-अशोक मानकर
डॉक्टर ग्रॅहम रिचर्ड
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
दर्यापूर तालुक्यातील कुठल्याशा गावात पस्तीसेक वर्षांचा सहदेव नामक माणूस पोटदुखीने त्रस्त होता.
अगोदर त्यानं गावातील दवाखाना केला.
डॉक्टरांनी औषधे लिहून दिली.
पण फरक पडला नाही.
दुखणं सारखं वाढत होतं.
ते पाहून घरच्यांनी त्याला दर्यापुरातील प्रसिद्ध डॉक्टरांकडे नेलं.
डॉक्टरांनी हा त्रास हायपर अॅसिडिटीमुळे असल्याचं सांगितलं.
तशी औषधे लिहून दिली.
घरी आल्यावर सहदेवला एक दिवस तेवढ्यापुरतं बरं वाटलं.
पण दुसऱ्या दिवसापासून पुन्हा दुखणं सुरू झालं.
घरची मंडळी चिंतेत पडली.
घरात वृद्ध आईवडील, बायको, सोळा वर्षांचा मुलगा एवढे लोक होते.
गावातल्या जाणत्या लोकांनी त्यांना सहदेवला जिल्ह्याच्या ठिकाणी स्पेशालिस्टकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
या सल्ल्याचं पालन झालं.
स्पेशालिस्टनी आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्या. त्यांनीही ॲसिडिटीचंच निदान केलं आणि सहदेवला दोन दिवस दवाखान्यात भरती करून घेतलं.
सलाइन व काही औषधे दिली.
दोन दिवसात सहदेवला बर्यापैकी आराम पडला.
डॉक्टरांनी प्रिस्क्रीप्शनवर थोडी उच्च शक्तीची घरी घ्यायची औषधी लिहून दिली आणि सहदेवला डिस्चार्ज दिला.
सगळे घरी आले.
घरी आल्यावर सहदेवला तीन दिवस कसलाच त्रास झाला नाही.
मात्र चौथ्या दिवसापासून त्याचं दुखणं पुन्हा उफाळून आलं.
ते आता दिवसागणिक वाढू लागलं.
सहदेव रात्र रात्र तळमळू लागला.
मग तर त्याच्या वेदना इतक्या वाढल्या, की त्या घरच्यांना बघवेना झाल्या.
दरम्यान सहदेववर आयुर्वेदिक उपचारही करून पाहण्यात आले.
पण त्याचाही फायदा झाला नाही.
सहदेव आता मरणाची याचना करू लागला.
घरची मंडळी भयभीत झाली.
एके रात्री दहाच्या सुमारास सहदेवच्या घरी एक व्यक्ती आली.
आपण दर्यापूर येथे शासकीय वैद्यकीय सेवेत असून आज तुमच्या गावातील आरोग्य केंद्राला भेट द्यायला आलो होतो.
परत जायला उशीर झाला म्हणून मला घ्यायला आमच्या विभागाची गाडी येणार आहे. तिचीच वाट पाहत मी बस स्टॉपवर उभा होतो. तिथं काही लोकांकडून आपल्या आजाराबद्दल कळलं. म्हणून तुमच्याकडे आलो.
तुम्ही एक काम करा.
मेळघाटात सेमाडोहच्या उत्तरेला वीस किलोमीटर अंतरावर नीमटोला नावाचं छोटंसं गाव आहे.
या गावाच्या पूर्वेला जो डोंगर आहे त्याच्या पलीकडील पायथ्याशी फॉरेस्ट विभागाचं विश्रामगृह आहे.
या विश्रामगृहात डॉक्टर ग्रॅहम रिचर्ड राहतात.
वय शंभरीपार आहे.
या डॉक्टरांनी मेळघाटातल्या वनौषधीवर खूप मोठं संशोधन केलेलं आहे आणि ते असाध्यातला असाध्य आजार बरा करतात, असं मी ऐकलं आहे.
तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बघा.
