(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५)
– समीर गायकवाड
आपल्या देशात विविध पंथांचे साधू आहेत. त्यापैकीच एक पंथ अघोर पंथ होय! साधूंमध्ये हा एक वर्ग असा आहे, ज्याची सामान्य माणसाला काहीशी भीती वाटत असते. हे साधू स्मशानात राहतात, जळणाऱ्या मृतदेहांसमोर जेवतात आणि तिथेच झोपतात, असा समज रूढ आहे. अघोरी निर्वस्त्र असतात, माणसाचे मांस खातात, कवटीत जेवतात आणि दिवस-रात्र गांजा ओढतात, अशा गोष्टीही पसरवल्या जातात. अघोरी, अघोरपंथी, औगर, औघर ही नावे अघोर साधूच्या पंथाला लावतात. या पंथांतील लोक मृत-नरमांस भक्षक व इतर अघोर कृत्ये करतात असा अपसमज रूढ असल्याने फार प्राचीन काळापासून यांचे नाव समाजाला ज्ञात आहे.
……………………………………….
तीन वर्षापूर्वी राज्यात राजकीय समीकरणे बदलून सत्तापालट झाला, तसेच काही मोठे पक्ष फोडले गेले, राज्यभरात नावलौकिक असणारी अनेक नेते मंडळी आपापल्या पक्षांना रामराम करून दुसरीकडे गेली, ही एक प्रकारची गद्दारीच होती. यापैकी काही मंडळींनी आपल्याला राजकीय तोटा होऊ नये म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी जात काही पूजाविधी केले होते. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि त्याच बरोबर आपल्या कथित शत्रूंना इजा पोहोचावी, त्यांचे नुकसान व्हावे, त्यांचे वाईट व्हावे या प्रयोजनाने हे कर्मकांड त्यांनी केले होते. माध्यमांत याची खुमासदार चर्चा रंगली होती. काहींनी या अनुषंगाने आपले क्लिक बाईट्सचे टारगेट्स पूर्ण करून आपले उखळ पांढरे करून घेतले. सवंग प्रसिद्धीला हपापलेल्या पुढाऱ्यांनी या पूजाविधीचे, कर्मकांडांचेही प्रसिद्धीकरण केले! काहींनी पीआरसाठी या नकारात्मक प्रसिद्धीचा वापर केला.
मात्र या सर्व गदारोळात ते पूजाविधी आणि कर्मकांडे चर्चेच्या केंद्रस्थानी आले! हे अघोरी पूजाविधी होते, अघोरी कर्मकांडे होती. मुळात सामान्य माणसांच्या मनात याविषयी नेहमीच जिज्ञासा असते तिला या काळात बळ मिळाले, आणि अघोरी पूजाविधीविषयी बरेच दिवस मध्यमांत चर्चा झडल्या. त्या अघोरीपूजा, कर्मकांडे आणि अघोरपंथाचा हा धांडोळा! अर्थातच हा धांडोळा परिपूर्ण आहे असे मी स्वतःही मानत नाही कारण अंधाराच्या असीम, अद्भुत, अनियंत्रित साम्राज्यात काय काय घडते याचा एक टक्के अंशही मानवी मनाला उमगलेला नाही; अघोर पंथ हा या तमकाळाचा साक्षीदार! त्यामुळे अघोर पंथात जे विधी केले जातात, वा जे आचरण केले जाते त्याचे समग्र आकलन कोणत्याही सामान्य माणसाला होणे शक्य नाही. तरीही जे काही आकळले त्याचे अक्षर प्रकटन करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न!
‘
अघोर’ म्हणजे घोर नसलेला असाही एक अर्थ प्रचलित आहे, तसेच घोर हे एक शिवनाम देखील आहे. यापासून या पंथसंज्ञेची उत्पत्ति असल्यानें, त्याचा शैवसंप्रदायाशीं असलेला संबंध व्यक्त होतो. अघोरेश्वर या नावाने शिवाची उपासना म्हैसूरमध्ये इक्केरीच्या देवळात व इतर अनेक ठिकाणी दृष्टिस पडते. या पंथाच्या अनुयायांना अघोरपंथी साधक म्हणतात. “आध्यात्मिक ज्ञान मिळवायचे असेल आणि ईश्वराला भेटायचे असेल तर शुद्धतेच्या नियमांपलीकडे जावे लागेल”, असा अघोर दर्शनाचा सिद्धांत सांगतो.
“सामान्यपणे ज्या गोष्टींची घृणा वाटते त्यांचा सामना करून ती घृणा नष्ट करणे, हा अघोरी साधूंचा सिद्धांत आहे.
चांगल्या आणि वाईटा विषयीचे सामान्य नियम त्यांना मान्य नसतात. आध्यात्मिक प्रगतीचा त्यांचा मार्ग माणसाचे मांस आणि स्वतःचेच मल भक्षण करण्यासारख्या विचित्र क्रियांमधून जातो. मात्र इतरांनी वर्ज्य केलेल्या या गोष्टींचे भक्षण करून ते परम चेतना प्राप्त करतात, असा त्यांचा विश्वास आहे. अघोरी पंथाविषयी सांगायचे तर अठराव्या शतकात हा शब्द चर्चेचा विषय बनला. कपालिक पंथ ज्या क्रियांसाठी कुख्यात होता त्या क्रिया या पंथाने स्वीकारल्या आहेत. कपालिक पंथात मानवी कवटीशी संबंधीत अनेक रूढींसोबतच नरबळी देण्याचीही प्रथा होती. आता हा पंथ अस्तित्वात नाही. मात्र अघोरी पंथाने कपालिक पंथातील बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या आहेत.
अघोरी लोकांसारखे वर्तन असणार्या बैराग्यांचा प्राथमिक उल्लेख चीनी प्रवासी ह्युएन त्संगच्या प्रवासवर्णनात सर्वांत आधी आढळतो. अंगाला राख फांसून, कवट्यांच्या माळा धारण करणारे (कपालधारी), नागवे (निर्ग्रंथ) साधू त्याने हिंदुस्थानात पाहिले. त्यानंतरच्या कालखंडातले कापालिकांचें विशेष वर्णन आजही उपलब्ध आहे. ‘शंकरविजय’ या ग्रंथात कापालिकांबद्दल आनंदगिरीने असे म्हटले आहे की, ”चितेच्या राखेने त्यांचे अंग माखलेले असून, त्यांच्या गळ्यांत नररुंड माळा असतात; त्यांच्या कपाळावर एक काळी रेघ ओढलेली असते व केसांच्या जटा केल्या असतात. ढुंगणाला एक व्याघ्रचर्म गुंडाळलेले असून डाव्या हातांत माणसाच्या डोक्याची कवटी व उजव्या हातांत एक घंटा घेतलेली असते आणि तोंडानें ”शंभो भैरव कालीनाथ !” असे ओरडत ते एकसारखी ती घंटी वाजवीत जातात. मालतीमाधव या ग्रंथात भवभूतीने अघोरघंट हा चामुंडादेवीला मालतीचा बळी देत असताना माधव तिची सुटका करतो अशा अर्थाचे फार सुंदर कथानक विणले आहे. प्रबोध चंद्रोदय या ग्रंथात कापालिक व्रताचें उत्तम वर्णन दिले आहे.
