‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५
■प्रवीण बर्दापूरकर
‘ठाकरे ब्रँडचं काय होणार ?’ हा सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक उत्सुकतेचा विषय आहे . राज आणि उद्धव ठाकरे , हे दोघे बंधू एकत्र येण्याच्या ठाम शक्यतेमुळे ही उत्सुकता मोठ्या प्रमाणावर चाळवली गेलेली आहे . हे दोघे बंधू एकत्र येणार याचा अर्थ त्यांचे राजकीय पक्ष म्हणजे , उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्षही एकत्र येणार , हे त्या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि माध्यमांनीही स्वभाविकपणे गृहीत धरलेलं आहे . हे दोघे भाऊ एकत्र येणार याची चर्चा साडे तीन-चार महिन्यापूर्वी सुरु झाली तेव्हापासून ‘ठाकरे ब्रँड’ हा शब्दप्रयोग चर्चेत आला . तेव्हा ‘या दोन्ही भावांचं एकत्र येणं ही कापूस कोंड्याची गोष्ट तर ठरणार नाही ना ?’ अशी एक पोस्ट मी समाज माध्यमांवर टाकली होती . हे दोघे भाऊ एकत्र येत आहेत असे संकेत आता मिळाले आहेत . याचा अर्थ हे दोघे बंधू एकत्र येणं ही कापूस कोंड्याची गोष्ट ठरणार नाही पण , ते राजकीय पातळीवर कसे एकत्र येणार , या संदर्भात काहीही स्पष्ट झालेलं नाही . सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे नेतृत्व कोण करणार हा आहे पण , त्याबद्दल हे दोन्ही बंधू आणि त्यांचे पक्ष सध्या तरी मौन बाळगून आहेत .
‘ब्रँड’ हा कांही राजकारणातला शब्द नव्हे . हा शब्द व्यवसायाशी संबधित आहे आणि शब्दकोशातील त्याचा अर्थ-‘a type of product manufactured by a particular company under a particular name’ असा होतो . दोन ‘ब्रँड’ एकत्र येण्याआधी त्यांची किंमत ठरवली जाते . त्याला ‘‘ब्रँड व्हॅल्यू’ ठरवणं असं म्हणतात . इथे ठाकरे बंधूंचा उल्लेख ‘ब्रँड’ म्हणून केला जातोय तर त्याच पद्धतीनं विचार करावा लागेल की , महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ब्रँड व्हॅल्यू’ कुणाची जास्त आहे . समजा राज यांची ‘ब्रँड व्हॅल्यू’ जास्त निघाली तर ते उद्धव ठाकरे यांना चालणार आहे का किंवा उद्धव ठाकरे यांची ‘ब्रँड व्हॅल्यू’ जास्त आली तर ते राज ठाकरे याना मान्य असेल का ? जाहीर चर्चा झाली नाही आणि आता कितीही नाकारलं तरी , राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा पक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्या खालोखाल ‘सुप्रीम’ कोण , हा एक कळीचा मुद्दा होता आणि आताही तो असेलच .
