मेघदूताच्या आषाढधारा

(लेखक : ज्ञानेश महाराव, संपादक, साप्ताहिक चित्रलेखा )

आकाश पाऊस होऊन धरणीला भिडलंय.* मृदगंधाच्या दरवळात पेरणी झालीय. अंकुरलेली धरणी आकाशाकडे झेपावतेय. भगवंताची लीला ठरावी, अशी ही निसर्गाची करणी आहे. ही भावनाच शिवार पिकवणार्‍यांना विठ्ठल दर्शनाची ओढ लावते; पंढरीच्या वाटेवर आणते. ह्या विठ्ठल यात्रेतही ‘उभं राहाणार्‍या शिवाराचं रक्षण भगवंतच करील’ हा भक्तिभाव ओसंडून वाहत असतो. एव्हाना ज्ञानोबा-तुकोबाच्या पालख्या लाखो वारकर्‍यांच्या हरिनामाच्या गजरात पंढरीचा मार्ग चालू लागल्यात.
महाराष्ट्र नव्याने हिरवागार होत असतानाच पंढरीच्या वाटेवर भक्तीचा मळा फुलतोय. ही आषाढाची ओळख आहे. आषाढ हा भक्तीचा मास. हिंदूजीवन पद्धतीतल्या अनेक व्रतांचा प्रारंभ आषाढात होतो. गुरुभजनाची पौर्णिमा आणि दीपपूजनाची अमावस्या ह्याच महिन्यात येते. गुरू आणि दीप, अंधार्‍या आयुष्याला प्रकाशमार्गावर आणतात. म्हणूनच भारतीय समाज जीवनात त्यांना महत्त्वाचं स्थान आहे. वर्षातल्या २४ एकादशीत श्रेष्ठ मानली जाणारी ‘शयनी एकादशी’ही आषाढातच येते. ह्या आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी झोपी जातात आणि चातुर्मासास प्रारंभ होतो. आषाढात अथवा त्यापूर्वी थोडेच दिवस सूर्याचे कर्कसंक्रमण होऊन दक्षिणायन (२१जून)सुरू होते. धुवांधार पावसामुळे ‘देवाचा धावा’ करावा लागावा अशी महापूर, साथीचे रोग यासारखी संकटंही आषाढात कोसळतात.
अशा आषाढाचा प्रारंभ मात्र कविकुलगुरू कालिदासाच्या स्मरणाने होतो. त्याच्या कल्पनाविलासाची अमर साहित्यकृती असणार्‍या ‘मेघदूत’ ह्या खंडकाव्याची आठवण होते. त्यातील *आषाढस्य प्रथमदिवसे…* ह्या ओळी मनाला खेळवू लागतात. तथापि, हा काही मेघदूतचा प्रारंभ नाही. ते १२५ श्‍लोकांच्या संस्कृत खंडकाव्याचं, दुसर्‍या श्‍लोकाचं तिसरं चरण आहे. परंतु मेघदूत म्हटलं की तेच प्रथम आठवतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मेघदूतात विरह आणि शृंगार यांचा अप्रतिम संगम आहे. तसाच तो प्रवासवर्णनाचाही ललितरम्य नमुना आहे. संस्कृतातील ह्या ऐतिहासिक साहित्यकृतीचे अलौकिकत्व आपल्याही भाषेत उजळावे, ह्या हेतूने अनेकांनी त्याचे भाषांतर केले आहे. बहुतांश भारतीय भाषात मेघदूत अवतरलंय. उर्दूतही मेघदूत आहे. एच. एच. विल्सनने इंग्रजीत (१८१३), मॅक्स म्यूलरने जर्मनीत (१८४७) आणि ए. ग्वेरिनॉटने फ्रेंच भाषेत (१९०२) मेघदूताचा पद्यानुवाद केलाय. मराठीत हे काम कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी (१८६५) प्रथम केलं. त्यांच्यानंतर बा. ल. अंतरकर, हवालदार, कात्रे, रा. चिं. श्रीखंडे, रा. प. सबनीस, ना. ग. गोरे, कुसुमाग्रज, वसंत पटवर्धन, बा. भ. बोरकर, सी. डी. देशमुख, शान्ता शेळके, कोल्हापूरच्या मंदाकिनी कदम आदींनी मेघदूताला मराठीत आणलंय.
यातील कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर आणि शान्ता शेळके हे तिघेच कालिदास कुळातले म्हणजे कवी आहेत.  बाकीचे रचनाकार संस्कृत साहित्याचे अभ्यासक, आस्वादक आहेत. सी. डी. देशमुख आणि वसंत पटवर्धन अर्थतज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते, तर नानासाहेब गोरे यांचा समाजवादी नेते म्हणून राजकारणातही दरारा होता. मात्र या सर्वांनाच मेघदूताने आपल्या प्रेमपाशात अडकवलं होतं. हे प्रेमही विविधरंगी होतं. ते जसं ज्याला भावलं, तसं त्याने मराठीत आणलंय.
*मेघदूत ही* एका शापित यक्षाची विरह कथा आहे. अलकानगरीतील यक्षाच्या हातून काही चूक झाल्याने त्याला वर्षभराच्या शिक्षेसाठी रामनगरीला धाडलं जातं. तिथे तो एकटाच राहत असतो. प्रियाविरहाच्या दु.खाने तो खंगतो. आपल्यासारखी अवस्था आपल्या प्रिय पत्नीचीही झाली असेल, ह्या विचाराने तो अधिक अस्वस्थ होतो.
शिक्षेचे आठ महिने सरलेले असतात. आषाढ सुरू झालेला असतो. नभ मेघांनी आक्रमिले असे वातावरण असते. त्यातल्या एका मेघाला म्हणजे ढगाला तो रोखतो आणि मनातली अस्वस्थता आपल्या प्रिय पत्नीकडे पोहोचवण्याची विनंती त्याला करतो. तिचा ठावठिकाणा सांगताना दरम्यानच्या प्रवासातील खाणाखुणांचे बहारदार वर्णन करतो. हा प्रसंग आषाढातल्या पहिल्या दिवशी घडतो. त्याचे वर्णन कालिदासाच्या शब्दात असे आहे-
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीय ददर्श॥*