दबिस्तान ए मजहब ग्रंथात अशा योग्यांच्या एका पंथाची माहिती दिली असून, त्यात म्हटलंय की हिंदुस्थानमधील या पंथाला अन्नाच्या बाबतीत निषिद्ध असे काहीच नाही. ते माणसांना सुद्धा मारून खातात. यातील काहीजण आपली विष्ठा अन्नांत मिसळून व फडक्यांत गाळून पितात. असेही सांगतात की, या योगाद्वारे मनुष्य मोठमोठ्या गोष्टी करूं शकतो. या प्रकाराला ते ‘अतिलिया’ किंवा ‘अखोरी’ म्हणतात. गोरखनाथापासून यांची उत्पत्ती आहे असे या ग्रंथांत म्हटलेय. ‘दबिस्तान’चे लेखक दुअल फकर अर्देस्तानी यांनी असा एक माणूस पाहिला होता, जो आपले नित्यमंत्र उच्चारत एका प्रेतावर आरूढ झाला होता. त्या प्रेताला पाणी सुटेपर्यंत तसेच ठेवून नंतर त्याने त्यांतील मांस खाल्ले. हे कृत्य ते अतिशय पुण्यदायक असे समजतात. गोरखनाथ हा मध्ययुगांतील एक मोठा साधू होता; त्याच्यासंबंधी अनेक अद्भुत कथा सांगतात व काही योगी त्याला आपला पूर्वज मानतात. हे सर्व वर्णन त्यात आहे.
हिंदू समाजातील बहुतांश पंथांचे निश्चित असे नियम आहेत. पंथाचे अनुयायी संघटनात्मक पद्धतीने नियमांचे पालन करतात आणि सामाजिक पातळीवर विविध टप्प्यांत देवाणघेवाण होत राहते. मात्र अघोरींबाबत असे होत नाही. या संप्रदायातील साधू आपल्या कुटुंबियांशी संपर्क पूर्णपणे तोडतात आणि बाहेरच्या व्यक्तींवर विश्वास ठेवत नाहीत. बहुतांश अघोरी खालच्या जातीतील असतात, असा एक समज आहे, परंतु ही गोष्ट तितकीशी सत्य नाही. कोणत्या जातींमधून अघोरी साधू अधिक प्रमाणात दिसून येतात हे शोधणे कठीण आहे कारण यांचे मूळ शोधणे हेच मुळात जिकिरीचे आहे. तरीही त्यांच्या भाषा व लहेजावरून काही अंदाज लावता येतात. मात्र काही लोक याचा अन्वयार्थ त्यांच्या बौद्धिक क्षमतेशी जोडू पाहतात तेव्हा ते तितके संयुक्तिक वाटत नाही.
वास्तवात पाहिले तर अघोरी संप्रदायात साधूंच्या बौद्धिक कौशल्यात खूप अंतर दिसते. काही अघोरींची बुद्धी इतकी तल्लख होती की ते राजा-महाराजांना सल्ला द्यायचे. एक अघोरी साधू तर नेपाळच्या राजाचे सल्लागार होते.
मनोज ठक्कर लिखित ‘अघोरी : अ बायोग्राफिकल नॉवेल’ पुस्तक या दृष्टीने महत्वाचे आहे. लोकांमध्ये अघोरी साधूंविषयी चुकीची, भ्रमित करणारी माहिती अधिक आहे, त्यामुळे त्यांच्याविषयीचे सत्य शोधणे तितके सोपे नाही. अघोरी अनुयायी, वैयक्तिक जीवनातली साधी माणसं असतात. त्यांना निसर्गाच्या जवळ राहणे आवडते. त्यांची कुठल्याच प्रकारची मागणी किंवा अपेक्षा नसते. ते प्रत्येक वस्तूला ईश्वराचा अंश मानतात. ते कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि कुठल्याच वस्तूला नाकारत नाहीत. त्यामुळे ते प्राणी आणि माणसाच्या मांसातही भेद करत नाहीत. प्राण्यांचा बळी देणे हा त्यांच्या पूजा पद्धतीचा एक अविभाज्य घटक आहे. ते गांजाची चिलीम ओढतात. मात्र नशेतसुद्धा त्यांना स्वतःविषयी संपूर्ण जाण असते. काहींना हा नशेडी संप्रदाय वाटू शकतो मात्र हे अर्धसत्य आहे!
वरवर फारशी कठीण न वाटणारी आणि तितकीच आव्हानात्मक जीवनशैली असल्याने या संप्रदायाकडे बऱ्यापैकी लोक आकृष्ट होत असतील असे कुणाला वाटत असेल तर ते मात्र चुकीचे आहे. अघोर पंथामधील रिती रिवाज आणि काही कठीण परंपरा यामुळे अघोरी संप्रदाय अनुसरणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्याच बरोबर अघोरी पंथातील रितीरिवाजांचे योग्य पद्धतीने पालन करणारे अनुयायी खूप कमी प्रमाणात आढळतात.
कुंभमेळ्यात येणारे साधू हे नेहमीच स्वयंघोषित अघोरी असतात आणि यातील बहुतेकांनी कधीच कुठल्याच प्रकारची दिक्षा घेतलेली नसते. तसंच काही जण तर अघोरी साधूंप्रमाणे वेश घेऊन पर्यटकांचं मनोरंजन करतात. कुंभ संगमात स्नान करण्यासाठी आलेले भाविक त्यांना अन्न आणि पैसे देतात.खरे अघोरी कुणाकडूनही पैसे घेत नाहीत आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. कुणी संतती प्राप्तीसाठी आशीर्वाद मागतोय की घर बांधण्यासाठी, याची ते पर्वा करत नाहीत. ते अगदी जिवापासून आपल्या कर्मकांडात व्यग्र असतात. अघोरी सामान्यपणे महादेवाची पूजा करतात. त्यासोबतच ते महादेवाची पत्नी शक्तीचीही उपासना करतात. उत्तर भारतात स्त्रिया अघोरी संप्रदायाच्या सदस्य बनू शकतात. पश्चिम बंगालमध्ये स्त्रिया स्मशानभूमीतही दिसतात. मात्र अघोरी संप्रदायातील स्त्रियांना कपडे परिधान करावे लागतात. बहुतांश माणसं मृत्यूला घाबरतात. स्मशानभूमी मृत्यूचे प्रतीक आहे. मात्र अघोरी इथूनच सुरुवात करतात. ते सामान्य समाजाची मूल्यं आणि नैतिकतेला आव्हान देऊ इच्छितात.
