नोबेल पुरस्काराची १२५ वर्षे!

-डॉ. एन.जी. बेलसरे
— ——————————
मानवनिर्मित विश्वात सर्वोच्च बहुमान म्हणजे नोबेल पारितोषिक.जगातील अतिशय बलाढ्य राष्ट्राचे राष्ट्रपतीपद मिळाल्यानंतरही आपल्यास नोबेल पारितोषिक मिळाल्यास आपले  जीवन सार्थकी लागेल  व आपण अजरामर होऊ असा विश्वास अनेक राष्ट्रप्रमुखांना वाटतो यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती सुद्धा अपवाद नाहीत .सध्याचे विद्यमान राष्ट्रपती श्रीमान डोनाल्ड ट्रम्प साहेब यांनी या दृष्टीने केलेला प्रयत्न किंवा प्रयत्नांची   पराकाष्ठा आपल्या स्मृतीत ताजी  आहे. अशा या  अलौकिक किंवा एकमेवाद्वितीय  पुरस्काराची पार्श्वभूमी व थोडासा इतिहास  येथे नमूद  करण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे.
________________________
           १० डिसेंबर १९०१ पासून दरवर्षी (पहिले व दुसरे महायुद्ध झाले त्या कालखंडातील काही  वर्षांचा अपवाद  वगळता)आजच्या जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या  पारितोषिकाचे वितरण स्वीडन या देशाची राजधानी  स्टॉकहोम या शहरी १० डिसेंबर  रोजी केल्या जाते . विश्वातील समस्त मानव जातीच्या    कल्याणासाठी   अतुलनीय  कार्य करणाऱ्या व्यक्ती/ संस्था यांना  बहाल करण्यात येणारे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक प्रशस्तीपत्र  असा या पुरस्काराचा लौकिक आहे. हे पुरस्कार  रसायनशास्त्र , भौतिकशास्त्र ,फिजिओलॉजी किंवा मेडिसिन,  साहित्य , इकॉनॉमिक्स (अर्थशास्त्र)  जागतिक शांतता  या क्षेत्रात मानव कल्याणासाठी कारणीभूत ठरलेले  भरीव संशोधन किंवा योगदान यासाठी दिल्या  जातात.
     मानवाचे कल्याण होईल या दृष्टीने केलेल्या निःस्पृह योगदानासाठी  समर्पित  हा पुरस्कार एवढा प्रतिष्ठेचा म्हणून मान्यता पावला की अमेरिकेसारख्या बलाढ्य महाशक्तीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर देखील त्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाल्यास आपल्यास अढळपद  प्राप्त होईल किंवा आपण इतिहासात अजरामर  होऊ अशी आशा ,अपेक्षा किंवा महत्वाकांक्षा असते . योगायोगेच येथे नमूद करावेसे वाटते की Theodore Roosevelt , Jimmi Carter, Woodroe Wilson, बराक ओबामा या चार अमेरिकन राष्ट्रपतींना तर Al Gore  या  अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना नोबेल शांतता  पुरस्काराने गौरविण्यात आले. सद्यापर्यंत तरी डोनाल्ड ट्रम्प आशा  बाळगून आहेत. या विश्वातील  सन्मानाची किंवा पुरस्काराची निर्मिती व त्यामागची पार्श्वभूमी ही देखील अतिशय संवेदनशील व रंजक आहे ती आपण जाणून घेऊ.
पार्श्वभूमी:
        मानवाने वैज्ञानिक संशोधनाद्वारे केलेली प्रगती पृथ्वीवरील मानवी जीवन जितके सुलभ व सुविधायुक्त करण्यास कारणीभूत ठरले   तितकीच दुसरी बाजू अतिशय विदारक व दुःखमय आहे कारण फार मोठ्या प्रमाणात मानवी विध्वंस घडवून आणण्यात वैज्ञानिक संशोधन सहाय्यभूत ठरले. उदाहरणादाखल दुसऱ्या महायुद्धा दरम्यान ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा व ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकी या शहरांवर अमेरिकेने केलेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्याने घडवून आणलेला विध्वंस वैज्ञानिक संशोधनाची अतिशय काळी बाजू स्पष्ट करते. पहिल्या दोन ते चार महिन्यात हिरोशिमामध्ये ९० हजार ते एक लक्ष चाळीस हजार व नागासाकी मध्ये ३९ हजार ते ८० हजार लोक या बॉम्ब हल्ल्यात मृत्यूमुखी पडले .यात असंख्य निरागस स्त्रिया व बालकांचा देखील समावेश होता. यामधील जवळपास अर्धे लोक पहिल्याच दिवशी मृत्युमुखी पडले.
