संघ : स्कूल ऑफ मॅनेजमेंट

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२५)
-नितीन गडकरी
संघाच्या विशाल छायेत सारे एकसमान असतात. ज्येष्ठ-कनिष्ठ असे काहीही असत नाही. तसे भासविलेही जात नाही. मात्र एक रचना परंपरेने व सतत कार्यरत असते. त्यातील ज्येष्ठ दिशा दाखवत असतात, मध्यभागी असलेले लोक त्यासाठी आवश्यक ते नियोजन करतात आणि स्वयंसेवक प्रत्यक्ष अंमलबजावणीत असतात. तसे सारेच स्वयंसेवक असतात. त्यामुळे अंमलबजावणीत प्रत्येकाचा सहभाग असतो. संघाचे व्यवस्थापनशास्त्र कॉर्पोरेटसारखे नाही. ते रुक्ष नाही. ते मानवी चेहऱ्याचे व कल्याणकारी आहे. व्यक्ती, गट, समूह, समुदाय, समाज, प्रदेश-प्रांत व देश-राष्ट्र या प्रत्येक पातळीवर ‘ऐक्यभावना’ हे संघाच्या व्यवस्थापनशास्त्राचे अधिष्ठान आहे.
………………………………………………………..
मॅनेजमेंट हा गेल्या अनेक दशकांपासून विविध क्षेत्रांत ऐकू येणारा परवलीचा शब्द. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, फंडस् मॅनेजमेंट, फ्लोअर मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट ते अगदी डिझास्टर मॅनेजमेंटपर्यंत. मॅनेजमेंट उर्फ व्यवस्थापन करणे म्हणजे एखाद्या कल्पनेची, प्रकल्पाची वा यंत्रणेची उत्तमरीत्या हाताळणी करून तिला तिच्या ध्येयाप्रत किंवा ईप्सिताप्रत पोहोचण्यास मदत करणे. एखादी संस्था, संघटना, कंपनी, शासकीय यंत्रणा किंवा अन्य कोणताही कार्यक्रम-उपक्रम यासाठी आवश्यक असलेली सकल प्रशासन व्यवस्था व तिचे प्रक्रियात्मक घटक या बाबी एकत्रितपणे विचारात घेण्याला ‘व्यवस्थापन’ म्हणतात. व्यवस्थापनात काही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय प्राप्त करायचे आहे किंवा आपले ध्येय (ऑब्जेक्टिव्ह) काय आहे. दुसरी बाब म्हणजे त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी आपण कोणता मार्ग अनुसरणार आहोत, म्हणजेच त्यासाठी आपली रणनीती किंवा स्ट्रॅटेजी काय असणार आहे आणि तिसरी बाब म्हणजे त्यासाठी आपल्याला कोणत्या टप्प्यावर काय-काय लागणार (अर्थबळ-मनुष्यबळ-ज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी) आहे आणि ते आपण कसे मिळवणार आहोत. वेगळ्या शब्दांत हेच सांगायचे तर व्हिजन, मिशन आणि गोल्स असे त्यांचे विभाजन करता येईल. व्हिजनला आपण सरधोपटपणे दीर्घकालीन दृष्टिकोन किंवा दूरदृष्टी असे म्हणतो. मात्र व्यवस्थापनाच्या अनुषंगाने ही संकल्पना विचारात घेतली, तर व्हिजनचा अर्थ इतका मर्यादित नाही. भविष्यात आपल्याला काय व्हायचे किंवा काय मिळवायचे आहे, याची स्पष्टता म्हणजे ‘व्हिजन’, मिशन म्हणजे आपल्या अस्तित्वाचे कारण आणि समाजात आपली भूमिका काय असेल, याची निश्चिती व सुस्पष्टता आणि या व्हिजन व मिशनपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जे काही करायचे, घडवायचे, घडवून आणायचे आहे, ते म्हणजे ‘गोल्स’. गोल्स म्हणजे विविध टप्प्यांवर पूर्ण करावयाची कामे किंवा कामाचे भाग. या सर्वांच्या बाबतीत स्पष्टता असणे आवश्यक आहे आणि ती संघाच्या चिंतनात व कार्यप्रणालीत असते.