ह्या दोन चरणांचं भाषांतर मराठीत किती प्रकारे झाले ते पाहा.
आषाढाच्या पहिल्या दिवशी, ढग वेंघुनिया घेतो
गिरीशिखरा जणु गज मौजेने, धडक्या बांधा देतो – ना. ग. गोरे

आषाढाच्या पहिल्या दिनी, तया दिसे मेघ गिरिशिखरा
*आलिंगुनिया रम्य, जणो गज तटा, धडकता झुकला* – रा. प. सबनीस

*आषाढाच्या प्रथम दिवशी, टेकला अद्रिरेखे*
*दंताघाती समद गजसा, देखणा मेघ देखे* – बा. भ. बोरकर

*आषाढाच्या पहिल्या दिवशी, बघे रम्यशा ढगा*
*तट झुंजीच्या वेळी रमल्या, गजसा भिडला नगा* – वसंत पटवर्धन

*आषाढाच्या प्रथम दिनी, त्या दिसे पर्वतापरी*
*नयनरम्य घन, करी कड्यावर गज वा क्रीडांगण!* – कुसुमाग्रज

*आषाढाच्या पहिल्या दिवशी, बघतो शिखरी मेघ वाकडा*
*टक्कर देण्या तटभिंतीवर, क्रीडातुर गज जणू ठाकला*  – शान्ता शेळके
कालिदासाच्या ह्या दोनच ओळी शब्दप्रभूंनी वेगवेगळ्या रीतीने गुंफल्या आहेत. परंतु ‘आषाढाच्या पहिल्या दिवसा’पासून कुणाचीही सुटका झालेली नाही. म्हणूनच आषाढातला पहिला दिवस भारतभर ‘कालिदास स्मृतिदिन’ म्हणून साजरा होते.
*प्रत्येक भाषेला संस्कृतीच्या मर्यादा* असतात. संस्कृत ही अनेक भारतीय भाषांची जननी आहे. तथापि, ती देववाणी असल्याने विश्वव्यापीही आहे, असा काहींचा दावा असतो. तो खोटा असल्याचे मेघदूताचा इंग्रजी अनुवाद सांगतो. सी. डी. देशमुखांनी मेघदूताला मराठी बरोबरच इंग्रजीतही आणलंय. त्यांचे मेघदूत ऊर्फ CLOUD MESSENGER हे चित्रमय पुस्तक मराठी संस्कृत-इंग्रजी असं ‘थ्री-इन-वन’ आहे. तो समश्‍लोक, समवृत्त व सयमक असा अनुवाद आहे. सी. डी. देशमुखांनी तो मराठी आणि इंग्रजीत सारख्याच ताकदीने सादर केलाय. मेघदूतातल्या दुसर्‍याच श्‍लोकाचा मराठी अनुवाद पाहा-
*

प्रेमी कान्ता-विरहि अचली घालवी मास काही*
*गेले खाली सरुनि वलय स्वर्ण हस्ती न राही*
*आषाढाच्या प्रथम दिनी तो मेघ शैलाग्रि पाहे*
*दन्ताघाते तटि गज कुणी भव्यसा खेळताहे*

ह्याचंच इंग्रजीत काय झालं पाहा.

Some months were gone; the lonely lover’s pain
Had loosed his golden bracelet day by day
Ere he beheld the harbinger or rain,
A Cloud that charged the peak in mimic Fray,
As an elephant attack a bank of earth in play.
ह्याचा ओळीनुसार अर्थ.