     वैज्ञानिक संशोधन मानव हिताच्या दृष्टीने अग्रेसर होत असतानाच बहुतांश देशातील राजकारणी मंडळी व शासनकर्ते  यांनी या संशोधनाचा वापर शक्तिशाली युद्ध सामुग्री निर्माण करण्यासाठी  वैज्ञानिक संशोधन व  प्रज्ञावंतांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे परिश्रम यांचा  दुरुपयोग केला हे आपण आजही पाहतोच.जवळपास  जगातील प्रत्येकच ‘ डिफेन्स रिसर्च इन्स्टिट्यूट’ (संस्था) कोणत्या ना कोणत्या नावाने युद्ध सहाय्यक शस्त्र निर्मिती करण्यासाठी कार्यरत आहे. अशा या परस्पर जीवघेण्या स्पर्धेच्या युगात मानवाचे कल्याण करणारे संशोधन व्हावे व अशा प्रकारे कार्य करणाऱ्या व सर्वश्रेष्ठ योगदान देणाऱ्या व्यक्तींचे प्रेरणादायी योगदान इतरांसाठी अनुकरणीय ठरावे या एका प्रामाणिक व विधायक हेतूने अल्फ्रेड नोबेल या स्वीडिश ( रसायनशास्त्रज्ञ, इंजिनियर, संशोधक, उद्योजक) व्यक्तीने या पुरस्काराची निर्मिती केली .
       आल्फ्रेड  नोबेल यांचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ रोजी  स्वीडन मधील  स्टॉकहोम या शहरात झाला तर मृत्यू १० डिसेंबर १८९६ रोजी इटलीमध्ये झाला. या काळात स्वीडन  उत्तरी युरोपमध्ये एक बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखल्या जायचे.नोबेल यांचे  बालपण स्वीडनमध्ये व नंतर काही काळ रशियामध्ये व्यतीत झाले .त्यांनी रसायनशास्त्राचे शिक्षण फ्रान्स व अमेरिकेमध्ये घेतले . त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते व एक शांतताप्रिय, विद्या – व्यासंगी, थोर मानवी   अंतःकरण  असलेला वैज्ञानिक म्हणून त्यांची ख्याती होती .नोबेल यांचे संशोधन इतके अफाट होते की त्यांचे नावावर ३५५ पेटंट्स (मूळ शोध)register झाले होते. त्यामध्ये १८६७ या वर्षी लावलेला dynamite चा  शोध अतिशय प्रसिद्ध  झाला .एक शांतता प्रिय व्यक्ती असलेल्या नोबेल यांच्या शस्त्रे बनविणाऱ्या ९० फॅक्टरीज (किंवा कारखाने)होत्या. ज्यामध्ये (भारतात अतिशय वादग्रस्त ठरलेल्या )बोफोर्स बंदुकी निर्माण करणाऱ्या स्वीडन मधील फॅक्टरीचा देखील समावेश होता. डायनामाइट व इतर शस्त्रांच्या विक्रीतून नोबेल यांना अफाट संपत्ती प्राप्त झाली .
