तो वीरू नव्हे, साक्षात धर्मेंद्रच होता!

 

-जी.बी.देशमुख                                                           

        ” कोई मुस्कुरा देता है…मै हाथ बढा देता हुँ,  कोई हाथ बढा देता है…  मै सिने से लगा लेता हुँ, अगर कोई सिनेसे लगा लेता है,  मै दिलमें बसा लेता हुँ…” वयाच्या नवव्या दशकात आपल्या जीवनाचं सार अशा पद्धतीनं सांगणारा धर्मेंद्र माणूस सच्चा होता.  पंजाबच्या रांगड्या मातीशी ज्याने कधी नाळ तुटू दिली नाही असा हा आत-बाहेर एकच असलेला मर्द गडी होता.  “मैं तो मोहोब्बत करनेके लिये ही पैदा हुआ हूँ” असं त्याचं प्रेमाचं तत्वज्ञान होतं.  जे केलं ते ‘डंकेकी चोट पर’.  जावेद अख्तर सांगतात त्याप्रमाणे एक साधा, सरळ आणि सर्वसामान्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांशी आत्मीयतेनं वागणारा धर्मेंद्र जगला मात्र स्वाभिमानानं आणि आब राखून.  तो विनम्र आणि संकोची वृत्तीचा असला तरी कुठल्याही प्रकारची वेडी वाकडी वागणूक त्याच्या बाबतीत करण्याची कुणाची हिम्मत नव्हती.  त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वाची स्तुती करताना दस्तुरखुद्द दिलीपकुमार म्हणाले होते की, “जब मैने पहिली बार धरम को देखा था, तो देखतेही मेरे मन मे ये उमंग जागी थी की अल्लाह मुझे ऐसाही बनाया होता तो क्या था. इस कदर खुबसुरत, हसीन और सेहतमंद चेहरा और आँखोसे एक रुहानी रोशनी टपकती थी.’  धर्मेंद्रच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणतात, “मैने किसी ग्रीक गॉडको नही देखा.  लेकीन इसका मुझे कोई गम नही, क्योकी मैने धर्मेंद्र को देखा है…”

पंजाब मधील ग्रामीण भागातून सिनेमात काम करण्याच्या ईर्ष्येने मुंबईत आलेला धर्मेंद्र १९६० साली अर्जुन हिंगोरानी ह्यांच्या ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ ह्या चित्रपटापासून रुपेरी पडद्यावर झळकला.  एक शिष्ट वर्ग त्याच्या अभिनयाकडे नाक मुरडून पाहत असताना त्याच्यातील प्रतिभा हेरली होती विमल रॉय आणि हृषीकेश मुखर्जींसारख्या चित्रपट कलेची जाण असलेल्या दिग्गजांनी.  ‘अनुपमा’, ‘देवर’, ‘बंदिनी’, ‘सत्यकाम’, ‘खामोशी’, अशा सिनेमात एक आदर्शवादी युवक बनलेला हा देखणा नायक साठच्या दशकाच्या उत्तरार्धात दरवर्षी सात ते आठ सिनेमात झळकू लागला होता.  ‘हकीकत’, ‘फुल और पत्थर’, ‘धरम-वीर’  सारख्या चित्रपटांमधून त्याने पुरुषी सौष्ठवाचं नवीन रूप हिंदी सिनेप्रेमींना दाखवलं आणि तिथून त्याला ‘ही-मॅन’ हे बिरूद चिकटलं.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

