‘वाईट नजर’ ……

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

बऱ्याच पुरुषांना बायकांनी म्हटलेलं,- ‘पुरुषांच्या घाणेरड्या नजरा’…वगैरे वाक्य खटकतात. त्यावर त्यांची उत्तरं – ‘हे म्हणजे अतीच झालं’, ‘आता काय डोळे बंद करून बाहेर वागायचं का ?’, ‘नुसतं पाहिलं तरी वाईट का ?’, ‘पाहिलं की भोकं पडतात का यांना’ …. अशा प्रकारची उद्धट असतात.

बाकींच्यांचं जाऊ दे,
पण, जे कोणी आजच्या घडीला टीनएजर किंवा नुकतीच मिसरूड फुटलेली पोरं आहेत, जी तुम्ही उद्याचं भविष्य असणार आहात, त्यांच्यासाठी…
कारण ‘उद्याचा समाज कसा असावा’, हे तुमच्या हातात आहे.

तुम्ही किती मुलींबरोबर सेक्स करताय, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे/असेल. त्यात काहीही चूक नाही.
जोपर्यंत तुमच्यामुळे कुणाला त्रास होत नाही, कुणाची फसवणूक होत नाही, कायदे तोडले जात नाहीत, तुमच्या सेफ्टीची तुम्हाला जाणीव आहे, तोपर्यंत तुमच्या कुठल्याही गोष्टींना विरोध करायचा वा त्याला चुकीचं ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही आणि तुम्ही तो अधिकारही कुणाला देऊ नये.

पण, तरी काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत.
‘ त्या गोष्टी तशा का ? ‘, हे समजून घेणं हे आपलं नेहमीच कर्तव्य, त्याला प्राधान्य असायला हवं.
एकदा गोष्टी समजून घेतल्या की आपलं वागणं कदाचित सकारात्मक होऊ शकेल, एवढीच अपेक्षा.

————-

” ‘वाईट नजर’ म्हणजे काय “, आणि त्यात घृणा/भीती का भरलेय हे पाहू.
पण त्याआधी एक उदाहरण घेऊ –

तुम्ही कुठल्या जवळपासच्या पक्ष्याचं निरीक्षण केलं, तर तो पक्षी सतत आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचा अदमास घेत असतो. तुम्ही त्याच्याकडे चालत गेलात, तर तो लांब जातो … तो कुठेही वळला तर त्याची नजर आजूबाजूला असते. पण असं का? कारण संरक्षण हवंय. आपण कुणाचं तरी भक्ष्य बनू नये, ही भीती प्रत्येक जीवाला दिली आहे. ‘अरे पण आम्ही त्याला काय मारणार नसतो’, हो पण ते तुझं मत. त्या पक्ष्यासाठी तू एक Threat आहेस.

मग तुम्ही हत्ती, घोडा, वाघ, सिंह … यांचं निरीक्षण करा. ते देखील आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल सतर्क असतात. पण तुमच्या हालचालींवर ते बिथरणार नाहीत. असं का ?

कारण पक्षी हा ‘शारीरिक दृष्ट्या आपल्याहून दुबळा आहे’. त्याचा आपल्याकडून पराभव होऊ शकतो. तर हत्ती-घोडा-वाघ-सिंह यांच्या तुलनेत आपण दुबळे आहोत. त्यामुळे ते आपल्याला बिथरणार नाहीत. हे आपल्या हातात आहे का ? नाही, बलाढ्याला-कमजोर घाबरणार, हा निसर्गनियम आहे. कारण ते आपल्या ‘जेनेटिक्स-कोडिंगमध्ये ज्याम मुरलंय’. प्रत्येक जिवाच्या संरक्षणासाठी ते दिलं गेलंय.