फक्त एक आहे, हे डॉक्टर रुग्णांना फक्त अमावस्येच्या दिवशी तपासतात आणि औषधही याच दिवशी देतात. आपण तिथं सायंकाळी सात नंतर गेलात तर उत्तम.
एवढं सांगून या व्यक्तीनं मनगटावरील घड्याळीत पाहिलं आणि घाईघाईनं म्हटलं, “चला येतो मी. माझ्या गाडीची वेळ झाली आहे.”
मरता क्या नही करता या नात्यानं सहदेवच्या कुटुंबानं त्याला नीमटोला येथे घेऊन जायचं ठरवलं.
अमावस्येच्या दिवशी भाड्याची गाडी ठरवली गेली आणि सहदेवला घेऊन हे कुटुंब सेमाडोहकडे निघालं.
सायंकाळी पाचच्या सुमारास गाडी सेमाडोहला पोचली.
तिथून विचारत विचारत त्यांनी नीमटोलाकडे मार्गक्रमण सुरू केलं.
गाडी नीमटोल्यात पोचली तेव्हा सात वाजले.
किट्ट काळोख पसरू लागला होता.
रातकिडे उच्चरवात किरकिरत होते.
नीमटोल्यात शंभरेक घरांची वस्ती होती.
तिथल्या लोकांना यांनी फॉरेस्ट विभागाचं विश्रामगृह विचारलं.
गावकऱ्यांनी दिशा सांगितली.
विश्रामगृह नीमटोल्यापासून तीन किमी पुढे होतं.
दाट झाडीतून जाणाऱ्या वाटेनं वर चढत गाडी डोंगर माथ्यावर गेली. तिथून खाली उतरायला फारसा वेळ लागला नाही.
गाडी विश्रामगृहासमोर पोचली तेव्हा आठ वाजले होते.
विश्रामगृहाची वास्तू अत्यंत जुनाट होती. समोर मोठं पण उजाड बोडकं परसदार होतं. त्याला चारी बाजूंनी तारेचं कुंपण होतं.
विश्रामगृहाला असलेल्या खिडक्यांच्या काचांमधून आत कंदिलासारखा मंद उजेड दिसत होता.
गाडीचा ड्रायव्हर पुढे झाला.
त्यानं कुंपनाचं फाटक उघडलं. कुटुंबीयांनी सहदेवला आधार देत गाडीतून खाली उतरवलं आणि सगळे आत शिरून विश्रामगृहाच्या दरवाजापाशी गेले.
ड्रायव्हरनं दार ठोठावलं.
आत काहीतरी खुडबूड झाली.
संथ पावली वाजली.
पटांचा किरकिर आवाज झाला आणि दार उघडलं गेलं.
तांबूस गुलाबी वर्णाच्या त्या वृद्ध व्यक्तीनं पावलांपर्यंत लोंबणारा झग्यासारखा पांढरा शुभ्र अंगरखा घातलेला होता.
नाक खूपच चिरेदार आणि लांबोळं होतं. डोक्यावरील तांबूस पिवळे केस खांद्यापर्यंत रुळलेले होते.
“या.” व्यक्ती बोलली. “मी डॉक्टर ग्रॅहम रिचर्ड. या. आत या.”
डॉक्टरांपाठोपाठ सगळे आत गेले.
दिवानखान्यासदृश्य त्या हॉलमध्ये शिसवी लाकडापासून बनविलेला मोठा पलंग टाकलेला होता.
समोर शिसवाच्याच सात आठ जुनाट खुर्च्या, तीन स्टूल्स आणि एक टेबल मांडलेला होता. भिंतीवर जागोजाग कंदिलासारखे पितळी दिवे टांगलेले होते.
कोपऱ्यात एक लाकडी कपाट होतं.
डॉक्टरांनी सर्वांना खुर्च्यांतून बसण्याची खूण केली.