मात्र याचा दुसराच परिणाम होऊन समाजात अघोरी साधूंचा सहज स्वीकार केला जात नाही. तरीही गेल्या काही वर्षांमध्ये या संप्रदायाने समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा प्रयत्न केला आहे. काही भागात अघोरींनी कुष्ठरोगींसाठी हॉस्पिटल उभारली आहेत. अघोरी त्या माणसांसोबत काम करत आहेत, ज्यांना समाजाने अस्पृश्य मानले आहे! कुष्ठरोगाच्या रुग्णांसाठी हॉस्पिटल्सने एकप्रकारे स्मशानभूमींची जागा घेतली आहे आणि अघोरी या रोगाच्या भीतीवर विजय मिळवत आहेत.
अघोरी लोक सामान्य समाजापासून वेगळे राहतात, असा समज आहे. काही अघोरी साधू फोन आणि सार्वजनिक वाहतुकीचाही वापर करतात. याशिवाय काही अघोरी साधू सार्वजनिक स्थळी जाताना कपडेही घालतात. यांचा सार्वजनिक वावर अलीकडील काळात वाढलेला असूनही त्यांची नेमकी संख्या अजूनही अज्ञात आहे. जगभरात एक अब्जाहून जास्त लोक हिंदू धर्माचे पालन करतात. मात्र त्यांचा एकाच प्रकारच्या मान्यतांवर विश्वास नाही. एकच ग्रंथ किंवा एका पैगंबर अशी परंपरा हिंदू धर्मात नाही. त्यामुळे अघोरींच्या संख्येचा अंदाज बांधणे अवघड आहे. मात्र अघोरी हजारोंच्या संख्येने असतील, असे तज्ज्ञांना वाटते. यांची खानेसुमारी करणे कठीण आहे कारण इतर सर्व साधूंच्या वहिवाटीप्रमाणे हे देखील यात्रेकरिता व पर्वस्नानासाठी एकसारखे इकडे तिकडे फिरत असतात; व दुसरे असे की, या पंथाच्या नाचक्कीमुळे प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी यातील बरेच जण आपला खरा पंथ लपवून ठेऊन, इतर कोणत्यातरी संभावित सदरांत आपली नावे नोंदवतात. जेथे यांचे मठ असत अशी प्राचीन काळची प्रमुख ठिकाणे म्हणजे, माऊंट अबू, गिरनार, बुद्धगया, काशी व हिंगलाज होत. (पश्चिमेकडे हिंगलाजपर्यंत भारतीय अनेकेश्वरी वाद पोहोचला होता) पण सध्या माऊंट अबूवर किंवा दुसर्या कोणत्याही क्षेत्री यांचे मठ किंवा काही जामानिमा आढळत नाही.
काही अघोरी साधूंनी आपण मृत शरीरासोबत संभोग केल्याचे, सार्वजनिक स्वरूपात मान्य केले आहे. मात्र ते गे सेक्सला मान्यता देत नाहीत. त्यांच्या मांसभक्षणाबाबतीत देखील एक खूपच विशेष बाब अशी की, जेव्हा एखाद्या अघोरीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मांसाचे भक्षण इतर अघोरी करत नाहीत. त्यांच्या मृतदेहाचं रिवाजपूर्वक नि विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात.
गुजरातमधील भडोच जिल्ह्यांत ‘डेबका’ येथे पूर्वी अघोर्यांची वसाहत होती. माऊंट अबू येथे बरीच वर्षे एका गुहेत राहणाऱ्या फत्तेपुरी नावाच्या एक अतिविख्यात अघोरपंथी साधूला त्याच्याच इच्छेनुसार अखेरच्या दिवसांत गुहेच्या भिंतीत चिणण्यात आलं होतं. हा किस्सा खूप गाजला होता. एके काळी कालिका मातेला नैवेद्य म्हणून नरमांसभक्षक अघोरी बळी देण्याकरितां माणसांना धरत असत असा उल्लेख काही पुरातत्वजन्य कागदपत्रांत आढळतो. बुकॅनन (Martin Buchanan] E. India, ii 492p.) याने आपल्या ग्रंथांत एका अघोरी साधकाविषयी लिहिलं आहे की, एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी संयुक्त प्रांतात गोरखपुर येथे एक अघोरी आला होता. येथील राजाच्या घरात शिरून त्याने त्याच्या अंगावर घाण टाकली तेव्हा राजाने आह्मुती (Ahmuty) नावाच्या तेथील जिल्हा-न्यायाधिशाकडे तक्रार नेली. अह्मुतीने त्या अघोरी साधकाला हाकलून देण्याविषयी हुकूम दिला. पण पुढे लवकरच जेव्हा अह्मुती स्वत: आजारी पडला व त्या भागातील राजाचा वारस स्वर्गवासी झाला तेव्हा त्या भागांतील लोक असे समजू व सांगू लागले की, साधूच्या अपमानाचे हे प्रायश्चित्त मिळाले.
The Revelations of an Orderly – Benares edition 1849 या पुस्तकात अघोरी साधकांचे अंगावर शहारे आणणारे वर्णन केलेय. त्यात वर्णनग्रंथकर्त्याने या गोष्टी बंद करण्याविषयी सरकारला विनंती केली. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर अघोरी साधूंची नागवे हिंडण्याची वहिवाट पोलिस कायद्याने बंद पाडली होती हे विशेष! त्यानंतर विशेष ठराव पास करवून (ब्रिटिश हद्दींत) नरमांसभक्षण अपराध ठरवून शिक्षेस पात्र ठरविण्यात आलेलं. अद्यापही अनेकजण अघोरी साधक कधीही नरमांसभक्षण करत नव्हते असे मानतात मात्र ते म्हणणे तितके बरोबर नाही.
१८८७ मध्ये उज्जैन येथे एका यात्रेच्या वेळी अघोरी साधकांची एक टोळी आली; त्यांनी तेथील अधिकार्यांजवळ बळी देण्यासाठी कांही बकऱ्या मागितल्या. त्यांनी त्या देण्यास नकार दिल्यावर त्या टोळीतील साधक स्मशान घाटावर गेले व तेथील एक प्रेत उचलून त्यांनी ते खाण्यास सुरुवात केली. तेव्हां पाहाणारांच्या उरांत धडकी भरून त्यांनी पोलिसांना बोलाविलें; पण त्या नंग्या गोसाव्यांनीं त्यांनी मागितलेली बकरी मिळेपर्यंत आपले खाणें बंद ठेवले नाही. या घटनेचे नोंदीकरण झालेले असल्याने यावर संशय घेणे उचित नाही.
