– चंद्रकांत झटाले
हिंदू धर्मातून धर्मांतरित होऊन इतर धर्मात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणारे व हिंदुत्ववादी सरकार सत्तेमध्ये असतानासुद्धा गुजरात मधील 2 ते अडीच लाख लोक जे हिंदू धर्मात त्रस्त झाले आहेत त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 101 व्या सकल्पपूर्ती वर्षानिमित्त येणाऱ्या 23 सप्टेंबर 2018 रोजी वडोदरा येथे बौद्ध धर्मात प्रवेश घेण्याची घोषणा केली आहे या घटनेमुळे भारतात धर्मांतराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. हिंदू धर्माचे नुकसान पूर्वीपासूनच होत आले आहे आणि वर्तमानातही होत आहे. परंतु त्या नुकसानाची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्यापेक्षा कुणी त्यावर भाष्य केल्यास त्यावरच तुमच्यामुळे धर्माचे नुकसान होते, धर्म बदनाम होतो अशी ओरड केल्या जाते. या विरोध व आरोपांना उगाच अंगावर घेतल्यापेक्षा जसे सुरू आहे तसे सुरू राहू देण्यातच समाज सुधारक धन्यता मानतात. आसाराम-रामराहिम अशा ढोंगी संतांनी केलेल्या नीच कृत्यांमुळे हा धर्म बदनाम होत नाही तर त्यांनी नीच कृत्य केले असे म्हणणाऱ्यांमुळे धर्माची बदनामी होते अशी हिंदू धर्माची आदर्श आचारसंहिता आहे. धर्माचं नुकसान होतंय पण ते कुणामुळे? कशामुळे? हे प्रश्न शेवटी अनुत्तरीतच राहतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. ती शोधतांना भगवान गौतम बुद्धांनी का बौद्ध धर्म स्थापन केला ? आणि सम्राट अशोकाने का शेवटी बुद्ध धर्माचा स्वीकार केला इतक्या खोलात न शिरता आपण अलीकडच्या काळातील काही उदाहरणे बघूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी हिंदू धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या मधील 21 वर्ष त्यांनी जगभरातल्या जवळपास सर्वच धर्मांचा सखोल अभ्यास केला. अनेक धर्मांकडून त्यांना विविध पदांची व आर्थिक आमिषे सुद्धा दाखविण्यात आली परंतु त्यांनी अशी सर्व प्रलोभने झुगारून शेवटी 5 लाख अनुयायांसोबत बुद्ध धर्माचा स्वीकार केला. 5 लाख हिंदू एकाच क्षणात बुद्ध झाले. हिंदू धर्माचे किती प्रचंड नुकसान? का? तर हिंदू धर्मात माणसांना माणसांकडून माणसांसारखी वागणूक मिळत नाही म्हणून.. एकाच धर्मात असलेल्या एकच देव असलेल्या विशिष्ट वर्गाला आपल्याच देवाच्या मंदिरात प्रवेश नाही म्हणून.. एकाच धर्मात असलेल्या एका व्यक्तीच्या स्पर्शाने, सावलीने सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला विटाळ होतो म्हणून.. जगाच्या पाठीवर असा कुठला धर्म आहे ज्या धर्मात त्या धर्मातील कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या जातीवरून धार्मिक स्थळांवर प्रवेश नाकारला जातो? असा कुठला धर्म आहे ज्यात आपल्याच धर्माचे धर्मग्रंथ वाचण्यास मनाई आहे? असा कुठला धर्म आहे की जिथे माणसाच्या स्पर्शाने दुसरा मनुष्य बाटतो व जनावरांच्या मूत्राने शुद्ध होतो?धार्मिक स्थळात गेल्यावर देव बाटतो? अरे देव श्रेष्ठ, ताकदीवर, सामर्थ्यवान की मनुष्य? मग माणसाच्या स्पर्शाने देव बाटायला पाहिजे की देवाच्या स्पर्शाने माणूस पवित्र व्हायला पाहिजे? आणि जो एक सध्या माणसाच्या स्पर्शाने बाटतो त्याला देव मानायचंच कशाला? मग हिंदू धर्माचे नुकसान हे जुन्या अमानुष रूढी-परंपरांमुळे, अंधश्रद्धांमुळे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्यांमुळे की परधर्मीयांमुळे?