मुद्दा केवळ नेतृत्वाचा नाही , महाराष्ट्रात ३१ जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजे , असं सर्वोच्च न्यायालयानं खडसावलं आहे , ते जर लक्षात घेतलं तर , आधी जिल्हा परिषद मग नगरपालिका आणि सर्वात शेवटी महापालिकांच्या निवडणुका होण्याची चिन्हं दिसत आहेत . या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती नेमकी कशी होणार , ही युती महापालिका निवडणुकीपुरती मर्यादित राहणार का राज्यातल्या येत्या सर्व निवडणुकात ही युती राहील , दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्णी कुठे आणि कशी लागणार , या दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणामुळे संघटनात्मक बांधणी कशी राहील अशा अनेक बाबी , दसरा उंबरठ्यावर आलेला असताना हा लेख लिहायला घेतला असला तरी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत . शिवाय या पक्षात दोन्ही पक्षांचे नेते अधून मधून संभ्रम निर्माण करणारी विधाने करत असतात , उदाहरणार्थ दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बोलताना ‘हे दोन्ही राजकीय पक्ष स्वतंत्र आहेत’ , असं संजय राऊत म्हणाले . ( ‘हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यास शरद पवार यांची संमती आहे’ , असंही संजय राऊत म्हणाले ; त्यामुळे ‘मिया बीबी राजी असतील तर काझीचं काय काम ?’ असा संभ्रम सहाजिकच निर्माण होतो . ) उद्धव ठाकरे यांची परवानगी नसेल तर तोंडातून ‘ब्र’ काढण्याची हिंमत संजय राऊत यांची असूच शकत नाही , हे लक्षात घेता याचा अर्थ केवळ ‘दोन भाऊ एकत्र येणार आणि पक्ष स्वतंत्र राहणार’ असा काढायचा का ? अशी ही संभ्रमांची मालिका असल्यानं सध्या तरी कांही केवळ आडाखे बांधणं आणि ‘ब्रँड व्हॅल्यू’ गृहीत धरणं एवढंच सध्या हातात आहे .
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणजे पर्यायांनं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यास काय होईल , या संदर्भात संदर्भात ठोकताळे व्यक्त करण्याआधी हे दोन्ही नेते आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल स्पष्टपणे लिहिणं आवश्यक आहे . शिवसेनेची सूत्र हाती घेतल्यावर उद्धव ठाकरे यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागलं . त्यापैकी एक आव्हान नारायण राणे तसेच राज ठाकरे यांनी पक्ष सोडण्याचं होतं . त्यातून उद्धव ठाकरे सावरतात न सावरतात तोच बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं . या आणि नंतरच्या काळात उद्धव ठाकरे यांनी पक्ष योग्य पद्धतीने सांभाळला . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा करिष्मा असणारा नेता गमावल्यावर खरं तर , राजकीय पक्ष सांभाळणं हे फार मोठं आव्हान होतं मात्र , ते आव्हान उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे पेललं यात शंकाच नाही . उद्धव ठाकरे यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा शिवसेना ‘राडा करणारा पक्ष’ म्हणून ओळखली जात होते होती . शिवसेनेला एक गंभीर राजकीय पक्ष म्हणून आकार दिला , हेही उद्धव ठाकरे यांचं योगदान महत्वाचं आहे . शिवाय बाळासाहेब ठाकरे यांची दुसरी फळी , जी तशी वयाने वृद्ध झालेली होती , त्या सर्वांना एक पर्याय उद्धव ठाकरे यांनी उभा केला हेही मोठं काम होतं ( उद्धव ठाकरे यांच्या काळातील या दुसऱ्या फळीतील नेते संघटनात्मक कामाऐवजी उद्धव ठाकरे यांच्याभोवती घुटमळणारे जास्त निघाले हा या ठाकरे यांची ब्रँड व्हॅल्यू’ घसरवणारा एक मुद्दा आहे . ) . बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या विशाल वटवृक्षाच्या सावलीत नव्यानं अंकुरलेल्या झाडांनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं , हे मुळीच सोपं नव्हतं पण ते उद्धव ठाकरे यांनी साध्य केलं .
मात्र , साधारण २०१२ नंतर उद्धव ठाकरे यांची पक्षावरची पकड दिली होत गेली आणि त्यांच्या हातून काही चुका घडल्या . त्या चुका दुरुस्त केल्याशिवाय उद्धव ठाकरे यांना आता पर्याय उरलेला नाही . प्रकृतीच्या तक्रारीमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर काही बंधन आली हे शंभर टक्के खरं असलं तरी , काही चुका त्यांना टाळता आल्या असत्या . उदाहरणार्थ हृदयविकाराचा पहिला त्रास झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा जनसंपर्क कमी होत गेला आणि मुख्यमंत्री झाल्यावर तर तो उरलाच नाही . पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनाही उद्धव ठाकरे यांना भेटणं मुश्किल होत गेलं मग शिवसैनिक दूरच राहिला .