व्यवस्थापन कौशल्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रछायेखाली अनेक संघटना आपले काम करीत आहेत. या सर्व संघटनांचा मूळ विचार संघाचा असला, तरी सर्व संघटनांच्या संदर्भात संघ मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो. संघपरिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशाल कुटुंबात लाखो कार्यकर्ते, स्वयंसेवक आहेत आणि ते कोट्यवधी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणत आहेत. या परिवर्तन प्रवाहामागे संघाचे व्यवस्थापन कौशल्य दडलेले आहे. व्यवस्थापन हा फार व्यापक विषय आहे. त्यात अनेक नियम, कार्यपद्धती, प्रक्रिया इत्यादी बाबींचा समावेश होतो. आधुनिक काळातील व्यवस्थापन तज्ज्ञ व्यवस्थापनशास्त्राची तीन/पाच/सात/दहा इत्यादी सूत्रे सांगतात. पण माझ्या मते कोणत्याही व्यवस्थापनाचे तीनच घटक महत्त्वाचे असतात. पहिला घटक असतो आपल्याला नेमके काय, कसे, किती काळात करायचे किंवा मिळवायचे आहे याची ‘स्पष्टता’, दुसरा घटक म्हणजे त्यासाठी वापरावयाचे ‘तंत्र’ आणि तिसरा घटक म्हणजे त्यासाठी लागणारे ‘मनुष्यबळ’ किंवा ‘सहकारी.’ यांतील तिसऱ्या घटकाला संघाच्या कार्यपद्धतीत फार मोठे महत्त्व असले, तरी त्याचे स्तोम माजविले जात नाही.
संकल्पनात्मक कार्य
संघात ज्येष्ठ अधिकारी संकल्पनात्मक किंवा रचनात्मक कार्य करतात. त्यासाठी ते प्रवास करतात. लोकांना, पदाधिकाऱ्यांना भेटतात. सामाजिक गरजा ओळखून कार्यक्रम-उपक्रम आखतात. सुरू असलेल्या कार्यक्रम-उपक्रमांत आवश्यक ते बदल करतात. ही प्रक्रिया निरंतर व दीर्घकाळ सुरू असते. संघाची शताब्दी सुरू झाल्याचा उल्लेख यापूर्वी केलेलाच आहे. पण इतक्या वर्षांच्या दीर्घ प्रवासात संघ आपल्या मूळ भावनेपासून तसूभरही ढळलेला नाही. ती भावना आहे राष्ट्रीय ऐक्यासाठी सर्वांना एका सूत्रात बांधण्याची व त्यायोगे व्यक्तिनिर्माण तसेच राष्ट्रनिर्माण करण्याची. राष्ट्राला परम वैभवाप्रत नेण्याची. इथल्या माणसांच्या कल्याणाची. त्यासाठी संकल्पना, आराखडे, नियोजनासह सर्व खटाटोप आणि त्यासाठी कार्यक्रम-उपक्रम. सारे काही राष्ट्रासाठी म्हणजे या पुण्यभूमीवर राहणाऱ्या आणि इथल्या उज्ज्वल संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या प्रत्येकासाठी.
नियोजन
एखादी संकल्पना पुढे आल्यावर तिच्यावर संघात भरपूर मंथन होते. अनेकांची मते विचारात घेतली जातात. मग त्यावर जाणकार मंडळी किंवा त्या-त्या क्षेत्रांत प्रभारी म्हणून काम करणारे लोक काम करतात. ते एक आराखडा तयार करतात. त्यावर पुन्हा मंथन होते. त्याचे टप्पे ठरतात. त्याला अंतिम स्वरूप दिले जाते. ही प्रक्रियादेखील निरंतर व दीर्घकाळ चालणारी असते. पण हा आराखडा-कार्यक्रम-उपक्रम कशासाठी, कुणासाठी व किती काळ चालेल, याची बरीच स्पष्टता अगदी सुरुवातीपासून असते. त्यामुळे त्याची अंमलबजावणी बरीच सोपी होऊन जाते.
