसेन यांच्यासोबतचे संबंध नंतर खूप ताणले गेले होते . एकेकाळी यशस्वी निर्माते असणारे ताहीर नंतर उतरणीला लागले होते . पण कमबॅक करण्याची इच्छा होतीच . त्यांनी अनेक फायनान्सरशी माझ्या पुढच्या सिनेमात आमिर आहे असं सांगून पैसा गोळा करायला सुरुवात केली . आमिरच्या कानावर ही गोष्ट येताच त्याने वर्तमानपत्रात मी माझ्या वडिलांच्या पुढच्या सिनेमात काम करत नाहीये आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी जाड मथळ्यातली जाहिरात दिली . हे आपल्या मध्यमवर्गीय कल्पनेत बसणार नसलं तरी एका उच्च वर्तुळात नेहमीच चालणारा खेळ . नाराज झालेल्या आमिरच्या वडिलांनी आमिरचं घर सोडलं . घरं सोडलं तर सोडलं पण आमिरच्या आईला घटस्फोट देऊन वयाच्या सत्तरीमध्ये दुसरं लग्न केलं . संबंध कायमचे तुटणार होते .तसंच झालं .हुसेनच्या मृत्यूपूर्वी थोडे संबंध पुन्हा निर्माण झाले पण ते तेवढंच.
आमिरचा सख्खा भाऊ फैसल . आमिरने आपल्या भावासाठी काय नाही केलं ? त्याच्यासाठी सिनेमे काढले , वैयक्तिक आयुष्यात त्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या ,आर्थिक मदत केली आणि बरंच काही केलं . पण फैसलमध्ये आमिरच्या दहा टक्के पण कुवत नव्हती . ‘सिबलिंग रायव्हलरी ‘ कुठंतरी असतेच .आपल्या अपयशाला आमिरचं कारणीभूत आहे असा फैसलचा समज झाला . दुर्दैवाचा शेवटचा घाव म्हणजे फैसलला स्किझोफ्रेनिया झाला .मानसिक संतुलन ढासळलं .त्याने जाहीर पत्रकार परिषद घेऊन आमिरवर नाही नाही ते आरोप केले . शेवटी त्याला मानसिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं . आमिरनेच ती जबाबदारी उचलली . तो बरा होऊन बाहेर आला . अजूनही संबंधामध्ये ताणतणाव आहेतच . पण किमान आघाडीवर शांतता आहे .
इम्रान खान . इम्रानचा ‘जाने तू या जाने ना ‘ आणि रणबीरचा ‘सांवरिया ‘ एकाच वर्षी प्रदर्शित झाले . ‘जाने तू या जाने ना ‘ हिट झाला आणि ‘सावरिया ‘ फ्लॉप . एकेकाळी रणबीरचा तुल्यबळ प्रतिस्पर्धी असणारा इम्रान नंतर मात्र झपाट्याने मागे पडत गेला . त्याने जे मोजके दोन हिट दिले त्यातले दोन (‘जाने तू या जाने ना ‘ आणि डेली बेली ) आमीरनेच प्रोड्युस केले होते . पण आमीरशी सातत्याने होणारी तुलना इम्रानला झेपणं शक्य नव्हतं . ‘कट्टी बट्टी ‘ सिनेमा (साल २०१५) करून इम्रान खान घरी बसला . त्याने काहीही करायचं नाकारलं . किती भयंकर डिप्रेशन असेल ? त्याची बायको म्हणजे त्याची पहिली जुनी प्रेयसी . इम्रानचं काहीच न करता घरी बसणं तिच्या अंगावर यायला लागलं .एकेकाळानंतर सगळं असह्य झाल्यानंतर आपल्या छोट्या मुलीला घेऊन तिने घरं सोडलं . आता त्या मोठ्या घरात इम्रान एकटाच राहतोय . याबाबतीत इम्रानचं काहीसं साम्य त्याचा काका आणि आमिरचा भाऊ मन्सूर खानशी आहे . एकूणच रॅट रेसला कंटाळलेल्या मंसूरने मुंबईच सोडली आणि एका शांत हिलस्टेशनवर स्थायिक झाला . सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर लोकांना पुन्हा इम्रान आठवला .त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर त्याची वास्तपुस्त करणारे , काळजी घे असं सांगणारे मेसेज लोक टाकू लागले .इम्रानचा सुशांत सिंग राजपूत होऊ शकतो ,हि कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे .
चार पुरुषांच्या चार शोकांतिका . यांना आमिर कितपत जबाबदार आहे किंवा तो या टाळू शकला असता का ? त्याने प्रयत्न नक्कीच केले असणार . पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर पडणारी त्याची भली मोठी सावली तो कशी थांबवणार होता ? वर लिहिल्याप्रमाणे लोहाची भांडी टिकणार आणि मातीची भांडी फुटणार .हेच तर विधिलिखित आहे . जयवंत दळवींची ‘धर्मानंद ‘ ही माझी आवडती कादंबरी . कोकणातल्या एका तालेवार जमीनदार घराण्याची वाताहत सांगणारी ही कादंबरी . कादंबरीचा नायक असणाऱ्या धर्मानंदचे आजोबा धर्मानंदच्या पूर्ण घराण्यावर पकड ठेवून असतात . एकाकाका , धर्माचे वडील , धर्माची आजी , धर्माची विधवा आत्या . ही सगळी हाडामांसाची माणसं हळूहळू उध्वस्त होत जातात . धर्माचे कर्तबगार , दरारा असणारे आजोबा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या या वाताहतीला कारणीभूत असतात . यामुळे धर्माचा आजोबांवर प्रचंड राग असतो . पण बरीच उलथापालथ झाल्यावर धर्माला एक चिरंतन सत्य कळत . शेवटी ही ताकदीची ,वर्चस्वाची लढाई आहे .ती सगळ्याच परिवारामध्ये चालू असते (लेटेस्ट उदाहरण -महाराष्ट्रातल्या एका प्रख्यात सामाजिक क्षेत्रातल्या घराण्यात घडलेली शोकांतिका ) . ती वर्चस्वाची लढाई खेळावीच लागते . मग तुम्ही जिंकता कसे हे महत्वाचं नाही . जो टिकून राहिला तो जिंकला . एकदा हे कळल्यावर धर्मानंदला आजोबांबद्दल पण आपुलकी वाटते . सूर्याच्या पिल्लाना सहानुभूती दाखवताना सूर्याकडे एकदमच दुर्लक्ष करायला नको . सूर्य नेहमीच खलनायक असतो असं नाही .नाही का ?
#ThursdayMusings
(लेखक नामवंत स्तंभलेखक आहेत.)
7448026948 

Previous articleअमरावती वकील संघाची ई-लायब्ररी
Next articleइतिहासातील कौटुंबिक सत्ता संघर्ष
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here