देवेंद्र फडणीस यांनी जाहीरपणे उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत , अशी तक्रार केलेली होती . जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज नेत्यानंही पत्रकारांशी खाजगीत बोलताना हेच एकदा सांगितलं होतं . महाराष्ट्राच्या अनेक अन्य ज्येष्ठ नेत्यांचाही हाच अनुभव आहे . ( सांगितलं त्या गाव पातळीवरील शिवसैनिकाला फोन करणारे उद्धव ठाकरे अनुभवलेले असल्यानं त्यांचं हे वागणं आश्चर्यस्तंभित करणारं होतं . ) बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात असं कधी घडलेलं नव्हतं . शिवसैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे दिवसातल्या कोणत्याही वेळेस कसे उपलब्ध असायचे , ते इतर सर्वांप्रमाणं प्रस्तुत पत्रकारांनं अनेकदा अनुभवलेलं आहे . बाळासाहेब ठाकरे दौऱ्यावर असले आणि मातोश्रीवर फोन केला तर दौऱ्यावरुन परत आल्यावर त्या फोनला बाळासाहेब ठाकरे न चुकता देतील प्रतिसाद याचा अनुभव महाराष्ट्रातील शिवसैनिक , अन्य राजकीय नेते आणि पत्रकारांनी अनेकदा घेतलेला आहे . उद्धव ठाकरे याच पठडीत तयार झालेले . पण , पहिल्या आजारपणानंतर उद्धव ठाकरे मोजक्यांच्या कोंडाळ्यात अडकले जनसंवादात टोकाचे कमी पडत गेले .
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा , उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली , हे चूक का बरोबर याच्या वादात मी जात नाही पण , उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यात चूक केली हे स्पष्टपणे सांगायलाच हवं . सत्तेची अभिलाषा नसलेला नेता , ‘किंगमेकर’ अशी बाळासाहेब ठाकरे यांची राजकारणातली प्रतिमा होती आणि ती त्यांनी तळहातावरचा दिवा जपावा तशी जपली . त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व कायमच झळाळून उठलं ; तो त्यांचा आजच्या भाषेत सांगायचं तर , कधीही न घसरणारा ‘टीआरपी’ ठरला होता . उद्धव ठाकरे यांना मात्र तसं झळाळून निघणं जमलं नाही . ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले तिथपर्यंत ठीक होतं पण , नंतर मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारायला नको होतं . त्यातच मुख्यमंत्रीपदाचा सुरुवातीचा अल्पसा काळ वगळता उद्धव ठाकरे या पदाला न्याय देऊ शकले नाहीत . त्यांचं आजारपण हे त्यातील एक प्रमुख कारण आहे त्याची कल्पना प्रस्तुत पत्रकारालाही आहे परंतु , मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही , दुपारी साडेबारापूर्वी आणि दुपारी साडेचार नंतर कोणतीही बैठक घेत नाहीत , ते सहजासहजी कुणाला भेटत नाहीत , ही जी त्यांची प्रतिमा तयार होत गेली ती त्यांच्यासाठी अतिशय मारक ठरली .
स्वपक्षाचे पक्षाचे २५/३० आमदार एका संध्याकाळी अचानक ( पुढे हा आकडा वाढला ) अचानकपणे बंदोबस्त सोडून कुठेतरी अज्ञात स्थळी रवाना होत आहेत , याची कोणतीही कल्पना मुख्यमंत्र्यांना येऊ नये हे केवळ पोलीस दलाचं अपयश नाही तर पोलीस दलावर म्हणजे , प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचा कोणताही अंकुश नाही हे सिद्ध करणारं होतं . अशा अनेक बाबी सांगता येतील . उद्धव ठाकरे यांची तळमळ आणि त्यांना वाटणारी त्यांचि जनतेप्रति असणारी आस्था निर्विवाद संवेदनशील होती ; ती संवेदनशीलता त्यांच्यात अजूनही आहे हे मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या सांत्वनासाठी ते ज्या तडफेनं धाऊन गेले त्यातून ते सिध्द झालं आहे .