काही महिने (असेच) गेले, तसे त्या एकांतवासी प्रेमिकाला पत्नी विरहाच्या वेदना सतावू लागल्या.
– (त्याच्या हातातील) सुवर्णकंकण दिवसेंदिवस ढिले होऊ लागले (एवढा तो कृश झाला.)
– इतक्यात त्याला पावसाळी मेघ दिसला.
– तो मेघ जणू पर्वत शिखरी त्याच्यावर खोटा खोटा हल्ला करून धडका देत होता.
– जणू एखादा हत्ती खेळताना कडा-कपारींना आपल्या माथ्याने धडका देतो तसा (तो मेघ ) विरही प्रेमिकाला भासत होता.
सी.डी. देशमुख यांनी मेघदूताची अर्थपूर्णता मराठीप्रमाणे इंग्रजीतही आणलीय. परंतु, संस्कृत-मराठीतले चार ओळीचे श्‍लोक इंग्रजीत येताना पाच ओळीचे झाले आहेत.  त्यात आषाढ आणि त्याच्या पहिल्या दिवसाचे नामोनिशाण उरलेले नाही. अर्थात, संस्कृतातून मराठीत येतानाही मेघदूताच्या मांडणीत सर्वच अनुवादकांनी थोडेफार फेरबदल केले आहेत. १२५ श्‍लोकांच्या मेघदूतचे पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे दोन भाग आहेत. परंतु मराठी अनुवादात ह्या भागाच्या श्‍लोकसंख्येत सारखेपणा नाही. कुसुमाग्रज यांचा अनुवाद ६३ आणि ५४ अशा विभागणीने ११७ श्‍लोकांचा झालाय. सी.डी. देशमुखांचा ६४/५४ आणि शांताबाईंचा ६५/५३ अशा विभागणीने ११८ श्‍लोकांचा झाला आहे. वसंत पटवर्धनांनी श्‍लोकांना सलग ११६ क्रमांक देऊन श्‍लोकसंख्या ६४ पासून उत्तरमेघ सुरू केलाय; तर बा. भ. बोरकरांनी अशाच प्रकारे १२० श्‍लोकांच्या अनुवादात श्‍लोक क्रमांक ६७पासून उत्तरमेघाला प्रारंभ केलाय. बा.भ.बोरकरांच्या अनुवादाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर सर्व अनुवादकांनी मराठीसोबत संस्कृत श्‍लोकही दिलेत. बा.भ. बोरकरांनी मात्र फक्त मराठी अनुवादच दिलाय. त्या अनुवादात साळके(छोटी कमळं) यादस्त(आठवण) यासारखे कोकणी शब्दही आलेत. चित्र मात्र सर्वच अनुवादाबरोबर आहेत. ही खुद्द कालिदासाच्याच चित्रमय लेखनशैलीची साक्ष आहे.
*मेघ हा अचेतन, अबोल* आहे. तो यक्षाचा निरोप त्याच्या प्रियेपर्यंत पोहोचविणार कसा? तो मधेच कुठे कोसळून पाऊस होणार नाही का? पण विरहाने व्याकुळलेल्या यक्षाला इतका विवेक कुठून असणार! हे गृहित धरूनच कालिदासाने मेघदूतात प्राण फुंकलेत. शापित यक्ष रामगिरीवरील नुकतीच उमललेली फुलं मेघदूतास अर्पण करतो, त्याची स्तुती करतो आणि त्याला अलकानगरीचा मार्ग सांगण्यास सुरुवात करतो. या मार्गदर्शनात मालक्षेत्र, आम्रकूटपर्वत, विंध्यपर्वताच्या पायाशी खडकांनी दुभंगलेली नर्मदा नदी याचं बहारदार वर्णन आहे.