ते स्वतः पलंगावर बसले आणि म्हणाले, “आम्हा लोकांच्या अर्थात ब्रिटीश काळात माझे वडील इथं फॉरेस्ट ऑफीसर होते. मी पण इथंच लहानाचा मोठा झालो. वडलांच्या इच्छेखातर उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलो. वैद्यकीय शाखा निवडली. त्या काळचा एफआरसीएस झालो. इथं येऊन प्रॅक्टिस सुरु केली. पण काहीच दिवसांत ॲलोपॅथीतून माझं मन निघालं.
कारण मला या मेळघाटातील वनराजी, वनौषधी खुणावत होती. आकर्षित करत होती.
तोवर हिंदुस्तान स्वतंत्र झाला.
माझे कुटुंबीय यूकेला निघून गेले.
मी मात्र इथेच राहिलो.
जंगलेच्या जंगले पालथी घातली. कैक झाडाझुडपांचा, झाडपाल्यांचा, कंद मुळांचा अभ्यास केला.
शेवटी काही औषधे हस्तगत झाली. तीच रुग्णांना देतो.”
घोंगडं पांघरलेला आणि कानाला शेला बांधलेला सहदेव डॉक्टरांच्या समोरच्या खुर्चीत बसलेला होता.
तो कण्हत होता. कुथत होता.
त्याच्याकडे लक्ष जाताच डॉक्टरांनी खेद व्यक्त केला. “सॉरी हां. मी ना, बोलायला बसलो का बोलतच राहातो. हां बोला आता. काय त्रास आहे आपणास?”
सहदेवनं दुखणं सांगितलं.
डॉक्टरांनी त्याचे डोळे निरखून पाहिले. तोंड उघडायला सांगून जीभ पाहिली आणि सहदेवला आश्वस्त केलं. “डोंट वरी. काही काळजी करू नका. तुमचे पॅनक्रियाजवर थोडे स्वेलिंग आय मीन सूजन आलेले आहे. पण तुम्ही शंभर टक्के बरे होणार. एस.” असं म्हणून डॉक्टर उठले.
हळूवार पावले टाकत कोपऱ्यातील कपाटाजवळ गेले. आतून काही बरण्या बाहेर काढल्या. त्यातील चुर्णे कागदांच्या पुड्यात बांधली.
पुड्या सहदेवला सोपवल्या. त्या कशा घ्यायच्या ते सांगितलं. पथ्य कुपथ्य सांगितलं आणि एका पुडीतील चूर्ण दुधासोबत समक्ष घ्यायला लावलं.
त्यासाठी आतल्या स्वयंपाक घरात जाऊन कपभर दूध आणलं.
सहदेवनं कडवट तोंडानं ही मात्रा गिळली.
डॉक्टर म्हणत होते, “काही काळजी करायची नाही. तुम्हास आराम पडणार म्हणजे पडणार. बरं या मग तुम्ही आता.”
निघताना सहदेवच्या बायकोनं डॉक्टरांना फी विचारली.
डॉक्टर गालात हसले. ” नाही माई. मी हे काम पैशांसाठी नाही करत. सेवा म्हणून करतो.”
सहदेव आणि मंडळी डॉक्टरांचा निरोप घेऊन परतीला निघाली.
घरी यायला त्यांना रात्रीचे साडेबारा वाजले.
त्या रात्री सुखदेवचं पोट तर दुखलं नाहीच, पण त्याला प्रथमच शांत अशी झोप लागली.
अगदी आठच दिवसात सहदेव खणखणीत बरा झाला.
शेतात कामालाही जाऊ लागला.
सहदेव आणि घरच्यांनी डॉ. रिचर्ड यांचे मनोमन आभार मानले.
पाहता पाहता सहदेवची पोटदुखी हद्दपार झाली.
या घटनेला वर्ष दीड वर्ष उलटलं.
एका गावात सहदेवच्या दूरच्या नात्यातील कुणी व्यक्ती पोटदुखीनं त्रस्त होती.