जबाबदारीचे वाटप
संघपरिवारात जबाबदारीचे वाटप करणे हे केवळ अधिकाराचे काम नसून, ते कौशल्याचे काम असते. संघाच्या भाषेत सांगायचे, तर तेही एक दायित्वच असते. व्यवस्थापन व्यवहारातील मूलभूत कला म्हणजे जबाबदारीचे वाटप. जबाबदारी देणारी व्यक्ती स्वतःदेखील जबाबदार असावी लागते. मुळातच संघाच्या कार्यपद्धतीमध्ये आपल्या पद्धतीनुसार माणसे व त्यांची क्षमता ओळखून त्यांनाच अधिकार व जबाबदारी देण्याची पद्धत आहे. यात कुणी कमी किंवा कुणी जास्त असा नसतो. प्रत्येकाला शक्यतो त्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कामाची जबाबदारी सोपविली जाते.
अंमलबजावणी-आढावा
कोणत्याही कामाच्या संदर्भात दिशा ठरली आणि निर्णय निश्चित झाला आणि अंमलबजावणीचे एकदा ठरले की, मग त्यात दुसऱ्या क्षेत्रातले कुणीही हस्तक्षेप करीत नाही. ज्याच्याकडे जबाबदारी असते, त्यालाच पूर्ण अधिकार मिळतो. गरज असेल, तेव्हा ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करतात किंवा विचारपूस करतात किंवा माहिती घेतात. ज्याला गरज वाटेल, त्याने ज्येष्ठांना भेटून माहिती द्यावी आणि मार्गदर्शन घ्यावे, अशीही पद्धत आहे. यालाच ‘आढावा’ म्हणतात. वर्षभर विविध ठिकाणी होणाऱ्या प्रवासादरम्यान त्या-त्या क्षेत्रांतील स्वयंसेवकांशी बोलून ज्येष्ठ पदाधिकारी ही माहिती घेतच असतात. तसेच वर्षभर विविध पातळ्यांवर होणाऱ्या बैठकी, प्रांतनिहाय क्षेत्रनिहाय आढावा, प्रचारकांच्या बैठकी, विविध संघटनांशी समन्वय हे सारे होत असते. शिवाय वर्षभरातून एकदा अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक ही आगामी काळातील संघकार्याचा विस्तार, त्यासंबंधीचे निर्णय व त्यावरील मंथन यासाठी होत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हे काम बहुतांशी अनौपचारिक स्वरूपात होत असते. यातील पदे म्हणजे जबाबदाऱ्या असतात. मग त्यांच्याशी जोडलेले अधिकार आपसूक येतात. त्यामुळे हे सारे एखाद्या लिखित नियमावलीसारखे किंवा एखाद्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे होते, असे मानण्याचे कारण नाही. गेल्या जवळजवळ एका शतकाचा प्रवास हा जसा समाज, देश यांच्या उत्क्रांतीचा आहे, तसा तो संघातही अनेकार्थाने उत्क्रांती घडवणारा आहे. संघाने या दीर्घ काळात अनेक अनुभव घेतले. पदाधिकारी-नेते-कार्यकर्त्यांच्या हत्या, त्यांच्यावरील हल्ले, बंदी, कोर्ट-कचेरी, आणीबाणीतील मुस्कटदाबी, बहिष्कार-निषेध असे सगळे संघाने पाहिले व अनुभवले आहे. प्रत्येक घटना-घडामोडीतून संघ काही ना काही बोध घेत आला आहे. संघटना ही शेवटी माणसेच बांधतात. त्या माणसांच्या उत्क्रांतीत त्या संघटनेची उत्क्रांती अनुस्यूत असते. संघाचे तसेच आहे. त्यामुळे संघाने बरीचशी अनौपचारिक असली तरी व्यवस्थापनाची एक पद्धत विकसित केलेली आहे, असे म्हटले तर ते योग्य ठरेल.