‘एका अघोरी साधकाचे चरित्र’ ही ड्रेक ब्रॉकमन नांवाच्या इंडियन मेडिकल ऑफिसरनें मिळविलेली एका अघोर्याची जन्मकथा, एच. बालफेर याने शब्दबद्ध केली. हा साधक जातीने लोहार असून पंजाबांतील पतियाळा संस्थानांत राहात असे. तो प्रथम भीक मागत असे, पण पुढे एका अघोर्याने त्याला आपला शिष्य केला. तो बद्रिनारायण करून नंतर नेपाळला गेला; तेथून जगन्नाथाला जाऊन शेवटी मथुरा व भरतपुर येथे आला. भरतपुरला त्याची चौकशी झाली. त्याने अशी जबानी दिली की, ”मी सध्या कोणत्याही जातीकडून अन्नग्रहण करतो, व जातीचा विधिनिषेध मी मानीत नाही. मी कोणाच्याही हातचे खातो. मी स्वत: नरमांस खात नाहीं पण माझ्या पंथांतील कांही जणांना तें खाऊन पुन्हां सजीव करण्याची ताकद आहे. काहींजवळ मंत्रसामर्थ्य असते व ते मनुष्यांचे मांस खातात; पण माझ्यांत हे सामर्थ्य नसल्याने ती क्षमता माझ्यात नाही. मी फक्त मनुष्याच्या डोक्याच्या कवटीतून अन्न खातो व पाणी वगैरे पितो. याशिवाय मी घोड्याव्यतिरिक्त सर्व मृत जनावरांचें मांस भक्षण करतो. घोडा निषिद्ध मानला आहे म्हणून खात नाहीं. माझे सर्व पंथबांधवही माझ्याप्रमाणेच घोड्याच्या मांसाशिवाय सर्व मांस खातात.”
अघोरी पंथाने घोड्याचे मांस निषिद्ध का मानले आहे, हा वादग्रस्त मुद्दा! कोणी म्हणतात घोडा (घोरा) हा शब्द या पंथाच्या नांवात असल्याने अघोरी ते निषिद्ध मानत असावेत. पण हा युक्तिवाद वरवरचा आहे. उलट हिंदुस्थानांत गायीपूर्वीही घोड्याला पवित्र मानत होते. अश्वमेधांत घोड्याला विराज् म्हटले आहे; अजूनही घोड्याला पवित्र समजले जाते, त्यामुळे अघोरी घोड्याचे मांस खात नसावेत.
आपल्या पंथांतील व्यवस्थेच्या बाबतीत अघोरी इतके मुग्ध असतात की, इतर पंथांसोबतचे त्यांचे संबंध अद्याप पूर्णपणे ज्ञात झाले नाहीत. साधनेचे मुख्य ठिकाण काशी असणारे साधक आणि अर्वाचीन काळचे पंथानुयायी, आपली उत्पत्ती किन्नराम नांवाच्या साधूपासून झाली असे मानतात. किन्नरामाचा गुरु काळुराम हा गिरनार येथे अठराव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला म्हणून या लोकांना कधीकधी किन्नरामी या नावानेही संबोधण्यात येते. अघोर्यांच्या धार्मिक समजुती जवळ जवळ परमहंसांप्रमाणेच आहेत. परमहंस हे ब्रह्मस्थितीत निमग्न असून त्यांना सुखदु:ख समान वाटते; ते जगापासून इतके अलिप्त असतात की, स्वत:च्या खाण्यापिण्याचीही त्यांना शुद्ध नसते. जीवित साधनांविषयीं बेपर्वाईने वागणारा यांच्यातला दुसरा पंथ म्हणजे सरभंगी. आयुष्यांतील गरजांविषयी या पंथांची बेपर्वाई भिन्न आहे. पंजाबच्या औघर योग्यांशी यांचा कसा संबंध आहे हे निश्चित उमगत नाही. अघोरी मंडळींप्रमाणे ते नरमांस व मल खात असत अशा नोंदी आहेत.
अघोर्यांसंबंधी महत्त्वाची लक्षण म्हणजे नरमांस व मल भक्षण आणि खाण्यापिण्याकरितां मनुष्याच्या कवटीचा उपयोग, हे होय. काली, दुर्गा इत्यादि स्वरूपात असलेल्या देवीचे शाक्त उपासक जे गूढ संस्कारविधी करत, त्यांच्यांशी अघोरींच्या नरमेध व नरमांस भक्षण या चालींचा मुख्यत्वेकरून संबंध पोहोचतो. या कालीपूजेला पाचव्या शतकांत पूर्व बंगालमध्ये सुरुवात झाल्याचे आढळते. हिचे नाव अघोरकाली असेही आढळते! कालिका पुराणांत मनुष्य बलिदान करण्यास स्पष्टपणे सांगितले आहे; मनुष्याऐवजी कबूतरे, बकरी व क्वचित बैल रेडेही बळी दिले जात. हिंदु धर्मांत कर्मकांडे म्हणून हे प्रकार आर्य आणि अनार्य दोहोंकडून आलेले असावेत; काही प्रमाणात पूर्वेकडील आदिम जमातींकडूनही आले असावेत असे दिसते. अजूनही आसाम वगैरे ठिकाणी असे प्रकार घडताना दिसतात. तेव्हा अघोरी पंथाचा हिंदुधर्मांतील या बाजूशी निकट संबंध आहे असा निष्कर्ष काढणे संयुक्तिक ठरते.