मोहम्मद अली जिना हे नावच ऐकलं की हिंदू धर्मातील प्रत्येक माणसाचं रक्त खवळत. कपाळावर आठ्या पडतात. भारतापासून भारताताच भूभाग वेगळा करून स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र पाकिस्तान निर्माण करणाऱ्या जिनाला गोडसेनी गांधींऐवजी का मारलं नाही? असंच प्रत्येक भारतीयाला आजही वाटतं इतका प्रचंड द्वेष मुस्लिम नेते जिनांबद्दल आज प्रत्येक हिंदूंच्या मनात आहे. पण हेच मोहम्मद अली जिना हे हिंदू होते हे किती हिंदूंना माहिती आहे? ऐकून आश्चर्य वाटेल पण जिनांच्या आजोबांचं नाव प्रेमजीभाई ठक्कर, त्यांच्या वडिलांचे नाव पुंजलाल ठक्कर. लोहाना समाज असणाऱ्या प्रेमजीभाईंचं कुटुंब गुजरात मधील वेरावळ येथे राहात होते. प्रेमजीभाईंचा व्यवसाय मच्छीमारीचा. लोहाना समाज म्हणजे पक्का कर्मठ, धार्मिक रितिरिवाजांना पाळणारा, पक्का शाकाहारी समाज. प्रेमजीभाईंचा मच्छीमारीचा व्यवसाय लोहाना समाजातील कर्मठ लोकांना मान्य नव्हता. साहजिकच त्यांच्यात वाद होऊ लागले. परंपरप्रिय लोहाना समाजाने त्यांना जातीबहिष्कृत केले. त्यानंतर प्रेमजीभाईंनी व्यवसायाचा वाढवला व भरपूर पैसा कमावला. आता हा जातीबहिष्कृततेचा डाग पुसून काढावा या उद्देशाने त्यांनी समाजातील प्रतिष्ठीतांना पुन्हा जातीत घेण्याची विनंती केली, परंतु जुन्या रूढी-परंपरा पाळणाऱ्या समाजाने ती विनवणी धुडकावून लावली. प्रेमजीभाईंचा मुलगा पुंजलाल ठक्कर (जिनांचे वडील) यांना स्वतःच्या वडिलांना समाजाकडून मिळालेली वागणूक सहन झाली नाही आणि त्यांनी समाजाला धडा शिकविण्याच्या उद्देशाने कर्मठांच्या नाकावर टिच्चून मुस्लिम धर्म स्वीकारला व आपल्या चारही मुलांची नावे मुस्लिम नावांप्रमाणे ठेवली. आता यात दोष कुणाचा? कुणामुळे व कशामुळे जिनांच्या वडिलांना हिंदू धर्म सोडावा लागला? का स्वतःच्याच धर्मात इतकी भयंकर वागणूक मिळते की मनुष्य दुसरा धर्म स्वीकारायला सहज तयार होतो? मग मोहम्मद अली जिनांमुळे फाळणी झाली, फाळणीमुळे मोठी भीषण दंगल झाली, दंगलीत लाखो मुस्लिम हिंदू मारल्या गेले, स्त्रियांवर पाशवी बलात्कार झाले यात काही टक्के का असेना पण हिंदू धर्मातील कर्मठांचा हात निश्चितच आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
शिवरायांच्या इतिहासातला एक खूप महत्वाचा प्रसंग म्हणजे औरंगजेबाच्या अनेक दिवसांच्या अनन्वित छळानंतर नेताजी पालकरांनी धर्मांतरास तयारी दर्शविली त्यानुसार १७ मार्च १६६७ रोजी त्यांची सुंता करून त्यांना मुस्लिम धर्माची दीक्षा देण्यात आली . जबरीने धर्मांतरण करून नेताजी पालकर चे मुहम्मद कुलीखान असे नामकरण करण्यात आले व महाबतखानासोबत काबुलकडे रवाना करण्यात आले . १६७६ मध्ये जेव्हा नेताजी पालकर पुन्हा स्वराज्यात परत आले तेव्हा महाराजांनी धर्ममार्तंडांच्या , धर्मपंडितांच्या विरोधाला अज्जीबात न जुमानता नेताजींना पुन्हा हिंदुधर्मात सामावून घेतले . मोहम्मद कुलीखान पुन्हा नेताजी पालकर झाले .