पटेल व बोस दरम्यानचे विस्मृतीत गेलेले वैर

-रामचंद्र गुहा

सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे समर्थक जवाहरलाल नेहरूंवर हल्ला चढवण्यासाठी वल्लभभाई पटेल नामक काठीचा वापर करत होते. अलीकडे, त्यांनी नव्या अस्त्राचा वापर सुरु केला आहे – सुभाषचंद्र बोस यांचा वारसा यातून वैचारिक सातत्य आणि ऐतिहासिक अचूकतेबद्दल प्रश्न निर्माण होतात. नेहरूंना खाली दाखवण्यासाठी पटेल व बोस यांना एकाच गठडीत बसवता येईल का?

इतिहासातील पुराव्यांकडे दुर्लक्ष केले तरच असे करणे शक्य आहे. कारण, वल्लभभाई पटेल यांचे सुभाषचंद्र बोस यांच्याशी तणावपूर्ण संबंध होते. सन १९३३ मध्ये वल्लभभाईंचे जेष्ठ बंधू विठ्ठलभाईंचे निधन झाल्यानंतर त्यांच्यातील संबंध वेगाने घसरलेत. सुभाषचंद्र बोस यांनी विठ्ठलभाईंच्या अखेरच्या आजारपणात त्यांची सुश्रुषा केली होती. मृत्युपत्रात विठ्ठलभाईंनी आपल्या संपत्तीतील तीन चतुर्थांश वाटा ‘शक्यतोवर इतर देशांमध्ये भारताच्या (स्वातंत्र्य) ध्येयाच्या प्रचार कार्य करण्यासाठी’ सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने केला होता. वल्लभभाईंनी या मृत्युपत्राच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले. यानंतर मोठी कायदेशीर लढाई झाली आणि शेवटी सुभाष बाबूंऐवजी विठ्ठलभाईंच्या सर्वात जवळच्या नातेवाईकाला संपत्ती मिळाली.

पाच वर्षांनी, सुभाषबाबूंचे नाव कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सुचवण्याच्या गांधींच्या निर्णयाला वल्लभभाईंनी विरोध दर्शविला. गांधींनी त्यांचा विरोध डालवला आणि सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाले. सन १९३९ मध्ये, जेव्हा सुभाष बाबूंनी अध्यक्षपदाच्या सलग दुसऱ्या कालावधीची मागणी केली, पटेल यांनी पुन्हा विरोध दर्शविला. त्यांनी एका जाहीर वक्तव्यात सुभाषचंद्र बोस यांना इशारा दिला की ते निवडून जरी आले तरी त्यांच्या धोरणांची चिकित्सा करण्यात येईल आणि आवश्यकता पडल्यास कार्यकारिणी (पटेल समर्थकांचे बहुमत असलेली) नकाराधिकाराचा वापर करेल.

राजमोहन गांधी यांनी वल्लभभाईंच्या जीवन चरित्रात लिहिले आहे, पटेल ‘यांचे सुभाष बोस यांच्या क्षमतेबाबत चांगले मत नव्हते’; तसेच, ‘त्यांचे सुभाष बोस यांच्याशी असलेले मतभेद गंभीर होते.’  पटेल यांचे मत होते की सन १९३७ मध्ये निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या प्रांतीय सरकारांनी सत्तेत रहावे, तर बोस यांची ‘इच्छा होती की सर्व कॉंग्रेस मंत्रीमंडळांनी  सत्तेतून बाहेर पडावे आणि ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारावे. पटेलांना हा मार्ग अनावश्यक आणि अविवेकी वाटत होता.’  राजमोहन पुढे लिहितात की ‘दोघांदरम्यान गांधींवरूनही मतभेद होते; सुभाषबाबूंच्या दृष्टीकोनातून गांधीना टाळणे शक्य होते, तर पटेल यांच्यासाठी गांधींचे अस्तित्व अत्यंत महत्वाचे होते.