१९६९ साली ‘आराधना’ आणि ‘दो रास्ते’ ह्या सिनेमातून राजेश खन्ना नावाची लोकप्रियतेची ढगफुटी हिंदी चित्रपट चाहत्यांवर कोसळली होती.  पुढील तीन वर्ष ह्या त्सुनामीत मोठमोठे स्टार बाजूला पडले होते.  पहिला सुपरस्टार म्हटल्या गेलेल्या राजेश खन्नाने हिंदी चित्रपटसृष्टीचा संपूर्ण अवकाश व्यापला होता, पण धर्मेंद्र मात्र ह्या तुफानात देखील यशस्वी चित्रपट देत टिकून होता.  १९७३ साली ‘जंजीर’च्या प्रदर्शनानंतर राजेश खन्नाचं स्टारडम खालसा करून अमिताभ आला आणि तिथून १९९३ पर्यंत अमिताभ चक्रवर्ती सम्राटासारखा हिंदी चित्रपटसृष्टीवर  राज्य करत राहिला, तरी धर्मेंद्रचं आपलं स्वतंत्र संस्थान टेचात टिकून होतं.  लोकांचा पाठिंबा आणि प्रेम हीच धर्मेंद्रची पुंजी होती.  पुरस्कार आदी उमेदीच्या काळात धर्मेंद्रच्या वाट्याला आले नाहीत.

त्याने संपूर्ण कारकिर्दित सुमारे  ३०० बऱ्या-वाईट चित्रपटांत भूमिका केल्या.  ह्यात आदर्श पुरुष, सैनिक, प्राध्यापक, पोलीस अधिकारी, प्रेमी अशा विविध भूमिकांचा सामावेश होता.  पण त्याच्या भोळ्या, रांगड्या, दिलदार, विनोदी  आणि सच्च्या व्यक्तिमत्त्वाची जी वर्णन त्याचे सहकलाकार आणि त्याच्या संपर्कात आलेली मंडळी करतात त्यावरून असं लक्षात येत की १९७५ साली प्रदर्शित रमेश सिप्पी ह्यांच्या ‘शोले’ चित्रपटातील वीरू आणि जय ह्या जोडीतील वीरूची भूमिका करणारा धर्मेंद्र खऱ्या अर्थाने वास्तव जीवनातील धर्मेंद्रच होता. ज्या कलागतींसाठी धर्मेंद्र पडद्यावर आणि पडद्यामागे प्रसिद्धी आणि चाहत्यांचं प्रेम टिकवून होता त्या सगळ्या एकत्रितपणे ‘शोले’ मधील वीरुत बघायला मिळाल्या होत्या. धर्मेंद्र मध्ये उपजत असलेली धाडसी, प्रेमळ, भोळसट, दिलेर, आणि प्रामाणिक वृत्ती ‘शोले’ मधील त्याच्या वीरू ह्या पात्रात ठासून भरली होती.

‘शोले’च्या अभूतपूर्व यशाच्या प्रमुख कारणांपैकी एक होतं त्यातील प्रत्येक चरित्राची भक्कम उभारणी. शहरात भुरट्या चोऱ्या करत, आनंदानं छोटा-मोठा तुरुंगवास भोगत जगणारे दोन शहरी तरुण मित्र वीरू आणि जय रंगवले होते धर्मेंद्र आणि अमिताभ ह्या जोडीनं. ह्या दोन चरित्रांचं वर्णन सिनेमातील सुरुवातीच्या दृश्यात ठाकूर बलदेवसिंग ‘बदमाश है लेकीन बहादूर है, खतरनाक है क्योंकी लडना जानते हैं, बुरे है लेकीन इन्सान है,’ ह्या शब्दांत करतो. ह्या जोडीतील वीरू शीघ्रकोपी, भोळा आणि काहीसा वेंधळा, तर जय शांत, संयमी, बुद्धिमान, विनोदाची खोलवर जाण असलेला आणि निर्णयक्षमता अंगी असलेला युवक होता. वीरूची मैत्री भावना प्रधान होती, तर जय भावनेच्या पलीकडे जाऊन, समजून उमजून निर्णय घेणारा दोघांच्या टीमचा ‘थिंक टँक’ होता. असं असूनही, तसा संकेत देणारा एकही संवाद नसताना धर्मेंद्रच्या देहबोलीतूनच वीरू त्या दोघाच्या चमूचा कप्तान होता, हे कळून आलं होतं.  पण दोघांचं एकमेकांवरील प्रेम निर्विवाद होतं.