 संघ आणि संघटन
संघटना व संघटनकार्याला संघात मोठे महत्त्व आहे. स्वयंसेवक म्हणून माझ्यावर तसेच संस्कार झाले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून त्या संस्कारांचे महत्त्व खऱ्या अर्थाने कळले आणि त्याचे कारण होते, त्या संघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते, ते मा. यशवंतराव केळकर, यशवंतराव केळकरांचे निधन झाले, त्या वेळी तत्कालीन प. पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले होते की, “यशवंतराव हे हेडगेवार-कुलोत्पन्न आहेत, एवढे म्हटले, तरी त्यांच्या कार्याचा संपूर्ण आवाका स्पष्ट होईल.”
प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे रा. स्व. संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक. त्यांना संघपरिवारात आदराने ‘डॉक्टर’ (हिंदी पट्टयात डॉक्टरजी) म्हणतात. त्यांच्या नंतरचे सरसंघचालक प. पू. माधवराव सदाशिवराव गोळवलकर. त्यांना सगळे आदराने ‘श्रीगुरुजी’ म्हणतात. डॉक्टर-डॉक्टरजी, गुरुजी-श्रीगुरुजी ही त्या-त्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यवसाय किंवा शिक्षणापासून आलेली विशेषणे असली, तरी संघटनकार्यात त्यांचे महत्त्व मोठे आहे. प. पू. डॉ. हेडगेवार हे व्यक्तींचे डॉक्टर बनण्याऐवजी समाजाचे डॉक्टर बनले आणि प. पू. मा. स. गोळवलकर यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी संघकार्याची धुरा स्वीकारली व दीर्घ काळ वाहिली. डॉक्टरजी आणि श्रीगुरुजी ही विशेषणे कार्यकर्त्यांना एकत्र आणतात, संघटित करतात. ही या अर्थाने संघपरिवाराची श्रद्धास्थाने आहेत.
भगव्या ध्वजाचे महत्त्व
संघात व्यक्तीला प्रथम प्राधान्याने महत्त्व नाही. भगवा ध्वज हाच सर्वांचा गुरू आणि मार्गदर्शक. कारण भारतीय शाश्वत परंपरेत त्याग, शौर्य आणि यज्ञाच्या पवित्र अग्नीचे प्रतीक म्हणून भगव्याला मान्यता आहे. प. पू. डॉक्टरजी म्हणायचे की, एखाद्या व्यक्तीमध्ये उणिवा किंवा दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे व्यक्तीऐवजी भगव्या ध्वजालाच आपण गुरू मानले पाहिजे. दरवर्षी व्यासपौर्णिमेच्या दिवशी होणारे भगव्या ध्वजाचे विधिवत पूजन हीच संघात गुरुपूजा असते. संघाचे वर्षभर जे काही महत्त्वाचे उत्सव असतात, त्यातला गुरुपूजन हा महत्त्वाचा एक. थोडे विषयांतर झाले खरे. पण भगव्या ध्वजाची महती संघाच्या संदर्भात सांगणे महत्त्वाचे होतेच.