अघोरी पंथात खाण्या पिण्याकरिता कवटीचा उपयोग करण्यांत विशिष्ट हेतू आहे. अशा तर्हेने उपयोगिल्या जाणार्या कवट्यांत विशेष जादू असते असा अपसमज रूढ आहे. जसे की, पूर्व आफ्रिकेतील वाडो (Wadoe) लोकात राजा नेमण्याच्या वेळी एखाद्या नवख्या मनुष्याला मारुन अभिषेकविधीत त्याच्या कवटीचा वापर पिण्याच्या भांड्याप्रमाणे करतात. बगंडांच्या (Baganda) राजाचा नवीन उपाध्याय पूर्वी आपल्या जागी असलेल्या उपाध्यायाच्या कवटीने पाणी वगैरे पित असे, यामुळे त्याचे भूत नवीन उपाध्यायात शिरते अशी समजूत होती. हिमालयांत हिमवातामध्ये मरण पावलेल्या स्त्रियांच्या कवट्या भूत वेताळांना पाचारण करण्यासाठी नगार्याप्रमाणे तयार केल्या जात असत, या व यासारख्याच दुसर्या गोष्टीत असे दिसून येते की, उपयोगात आणली जाणारी कवटी फार काळजीपूर्वक निवडलेली असते. कवटी वापरण्याची अघोर्यांची चाल याप्रमाणेच उद्भूत झाली होती मात्र अलीकडील काळात अघोरी जी कवटी निवडतात ती काही विशिष्ट निकष लावूनच निवडली जाते याविषयीचे मापदंड उपलब्ध नाहीत. मृत व्यक्तीचे वय, लिंग आणि मृत्यूचे कारण, या गोष्टी मात्र ते कवटी निवडण्यापूर्वी जरूर जाणून घेतात. जे अघोरी दिखाऊ स्वरूपाचे असतात ज्यांची पाळेमुळे पक्की नसतात, ते मात्र कवटी निवडण्याच्या बाबतीत इतके दक्ष नसतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात अघोरी साधकांना त्यांच्या कृत्यांसाठी कायद्याला सामोरे जावे लागलेय. माणसांची प्रेते खाण्याबद्दल किंवा त्यांचा उपमर्द करण्याबद्दल पुष्कळ अघोर्यांना कोर्टाने शिक्षा दिलेल्या आहेत. १८६२ साली गाझीपूरच्या सेशन्स कोर्टाच्या न्यायमूर्तींनी एका अघोर्याला एक प्रेत रस्त्यावरून ओढून नेल्याबद्दल एक वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा दिली होती. अशाच तर्हेचे खटले १८८२ मध्ये पंजाबांत रोहटक येथे व १८८४ साली डेहराडून येथे झाले होते. १८८४ मध्ये गंगेतील एका घाटावर नरमांस खात असलेल्या एका अघोर्याला दोघां युरोपियनांनी पकडले होते; त्याच्या झोपडीभोवती अनेक मुंडकी व कवट्या बांबूंवर लटकत होती; एक तर नुकतेच धडावेगळे झालेले दिसत होते. त्यांनी त्याची रीतसर तक्रार दिली होती.
बहुतेक अघोरी साधू नवशिक्या शिष्याला दीक्षा देण्याचे मंत्र व विधि गुप्त ठेवतात त्यामुळे अघोरी पंथाच्या दीक्षेबद्दलची नेमकी माहिती मिळणे कठिण आहे. तरीही काही माहिती सार्वजनिक पटलावर आहे, त्यानुसार दीक्षा देतेवेळी गुरु शंख वाजवितो व त्याबरोबर इतर भाडोत्री वाद्ये वाजवतात. नंतर गुरु माणसाच्या कवटीत लघवी करून, ते मूत्र शिष्य होऊ घातलेल्याच्या डोक्यावर ओततो व न्हाव्याकडून त्याचें मुंडन करवतो. नंतर तो नवा शिष्य थोडी दारू व हीन मानल्या जाणाऱ्या जातींकडून मिळविलेले भिक्षान्न सेवन करतो; कमरेला भगवे वस्त्र गुंडाळून हातात दंड धारण करतो. या दीक्षाविधीत गुरु आपल्या शिष्याच्या कानांत काही मंत्र सांगतो. काही काळापूर्वी नरमांसभक्षणहि या विधीचाच एक भाग असे, मात्र आता त्याची पुष्टी होत नाही. उत्तरेकडे ही दीक्षा काशीमधल्या या पंथाचा प्रसारक असलेल्या किन्नरामच्या समाधीच्या ठिकाणी देण्यात येते. त्यावेळी त्याच्या समाधीवर दोन पेले ठेवले जातात, पैकी एक पेला भांगेचा व एक पेला दारूचा ठेवलेला असतो. ज्यांना आपली जात कायम राखावयाची असेल त्यांनी फक्त भांग घ्यावी व ज्यांना पूर्ण दीक्षा हवी असेल त्यांनी दोन्ही पेये घ्यावीत असे सांगितलेले असते. नंतर किन्नरामाच्या काळापासून जागृत असलेल्या अग्नीला फळे अर्पण करण्यात येतात. व एखादा प्राणी बळी दिला जातो. यानंतर शिष्याचे डोके गुरुच्या लघवीने ओले करुन त्याची हजामत करवतात व शेवटी जमलेल्या लोकांना मेजवानी देण्यात येते. बारा वर्षांच्या उमेदवारीनंतर त्या शिष्याचा पूर्णपणें पंथात स्वीकार होतो. हे सर्व विलक्षण खडतर आणि संयमाची परीक्षा घेणारे आहे, त्यामुळे अघोर पंथ स्वीकारताना अनेकजण ऐन वेळी कच खातात.
अघोरी पूजाविधी आणि विद्येमध्ये कर्णपिशाच्च विद्येस महत्वाचे स्थान आहे. या विद्येच्या जोरावर दुसऱ्याच्या मनातील विचार , त्याच्या जीवनात घडलेल्या भूतकाळातील घटना सांगता येतात. या विद्येच महात्म्य एवढेच नाही. ही विद्या खरी की खोटी, यात अंधश्रद्धा किती हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. लेखातील हा भाग त्यास पुष्टी देण्यासाठी लिहिला नसून अघोरी पंथाविषयीचे अपसमज दूर व्हावेत आणि नेमके काय चित्र समोर येते त्याचे अक्षर प्रकटन करावे हा एकमात्र हेतू! असो.
दुर्दैवाने अघोरी कर्णपिशाच्च विद्या साध्य करून अनेक लोक आपण फार मोठे साधू संत आहोत व आपणास त्रिकाल ज्ञान सिद्धी प्राप्त झाली आहे, असा आभास करून अज्ञजनास भूलावतात, वास्तव उलटे असते! खरे तर हे लोक एका कथित पिशाच्च शक्तीच्या आधीन जातात.
त्यांना एक प्रकारचे पिशाच्च वश होते. ते त्यांना कानात सतत काहीना काही तरी सांगत असते पण ते कधीच दृष्टीस पडत नाही. ते नेहमी अदृश्य अवस्थेत असते. अघोरी साधूंना सुरुवातीला आपल्याला मिळणाऱ्या मान, प्रतिष्ठेमुळे हे सर्व खूप अलौकीक वाटतं. पण नंतर मात्र तेच पिशाच्च एक डोकेदुखी होऊन बसते. त्या पिशाच्च्याची टकळी नेहमी चालूच असते. त्यामुळे उर्वरित काळात अघोरी साधक नेहमी हिरमुसलेल्या अवस्थेत राहतो. त्याचा स्वभावही खूप चिडचिडा बनतो. ही विद्या जरी नगण्य प्रमाणात अस्तित्वात असली तरी हिच्या साधकांच प्रमाण खूप आहे, आणि अपवाद वगळता ती सर्वांना साध्य झालेली नाही. ही विद्या सिद्ध करायला स्मशान किंवा इतर कठीण साधना पद्धतीचा अवलंब करावा लागत नाही. घरात बसूनही ही साधना करता येते. खडतर साधना केलेल्या शिष्याला आठवड्याभरात ही विद्या सिद्ध होते तर काहींना जन्मभर तपस्येत घालूनदेखील ती साधत नाही. या विद्येच्या मागे लागून लोकांनी आपले स्वास्थ्य, नैतिकता, सात्विकपणा व ईश्वरभक्ती आदी गोष्टी गमावून बसू नये, असेच सांगावे वाटते.