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे , मुख्यमंत्री म्हणून त्या काळात निर्माण झालेले वाद त्यांना कौशल्याने सोडवता आले नाहीत . जी विधानं सभागृहात करायला पाहिजे ती त्यांनी सभागृहाबाहेर केली आणि जी विधान जाहीर सभेत करायची ती त्यांनी सभागृहात केली ; या संदर्भात सचिन वाजे प्रकरणाचा आवर्जून उल्लेख करायला हवा . उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर कथित बॉम्ब ठेवलं गेल्याचं प्रकरण कौशल्यानं हाताळण्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कमी पडले . नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर त्या पदावर नवीन नियुक्ती तातडीनं करण्याचं संसदीय कौशल्य उद्धव ठाकरे यांना दाखवता आलं नाही . त्या पदावर जर काँग्रेसच्या ( किंवा अन्य कोणा ) नेत्याची नियुक्ती झालेली असती , तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मोठ्या बंडानंतरची संसदीय कोंडी झाली नसती ; कदाचित ते बंडही टळलं असतं . विधिमंडळ कामकाजाचा अनुभव न त्यांना होता न त्यांच्या सल्लागारांना असंच ते चित्र होतं .
आणखी एक अत्यंत महत्वाची चूक म्हणजे , मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुखपद त्यांनी स्वत:च्याच हाती ठेवलं . पक्ष संघटनेची सूत्र एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या हाती न सोपवण्याची मोठी चूक उद्धव ठाकरे यांनी केली . हा दुहेरी भार त्यांना सोसावला नाही . त्याचाही परिणाम पक्षाची संघटनात्मक वीण विसविशीत होण्यात झाला .एकनाथ शिंदे फुटून निघाल्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेली भाषणं आणि मारलेले टोमणे हेही जनमानसाला फारसे काही रुचलेले नाहीत . तेच ते आणि तेच ते , असं उद्धव ठाकरे बोलत गेले , अजूनही बोलत आहेत . तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्याशी निर्माण झालेले मतभेद सोडवण्याचा मुत्सद्दीपणा दाखवण्यात उद्धव ठाकरे कमी पडले . सुसंस्कृत म्हणून ओळखले जाणारे उद्धव ठाकरे कोश्यारी याना विमान नाकारतात ; यात मुळीच राजकीय उमदेपणा नव्हता . इथे एक लक्षात घेतलं पाहिजे , बाळासाहेब ठाकरे यांचीही एक खास ‘ठाकरी’ शैली होती पण , ती प्रयोगात आणल्यावरही त्यांच्या सुसंस्कृत प्रतिमेला कधी तडा गेला नाही . पण , सेनेचे समर्थक किंवा हितचिंतक नसलेल्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेल्या ‘सुसंस्कृत या प्रतिमेला त्यामुळे तडा गेला . घरातील एखादी वृद्धा किंवा वृद्ध जशी किरकिर करतो तसं उद्धव ठाकरे बोलतात , असं अनेकांनी बोलून दाखवलं . महाराष्ट्रभर दौरा करुन त्यांनी जर पक्ष संघटित केला असता , शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांना विश्वासात घेत प्रेरणा दिली असती तर , त्याचा निश्चितच फायदा झाला असता . तसं घडलं नाही , परिणामी सरभैर झालेला शिवसैनिक एकनाथ ठाकरे यांच्यासेनेकडे ओढला गेला . एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी हा शिवसेनेवर झालेला फार मोठा आघात होता . त्यामुळे शिवसेनेची अक्षरशः दोन छकले झाली . सत्तेत असल्याचा फायदा उठवत एकनाथ शिंदे यांनी राज्यात चांगलेच हातपाय पसरवलेले आहेत . उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक लहान-मोठे पुढारी एकनाथ शिंदेंकडे वळले आहेत . अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व सद्यस्थितीत मुंबई , पुणे आणि छत्रपती संभाजी नगरच्या बाहेर फारसं उरलेलं आहे , असं काही दिसत नाही .
उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत गेली त्याचसोबत ते त्यांच्या हिंदुत्व आणि मराठी बाणा या मूळ भूमिकेपासूनही बाजूला गेले तर तो मतदारही बऱ्यापैकी दुरावला . एकीकडे कट्टर हिंदुत्वादींची साथ सोडायची आणि कथित सेक्युलर लोकांसोबत जाताना मात्र आपण हिंदुत्ववादीच आहोत असा दावा करायचा , हे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं शिवसैनिकांना पचणं लांबच राहिलं तर ते समजलंच नाही . कालपर्यंत ज्याच्या सोबत राडे केले , पंगा घेतला परिणामी फौजदारी गुन्हे दाखल करुन घेतले , त्यांच्याशीच जुळवून कसं घ्यायचं ही शिवसैनिकांची अडचण उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतली नाही आणि एकनाथ शिंदेंकडे यांच्याकडे शिवसैनिक वळत गेले .
पक्षात एवढी मोठी फूट पडल्यावर ती सावरण्यासाठी खरं तर , राज्यभर झंझावाती दौरे करणं शिवसेनेसाठी आवश्यक होतं पण प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ना ते दौरे उद्धव ठाकरे करु शकले ना दुसऱ्या फळीतील संजय राऊत यांचा कांहीसा अपवाद वगळता अन्य नेते करु शकले . संजय राऊत वगळता दुसऱ्या फळीतील नेते कायम मुंबईतच वावरणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या भोवती दिसत होते . अशा वेळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिवसेना पोहोचवणाऱ्या मनोहर जोशी , ( तेव्हाचे )छगन भुजबळ , सुधीर जोशी , प्रमोद नवलकर , सतीश प्रधान , वामनराव महाडिक , दिवाकर रावते , सुभाष देसाई प्रभृती नेत्यांची आठवण झाली . बाळासाहेब ठाकरे मुंबईत ठिय्या देऊन बसलेले असायचे तरी त्यांचे दुसऱ्या फळीतील हे नेते महाराष्ट्र पिंजून काढत असत . तसं कांही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर घडलं नाही . उद्धव ठाकरे यांच्या सेनेत दुसऱ्या फळीत ‘तसा’ आवाका नसणारे नेते नाहीत , हेही उघड झालं .
हिंदुत्व आणि मराठी या दोन ‘पायाभूत’ विषयांवर उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत ‘कम्फर्टेबल’ नाहीत हे स्पष्टच आहे ; मुंबई , ठाणे , पुण्याबाहेर म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रात संघटना कमकुवत झालेली आहे . अशा परिस्थितीत गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी अन्य कोणता तरी पर्याय उद्धव ठाकरे शोधतच असावेत आणि तो योग्य पर्याय राज ठाकरे हाच होता . सर्व राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर , यापुढील राजकारणात राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांची सोबत आवश्यक असण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांची राजकीय गरज जास्त आहे , हे वास्तव कटू असलं तरी खरं आहे . कारण मुंबई आणि मुंबई बाहेरही राज ठाकरे यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही .
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक निर्विवाद लोकप्रिय नेते आहेत , याबद्दल शंका नाही . राज ठाकरेंच्या सभेला ( सर्व ) माणसं ‘काही तरी’ देऊन आणावी लागत नाही , हेही मान्य करायला हवं . राज यांच्या वक्तृत्वानं विशेषतः तरुण आणि महिलांवर गारुड केलेलं आहे , याचा अनुभव मुंबई बाहेरच्या महाराष्ट्रातही ठिकठिकाणी येतो . राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा असतो पण , हा प्रतिसाद पाठिंब्यामध्ये परावर्तित करण्यात राज ठाकरे यांना यश येत नाही , ही खरी गोम आहे . राजकारणात प्रतिसाद पाठिंब्यामध्ये परावर्तित होण्याचा काळ खूप मोठा असतो . खुद्द बाळासाहेब ठाकरे याना विधानसभा निवडणुकीत किमान भरीव यश संपादन करण्यासाठी दोन-सव्वा दोन दशकं लागली , तर अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला संसदेत निर्विवाद बहुमत संपादन करण्यासाठी १९८८ ते २०१४ इतका कालावधी जाऊ द्यावा लागला . ‘प्रतिसाद पाठिंब्यामध्ये परावर्तित करण्याचं’ राजकीय सूत्र अजूनही सापडत नसल्यानं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना टाळी देण्यासाठी नाईलाजानं तयार झाले नाहीत ना ? असा प्रश्न म्हणूनच उपस्थित होतो .