यशवंतराव केळकर

...तर प्रत्यक्षात आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. हेडगेवार यांच्या कुळात यशवंतराव केळकर यांचा जन्म झाला नाही. पण संघटनकार्यात ते प. पू. डॉक्टरांसारखे निपुण होते, म्हणून त्यांना बाळासाहेबांनी ‘हेडगेवार कुलोत्पन्न’ या शब्दांत आदरांजली वाहिली. १९२५मध्ये संघाची स्थापना झाली. तो काळ स्वातंत्र्यलढ्याचा. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ सालची. स्वातंत्र्यलढ्यासाठीचे बहुतांशी काम काँग्रेसच्या छत्राखाली चाललेले. डॉक्टर काँग्रेसचे युवा नेते होते. शिवाय त्यांचा क्रांतिकारकांशीही संपर्क होता. त्यांना सामाजिक जीवनाचा, चळवळींचा प्रत्यक्ष अनुभव होता. त्या शिदोरीसह डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. भारतभूमीवर राहणाऱ्या विशाल हिंदू समाजाचा सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मिक वारसा हा हिंदूंच्या देशाचा आधार असला पाहिजे, असे डॉक्टरजी मानत. त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हे निःसंदिग्धपणे मांडले. त्यामागे दूरदृष्टी होती. त्याची फळे आता दिसत आहेत. संघटनेला नाव, ध्येय, दिशा, मार्ग व प्रार्थना-गणवेशादि साधने असे सगळे लागत असते. ते सर्व आपल्या तत्कालीन सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून डॉक्टरांनी दिले. नंतरच्या सरसंघचालकांनी व अन्य पदाधिकाऱ्यांनी संघाच्या संघटनकार्यात त्याच दिशेचे भान कायम राखले. साधने बदलली, मार्ग बदलले, पद्धती बदलल्या, पण ध्येय बदलले नाही. संघाच्या विशाल संघटनाचे आणि त्याच्या प्रभावशीलतेचे हे गमक आहे. त्याला मी मुद्दाम गुपित म्हटलेले नाही. कारण संघाच्या संघटनात्मक कार्यात गोपनीयतेला जागा नाही. जे काही घडले, घडते, ते सारे उजेडात असते.

१९२५मध्ये संघाची स्थापना झाली. १९३६मध्ये राष्ट्र सेविका समितीची स्थापना झाली. दोन्हींचे काम सुरुवातीपासून एकमेकांना पूरक. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ ही संघविचारांची पहिली लोकसंघटना. ती विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी काम करत होती. आजही करीत असते. १९५८ ते १९८५ असा सत्तावीस वर्षांचा काळ यशवंतराव केळकरांनी परिषदेला मार्गदर्शन केले. माझा त्यांच्याशी विद्यार्थिदशेत संपर्क आला, हे माझे भाग्य. संघटन म्हणजे नेमके काय असते, ते कशासाठी आणि कशा पद्धतीने साकारले जाते, हे मी खऱ्या अर्थाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत शिकलो. संघाशी बालपणीच संपर्क आला, तरी कळत्या वयात विद्यार्थी परिषदेत काम करताना अनेक गोष्टींचा खरा अर्थ कळला. यशवंतराव केळकरांचा मंत्र होता ‘चरैवेति, चरैवेति… म्हणजे निरंतर चालत राहा.’ संघटनेत सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती प्रखर तपातून सिद्ध होऊनच आली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पण कोणत्याच व्यक्तीचे कार्य आणि महत्त्व त्यांना अमान्य नव्हते. कार्यकर्ता अनुभव आणि पदाने श्रेष्ठ होत गेला की; त्याप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्त्वात मातृभाव, पितृभाव आणि भ्रातृभाव वाढला पाहिजे, असे यशवंतराव मानत. त्यामुळे ‘माणूस नावाचं काम’ या पुस्तकात त्यांनी ‘आपण सारे अपूर्णांक आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या ऐक्यातून आपल्याला पूर्णांक साकारायचा आहे,’ असा सिद्धान्त मांडला. तो माझा सर्वांत आवडता सिद्धान्त आहे. आपण सारेच अपूर्णांक आहोत आणि सारे मिळून पूर्णांक साकारतो, यावर विश्वास ठेवून काम करीत राहणे आवश्यक आहे. सर्व अपूर्णांक समान महत्त्वाचे असतात. अधिक महत्त्वाचा अपूर्णांक आणि कमी महत्त्वाचा अपूर्णांक, असा फरक आपल्या संघटनेत असू नये. अपूर्णांकाचे महत्त्व आणि मूल्य काहीही असो, पूर्णांक सिद्ध होतो, तो अशा सर्व अपूर्णांकांच्या ऐक्यातून व संघटनातून. यातूनच संघभावना निर्माण होते व सांघिक कार्य घडून येते, असे यशवंतराव म्हणायचे. संघटनेच्या संदर्भात संघाची मूळ दृष्टी ही अशी आहे.