वीरू आणि जयच्या जोडीच्या आपसातील संवादाची दृश्य  हजार वेळा पाहून झाली, तरी त्यांची गोडी कायम आहे.  ती दृश्य सिनेमा शेवटाला जाईपर्यंत सतत भोवती रुंजी घालत असतात. मालगाडीवरील दरोड्यातील दृश्यात एकाच हातकडीमध्ये जेरबंद केलेल्या अवस्थेत वीरू आणि जयचं प्रथम दर्शन होतं. धावत्या मालगाडीत गार्डच्या डब्यात खाली बसलेल्या ह्या दोन चोरांशी ठाणेदार ठाकूर बलदेवसिंग (संजीवकुमार) तात्पुरत्या खुर्चीवर बसून गप्पा मारत असतात. त्या क्षणापासूनच जय आणि वीरूच्या चरित्रातील फरक जाणवू लागतो. संवादाची सुरुवातच वीरू ठाणेदार साहेबांची जुनी ओळख, त्यापूर्वी त्यांच्या हस्ते झालेल्या अटकेच्या प्रसंगाची आठवण काढून करतो.  इथून वीरूच्या भोळेपणाची ओळख सुरु होते.  पोलीस किंवा चोर दोघांच्याही कामासाठी बहादुरीची गरज असते अशा आशयाचा संवाद जय फेकतो तेव्हा धर्मेंद्रने ज्या भोळसटपणाने “हाँ, जरूरत होती है…” असं म्हणत त्याची री ओढली होती, तो भोळसट भाव केवळ अभिनय नव्हता, तर तो भाव थेट त्याच्या हृदयातून आला होता.  जय कुठलंही इंटेलीजंट वाक्य फेकून समोरच्याला निरुत्तर करतो तेव्हा  वीरू नेहमी म्हणत असतो की, ‘इसकी तो आदत है बकबक करने की’, त्यातून वीरूला जास्त कठीण संवादाचा तिटकारा आहे, हे प्रतीत होत असत आणि दोघा मित्रातील  हा विरोधाभास प्रेक्षकांना भरभरून आनंद देत असतो.

सुरमा भोपाली, जेलर, बसंती, वीरू आणि जय ही पात्र ठाकूर बलदेवसिंग आणि गब्बरसिंग ह्यांच्या शत्रुत्वाच्या तणावात सापडलेल्या प्रेक्षकांच्या डोक्यांना आराम देण्याचं काम करतात.  आपल्या बौद्धिक मर्यादांची जाणीव असलेला वीरू कुठल्याही प्रसंगी निर्णय घेण्याची जबाबदारी जयकडे सोपवून देत असतो, ह्यातून मित्राप्रती असलेला त्याचा विश्वास व्यक्त होत असतो. निर्णय निष्पक्ष आणि दोघांचा आहे, असं मित्र वीरूला वाटावं ह्याकरीता दोन्ही बाजूनं ‘हेड’ असलेल्या खोट्या नाण्यानं टॉस करून योग्य निर्णय  जय राबवत असतो. पळून जायची संधी असूनही गोळी लागलेल्या ठाणेदाराला दवाखान्यात पोहोचविण्याच्या बाजूचा निर्णय, गब्बरसिंगला पकडण्याच्या मोहिमेची रुपये पाच हजाराची आगाऊ रक्कम घेऊन पोबारा करण्याची संधी असूनही तसं न करता रामगढ येथे जाण्याचा निर्णय आणि शेवटी पाठीत बंदुकीची गोळी लागली असताना दारूगोळा आणण्यासाठी मित्र आणि त्याच्या प्रेयसीला पाठवून मित्रासाठी जीव देण्याचा निर्णय. खोट्या नाण्याचा वापर करून सगळे मनासारखे निर्णय घेण्याची शक्ती हाती आलेली असताना, प्रत्येक वेळी जयने घेतलेले निर्णय मित्रत्वाची बूज राखणारे आणि निःस्वार्थ असतात, त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं की वीरूचा आपल्या मित्रावर इतका विश्वास असतो की तो ह्या निर्णयांना डोळे मिटून स्वीकारतो.