           डायनामाईटचा उपयोग प्रथमतः मायनिंगसाठी (खाणींचे  उत्खनन करण्यासाठी) फार मोठ्या प्रमाणात झाला . पुढे  समुद्री( मोठे )जीव ते मोठे पर्वत उडविण्यासाठी  डायनामाइट उपयोगात आणले गेले. Dynamite अतिशय सुरक्षित विस्फोटक असले तरी कळत- नकळत त्यामुळे अपरिमित मानवी जीवहानी झाली. त्यामुळे आल्फ्रेड नोबेल यांची जगात फार बदनामी झाली . एक उदाहरण म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांचे बंधू लुडविग यांचा मृत्यू झाला तेव्हा फ्रान्समधील काही  वृत्तपत्रांनी चुकीने अल्फ्रेड नोबेल यांचाच मृत्यू झाला असे समजून  मृत्यू लेख  छापले व त्यामध्ये त्यांचा मृत्यूचा सौदागर असा उल्लेख करण्यात आला .या घटनेने त्यांना अतिशय दुःख झाले. त्यावर पश्चाताप म्हणून त्यांनी  Nobel Foundation ची स्थापना केली. सुरुवातीला पाच नोबेल पुरस्कारांची निर्मिती केली .यामध्ये रसायनशास्त्र ,साहित्य ,शांतता, भौतिकशास्त्र ,फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या विषयांमध्ये जागतिक स्तरावर मानवी कल्याणासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरू शकणाऱ्या संशोधनासाठी किंवा कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात यावा असे मृत्यु पत्र  त्यांनी २७ नोव्हेंबर १८९५ रोजी (त्यांचे मृत्यूच्या एक वर्ष अगोदर) तयार केले .यासाठी स्वतःचे संपत्तीचा ९४ % हिस्सा नोबेल फाउंडेशनला त्यांनी दिला त्यावेळी ती रक्कम ३१ दशलक्ष स्वीडिश  क्रोनर्स   (आजची किंमत जवळपास १७१२ स्वीडिश क्रोनर्स   एवढी होते . या रकमेच्या व्याजातून सहा प्रकारच्या  नोबेल पुरस्काराचे वितरण होते.( वरील पाच व १९६८ पासून दिल्या जाणारा इकॉनॉमिक्स  साठीचा सहावा). आज रोजी प्रत्येक पुरस्काराला ११ दशलक्ष स्वीडिश क्रॉनर्स किंवा १.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा १०. ४ कोटी भारतीय रुपये एवढी रक्कम दिली जाते .ही रक्कम कधी एकट्या व्यक्तीला किंवा जास्तीत जास्त तीन व्यक्तीला विभागून किंवा एकट्या सेवाभावी संस्थेला दिली जाते . आजपर्यंत ६३३ नोबेल पुरस्कारांचे वितरण झाले. यामध्ये ८४४ पुरुष व ४८ स्त्रियांचा समावेश आहे.
पुरस्काराचे  काही मानकरी:
————–
आपल्या भारतीयांमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर- १९१३(साहित्य ), सर सी .व्ही .रमण – १९३० (भौतिकशास्त्र)  मदर तेरेसा- १९७९ (शांतता), अमर्त्य सेन -१९९८(अर्थशास्त्र), कैलास सत्यार्थी- १९१९ (शांतता ). याव्यतिरिक्त भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ : हरगोविंद खुराना १९६८ (फिजिओलॉजी /मेडिसिन) ,चंद्रशेखर सुब्रमण्यम (सर सी. व्ही  रमण यांचे पुतणे ) १९८३ (भौतिकशास्त्र ). व्यंकट रमण रामकृष्ण- २००९ (रसायनशास्त्र ),अभिजीत बॅनर्जी  २०१९ (अर्थशास्त्र) या भारत मातेच्या सुपुत्रांनी हा उच्च कोटीचा सन्मान प्राप्त केला आहे.
        यामध्ये आणखी  उल्लेखनीय बाब म्हणजे हा सन्मान प्राप्त करणारे इतर देशातील  काही  पिता- पुत्र , माता- कन्या, काका – पुतणे, सासू – सासरे – जावई यांचा देखील समावेश आहे .उदाहरणार्थ मॅडम क्युरी व पेरी क्युरी (पती-पत्नी ). मॅडम क्युरी –  पेरी क्युरी – आयरीन क्युरी – फ्रेडरीक जुलीयट ( माता-पिता- कन्या- जावई). आश्चर्य म्हणजे मॅडम क्युरी यांच्या कुटुंबात  इतिहासातील सर्वात जास्त म्हणजे पाच नोबेल विजेते आहेत . मॅडम क्युरी  ( मातोश्री यांना १९०३- भौतिकशास्त्र  व १९११ (रसायनशास्त्र), असा दोनदा हा पुरस्कार प्राप्त झाला व बाकी लोकांना (वडील – मुलगी – जावई) एक – एकदा.
