-शेखर पाटील
आज रेखाचा तर उद्या महानायक अमिताभचा वाढदिवस. वैयक्तीक आयुष्यातील एका रहस्यमयी अध्यायामुळे जवळपास आख्यायिका बनलेल्या या दोन्ही मान्यवरांचा लागोपाठचा वाढदिवस हादेखील खरं एक योगायोगच ! रूपेरी पडद्यावरील अनेक जोड्या गाजल्या असल्या तरी अमिताभ-रेखाची बातच निराळी. खरं तर, अमृता-इमरोज-साहीर या दंतकथा बनलेल्या त्रिकोणाइतकाच अमिताभ-जया-रेखा यांची प्रेमकथा अजरामर झालीय. अमृताजी आपल्या प्रेमाबाबत भरभरून व्यक्त झाल्या. एखाद्या स्त्रीने आपल्या आयुष्यातील अलवार अध्याय इतक्या विलक्षण निर्भयपणे मांडणे तसे बंडखोर या प्रकारातील मानले गेले. इमरोज यांनी प्रेमाच्या अभिव्यक्तीपेक्षा याच्या अनुभूतीलाच जास्त प्राधान्य दिले. तर साहिरनेही कधी याबाबत स्पष्ट केले नाही. तर दुसर्या त्रिकोणातील तिन्ही मान्यवरांनी याबाबत विलक्षण चुप्पी साधली आहे. नाही म्हणायला, रेखाने अनेकदा स्पष्टपणे तसेच इशार्यांमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली असली तरी बच्चन्स मात्र गप्प बसलेत. असो. तर आज अमिताभ व रेखा यांच्याबाबत.
अलीकडच्या भाषेत बोलायचे झाल्यास रूपेरी पडद्यावर कोणत्याही जोडीची ‘केमिस्ट्री’ मॅच होण्याला महत्व असते. किंबहुना त्यावरूनच त्या जोडीची लोकप्रियता ठरत असते. याचा विचार केला असता, अमिताभ आणि रेखा हे अन्य जोड्यांपेक्षा कितीतरी पटीने सरस ठरतात. सत्तरच्या दशकात अमितजींनी आपल्या ‘अँग्री यंग मॅन’ या प्रतिमेने पडद्यावरील इतरांना अक्षरश: खाऊन टाकले. हा अभिनेता जीवंतपणीची दंतकथा बनला. मात्र या दंतकथेतील नायिकेचा शिरकाव हा अनेक चित्तथरारक गॉसीप्सला जन्म देणारा ठरला. या दोघांचे नाव येताच पहिल्यांदाच आठवण होते ते सिलसिला चित्रपटाची ! यश चोप्रा यांनी अत्यंत खुबीने ‘रिअल लाईफ टू रील लाईफ’ अशा कथानकाला मनमोहक संगीताची जोड देऊन ही कलाकृती सादर केली. ‘फुल भी हो दरमिया तो फासले हुवे…’ अशी अतिशय विलक्षण प्रेमाची अभिव्यक्ती अमितजी व रेखाशिवाय कुणाला शोभून दिसली असती का हो ? नक्कीच नाही ! सिलसिलामध्ये प्रेमातील त्रिकोणातला सर्व मेलोड्रामा आहे. आधीच अमिताभ व रेखा यांच्याबाबत अचाट अफवा पसरलेल्या असतांना यश चोप्रांच्या ‘आधी हकीकत आधा फसाना’ स्टाईलच्या या चित्रपटाला आजही माईलस्टोन म्हणून गणले जाते. खर तर या जोडीने अनेक चित्रपट केले आहेत. तथापि, मला ‘मुकद्दर का सिकंदर’मधील या दोघांच्या भूमिका खूप भावतात. म्हटलं तर हा प्रकाश मेहरा यांच्या शैलीतला खास मसालापट. तथापि, यातील कथानक, संवाद, गाणी आणि अर्थातच अभिनय हे सारेच काही सरस. जोहराबाई व सिकंदर यांच्यातल्या अव्यक्त प्रेमाने याला नवीन आयाम प्रदान केला. यातील ‘सलामे इश्क’ हे गाणे तर अक्षरश: अजरामर झालेले आहे.