बोस यांनी स्वत:च्या फेर-निवडणुकीसाठी कॉंग्रेस नेत्यांकडे याचिका करण्यास सुरु केल्याचे बघून पटेल स्तब्ध झाले. ‘मी स्वप्नातही विचार केला नव्हता’, त्यांनी राजेंद्र प्रसाद यांना लिहिले, ‘की सुभाष पुन्हा निवडून येण्यासाठी या प्रकारच्या घाणेरड्या क्लुप्त्या करेल.’. सुगाता बोस यांनी त्यांच्या His Majesty’s Opponent या पुस्तकात सुभाष बोस यांना ‘पुन्हा निवडून आणणे देशासाठी हानिकारक असेल’ हे पटेल यांचे वाक्य उद्धरित केले आहे. प्रत्तुत्तरात, आपण पुन्हा निवडणुकीस उभे राहू नये यासाठी वल्लभभाई ‘नैतिक बळजबरी’ करत असल्याचा आरोप बोस यांनी केला होता.

जसे की सर्वज्ञात आहे, गांधी व पटेल यांचा विरोध असतांनाही पट्टाभी सीतारामय्या यांना पराभूत करत बोस पुन्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आलेत. कॉंग्रेस श्रेष्ठींसाठी हे फारच लाजिरवाणे होते. ‘आम्हाला सुभाष सोबत काम करणे अशक्य आहे’ असे पटेल यांनी राजेंद्र प्रसाद यांना लिहिले. गांधी-पटेल तंबूने बोस यांचे अध्यक्षीय अधिकार कमी लेखण्यास सुरुवात करत त्यांना पदाचा राजीनामा देण्यास आणि नंतर पक्षाचाच त्याग करण्यास भाग पाडले.

राजमोहन गांधी यांनी अत्यंत सचोटीने संशोधन केलेल्या या वादातून पटेल आणि बोस दरम्यानचे हाडवैर स्पष्ट होते. राजमोहन यांनी लिहिले आहे की, ‘बोस समर्थकांनी त्यांच्यातील कटुता पटेल यांच्यासाठी आरक्षित ठेवली होती, जरी गांधींचा सुद्धा बोस यांना तेवढाच तीव्र विरोध होता.’ सुभाष बाबूंचे बंधू, सरत चंद्र यांनी वल्लभभाईंवर सुभाष विरुद्ध ‘क्षुद्र, द्वेषपूर्ण आणि सुडाने पेटलेला’ प्रचार चालवल्याचा आरोप केला होता.

पटेल सुद्धा (मतभेद) विसरण्याच्या मानसिकतेत नव्हते. सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा त्यांच्यावर ‘लोकशाहीविरोधी’ असल्याचा आरोप केला, पटेलांनी रागाने प्रत्तुत्तर देत म्हटले की, ‘सिंह जन्मानेच राजा असतो, तो जंगलातील निवडणुकीने राजा होत नाही.’ राजमोहन यांनी म्हटले आहे की सुभाष बाबूंनी नंतरच्या काळात दाखवलेल्या असाधारण शौर्याच्या पार्श्वभूमीवर कुठलीही दया न राखता पटेलांनी केलेले वक्तव्य अयोग्य वाटत असले तरी सन १९३९ मध्ये कॉंग्रेस अंतर्गत चाललेल्या संघर्षाच्या संदर्भात ते समजून घेणे शक्य आहे.

काही वर्षांनी, सन १९४६ मध्ये, पटेल यांनी भारतात परतलेल्या आझाद हिंद फौजेच्या जवानांना मदत करत आपल्या आधीच्या क्रूर विधानावर पाणी टाकले. राजमोहन यांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की ‘या भूमिकेमागे व्यवहार्यता तर होतीच कारण त्यावेळी सुभाष बाबूंची प्रतिष्ठा उत्तुंग होती, मात्र (पटेल यांच्या)भावना सुद्धा होत्या.’ पटेल यांनी ‘सुभाष ने विजनवासात दाखवलेल्या शौर्याचे कौतुक’ केले होते.