‘मोहिनीविद्या – साधना व सिद्धी’ या पुस्तकात, कर्णपिशाच्च विद्येची अ. ल. भागवत यांनी लिहिलेली कथा त्यांना स्वतःला कर्णपिशाच्च विद्येच्या साधकांने सांगितलेली आहे. एके दिवशी भागवत यांना हे साधक भेटले. तेव्हा गप्पा मारण्याच्या ओघात त्यांनी कर्णपिशाच्च बद्दल सांगितलेली माहिती त्यांच्याच शब्दात –
“माझ्या कडे बरेच वर्षांपूर्वी एक बंगाली वृध्द गृहस्थ आला . त्याला फार भूक लागली होती. तो दारोदार अन्न मागत फिरत होता. योगायोगाने तो माझ्या दारापुढे उभा राहून अन्न मागू लागला. त्याचा तो दीनवाणा चेहरा पाहून मला दया आली व मी त्यास जेवू घातले. पाणी पिऊन तो बंगाली वृद्ध शांत झाला व घराच्या ओट्यावर बसला. त्याने मला जवळ बसविले व हिंदीत माझे नाव, मूळ गाव, माझे वडील काय करीत होते, माझ्या भावाचा नुकताच झालेला अपघाती मृत्यू वगैरे घटना अगदी बरोबर सांगितल्या. मी तर आश्चर्याने अगदी थक्क झालो व हा कोणी तरी साधूपुरुष असावा असे वाटून त्याचे पाय धरू लागलो. मला त्याने तसे करू दिले नाही. तो म्हणाला, ‘मी काही कोणी साधू वगैरे नाही, पण मला कर्णपिशाच्च विद्या अवगत आहे.’
मला वाटले, ही विद्या मला प्राप्त झाली तर किती छान होईल?
मी त्यास विचारले, ‘बाबूजी, तुम्ही मला ही विद्या शिकवाल का?’
तो म्हणाला, ‘बाबा, ही विद्या फार घातक व दुष्ट आहे. जे पिशाच्च तुला वश होईल ते रात्रंदिवस तुला शांत बसू देणार नाही. तुझी मनःशांती पार ढासळून जाईल. तू या विद्येच्या मागे लागू नको. मलाही ही विद्या शिकल्यामुळे फार पश्चात्ताप होत आहे.’
मला ही विद्या शिकवायची नसावी म्हणून तो काहीतरी थापा मारीत आहे, असे मला वाटल्यामुळे मी त्यास म्हटले की, ‘कितीही यातना व त्रास सहन करावा लागला तरी हरकत नाही. मला ही विद्या शिकवाच.’
माझा हा निश्चय पाहून तो वृध्द गृहस्थ म्हणाला ,’मी उद्या सकाळी येईन. तू भात शिजवून ठेव. मात्र दात घासू नकोस व आंघोळ करू नकोस.’
दुसऱ्या दिवशी सकाळी तो गृहस्थ घरी आला . त्याच्या हातात एक काळ्या रंगाची पिशवी होती. मी त्यास आत बोलावले व त्याच्या समोर बसलो. त्याने आपल्या पिशवीतून माणसाची एक कवटी काढली व मला भात आणावयास सांगितले. त्या कवटीत भात घालून त्याने तो मला खाण्यास सांगितले. माझ्या अंगावर शहारे आले व कुठून या फंद्यात पडलो असे वाटायला लागले. मन घट्ट करून तो भात मी थोडासा खाल्ला. नंतर त्याने त्याच्या भाषेत काही मंत्र म्हटले व मला ताजी विष्ठा आणावयास सांगून कवडीएवढ्या आकाराची विष्ठा मला खावयास लावली व रोज सकाळी तितकी विष्ठा खाल्ली पाहिजे असे सांगितले.
नंतर त्याने मला सांगितले की, रोज सायंकाळी कणकेच्या लहान लहान गोळ्या करून तुझ्या घरातील विहिरीत टाकत जा. त्या गोळ्या विहिरीतील मासे खातील व ज्या दिवशी त्या गोळ्यांना मासे तोंड लावणार नाहीत त्या दिवसापासून तुला पिशाच्च वश होईल. असे म्हणून त्याने माझ्या डाव्या मांडीवर थाप मारली व मी बेशुध्द झालो. सावध झाल्यावर पाहतो तर तो वृध्द गृहस्थ केव्हाच निघून गेला होता.
त्याने सांगितल्या प्रमाणे मी रोज मोठ्या कष्टाने विष्टा खात होतो व माशांना कणकेच्या गोळ्या घालत होतो.
पाच सहा दिवसांनी पाहतो तर मासे त्या गोळ्या खाईनासे झाले होते.
त्या दिवसापासून मला वाटू लागले की आपण स्वतंत्र नाही. उगीच वाटायचे की विहिरीवर जाऊन परत यावे. तसे केल्याशिवाय चैनच पडत नसे. असे आदेश मला कोण देत आहे हे समजेना; माझा देव धर्म संपला. आंघोळ कधीच करू नये असे वाटू लागले. हातापायाची सारखी हालचाल व्हायची. चेहरा घाबरलेला दिसावयाचा. माझी मनःशांती व आनंद नष्ट होऊन माझा जीव कोणाच्या तरी ताब्यात गेला आहे, असे वाटू लागले.’
मी ज्या श्रीमंत कुटुंबाकडे वरकामाला होतो, त्या घरात एकदा मालकिणीच्या सोन्याच्या पाटल्या चोरीस गेल्या. मी ज्योतिषाचा थोडाफार अभ्यास केला आहे, हे मालकास माहित होते. त्याने मला हाक मारली, व विचारले, ‘वामन पाटल्या कोणी चोरल्या?’
मला वाटले मालक माझ्यावर आळ घेत आहेत . मी कळवळून म्हणालो ,’बाबासाहेब ,मी कशाला तुमच्या पाटल्या घेऊ?
असे बोलताना माझा हात सहज डाव्या मांडीला लागला. तोच कानात स्पष्ट शब्द ऐकू आले की ‘गुलाबच्या खिशात!’
मी मालकास सांगितले ,’गुलाबच्या खिशात.’
गुलाब म्हणून एक मोलकरीण होती. तिला मालकांनी बोलावले व पोलक्याच्या खिशात काय आहे ते काढ असे दरडावून सांगितले. त्या खिशातून पाटल्या बाहेर पडल्या.