तिनंही अगोदर अनेक दवाखान्यांचे उंबरठे झिजवले होते.
पण परिणाम शून्य होता.
या रुग्णाईताला सहदेवनं मेळघाटात जाऊन घेतलेल्या उपचारांची माहिती मिळाली. तसा त्याच्या घरचा एक जण सहदेवकडे आला.
सहदेवनं डॉ. रिचर्डचा पत्ता सांगितला.
पण तो एक गोष्ट सांगायला विसरला. ती म्हणजे डॉ. रिचर्डकडे अमावस्येच्या दिवशी जायचं असते.
ही व्यक्ती मग काही सहकाऱ्यांसह आपल्या रुग्णाला घेऊन एका आडवारी नीमटोल्याला गेली.
हे लोक दुपारी एकच्या सुमारास नीमटोल्यात पोचले.
तिथून मार्ग विचारून अर्ध्या तासात विश्रामगृहापाशी आले.
बाहेरच्या कुंपनाचं फाटक उघडून आत शिरले.
विश्रामगृहाच्या दारावर गंज चढलेलं जुनाट कुलूप लावलेलं होतं.
यांनी दार ठोठावलं.
आतून कसलाच प्रतिसाद आला नाही.
बाजूची खिडकी उघडी होती.
एका गड्यानं तीतून आत डोकावलं.
आत धुळीनं माखलेलं आणि सडायला आलेलं जुनं फर्निचर होतं.
जागोजाग कोळीष्टकं चढलेली होती.
गड्यानं खिडकीतून जोर जोरात हाका मारल्या. ” अरे आहेत काय डाक्तर सायेबsss? ओsss डाक्तर सायेब.”
पण आत काहीच हालचाल नव्हती.
प्रश्नार्थक चेहऱ्यांनी सगळे कुंपनाबाहेर आले.
इकडे तिकडे पाहू लागले.
जरा वेळानं त्यांना जवळच असलेल्या पायवाटेवर दुरून येणाऱ्या मोटारसायकलचा आवाज आला.
हे लोक घाईघाईनं त्या दिशेनं पायवाटेवर गेले.
काहीच वेळात समोरून मोटारसायकल आली.
तीवर हिरव्या गणवेषातील दोन स्वार होते.
मंडळींनी त्यांना हात दाखवून थांबवलं.
विश्राम गृहात राहणाऱ्या डॉ ग्रॅहम रिचर्ड बद्दल विचारलं.
गाडीवरील स्वार फॉरेस्ट गार्ड होते. त्यांनी गूढ हसत एकमेकांकडे पाहिलं आणि चालक या लोकांना म्हणाला, “जुन्या काळात या विश्रामगृहात एक डॉक्टर राहायचे. इथल्या आदिवासी आणि गोरगरिबांवर मोफत उपचार करायचे. हाताला गुण होता. पण मध्येच होत्याचं नव्हतं झालं. त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि डॉक्टर गेले. आम्हाला तर कधी दिसलं नाही. पण बरेच लोक सांगतात, डॉक्टरांचं मग भूत झालं. ते या विश्रामगृहात राहते आणि कुणी पेशंट गेला तर त्याला दुरुस्त करते.”
मंडळीच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.
“बराय येतो मंडळी. तुम्ही पण शक्य तेवढ्या लवकर निघा इथून. कारण हा स्पॉट डेंजर झोन म्हणून ओळखला जातो आणि रात्र तर दूरची गोष्ट दिवसा उजेडीही इकडे कुणी फिरकत नाही.”
(ही कथा काल्पनिक आहे.)
अशोक मानकर नामवंत कथा लेखक आहेत)
8087105357
हे सुद्धा नक्की वाचा-
मेळघाट भ्रमंती – डाक बंगलाhttps://mediawatch.info/melghat-bhramanti-dak-bangla-an-interesting-and-thrilling-story-by-ashok-mankar/
Untold stories of Melghat : एकटी राहिलेली ब्रिटिश लेडी