प्रभावी संघटन
    एखादे संघटन प्रभावी रितीने चालायचे असेल, तर त्यात तीन महत्त्वाच्या बाबी विचारात घ्यायच्या असतात. उद्देश किंवा उद्दिष्टाची स्पष्टता ही पहिली बाब. योग्य कार्यकर्त्यांची निवड हा दुसरा मुद्दा. सांघिक किंवा सामूहिक कार्य हा तिसरा मुद्दा. यातले काहीही कमी किंवा जास्त महत्त्वाचे नाही. उद्देशांची स्पष्टता असेल; पण योग्य कार्यकर्ते उपलब्ध नसतील किंवा निवड योग्य झाली नसेल, तरी त्या उद्देशाचा उपयोग नाही. उद्देश स्पष्ट आहे, कार्यकर्तेही योग्य व पात्र आहेत, पण त्यांच्यात सांघिक भावना नसेल, तरीही ते उद्दिष्ट त्या संघटनेला गाठता येत नाही. स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ आणि भारतीय किसान संघाचे संस्थापक श्री. दत्तोपंत ठेंगडी यांच्या ‘कार्यकर्ता’ या नावाच्या पुस्तकाचा यासंदर्भात उल्लेख केला पाहिजे. या पुस्तकातून दत्तोपंतांनी अधिष्ठान, व्यक्तिमत्त्व आणि व्यवहाराच्या अनुषंगाने संघकार्यातील कार्यकर्त्याचे महत्त्व

दत्तोपंत ठेंगडी

सविस्तर समजावून सांगितलेले आहे. कार्यकर्ता हा संघटनेचा प्राण असतो. त्यामुळे कार्यकर्ता व त्याची जडणघडण समजून घेणे म्हणजेच संघटन समजून घेणे होय. दत्तोपंत आणि यशवंतराव यांचा भर यावरच होता. संघात कार्यकर्त्यांवर केल्या जाणाऱ्या संस्कारांमध्ये एक सूत्र नकळत बिंबविले जाते, असे माझे आकलन आहे. ते असे की, संघटनेत प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे आणि (तरीही) कुणीही अपरिहार्य नाही. या सूत्रातून दोन गोष्टी साध्य होतात. ‘आपण या संघटनेत महत्त्वाचे आहोत,’ हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना मिळतो. मात्र आपल्या व्यक्तिगत महत्त्वाहून अधिक महत्त्व आपल्या समर्पणभावाला आहे, हेही त्याला कळते. मुख्य म्हणजे या बिंबवण्यात सहजता आहे आणि त्याचे प्रात्यक्षिक विविध कामांतून कार्यकर्त्यांना दिसत असते. ती सहजता विविध टप्प्यांवर विकसित होत आली आहे. आणखी महत्त्वाचे असे की, कार्यकर्ता आणि व्यवहारासंबंधीची सूत्रे आमच्या पूर्वसूरींनी व्यक्तिगत आचरणात आणली आणि कार्यकर्त्यांसमोर उदाहरण ठेवले. आपले उद्दिष्ट, कार्यकर्ता व कार्यपद्धती या घटकांशिवाय संघात संघटनेचा किंवा संघटनाचा विचार केला जात नाही, यात सारे काही आले.

(लेखक भारत सरकारमध्ये  रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आहेत.)
 
 
Previous articleअघोर पंथ – समज गैरसमज आणि वास्तव! 
Next articleइंडिगोचा डोलारा कोसळला: स्वस्त तिकिटांमागे दडलेली विस्कळीत सेवा!
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here