यातील कालिदासाच्या शब्दमोहिनीनेच अनेक सिद्धहस्त लेखकांना मेघदूताचा अनुवाद करण्यास भाग पाडले आहे. त्यातल्या प्रत्येकाने मेघदूताच्या अनुवादात दर्जेदारपणा राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. तथापि, बा.भ. बोरकर यांनी केलेला मेघदूताचा अनुवाद साहित्यिकदृष्ट्या अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरलाय. मेघदूताचे संस्कृतातील श्‍लोक ‘मंदाक्रांता’ वृत्तात आहेत. अनुवाद करताना मूळचा छंदवृत्त करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यावरून अनुवाद तोलला जातो. बोरकर, कात्रे, देशमुख वगळता मेघदूताच्या अन्य अनुवादकांनी हा आग्रह मोडला आहे. परंतु त्याने अनुवादाचा दर्जा ढळलेला नाही. शान्ताबाईंनी मेघदूताचा अनुवाद ‘पादाकुलका’सारख्या प्रवाही छंदात करूनही त्यातला रसरशीतपणा वाहून गेलेला नाही. तथापि, साहित्यकृतीच्या मुळाच्या छंदानुसार अनुवाद करणे जिकिरीचे काम असते. बोरकरांनी ते प्रयत्नपूर्वक केले आहे.
*कालिदासांची शब्दमोहिनी* ही काही गेल्या दोन-चार शतकातली नाही. तिचा अंमल दोन सहस्रके आहे.कालिदासाची साहित्यसृष्टी जेवढी तेजोमयी; तेवढाच त्यांचा जन्म गूढ आणि आयुष्य नाट्यपूर्ण आहे. त्याच्या दंतकथा व्हाव्यात एवढं ते रहस्यमय आहे. कालिदासांचा जन्म केव्हा झाला, हा वादाचा विषय आहे. काही इतिहास संशोधकांच्या मते, कालिदासाचा जन्म इसवी सनपूर्व पहिल्या अथवा दुसर्‍या शतकात झाला असावा; तर इतिहासाचार्य सर भांडारकर यांच्या मते, तो इ. स. चौथ्या शतकात झाला आहे. मॅक्स म्यूलरचं म्हणणं, ‘कालिदास सहाव्या शतकात होऊन गेला.’
अशीच मतभिन्नता कालिदासाच्या जन्मभूमीबाबतही आहे. बंगाल आणि मध्य भारतातील विदिशा, उज्जैन ह्या प्रदेशांचा कालिदासांची जन्मभूमी म्हणून उल्लेख केला जातो. विदर्भातल्या रामटेक परिसरात त्याने वास्तव्य केल्याचेही म्हटले जाते. यासाठी मेघदूतात शापित यक्षाच्या एकांतवासाचे रामगिरी हे ठिकाण म्हणजे आजचे रामटेक असल्याचे सांगितले जाते.
कालिदास विक्रमादित्याच्या राज्यात होता की भोजराजाच्या राज्यात होता, याबाबतही वाद आहे. असा हा कालिदास येणेप्रमाणे ब्राह्मणाचा मुलगा होता. तो पाच-सहा महिन्यांचा असताना त्याचे आई-वडील निवर्तल्याने पोरका झाला होता. एका गवळ्याने त्याला लहानाचे मोठे केले. तो दिसायला देखणा असला तरी अशिक्षित होता. तो जिथे राहात होता, त्या नगराच्या राज्याच्या उपवर कन्येचं वरसंशोधन सुरू होतं. ती रूपवती आणि कलाभिज्ञ तरुणी होती. परंतु तिच्यासाठी