याचप्रमाणे बजाजी नाईक निंबाळकर यांच्या जबरी धर्मांतरानंतर सुद्धा महाराजांनी धर्मगुरूंचा विरोध दुर्लक्षित करून त्यांना हिंदू धर्मात नुसतं परतच घेतलं नाही तर त्यांचा मुलगा महादेव याला स्वतःची मुलगी सुद्धा दिली . कारण पुन्हा हिंदू धर्मात येणं म्हणजे एखाद्या जातीत येणं. उद्याचालून यांच्या वंशाला पुढे त्रास नको हाच उद्देश. या दोन्ही घटनांच्या वेळी महाराजांनी धर्मपंडितांना जबरीने ज्या हिंदूंचे धर्मांतरण केल्या गेले आहे त्यांना मुस्लिम धर्मातून पुन्हा त्यांच्या मूळ हिंदू धर्मात घेण्यासाठी काही तरतूद आहे का अशी विचारणा केली असता , अशी कुठलीही तरतूद , सोय वा पूजा विधी आपल्या धर्मात अजिबात नसल्याचे धर्मगुरूंनी सांगितले . त्यावर शिवराय बोलले कि “जर आपल्या धर्मात अशी तरतूद नसेल , असे प्रयोजन नसेल तर ते तयार करा , नवीन लिहा , नवीन नियम तयार करा पण आपलीच माणसे परत आपल्या धर्मात घ्या . ” आणि त्या धर्मगुरूंना पालकर व निंबाळकरांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यावं लागलं .
आजच्या काळातही धर्माचा जबर असा पगडा पाहता १६ व्या शतकातील महाराजांचा हा निर्णय म्हणजे विलक्षण क्रांतिकारी आणि दूरदर्शीपणाचा वाटतो . ते वाटण्याचे कारणही तसेच आहे . संपूर्ण भारतदेश इंग्रजी राजसत्तेच्या अधिपत्याखाली असतांना जम्मू काश्मीर चे तत्कालीन महाराजा रणबीरसिंग (१८५७-१८८५) यांच्याकडे मुघलांच्या काळांत जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आलेले राजौरी , पुंछ आणि श्रीनगर भागातील पंडित आले . त्यांनी महाराजा रणबीरसिंहांकडे दयायाचना केली कि “आमच्या पूर्वजास व आम्हास जबरीने धरून पकडून मुस्लिम करण्यात आले आहे, आम्हास परत स्वधर्मात यावयाचे आहे , आम्हास आमच्या मूळ हिन्दु धर्मात परत घ्या. त्यावेळी महाराजा रनबिरसिहांनी तत्कालीन धर्मगुरू , पंडितांना बोलावून जबरीने मुस्लिम झालेल्या हिंदूंना मूळ धर्मात परत घेण्यासाठी धर्मात काही तरतूद आहे का ? विचारले असता , अशी कुठलीही तरतूद अथवा विधी हिंदू धर्मात नसल्याचे त्यांनी सांगितले . राजा रणबीरसिंहसुद्धा धर्मगुरूंच्या निर्णयाविरुद्ध गेले नाहीत . त्या जबरीने धर्मांतरण करण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांना त्यांच्याच बंधूंच्या सल्ल्याने परत हिंदू करून घेतलं नाही त्याचंच फळ भारत देश आज गेली अनेक वर्षांपासून काश्मीर मुद्द्याच्या रूपाने भोगतो आहे . ज्यांनी त्या काश्मिरी पंडितांच धर्मांतरं होऊ शकत नाही असा निर्णय रणबिरसिहांना दिला होता त्यांचेच २ लाख वंशज आज दिल्ली आणि परिसरात निर्वासितांच जगणं जगत आहेत. मा. गो. वैद्य यांनी त्यांच्या ‘काश्मीर – इतिहास, वर्तमान व भविष्य’ या पुस्तकात देखील या घटनेचा उल्लेख हिंदूंचा मूर्खपणा असा केलेला आहे. आज काश्मिरात मुस्लिमांची संख्या किती आहे? तेव्हढं हिंदू धर्माचं नुकसान झालंय. कुणामुळे? तर कट्टर हिंदूंमुळे. धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म ? या प्रश्नाचं उत्तर शोधू न देण्यातच या धर्ममार्तंडांच्या वर्चस्वाचं यश लपलंय.