(इथे बायकांना दुबळं म्हणण्याचा अर्थ हे फक्त ‘शारीरिक’ ताकदीच्या तुलनेत आहे. जरी आज बायका स्वंरक्षणाच्या दृष्टीने पावलं टाकत असली, तरी त्याचा रेशिओ कमी आहे असं मला वाटतं)

——————-

आता समजा, मी एका स्त्रीकडे टक लावून पाहतोय. तर त्याने ती घाबरेल का ? त्याची तिला किळस वाटेल का ?
तर हो, काही घाबरतील, काहींना किळस वाटेल.
< पण का ? आम्ही काय त्यांना मारणार नाही ? >
सर्वात पहिले तर तुम्ही जर अनोळखी असाल, तर भीती वाटण्याची शक्यता आहे. कारण तेच ‘तू तिच्यासाठी एक ‘Threat’ होतोस. तुझ्यासाठी ती ‘Threat’ होणार नाही, कारण तू तिच्याहून शारीरिक दृष्ट्या ताकदवान आहेस. हा निसर्गाचा नियम आहे.

< पण किळस का वाटते ? >
आता इथे सामाजिक गोष्टींमुळे म्हणू , पण ‘आपल्यावर रेप होऊ शकतो’, हे त्यांच्या मनात कुठेतरी मुरलेलं आहे. त्या ज्या समाजात वाढल्या, त्या समाजात/आजूबाजूला त्यांनी तशा गोष्टी घडताना पाहिल्यात. मग त्याची भीती/किळस मनात असणं हे फार Obvious आहे. अगदी आपण देखील जेव्हा सुमसान रस्त्यावरून जातो, तेव्हा आपल्याला भीती वाट असतेच, ‘कुठून चोर येतील, गुंड येतील…. कोणी आपल्यावर दरोडा टाकेल’, वगैरे. का ? कारण अशा घटना घडल्यात. आपल्या मेंदूत ते स्टोर झालंय. आणि आपल्याबरोबर ते होऊ शकतं याचा आपल्या मेंदूने धसका घेतलाय.

(आता पुरुषांना किळस वाटणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत ? याचा विचार करून त्याच्याशी तुलना करा.)

—–

आपला मेंदू काय करतो बघ….
तो चांगल्या आठवणी कमी आणि वाईट आठवणी पट्कन लक्षात ठेवतो. असं का ?
ज्या ज्या आठवणी आपल्या मेंदूला शॉक देतात, त्या त्या आठवणी आपला मेंदू पट्कन लक्षात ठेवतो.
म्हणजे आपण आठवडाभर एकाच ट्रेनमधून तासभर प्रवास केला आणि तीच लोकं दोन आठवड्यांनंतर आपल्यासमोर आली, तरी आपल्याला ती लक्षात राहतीलच असं नाही. पण तेच जर आपला कुणाशी नुसता १० सेक्सनंदापुरता जरी वाद झाला, किंवा कोणाला तरी ‘दुखापत’ झाली, तरी ती गोष्ट आपला मेंदू लक्षात ठेवतो. का ? कारण शॉक आणि भीती. आपल्या मेंदूचं काम आपल्याला वाचवणं आहे. त्यामुळे अशी कुठलीच गोष्ट जी Threat होऊ शकते, तो आपल्या मेमरीत सेव्ह करतो आणि आपल्याला त्यापासून अलर्ट करतो.
आपल्याला मेमरी मिळण्याचं एकमेव कारण, आपलं ‘संरक्षण’ हे आहे.

मग समजा, मी कुठल्या मुलीकडे बघत राहिलो, तर तिच्या डोक्यात कुठल्या गोष्टी चालू असण्याची शक्यता आहे ?
१. भीती २. किळस ३. राग.

आता आपण जर ह्या तिन्ही गोष्टी तिच्या मेंदूत काहीही कारण नसताना टाकणार असू…किंवा नुसत्या आपल्या न बघण्याने तिचा/त्याचा मेंदू फ्री राहणार असेल, तर ही गोष्ट करणं, पाळणं खूप महत्त्वाची नाही का वाटत ? आपण सगळेच आपल्या स्त्रियांच्या सेफ्टीबद्दल हाच विचार करू. आपल्या कुठल्याही वागणुकीमुळे कोणाला तरी भीती वाटावी, हा घाणेरडा प्रकार झाला. कारण आपल्याकडे पण आई-बहीण-बायको-मुलगी-मैत्रीण आहे ना,. मग अनावश्यक वाटणाऱ्या गोष्टी कोणाकडूनही होऊ नये याचा आपण पुरस्कार करायला हवा.