दुसऱ्या प्रसंगी आमच्या गावात एकदा एका मृत बालकाचे प्रेत गटारात पडले होते. त्याची आई कोण असावी असे पोलिसांनी मला विचारले. मी डाव्या मांडीवर हात ठेवताच ‘विधवा मनुबाई’ असे शब्द कानात ऐकू येऊ लागले. मी नाव सांगताच पोलिस त्या मनुबाईच्या घरी गेले व त्यांनी तिचा जाबजबाब घेतला. ते मृत बालक तिचेच होते!’ ”
काही वर्षापूर्वीच हेच साधक अत्यंत करुणास्पद अवस्थेत मृत्यू पावले. त्यांना जे पिशाच्च वश झाले होते, ते त्यांच्या कानाजवळ सतत काही ना काही बडबडत राहायचे. कोण व्यक्ती दिसली की ते पिशाच्च त्या व्यक्तीचा भूतकाळ सांगत राहायचे. त्याने त्याचं डोकं भंडावून सोडलं होतं. त्याला मौन करता येत नव्हत. ते पिशाच्च त्या व्यक्तीलाच चिटकून असायचे. कोणी दिसलं का झाली त्याची भनभन सुरू होत असे. या कारणांमुळे ते साधक समाजात मिसळायचे बंद झाले होते. स्वतःला त्यांनी घरात कोंडून घेतलं. शेवटच्या काळात त्यांची फार उपासमार झाली होती. त्यांच्या तोंडाला किडे पडले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे प्रेत नेण्यास चार माणसेही नव्हती .
मोहिनीविद्येच्या पुस्तकाप्रमाणेच ‘निळावंती’विषयी देखील वदंता आहेत! प्राचीन काळात लिहिला गेलेला ‘निळावंती’ हा अघोरी विद्येसाठी प्रसिद्ध ग्रंथ मानला जातो. ब्रिटिश अंमल असताना इंग्रज सरकारने मूळ ग्रंथाचं मुद्रण १९३२ साली बंद केलं. आज या ग्रंथाच्या मूळ प्रती फार कमी लोकांकडे आहेत. असं म्हणतात की, या ग्रंथामध्ये जी विद्या आहे, ती जो कोणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. त्याला एक तर ही विद्या पूर्णपणे प्राप्त होते किंवा ती व्यक्ती संपूर्ण वेडी होते, अथवा ही विद्या आत्मसात करताना त्या माणसाला त्याच्या कुटूंबातील सर्वांना गमवावं लागतं, त्याशिवाय तो ही विद्या आत्मसात करुच शकत नाही.
निळावंती पुराणकथा, दंतकथा की वास्तवातली, याविषयी वर्षानुवर्षे वाद चालू आहे. शाहिरांनी आणि पिंगळ्यांनी तिला आपल्या कवनांतून, भाकितांतून वर्षानुवर्षं जिवंत ठेवलंय. अध्यात्म, चमत्कार, जादूटोणा आदी अनेक संदर्भात तिचं नाव घेतलं जातं. विशेष म्हणजे निळावंती वाचल्यानंतर माणूस वेडा होतो किंवा सहा महिन्यांत मरतो किंवा जादूटोण्याच्या मार्गाला लागतो, अशा अफवाही वर्षानुवर्षं टिकून आहेत.
सरनोबतांनी याच विषयावरच्या पुस्तकात भाष्य केले आहे – “गुप्तधन शोधण्याचा एक मोठा मार्ग म्हणूनही काही जण या पुस्तकाकडे पाहतात. दिव्यशक्ती म्हणूनही पाहतात. निळावंतीला पक्षी, कीटक, प्राणी यांची भाषा अवगत असते. यातील अनेक पक्षी, कीटक तिला गुप्तधनाचे अड्डे सांगतात. गुप्तधनाची तंतोतंत माहिती पक्ष्यांनाच असते. कुबेराचं वाहन मुंगूस आहे. या मुंगसाला सारे धनाचे साठे माहीत असतात. सापाच्या फण्यात कसला तरी मणी असतो तो सापडला, की धनाचे साठेही शोधता येतात. काय काय कल्पना आपल्या लोकांनी करून ठेवल्या आहेत! मुंगसाचं ऐकून धनसाठा सापडला असं सांगणारं कोणी भेटत नाही. साप-मुंगसाची लढाई लावणाऱ्या गारुड्यालाही असे धनाचे साठे कुठं सापडलेले नाहीत. सापडले असते, तर साप आणि मुंगसाच्या लढाईचा बहाणा त्यानं कशाला केला असता?”
ज्येष्ठ विचारवंत दुर्गाबाई भागवत यांनीही निळावंतीची मूळ पोथी शोधण्याचा प्रयत्न केला. “प्रासंगिका’ या पुस्तकात त्यांनी न मिळालेल्या निळावंतीच्या पोथीवर एक लेख लिहिलाय. स्वामी विवेकानंदांनी ही पोथी वाचली व पुढे सहा महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला, अशी त्या वेळची एक अफवाही त्यांच्या लेखात आलीय. तर ही निळावंती एका धनवंताची कन्या. लग्नानंतर मध्यरात्री कोल्ह्याची कुई कुई तिच्या कानावर येते. कोल्हे सांगत होते, की नदीतून एक प्रेत वाहत येतं आहे. त्याच्या कमरेला दोन लाल चिंध्या किंवा दोऱ्याच्या गाठी आहेत. रात्री ती नदीच्या दिशेनं गेली. तिला प्रेत दिसलं. त्याच्या कमरेला गाठी दिसल्या, तिनं हातानं त्या सोडवण्याचा प्रयत्न केला; पण शक्य झालं नाही. तिनं त्या दातानं कुरतडल्या, नवऱ्याला वाटलं ती प्रेत खातेय वगैरे वगैरे. नवऱ्यानं हे स्वतः पाहिलं. त्यानं तिला सोडून दिलं. या निळावंतीला कावळा, चिमणी, टिटवी, पाल, घुबड, कोकिळा, बगळा आदी सर्वांच्या भाषा अवगत होत्या. ती त्यांच्याशी संवाद करायची. ती शाहिरांचा विषय बनली. अध्यात्माचा विषय बनली. पहाटे फिरणाऱ्या पिंगळ्यांचा विषय बनली. चित्रविचित्र शक्तीचा विषय बनली. गूढतेचा विषय बनली. महाकल्पनेचा, प्रतिभेचा आणि धनशोधाचा विषय बनली. अनेकांनी त्याचा वेध घेतला. जे कल्पनेच्या पलीकडचं असतं ते वाचलं, की माणूस भ्रमात जातो. तसं झाली की तो खुळा होतो, असं म्हणतात. अनेक तांत्रिकांकडं निळावंतीचं नाव निघतंच. काही अघोरी साधक आपल्याला निळावंती वश असल्याचे सांगतात मात्र याची सत्यता पडताळली गेलेली नाही. त्यात लिहिलेल्या अघोरी पूजा आपण करून देऊ आणि अडलेली कामे सिद्धीस नेऊ असे त्यांच्या वतीने सांगितले जाते. यावर विश्वास ठेवण्याआधी श्रद्धाळू व्यक्तींनी विवेकाचा आधार घेतला पाहिजे! असो.