18 मे2017 रोजी उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथिल ग्रामीण भागातील कपूरपूर, रूपडी आणि इधरी या तीन गावातील 180 कुटुंबांनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून 18 मे 2017 रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्म स्वीकारला. योगी सरकार आल्यानंतर दोनच महिन्यात हि घटना घडली. या अगोदर उत्तरप्रदेशातीलच मुरदाबाद येथील काही हिंदूंनी बुद्ध धर्म स्वीकारला आहे. केव्हा आणि कसं थांबणार हे सर्व? आपल्याच धर्मातील बांधवांवर अत्याचार करणारे आपण तर मोघल-इंग्रजांपेक्षाही अत्याचारी निघालो . त्यांनी कधी स्वधर्मीयांवर असे अत्याचार केले नाहीत.
२९ एप्रिल २०१८ रोजी म्हणजेच बौद्ध पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर गुजरातमधील उना येथील समढियाळ गावातील ३०० दलितांनी हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्म स्वीकारला होता. संपूर्ण देशात या घटनेचे पडसाद उमटले. होते. कारण होतं अशोक सरवैय्या आणि त्याच्या परिवारातील ३ सदस्यांना जुलै २०१६ साली मेलेल्या गायीची चामडी काढण्याच्या मुद्द्यावरून तेथील सवर्णांनी केलेली जीवघेणी मारहाण. वंशपरंपरागत मेलेल्या ढोरांची चामडी काढण्याचा व्यवसाय करणाऱ्या अशोक सरवैय्या त्याचे तीन चुलतभाऊ व मोठे बाबा यांना गाईचं मास विकण्याचा आरोप लावून तथाकथित गोरक्षकांकडून उना पोलीस स्टेशन समोर कपडे काढून ढोरासारखं मारण्यात आलं. सामान्य नागरिक सोडा पण पोलिसही त्यांच्या मदतीला आले नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि शासनाने अनेक आश्वासने दिलीत पण एकही पूर्ण झाले नाही. यात दोष कुणाचा? घटनेची शहानिशा न करता निर्णय घेऊन शिक्षा करण्याचे या गोरक्षकांना अधिकार कुणी दिले? गाईंबद्दल इतकेच प्रेम आहे तर प्रत्येक गोरक्षक 10-10 भाकड गाई(ज्या दूध देत नाहीत) ची जबाबदारी का घेत नाहीत? शेतकऱ्यांची स्वतःचीच खाण्याची भ्रांत असतांना त्याने अशा भाकड गायींच्या चाऱ्या-पाण्याची कुठून सोय लावायची? आणि गोभक्तांचच सरकार सत्तेत असल्यावर सुद्धा जिथे रोज लाखो गायी-बैल कापल्या जातात ते कत्तलखाने का बंद होत नाहीत? यांची उत्तरे शोधणे मात्र आपण सोयीस्करपणे टाळतो.