त्यांच्यातील राजकीय मतभेदांशिवाय, पटेल व बोस दरम्यान तेवढेच गंभीर वैचारिक मतभेद सुद्धा होते. बोस यांचा समाजवादी ‘planning’ वर मोठाच विश्वास होता, तर पटेल यांची खाजगी उद्योजकांप्रती सहानुभूती होती. पटेल यांच्यापेक्षा बोस हे हिंदू-मुस्लिम एकतेबाबत कितीतरी जास्त वचनबद्ध होते. त्यांनी आपल्या The Indian Struggle (प्रथम प्रकाशित, १९३५) या पुस्तकात हिंदू महासभेवर प्रखर टिका केली आहे. बोस यांनी हिंदू महासभेला सातत्याने ‘प्रतिगामी’ म्हणून संबोधत ते इस्लामिक मुलतत्ववादाचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. गांधी आणि आपण स्वत: ज्या हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यात खोळंबा आणण्याचे काम करत (हिंदू महासभा) ब्रिटीशांच्या हातात खेळत असल्याचा आरोप सुभाषचंद्र बोस यांनी केला आहे.

सुभाषचंद्र लिहितात, ‘हिंदू महासभेत, त्यांच्या मुस्लिम समकक्ष (संघटने) प्रमाणे, फक्त पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवाद्यांचा समावेश नसून, राजकीय आंदोलनात सहभागी होण्यास घाबरत असलेल्या व सुरक्षित व्यासपीठाच्या शोधात असलेल्या अनेकानेक व्यक्तींचा समावेश आहे.’ हा आरोप न्यायोचित आहे; कारण एकीकडे बोस, नेहरू, पटेल यांनी तुरुंगात अनेक वर्षे घालवलेली असतांना, दुसरीकडे सन १९३० व १९४० च्या दशकात हिंदुत्ववाद्यांनी ब्रिटिशांना आव्हान देण्याचा कोणताही मार्ग पत्करला नव्हता. ब्रिटीशांशी संगनमत असलेल्यांपैकी एक होते, डॉ एस पी मुखर्जी – जन संघाचे संस्थापक आणि भाजपचा आदर्श!

डाव्या इतिहासकारांप्रमाणे, हिंदुत्वा बुद्धीजीवी सहजपणे सत्यावर विशिष्ट (वैचारिक) शिकवण थोपवतात. असे असले तरी, हिंदुत्ववाद्यांची नवी खेळी नवा नीचांक गाठणारी आहे. काही बाबतीत – जसे की योजनाबद्ध विकास व धर्मनिरपेक्षता – बोस व नेहरू एकाच पानावर होते; तर काही मुद्द्यावर – जसे की गांधींप्रती निष्ठा आणि (द्वितीय महायुद्धात) मित्र राष्ट्रांपेक्षा धुरी राष्ट्र अधिक क्रूर असण्याबाबत नेहरू व पटेल एकमेकांच्या खांद्यास खांदा लावून उभे होते. याउलट, भारताच्या स्वातंत्र्याची आस वगळता, बोस व पटेल यांच्या दरम्यान राजकीय, वैयक्तिक व वैचारिक समानता काहीच नव्हती.

मुस्लिमांनी भारतीय गणराज्याप्रतीची निष्ठा सिद्ध करावी असे जर कुणाला वाटत असेल, तर ते पटेल यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नेहरूंवर नेम साधू शकतात. जपानी शासक हे वसाहतवादी ब्रिटीशांपेक्षा कमी क्रूर होते असे जर कुणाला वाटत असेल तर ते सुभाषचंद्र बोस यांना नेहरूंच्या विरुद्ध वापरू शकतात. पण नेहरूंवर हल्ला करण्यासाठी पटेल व बोस यांचा एकत्रितपणे वापर करण्याची भूमिका हा राजकीय संधिसाधूपणा आणि (त्याहूनही वाईट) बौद्धिक विसंगती आहे.

३० ऑक्टोबर २०१८

(लेखक इतिहासाचे ख्यातनाम अभ्यासक आहेत)

(अनुवाद – परिमल माया सुधाकर)

(अनुवादक पुण्याच्या एम आय टी स्कूल ऑफ गवर्नमेंट मध्ये कार्यरत आहेत)

#mediawatch

#subhashchandrabose

#Vallabhbhaipatel

Previous articleसरदार पटेल काही समज व गैरसमज
Next articleजीवनशैली
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here