लेखाचा अंतिम भाग म्हणून अघोरी पूजेकडे वळूया. अघोरी पूजेची प्रमुख दैवते म्हणून भगवान शिव (विशेषतः भैरव, महाकाल, वीरभद्र रूपात), माता काली (भैरवी, बगलामुखी, धूमवती रूपात) आणि भगवान दत्तात्रेय यांची पूजा केली जाते. बाबा किनाराम यांनाही संत म्हणून पूजले जाते.
पूजा प्रामुख्याने स्मशानभूमीत केली जाते, तिथे शक्य नसल्यास जिथे पूजा करायची असते तिथे, स्मशानातील राख आणून पूजा केली जाते. स्मशान हे त्यांच्या लेखी जीवन, मृत्यूच्या चक्राचे प्रतीक आहे. अघोरी पूजेत तंत्र-मंत्रांचा वापर केला जातो. यात मंत्रजाप, यंत्रपूजा आणि काहीवेळा नरमुंड (कपाल) किंवा शवांचा वापर केला जातो.
अघोरी साधक तीन प्रमुख प्रकारच्या साधना करतात – शिव साधना: यात भगवान शिव यांच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यामध्ये भस्म (राख) लावणे, रुद्राक्ष माळ, त्रिशूल आणि डमरू यांचा वापर होतो; शव साधनेमध्ये शवावर (मृतदेहावर) पाय ठेवून साधना केली जाते. या साधनेत मांस आणि मदिरा प्रसाद म्हणून अर्पण केली जाते. ही साधना शिव आणि पार्वतीच्या प्रतीकात्मक एकतेशी जोडली जाते, जिथे पार्वतीने शिवाच्या छातीवर पाय ठेवला होता, अशी मान्यता आहे.
स्मशान साधनेत शवपीठाची पूजा केली जाते, जिथे गंगाजल अर्पण केले जाते आणि मांस-मदिराऐवजी मावा प्रसाद म्हणून वापरला जातो. ही साधना कुटुंबातील व्यक्तींसह देखील केली जाऊ शकते. अलीकडील काळात महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात ज्या अघोरी पूजा केल्या गेल्यात, त्या या वर्गवारीमधल्या होत्या!
यासाठीच्या पूजा विधींच्या विशिष्ट प्रक्रिया असतात. यात मुख्यत्वे कपालाचा वापर केला जातो. अघोरी काहीवेळा मानवी कपालाचा (खोपडी) उपयोग पूजेसाठी करतात. याला मंत्रजाप करून मातीने शुद्ध केले जाते आणि नंतर पूजेत समाविष्ट केले जाते. \पुढच्या टप्प्यात अघोरी आपल्या शरीरावर स्मशानातील राख लावतात, ज्याला ते भस्म म्हणतात. हे भस्म शिवाचे प्रतीक मानले जाते आणि साधनेत वापरले जाते.
- अघोरी पूजेत विशिष्ट मंत्रांचा जाप आणि यंत्रांचा उपयोग केला जातो. यात भूत-पिशाच्चांपासून संरक्षणासाठी मंत्रांचा वापर केला जातो, जसे की साधनेपूर्वी धूप, अगरबत्ती लावून चितेभोवती सीमारेषा अथवा जाळरेषा काढली जाते.
अघोरी पूजा प्रामुख्याने काली मठ, उत्तराखंडमधील गुप्तकाशी येथील शक्तिपीठ येथे केल्या जातात. बंगालमधील तारापीठ या नावाने प्रसिद्ध असलेल्या रामपुरहाट येथील तांत्रिक मंदिरात देवी तारा हिची जिथे पूजा केली जाते, तिथेच अघोरी पूजा केली जाते. त्याचबरोबर वाराणसी येथील मणिकर्णिका घाटावरील बाबा स्मशाननाथ मंदिर येथेही महाकालाच्या कठीण स्वरूपाची पूजा होते. दक्षिणेकडील मदुराई येथील
- कपालेश्वर मंदिर हे देखील अघोर पूजासाधनांसाठी प्रसिद्ध आहे.
या पूजा करताना अघोरी साधकांचा विश्वास असतो की, विश्वातील प्रत्येक गोष्ट ही शिव आणि शक्तीचा अंश आहे. त्यामुळे ते घृणा, भेदभाव किंवा भय यापासून मुक्त असतात.
काही ठिकाणी अघोरी पूजा किंवा तांत्रिक विधींवर कायदेशीर बंदी आहे, विशेषतः जर त्यात नरबळी किंवा अमानवीय प्रथांचा समावेश असेल. महाराष्ट्रात तर अशा प्रथांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा प्रतिबंधक अधिनियम, २०१३ या कायद्याअन्वये बंदी आहे! असो.
जीवनात हवी असलेली गोष्ट उत्तम कर्मे करून मिळवली पाहिजे आणि इतरांचे वाईट व्हावे हा विचार टाळता आला पाहिजे, या दोन गोष्टी जमल्या की जगणे सुसह्य होते! आयुष्यात कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात आणि का ठेवाव्यात याचाही विचार करता आला तर मनुष्य स्वमग्नतेमधून बाहेर पडतो मग त्याला कर्मकांडांची गरज उरत नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेखा धूसर आहेत, त्या ओळखता आल्या पाहिजेत! अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन आपल्या आणि इतरांच्या आयुष्याचे वाटोळे करण्याचा आपल्याला अधिकार नाही! हे सर्व तेव्हाच उमगते जेव्हा आपला विवेक शाबूत असतो. आपली सदविवेकबुद्धी सक्रिय असते, व्यक्तिच्या आयुष्यात या गोष्टींचे संतुलन बिघडून हपापलेपण येतं, षड्रिपूच्या छायेत माणूस जगू लागतो तेव्हा मग त्याचे नैतिक वर्तन बिघडते! गुवाहाटीला जाऊन अघोरपूजा करवणे यासारख्या गोष्टी मग त्याच्या हातून घडू लागतात! आपला तोल ढळू न देणं आपल्याच हाती आहे आणि त्यासाठी आपला विवेक हाच आपला गुरु ठरतो! विवेक हा जगातल्या सर्व जीवनविद्यांवरचा तोडगा आहे याचा विसर पडता कामा नये! अघोर पंथ देखील अशांना वाचवू शकत नाही कारण नैतिक अधःपतन रोखणे हे विवेकाच्या अधीन असणाऱ्यांनाच जमते! सुज्ञास अधिक सांगणे न लगे!
(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत . त्यांच्या ‘खुलूस’ व ‘झांबळ’ या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याशिवाय गवाक्ष (ललित लेखसंग्रह), गौहर (वेश्यांच्या जीवनावरील कथासंग्रह), आणि चाहूर हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक आहे.)

‘