 

 

 

 

 

 

 

‘शोले’मधील प्रत्येक पात्राचा आपला एक रंग होता.पण वीरूचं पात्र मात्र चित्रपटात देखील आपल्यातील मूळ कलाकाराचं जीवन जगत होतं.  पहिल्या नजरेतच बसंतीवर लट्टू झालेला वीरू, प्रथम संवादापासून बसंतीच्या बाबतीत पक्षपाती होउन जातो आणि जयने तिच्या खेडवळ बडबडीवर उलट-सुलट शेरा मारला की ‘इसकी तो आदत है बकबक करने की’ असं म्हणत बसंतीच मन राखत असतो.   त्या काळात ‘शोले’ चित्रपटाच्या संवादाच्या कॅसेटस् निघाल्या होत्या आणि त्या गल्लोगल्ली पानठेले, कँटीन, दुकानात वाजत असत.  त्यात ‘वीरू की सगाई’ नावाची एक कॅसेट होती.  ह्यामध्ये बसंतीचा वीरू आणि जयला टांग्यातून रामगढला घेउन जाण्याचा प्रसंग, जयचं वीरूची सोयरिक घेउन बसंतीच्या मावशीकडे जाणं, वीरूचा दारू पिऊन पाण्याच्या टाकीवरील मजेदार तमाशा, इत्यादी सगळे प्रसंग लोकं कान देउन ऐकायचे आणि खुश व्हायचे.  वीरूकडून होणारे विनोद परिस्थितीजन्य होते, तर जयचे विनोद बुद्धिपुरस्सर होते. आमराईत वीरू  बसंतीला पिस्तूल चालविण्याचं प्रशिक्षण देत असताना तिची  छेड काढतो, तो प्रसंग जणू अख्ख्या भारतातील तत्कालीन तरुण मंडळीना हवाहवासा वाटायचा.  त्या प्रसंगाबाबत अस सांगण्यात येतं की ह्या चित्रीकरणाच्या दरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची जवळीक वाढली होती आणि तिच्या सोबत अधिक काळ राहता यावं ह्याकरीता धर्मेंद्रने स्पॉट बॉईजना जाणून चुका करायला लावून २० रुपये प्रती रिटेक ह्या दराने एकाच दिवशी रु. २,००० खर्च करून वारंवार रिटेक घ्यायला भाग पाडलं होत.  पन्नास वर्षांपूर्वीचे रु. २,००० म्हणजे आजचे दोन लाख.  ह्या प्रसंगात ‘शोले’तील वीरू आणि वास्तवातील धर्मेंद्र एकच होते. पाण्याच्या टाकीवरून आत्महत्या करण्याची धमकी देणारा प्रसंगसुद्धा प्रेमापोटी समाजाविरुद्ध बंड  करण्याच्या धर्मेंद्रच्या मुळ वृत्तीशी मेळ साधणारा होता.