संपूर्ण गुजरात मधील 2 ते अडीच लाख हिंदू-दलित जे त्यांच्यावरील हिंदू धर्मियांच्या अत्याचारांनामुळे त्रस्त झाले आहेत ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 101 व्या सकल्पपूर्ती वर्षानिमित्त येणाऱ्या 23 सप्टेंबर 2018 रोजी वडोदरा येथे बौद्ध धर्मात प्रवेश घेणार आहेत. या हिंदू धर्म त्यागणाऱ्या तीलच रवींद्र धाडे म्हणतात की, ” हिंदू असूनही दलितांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. कुठे दाढी-मुछ वाढवली म्हणून मारलं जातं, कुठे घोड्यावर बसलो म्हणून, कुठे विहिरीत अंघोळ केली म्हणून , कुठे गावात नवरदेवाची घोड्यावरून वरात काढली म्हणून जबरी मारहाण , घरे जाळली जातात, अत्याचार केल्या जातात आणि हे अत्याचार करणारे ख्रिश्चन, शीख किंवा मुस्लिम नाहीत तर आम्ही ज्या धर्मात आहोत त्याच हिंदू धर्मातील लोक हे अत्याचार करत आहेत..” म्हणजे स्वधर्मियांकडूनच अन्याय-अत्याचार होत असतांना हे अत्याचार करणारे मात्र आपल्या धर्माला परधर्मियांकडून धोका आहे असा सर्रास ढोल पिटतांना दिसतात.
सर्वात सहिष्णू आणि श्रेष्ठ म्हणवल्या जाणारा हिंदू धर्म सोडून जेव्हा हिंदूंनाच इतर धर्मात जावं लागतं तेव्हा प्रश्न पडतो की हिंदू धर्म इतकाच जर जगात श्रेष्ठ धर्म आहे तर इतर धर्मातून हिंदू धर्मात लोक का येत नाहीत? जाणाऱ्यांची संख्या इतकी मोठी का? असा विचार कुणालाच येत नसेल का? आणि जर येत असेल तर यावर काही उपाय योजना धर्मातील धर्मगुरू का करत नाहीत? का असे वागत नाहीत आणि हिंदूंनाही वागायला भाग पडत नाहीत जेणेकरून इतर धर्मातील लोकांना वाटावं की हिंदू धर्मात प्रवेश करावा? हिंदुत्वाबद्दल चीड निर्माण होईल असच वातावरण आज देशभर पाहायला मिळतंय. आपण आपल्याच धर्म-बांधवांवर अत्याचार करून आपल्याच धर्माच्या अनुयायांची संख्या घटवतो आहोत याचंही भान राहू नये हे दुर्दैवी आहे. फक्त दलितच नाही तर इतरही अनेक जातींचे लोक हिंदू धर्माला कंटाळून इतर धर्मात जाण्याचा विचार करायला लागलेत. हिंदू राष्ट्राचे स्वप्न बघणाऱ्यांकडूनच या वातावरणाला खतपाणी घालण्याचे कार्य सतत सुरू असल्यामुळे यांना हिंदूमय राष्ट्र पाहिजे की हिंदुमुक्त राष्ट्र अशी शंका मनात डोकावत राहते. वेळीच ही परिस्थिती सावरली नाही आणि धर्मांतराची हीच गती राहिली तर येणाऱ्या 50 वर्षातच देशात हिंदू अल्पसंख्यांक होतील यात तिळमात्र शंका नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांचे लाखो अनुयायी, मो.अली जिना, लाखो काश्मिरी पंडित, लाखो हिंदू-दलित इतकं मोठं धर्माचं नुकसान जे आजही निरंतर सुरूच आहे यावर इतर धर्मातील लोक उपाय करू शकत नाहीत. जे करायचंय ते हिंदूंनाच करायचंय. पण जोपर्यंत या देशातील हिंदू “धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म” ? या प्रश्नाचं उत्तर शोधत नाही तोपर्यंत तरी परिस्थिती बदलणं शक्य नाही.
(लेखक सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक आहेत)
– चंद्रकांत झटाले
९८२२९९२६६६
absolutely correct and factual article