राज ठाकरे यांनी पक्ष काढल्यावर सुरुवात तर झकास केली होती . विधानसभा निवडणुकीत दुहेरी आकडा पार केल्यावर राज्याच्या राजकीय अवकाशात राज ठाकरे यापुढे निर्णायक भूमिकेत वावरतील , अशी हवा निर्माण झाली होती पण , नंतर सर्वच आघाड्यांवर गणित ढेपाळत गेलं . राज ठाकरे यांची राजकीय भूमिकाही सतत बदलत गेली . या राजकीय फांदीवरुन त्या राजकीय फांदीवर ते विहरत राहिले . हे सर्व होऊनही त्यांच्या लोकप्रियतेत घट झाली नाही पण , राजकारण म्हणून ते नेमकं काय करतील याचे अंदाज बांधणं अशक्य होत गेलं . परिणामी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व मुंबई , पुणे आणि नासिकपुरतं मर्यादित राहिलं ; संघटना म्हणून हा पक्ष राज्यात बळकटपणे उभा राहिलाच नाही .
जनसंपर्काच्या बाबतीत जे उद्धव यांना लागू आहे तेच राज ठाकरे यांनाही लागू आहे . राजकारण २४x२७ करावं लागतं हे या दोघांनाही मान्य नाही, असाच त्यांचा राजकारणातील वावर असतो . ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही उद्धव आणि राज ठाकरे यांच्या प्रचार सभांचं प्रमाण दर दिवशी जेमतेम एक असतं . गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी याच ४०/४२ दिवसात प्रत्येकी १२० पेक्षा जास्त प्रचार सभा घेतल्या हे लक्षात घेता , उद्धव आणि राज हे बंधू ठाकरे राजकारणाबाबत अनेक बाबी गृहीत कशा धरतात हे स्पष्ट होतं .
कोणताच राजकीय पक्ष ( म्हणजे संपादकांनी दिलेल्या विषयाप्रमाणं ‘ब्रँड’) सहजासहजी पूर्णपणे संपत नसतो . उद्धव आणि राज ठाकरे हे राज्याच्या राजकारणातील ‘ब्रँड’ अजूनही आहेत हे खरं पण , या दोन्ही ठाकरे ब्रँडसची ‘लकाकी’ म्हणजे ( ‘व्हॅल्यू’ ) सध्या कांहीशी कमी झालेली आहे . पूर्वीची लकाकी ( ‘व्हॅल्यू’ ) परत कमावण्यासाठी या दोन्ही बंधूना शरद पवार ( आणि देवेंद्र फडणवीसही ) यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजकारणात २४x७ सक्रीय राहावं लागेल . राज्याची सत्ता मिळवायची असेल तर नव्या-जुन्यांना सोबत घेत ग्रामीण महाराष्ट्रात संघटनेचं जाळं घट्ट करावं लागेल . अन्यथा उद्धव आणि राज या ठाकरे बंधू नावाच्या ‘ब्रँड’चं अस्तित्व केवळ मुंबई , पुणे , नासिक , संभाजी नगर पुरतं आणि तेही माफक प्रमाणात शिल्लक असल्याचं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालातून समोर येईल .
(लेखक-ज्येष्ठ संपादक , राजकीय विश्लेषक , ब्लॉगर , साहित्यिक आहेत .)
+919822055799










