-मुग्धा कर्णिक
” मी आहे आई. साधीसुधी कुणाही माणसाच्या बाळाची.
झोपते कधी प्रेमाखातर, कधी नाईलाजाखातर कुणातरी नराबरोबर.
आणि जन्म घेतात नर मादी माणसाच्या माझ्या योनीतून.
चक्र सुरू रहाण्यासाठी.
याच योनीवर जणू थुंकता तुम्ही सारे मर्द
गांडपुचीच्यूत नि कायकाय…
तिच्यात कोण घुसला नि कुणी काय घुसवलं.
थूः.
कधी कुणा नराने दुसऱ्या नराला परम दुःख देण्यासाठी केला असेल
त्याच्या आईचा अपमान.
नंतर ही तुमची सांस्कृतिक रीत होऊन गेली.
आईतल्या बाईने आपल्या वेदना सांगायलाही योनीचा उल्लेख करायचा नाही.
खाली दुखतंय म्हणतात आय़ा, तिकडे आत फार खुपतं सांगतात डॉक्टरलाही.
आणि तुम्ही… तुमच्या हृदयासकट जिथून धडधडलात त्या योनीला
मुद्दाम हलकट शब्द सहजच वापरता-
म्हणून आज मी ही लिहून ठेवतेय इथे जळजळत्या काळजातल्या संतापाने.
——
मी आहे आई, बाई सर्वसमावेशक.
माझ्या गांडीचा उल्लेख तुमच्या ओठांत रुळलेला असतो.
माझ्यावर चढायला कोणतीही लेकरं तयारच असतात.
कधी शाब्दिक कधी प्रासंगिक.
रामाचं नाव घे नायतर- आईची गांड तयारच असते घालून घ्यायला.
शिवाजीराजाचा जयजयकार करताना तुम्ही आईच्या पुच्चीला विसरत नाही.
बाबासाहेबांचा जयजयकार करणारांना तरी कुठे बाबाच्याही जननस्थानाचा विसर पडेल?
तेरी माँ की च्यूत
तिकडे ते जगातली सर्वश्रेष्ठ प्रगत संस्कृती म्हणून मिरवणारे सश्रद्ध पाश्चात्यही
एकमेकांच्या मदरला फक करतात किंवा तूच तुझ्या मदरला केलंस म्हणतात.
अल्ला के बंदे काय डायरेक्ट पडत नाहीत पृथ्वीवर.
त्यांनाही तर यावं लागतं बाहेर आईच्याच मांडीमधून
त्यांचाही कुणीही दुश्मन त्याच्या माँला ‘घालणारा’ असतो.
आणि तोही त्याच्या काफीर दुश्मनाला…
तरी असतात सगळेच त्यांच्या आयांची लेकरं. बछडी…
मी आहे आई.
कधी तुमची आई कधी त्याची आई.
‘घालून’ घेण्याच्या पोझमध्ये जणू जन्मजन्मांतरी वाट बघत रहाणारी.
निरखत, ऐकत रहाते गर्दीतही कानावर सहज पडणारे घण
गांडगांडगांडगांडगांड…
तुमचे शब्द, तुमच्या जिभा माझ्या आईपणाच्या इंद्रियावरून लपलपताना.
वाट पाहात रहाते झडतील कधी जिभा या- महाकुष्ठ झाल्यासारख्या.
लक्षातही येणार नाही तुमच्या- जेव्हा कदाचित् होऊनही जाईल तसं.
आत्ताच पहा.
तुमचा मेंदूच झडतो आहे.
महाकुष्ठ जडलंय त्याला.
रक्तपू होऊन तो पिसाळेपर्यंत देतच रहा तुम्ही आईच्या योनीच्या नावे शिव्या.
एक काळ असा उगवेल
तुम्हाला आईच्या योनीतून जन्मच नाही मिळणार.
हा असेल गांडीचा शाप.
उःशाप नसलेला.”