मुकद्दर का सिकंदरमध्ये प्रेमाचे अनेक विलोभनीय रंग आहेत. बालपणापासूनच मेमसाहबवर जीवापाड प्रेम करणार्या सिकंदरचे स्वप्न वास्तवाच्या तडाख्याने तुटते. कसे तरी उसासे टाकत जीवन जगत असतांना त्याच्या जीवनात हीच मेमसाहब कामिनी बनून येते तेव्हा त्याला आयुष्यात बहार आल्याची भावना होते. मात्र तोवर बराच बदल झालेला असतो. म्हणजे सिकंदरला कामिनी आवडत असते तर कामिनीला विशाल. दिलावरला जोहराबाई आवडत असली तरी ती मात्र खर्या प्रेमाचा शोधात असते. यातच प्रेमभंगाने व्याकुळ बनलेल्या सिकंदरला त्याचा मित्र प्यारेलाल हा जोहराबाईच्या कोठ्यावर घेऊन जातो. यानंतर अवघ्या काही मिनिटांचे नाट्य आपल्या अंगावर शहारा आणते. जोहराबाई आपल्या गीत व नृत्यातून खर्या प्रेमासाठी आसुसलेली असल्याचे भासते. ‘तुम हमसे प्यार करने की जरासी भूल कर लो…’ अशी आर्जवे करते. एकीकडे गाणे टिपेला पोहचलेले असतांनाच सिकंदर उभा राहतो. त्याच्या आवाजाची विलक्षण तान या गाण्याची चाल अक्षरश: तोडून टाकते. जोहराबाई प्रेमाचे वर्णन करत असली तरी तिने आता यापुढे आपले म्हणणे ऐकावे असे तो सुनावतो. यानंतरचे शब्द अंगावर काटा आणतात….
तू मसिहा मुहब्बत के मारो का है
हम तेरा नाम सुन के चले आये है ।
अब दवा दे हमे या तू दे दे जहर,
तेरी महेफिल मे ये दिलजले आये है ॥
मला वाटत नाही प्रेमाची दग्ध भावना इतक्या विलक्षण पध्दतीत अवघ्या काही शब्दांमध्ये कुणाला मांडता येईल ! जीवनात असा क्षण कधी तरी येतो की, एक तर आपल्याला दवा हवी असते अथवा जहर ! अशाच क्षणाची आपण या गाण्याच्या माध्यमातून अनुभूती घेऊ शकतो. यामुळे सलामे-ईश्क हे गाणे नसून एक अतिशय उत्कट अशी प्रेमानुभूती आहे. पहिल्या नजरमध्येच सिकंदरच्या प्रेमात पडलेल्या जोहराबाईची तगमग सुरू होते ती मुजरा संपल्यानंतर ! ”इस कोठे पर लोग चोट खाकर आते है या चोट खाकर जाते है…ये पहला शख्स है जो मुझे चोट देकर जा रहा है !” अशा शब्दांमध्ये ती आपल्या प्रेमाची स्वीकारोक्तीही देऊन टाकते. आणि हो सिकंदर येथे पुन्हा येईल तेव्हाच मुजरा होईल असा प्यारेलालला इशारादेखील देऊन टाकते. आता गंमत अशी की, जोहराबाई सिकंदरवर जीवापाड प्रेम करत असली तरी त्याला त्याचा पत्ताही नसतो. अगदी याच प्रकारे सिकंदरच्या प्रेमाची कामिनीला कल्पनाही नसते. अव्यक्त प्रेमातला नियतीचा हा खेळ या चित्रपटाला नवीन उंची प्रदान करतो.
सलामे-ईश्क या गाण्यातील सिकंदर आणि जोहराबाई अर्थात अमिताभ आणि रेखाच्या पडद्यावरील वावराची देहबोली पाहिली असता आपल्याला निस्सीम प्रेमानुभूती आढळून येते. नो डाऊट…अंजान यांचे विलक्षण प्रत्ययकारी शब्द, कल्याणजी-आनंदजींचे संगीत आणि अर्थातच लता व किशोर यांच्या स्वर्गीय सुरांनी हे गाणे अजरामर बनले आहे. मात्र माझ्या तरी मते हे गाणे फक्त आणि फक्त अमिताभ आणि रेखाचेच होय. किंबहुना या गाण्यात इतर कुणी अभिनेता वा अभिनेत्रीची आपण कल्पना तरी करू शकतो का ? या दोन्ही मान्यवरांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा !
गाण्याची लिंक :- http://bit.ly/2pKhYtD
(लेखक महाराष्ट्रातील आघाडीचे पत्रकार ,ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत. त्यांचा techvarta.com हे वेब पोर्टल तंत्रज्ञान विषयातील अद्यावत माहिती देणारं मराठीतील एकमेव पोर्टल आहे)