अमेय तिरोडकर
ब-याचदा होतं काय, आपण ही जी फेसबुकवर, ट्विटरवर आणि व्हॉट्सअपवर असणारी मंडळी आहोत ना, ती जगण्याचे बेसिक प्रश्न सुटलेली मंडळी आहोत आणि आपण आपल्याच सारखा सगळा देश आहे असा विचार करतो. आणि मग कशाला हवं ते संविधान. बदलून टाका सरळ. असं काहीही बोलतो.
पण हे काही बरं नसतं.
या संविधानाने आपल्याला काय दिलं?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचा सन्मानपूर्वक मूलभूत अधिकार ! त्याआधी कुठलाही कायदा, कुठलीही स्मृती, कुठलीही प्रचलित परंपरा तमाम भारतीयांना एकाच समान नजरेतून बघत नव्हती. आपण संविधान नको म्हणतो तेव्हा हा माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकारच आपण नाकारत असतो.
या अधिकाराची किंमत कदाचित आपल्याला नसेल पण जरा डोळे उघडे ठेवून गरीब, कष्टकरी, मजूर वस्त्यांमधून फिरलो की जगण्याचा बेसिक संघर्ष अंगावर येतो. आणि मग असा संघर्ष करणाऱ्याना माणूस म्हणून जगण्यासाठी ठोस आधार असला पाहिजे याची जाणीव होते. कुठलाही भेदभाव न करता मिळणारा असा आधार म्हणजे संविधान ! पण हे तर अगदीच बेसिक झालं.
समाजात उतरंड असतेच. आणि well off म्हणवणारेही सगळे अर्थव्यवस्थेच्या काही सगळ्यात वरच्या पायरीवर नसतात. जर एकसमान कायदा नसेल ते मग हे जे खालच्या पाय-यांवर असतात ना ते नेहमीच असुरक्षित राहतील. आणि एकसमान कायदा हा फक्त संविधान देतं.
आपण ही सगळी नवी टेक्नॉलॉजी वापरतो. जर तुम्हांला असं कोणी सांगितलं की जरी ही टेक्नॉलॉजी विकत घेण्याएवढा पैसा तुमच्याकडे असला तरी ती घेता येणार नाही कारण ती एका विशिष्ट वर्गापुरतीच उपलब्ध आहे तर तुम्हांला कसं वाटेल? एकदा का संविधान गेलं की मग हा privileged class चा कायदा सुरू होतो.
म्हणजे सन्मान हवा, सुरक्षितता हवी आणि इतकंच काय तर अगदी आधुनिक तंत्रज्ञान हवं तरीही तुम्हाला त्यासाठी नियमांच्या एका विशिष्ट चौकशीचा आधार असावा लागतो. संविधान हा आधार देतं !
मग जरा विचार करू की ही इतकी ताकद कुठून आली असेल आपल्या संविधानात?
तर एक संविधान समिती होती. तिने प्रत्येक मुद्द्यावर प्रचंड चर्चा केली. आणि मग एकेक मुद्दा तपासून घेत इथलं संविधान बनलं. आपल्या सुदैवाने या सगळ्या चर्चांना आपण वाचू शकतो. Constitution Assembly Debates या नावाने ही चर्चा पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. ज्यांना संविधान हवं असतं आणि ज्यांना संविधान नको तर मनुस्मृती हवी असते, त्या दोघांनीही ही सगळी प्रदीर्घ चर्चा वाचली पाहिजे.
या चर्चेच्या पानापानावर एक स्वप्न आहे. आधुनिक, समर्थ, बलशाली भारताचं स्वप्न. बरं हे स्वप्नसुद्धा काही अचानक पडलेलं नाही. त्यालाही संघर्षाचा इतिहास आहे. थोड्याथोडक्या नाही तर तब्बल 180 वर्षांच्या संघर्षाचा इतिहास.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक जगाची भारताला होऊ लागलेली जाणीव ते एकोणिसाव्या शतकाचा सामाजिक सुधारणांचा इतिहास ते स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास ….. अशी एक व्यापक आणि गुंतागुंतीची पार्श्वभूमी या स्वप्नाला आहे.
इतकंच नाही,
या स्वप्नाने स्वतःला आधुनिक जगाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केलाय. अमेरिकन राज्यक्रांतीने दिलेलं स्वातंत्र्याचं सूत्र, फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेलं समतेचं सूत्र, ब्रिटिश उदारमतवादी लोकशाही, रशियन राज्यक्रांतीने दिलेला समाजवाद आणि भारताच्या प्राचीन परंपरा यांच्याशी संविधानाने स्वतःला जोडून घेतलंय.
आपण जेव्हा संविधान नको म्हणतो तेव्हा सतीच्या प्रथेला विरोध करण्यापासून आपल्या घरातल्या स्त्रीला आपल्याच इतका सन्मान आहे याची जाणीव स्वतःच्या मनाशी बाणवेपर्यंत, आपण काय शिक्षण घ्यावं आणि काय व्यवसाय करावा या आपल्या अधिकारांपासून ते अगदी नको हे संविधान असं म्हणता येण्याच्याही आपल्या अधिकारांपर्यंत अनेक गोष्टी आपल्या हातातून निसटून जाणाऱ्या असतात. हक्क निसटून जाणारे असतात.
तेव्हा जे कोणी संविधान नको आणि मनुस्मृती हवी म्हणून सांगत आहेत त्यांना डोक्यावर उचलून घेणाऱ्यानी स्वतःशीच विचार करावा. आम्ही (पक्षी फुरोगामी, सिक्युलर, लिबटार्ड) याला विरोध करून हा डाव बहुसंख्य भारतीय समाजाच्या साथीने हाणून पाडूच पाडू !! अगदी एक कणभरही शंका नाही आम्हाला या लढाईत काय होऊ घातलं आहे त्याची !! विचार तुम्ही करा, इतिहासाच्या पुस्तकात शिवाजीना राज्याभिषेक नाकारणा-या, फुलेंवर दगड आणि शेण मारणा-या आणि शाहू महाराजांना छळणा-या कुजक्या प्रवृत्तीचा वारसा तुम्ही चालवलात अशीच संविधानासाठीच्या या लढाईत तुमची नोंद होईल !!!
(लेखक ‘एशियन एज’ या दैनिकात कार्यरत आहेत )
9899395561