येणार्‍या वरांमध्ये  ‘अखिल कलाविशारद’ कुणीच नसल्याने तिच्या पसंतीस कुणीच उतरत नव्हते. ह्या सततच्या नकाराने कंटाळलेल्या राजाने शेवटी कन्येच्या वरसंशोधनाचे काम प्रधानावर सोपवले. प्रधानालाही काही कारणाने राजकन्येचा सूड घ्यायचाच होता. त्याने काय केलं, गवळ्यांच्या मुलांबरोबर राजवाड्यात ये-जा करणाऱ्या कालिदासाला बोलावलं; त्याला मौल्यवान वस्त्रालंकारांनी सजवलं आणि सोबत तरुण शास्त्रीपंडितांचा लवाजमा देऊन त्याला राजकन्येसमोर वरपरीक्षेसाठी राजसभेत बसवलं. राजसभेतल्या पंडितांना कालिदासाच्या नाटकी शिष्यांनी नमवलं. त्यामुळे राजकन्येला कालिदासाची परीक्षा घेण्याची आवश्यकताच वाटली नाही. त्यात कालिदासाच्या देखणेपणाने राजकन्येचं हृदय जिंकलं होतं. लवकरच त्यांचा विवाह झाला. परंतु थोड्याच दिवसात त्याच्या खोटेपणाची कुजबुज सुरू झाली. तेव्हा त्याला ठार करण्याचा धाक दाखवून राजकन्येने सत्यस्थिती समजून घेतली. ती दु.खी झाली. परंतु विवाह झाल्याने ती हतबल झाली होती. तिने त्याला कालीची उपासना करण्यास सांगितलं. त्यानेही देवीच्या पायाशी धरणं धरलं. पण ती प्रसन्न होईना, तेव्हा तो आपला शिरच्छेद करण्यास तयार झाला.
त्याच्या भक्तीने व दृढनिश्चयाने देवीही प्रसन्न झाली व त्याच्या मस्तकी तिने वरदहस्त ठेवला. कालिदास नावाने सिद्ध झाला, प्रतिभासंपन्न झाला. कालिदास राजकन्येकडे परतला. तेव्हा तिने त्याला ‘अस्ति कश्चिद्वाग्विशेष.’ म्हणजे आपल्या वाणीत काही फरक झाला आहे का, असा प्रश्‍न विचारला. तेव्हा दैवी प्रसादाने प्रतिभासंपन्न झालेल्या कालिदासाने कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश ही स्वरचित काव्ये राजकन्येला धडाधड ऐकवली. त्याचे पुढे ग्रंथ झाले. कालिदासाची कीर्ती सर्वत्र पसरली. तथापि,  आपला हा भाग्योदय राजकन्येमुळेच झाला ,ह्या समजुतीने कालिदास तिला मातृवत, गुरुवत मानू लागला. त्याने संतापलेल्या राजकन्येने ‘तुला स्त्रीच्या हातूनच मृत्यू येईल’ असा शाप त्याला दिला.
त्यानंतर कालिदासांच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. तो वेश्यांच्या सहवासात गुंतला. असाच तो सिंहलीद्वीपात आपला मित्र राजा कुमारदास यास भेटण्याकरिता गेला असता तेथील वेश्येच्या तोंडून ‘कमले कमलोत्पति. श्रूयते न दृश्यते’(एका कमळातून दुसरे कमळ निघते ,असे आम्ही ऐकतो, पण तसे कुठे दिसत नाही.) ह्या श्‍लोकार्धाच्या पूर्तीसाठी राजाने मोठं बक्षीस लावलं असल्याचं त्याला कळलं. त्याने लगेच ‘बाले तव मुखाम्भोजात्कथमिन्दीवरद्वयम्’ (हे बालिके, तुझ्या मुखकमलावर नेत्ररूपी निळी कमळे कशी दिसतात?) असा श्‍लोकार्ध रचून त्या समस्येची पूर्ती केली. परंतु बक्षिसाच्या लोभाने त्या वेश्येने कालिदासाला फसवून ठार मारले. राजकन्येचा शाप खरा ठरला.