Carl Cori -Gerti Cori (पती – पत्नी)
Abhijeet Bannerjee -Esther Duflo (पती – पत्नी)
जे.जे. थॉमसन – G.P. थॉमसन (पिता पुत्र)
Niels Bohr – Aage Bohr)(पिता पुत्र)
Arthur Korenberg -Roger Korenberg ( पिता पुत्र).
      एवढा मोठा जागतिक सन्मान  नाकारणारे सुद्धा  अचाट मनोधैर्याचे काही  महाभाग  होऊन गेले .ज्यामध्ये Jean Paul Sarte ( Literature -१९६४ ),Le Duc Tho (to be shared with Henry Kissinger १९७३ शांतता) .  हा पुरस्कार Tho (Vietnam) यांनी नाकारला परंतु Kissinger यांनी स्वीकारला.हा इतिहासातील अतिशय  वादग्रस्त नोबेल शांतता पुरस्कार ठरला. दोन जर्मन शास्त्रज्ञ १९३८ व एक रशियन शास्त्रज्ञ १९३९  यांना सरकारच्या दबावाखाली हा बहुमान  नाकारावा लागला.
      १९०१  नंतर ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला त्या  व्यक्तींचे कार्य/ संशोधन /योगदान बहुमूल्य होतेच यात शंकाच नाही परंतु सर्वच सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झाला असे ही मानता येत नाही. यामध्ये नोबेल कमिटीचे सर्वात मोठे दुःख किंवा शल्य म्हणजे महात्मा गांधींना शांततेचा पुरस्कार देण्यात आला नाही .सन १९४८ ला दहा डिसेंबर रोजी तो पुरस्कार आपल्या राष्ट्रपित्याला मिळण्याची दाट शक्यता होती.परंतु दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची  हत्या झाल्याने तो मिळू शकला नाही कारण हा पुरस्कार मरणोपरांत देण्यात येत नाही(या  दुर्दैवी घटनेमुळे आपल्या देशाने एका महामानवासोबत एक नोबेल पुरस्कार देखील गमावला). गांधीजींनी हा शांतता पुरस्कार स्वीकारला असता तर हा पुरस्कार  आणखी गौरवान्वीत झाला असता .
१९०१ पूर्वी मृत्यू पावलेल्या असंख्य महामानवांना अतिशय उच्च कोटीचे कार्य करून देखील हा पुरस्कार प्राप्त झाला नाही . ज्यामध्ये  Newton, Kepler डार्विन, गॅलिलिओ, कोपर्निकस अशा कितीतरी दिग्गजांचा समावेश आहे.परंतु त्यांचे कार्य मात्र अजरामर झाले व आजचे विज्ञान युग घडविण्यात मैलाचा दगड ठरले.  १९०१ नंतर सुद्धा भौतिक शास्त्रामध्ये उच्च कोटीचे योगदान देणारे Ervin Hubble ,  थॉमस अल्वा एडिसन(ज्यांनी १३०० पेक्षा जास्त  मुलभुत शोध लावले), निकोला टेस्टला, Robert Oppenheimer,  स्टीफन हॉकिंग , आपल्या  भारतीयांमध्ये जे . सी . बोस, एस .एन . बोस,  होमी भाभा ,   मेघनाद सहा ,सर्वपल्ली राधाकृष्णन( साहित्य) यांचा  प्रामुख्याने समावेश करता येईल .
आजच्या युगात विधायक संशोधन प्रवृत्तींना अतिउच्च प्रोत्साहन किंवा प्रेरणा देतो असा  दरवर्षीचा दहा डिसेंबर हा दिवस मानव कल्याणकारी संशोधन किंवा विधायक वैश्विक समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना/ संस्थांना गौरव बहाल  करणारा अल्फ्रेड नोबेल यांचा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने आजच्या दिवसी  या महान शास्त्रज्ञाला व महामानवाला  विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा.
(लेखक अमरावतीच्या ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेजचे माजी प्राचार्य आहेत)
9422949550
Previous articleतो वीरू नव्हे, साक्षात धर्मेंद्रच होता!
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here