‘कुणाचा पाठलाग करणं, आपल्यामुळे कोण तरी घाबरणं’… आणि आपल्याला ते गंमतीचं वाटून आपण ते उपभोगणं, ह्याला मी विकृती म्हणेन.
आणि हे प्रकार आपल्याही लोकांबरोबर होऊ शकतात, याची जाणीव देखील असायला हवी.

आपल्या कुठल्याही वागणुकीमुळे जर कोणी ‘Uncomfortable’ होत असेल, तर ती प्रत्येक गोष्ट आपण टाळायला हवीच.
“झिरो टॉलरन्स”, ह्याचा ध्यास घ्यायला हवा.

आपला समाज एका गोष्टीवर तग धरून आहे, तो म्हणजे ‘विश्वास’.
हॉटेलात गेलो की आपल्याला विष खाऊ घालणार नाही, हा विश्वास.
रस्त्यावरून चालत असलो की कोणी आपल्याला दगडं मारणार नाही, हा विश्वास…

‘आपल्या संरक्षणाचा विश्वास’, आपल्या सभोवतालाकडून मिळणं, ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि तो विश्वास आपल्याला समोरच्यात निर्माण करता यायला हवा. त्यासाठी जी आवश्यक पावलं आहेत, ती आपल्याला उचलावी लागतील.

समाज म्हणजे कोणी नाही. प्रत्येकवेळी कुठल्या तरी महापुरुषाची वाट बघत बसायलाच हवी का ? आपण नाही का करू शकत साध्या साध्या गोष्टी साकार. नुसत्या एका आणि ते देखील सहज, शक्य असणाऱ्या गोष्टींमुळे जर एखादा पॉजिटीव्ह बदल होऊ शकत असेल, तर ते आपल्याला करायला जमायला हवं.

आमच्यावेळी किंवा आमच्याकडून देखील बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, पण तेव्हा आमहाला सांगणारं देखील कोणी नव्हतं किंवा या विषयावर बोलणारं देखील कोणी नव्हतं…. आज जर तुमच्याकडे तशी लोकं असतील, तसे संवाद साधता येणारी मित्र-मंडळी असतील, तर नक्कीच त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करून मार्ग काढायला हवा.

———–

बाकी, बायकांनी देखील काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. पुरुष-प्रधान संस्कृती म्हणून नुसतं रडत बसण्यात, पुरुषांविरोधात बोटं मोडण्यात काहीही साध्य होणार नाही. कुठला पुरुष आईच्या पोटातूनच वाईट होऊन येत नाही. समाजाचा देखील तेवढाच हातभार असतो. पण जर प्रगल्भ समाज घडवायचा असेल तर कोणाला नावं ठेवण्याआधी थोडं आपुलकीने देखील संवाद साधायला हवा. आणि हा संवाद पहिले आपल्या घरापासून सुरुवात करायला हवा.

जर आपल्याच घरातील पुरुष व्यवस्थित घडवण्याची जवाबदारी प्रत्येकाने घेतली, तर अशा नकोशा गोष्टी कितीतरी पटीने कमी होतील.

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात. लेखक स्वतःचा परिचय अतिशय हट्टी , अतिशय निर्बुद्ध , अतिशय अश्लील , अतिशय दुराचारी-अविचारी , अतिशय उद्धट …. वगैरे वगैरे..असा देतात   )

Previous articleमोहन ते महात्मा @ १२५ वर्षे
Next articleशिक्षण विचार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. कुठलाही अविर्भाव न आणता मंगेश सपकाळ लिहितात. मी अनेक वर्षे त्यांच्या पोस्ट्स वाचल्या आहेत. निर्भीडपणे आणि सगळे तथाकथित सामाजिक दबाव झुगारून लिहिणाऱ्या लेखकांच्या मागे गर्दी लागते. एक तर त्यांचा निषेध करायला, नाहीतर त्यांना फॉलो करायला. हे सारे मंगेशच्या बाबतीत होत असूनही त्याने अजून त्याच्या लेखणीत असलेली गंमत गहाण टाकलेली नाही हे पाहून फार छान वाटलं. छान लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here