जयचं प्रत्येक वाक्य वीरूसाठी ब्रम्हवाक्य होतं.  ‘बुराईने बंदुक चलाना सिखाया, नेकी हल चलाना सिखा देगी’, ह्या वाक्यातून जयनं सांगितलेलं तत्वज्ञान वीरुला शंभर टक्के पटण्याचा वीरूने केलेला अभिनय, धर्मेंद्रच्या निर्मळ मनाची साक्ष देणारा होता.  ‘शोले’ सिनेमात अमिताभने साकारलेला मृत्यूचा प्रसंग अजरामर झाला आहे. परंतु तो प्रसंग हृदयाला स्पर्श करून जाण्यामागे वीरूची त्याप्रसंगीची उत्कट प्रतिक्रिया सुद्धा तितकीच महत्वाची आहे.  मित्राच्या आग्रहावरून त्याला डाकूंशी एकट्याने लढायला सोडून मनाविरुद्ध प्रेयसीला घेउन निघालेला वीरू जेव्हा काडतूस घेउन परत येतो आणि मरणासन्न अवस्थेत पडलेल्या जखमी जयला पाहून आक्रोश करतो, त्याने प्रेक्षकांचं मन हेलावून जातं.   मित्राप्रती त्याने केलेला आक्रोश प्रेक्षकांच्या हृदयाला थेट भिडण्याचं कारण केवळ वीरूच्या चरित्रातील मैत्रीच्या भावनेची प्रामाणिकता तेवढी नव्हती, तर मुळात प्रेक्षकांमध्ये धर्मेंद्रची एक दिलेर व्यक्ती म्हणून जी प्रतिमा होती, ती सुद्धा ह्या परिणामाला कारणीभूत होती.  म्हणून अभिनयाच्या निकषावर दिलीपकुमार, अमिताभ बच्चन ह्यांच्याशी तुलना होउ शकत नसली तरी  धर्मेंद्र त्याच्या चाहत्यांच्या गळ्यातला ताईत होता. ‘आनंद’ सिनेमामध्ये राजे खन्नाच्या मृत्यू प्रसंगी अमिताभने ज्याप्रमाणे प्रतिक्रियात्मक अभिनयातून  ‘आनंद’च्या जाण्याचं दु:ख अजरामर करून ठेवलं होतं, अगदी तसाच जयच्या मृत्युच्या वेळी वीरूचा आक्रोश प्रेक्षकांच्या मनात कायम कोरला गेला.

 

संतापाच्या भरात पुन्हा गब्बरच्या अड्ड्यावर एकट्याने हल्ला करून त्याची उर्वरित टोळी त्वेषाने नष्ट करण्याचा अतर्क्य प्रसंग केवळ धर्मेंद्रच्या ‘ही-मॅन’ प्रतिमेमुळे विश्वासार्ह ठरला होता.  मित्राने दिलेल्या वचनामुळे गब्बरला जिवंतपणी ठाकूर साहेबांच्या हवाली कराव लागल्यामुळे पश्चातापाच्या भरात हातातील जाडसर दांडू दोन्ही हातानी स्वत:च्याच मांडीवर मोडण्याची त्याची कृती धर्मेंद्रच्या वास्तविक जीवनातील प्रतिमेमुळेच सुसह्य वाटली होती.   मित्राचे सल्ले कुठलाही किंतू-परंतु मनात न आणता पाळणारा, प्रेमिकेसाठी कुठल्याही थराला जाणारा, रेल्वेतील दरोड्याच्या प्रसंगात अथवा गब्बरशी लढतीच्या वेळी जीव झोकून देणारा, ठाकूरसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीसोबत अत्यंत आदरपूर्वक वागत असतानाच ज्यावेळी ठाकूर चुकत आहे असं वाटलं तेव्हा त्याला ठणकावून जाब विचारणारा, शीघ्रसंतापी, रोमँटिक, खोडकर, मिश्कील आणि भोळा असा वीरू नावाचा हवाहवासा  मित्र धर्मेंद्रने ‘शोले’ मध्ये साकारला, तो माझ्या मते खराखुरा धर्मेंद्रच होता.  धर्मेंद्रची आठवण आली की ‘शोले’ पाहणे हा सोपा उपाय त्याच्या चाहत्यांकडे असणार आहे.

देखणेपणात देवतांना न्यूनगंड देणाऱ्या धर्मेंद्रला असूयेपोटी देव अधिक दिवस स्वर्गात ठेवणार नाहीतच, तेव्हा तो लवकरच परत येउन चाहत्यांवर प्रेमाची वर्षा करेल हा विश्वास तो गेल्याच दु:ख कमी करण्यास सहाय्यभूत ठरेल.

(लेखक ‘कुलामामाच्या देशांत’ ‘अ -अमिताभचा’, ‘महारुद्र’ ‘छाटितो गप्पा’ अशा अनेक गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आहेत.)

9423183248

[email protected]

Previous articleमुखवट्यामागचा संघ
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here