ती वेश्या राजाकडे गेली. श्‍लोकार्धाची समस्यापूर्ती ऐकवली. परंतु राजा कुमारदासला संशय आल्याने त्याने तिला दरडावून विचारताच वेश्येने आपला गुन्हा कबूल केला. आपल्या प्रिय मित्राचा अशा प्रकारे अंत झाल्याने राजाही व्यथित झाला आणि दु.खातिरेकाच्या भरात त्याने कालिदासाच्या चितेवर स्वतःलाही जाळून संपविले.
मात्र सत्य वाटाव्या अशा दंतकथातून कालिदासाचं आयुष्य उजळून निघालं आहे. त्यात त्याच्या जीवनाचा अंत दुःखद झालेला असला तरी त्याने निर्मिलेली साहित्यसृष्टी अनंत काळाची झाली आहे. कालिदासाने कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश याप्रमाणे ॠतुसंहार हादेखील काव्यग्रंथ निर्माण केला आहे. याशिवाय मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि शाकुंतल ही नाटकंही लिहिलीत. कुन्तलेश्वरदौत्या  हा ग्रंथही त्यांच्या नावावर आहे. परंतु आज तो उपलब्ध नाही. उच्च प्रतीची काव्यात्मकता हा कालिदासांच्या साहित्यनिर्मितीचा प्राण आहे. म्हणूनच कवी जयदेव यांनी कालिदासांना ‘कविकुलगुरू‘ ही अत्यंत समर्पक अशी पदवी अर्पण केली.
काही पाश्‍चात्त्य पंडितांनी ‘कालिदास हाच हिंदुस्थानचा शेक्सपियर’ अशी स्तुती करताच हिंदुस्थानी पंडित सुखावले आहेत. ते चुकीचं आहे. खरं तर, कालिदासांचं नाव बिरुद म्हणून शेक्सपियरपुढे लावावं, एवढी कालिदासांची प्रतिभाभरारी उत्तुंग आहे. कालिदासांनी तीनच नाटकं लिहिलीत, पण ती शेक्सपियरच्या तीस नाटकांच्या वरचढ ठरतील, अशी आहेत. विविध नाट्यरसांप्रमाणे, विविध कलांचाही संगम कालिदासांच्या तीन नाटकात झालेला आहे. ही कालिदासाची साहित्य-थोरवी काळाला दास करणारी आहे. म्हणूनच कालिदासांच्या स्मरणासाठी आषाढातला पहिला दिवस हा केवळ निमित्तमात्र ठरतो.

ज्ञानेश महाराव*
( पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक चित्रलेखा २५जून२००१)

9322222145

Previous articleभारतीय शेती आणि संस्कृतीचा इतिहास
Next articleबाबासाहेब, मनू आणि संभाजी भिडे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. महाकवी कालिदास बद्दल अप्रतिम माहिती वाचायला मिळाली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here