भावनाताई व माणिकरावांसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान

– अजिंक्य पवार

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राकाँ आघाडीचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेना-भाजप युतीच्या भावना गवळी या दोघांमध्येच थेट लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे . नाही म्हणायला भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी.बी. आडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. प्रवीण पवार, बसपाचे अरूण किनवटकर हे काही उमेदवार दखल घ्यावे असे आहेत. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत भाजपातील अपक्ष उमेदवाराची बंडखोरी मोडीत निघेल, असे सांगितले जाते. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार शिकवणी वर्ग घेण्यात तरबेज असला  तरी मिळालेल्या अल्पकालावधीत या मतदारसंघातील मतांचे गणित सोडविणे त्यांना जड जाईल, असे चित्र आहे. बसपाच्या उमेदवाराचा करिश्मा मर्यादित असल्याने हा उमेदवार सहा विधानसभा मतदारसंघातील बसपाचे कॅडरबेस मतं स्वत:कडे खेचून आणण्यात यशस्वी होईल का, याबाबत साशंकता आहे.

भावना गवळी या पाचव्यांदा लोकसभा निवडणूक लढवित आहेत आणि यापूर्वी त्या दोनवेळा वाशिम लोकसभा मतदारसंघातून आणि दोनवेळा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून अशा चार टर्म खासदार झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या अनुभवाच्या तुलनेत माणिकराव ठाकरे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत. माणिकराव ठाकरे २००४ मध्ये दारव्हा विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर ते यावेळी पहिल्यांदाच जनतेला सामारे जात आहे. खासदारकीसाठी स्पर्धेत असलेले हे दोन्ही उमेदवार कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे यावेळी कुणबी मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे. पोटजातींचा विचार केला तर माणिकरावांच्या बाजूने पारडे जड आहे. शिवाय भावना गवळी यांच्याबाबत सध्या मतदारसंघात असलेली नाराजी आणि समाज माध्यमांमधून सुरू असलेला ‘ताई आता घरी बसा’ हा अपप्रचार माणिकराव ठाकरे यांच्या पथ्यावर पडणारा आहे. माणिकराव ठाकरे यांनी वाशिमपासून राळेगावपर्यंत सर्व सहाही विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर विरोधी गटांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. नामांकन दाखल केल्यानंतर काँग्रेस आघाडीने केलेल्या शक्तीप्रदर्शात काँग्रेसमधील सर्व गट-तट एका मंचावर आले होते.

दुसरीकडे भावना गवळी यांना पक्षांतर्गत दगाफटक्याची चिंता सतावत आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासोबत झालेल्या बेबनावाची किंमत आपल्याला या निवडणुकीत चुकवावी तर लागणार नाही ना, या काळजीतून संजय राठोड यांच्यासह त्यांच्या समर्थकांना गोंजारण्याचे सर्व प्रयत्न भावना गवळींकडून सुरू आहेत. ‘इलेक्शन मॅनेजमेंट’ विषयात माणिकराव ठाकरे आणि भावना गवळी हे दोन्ही उमेदवार सध्या इतरांवर अवलंबून आहे. त्यामुळे व्यवस्थापन विषयात दोन्ही उमेदवारांचा गोंधळ सुरू आहे. त्यातून नाराजांची संख्या वाढण्याचा धोका वाढत आहे. नियोजनाअभावी छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांना स्वत:ला गुंतून पडावे लागत आहे. परिणामी यवतमाळ व दिग्रस मतदारसंघ वगळता वाशिम, कारंजा, पुसद आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघात ताईंना पुढल्या दहा दिवसात सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. तर या सहाही विधानसभा मतदासंघात कुणबी, मराठा समाजाच्या मतांसह मुस्लीम, दलित मतांचे ध्रुवीकरण करण्यात माणिकराव ठाकरेंनी सध्यातरी आघाडी घेतली आहे. शिवाय पुसद मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते आ. मनोहरराव नाईक यांनीही माणिकराव ठाकरेंना बंजारा मतांची हमी दिली आहे. बंजारा मते वळविण्याची ताकद असलेले संजय राठोड यांनी आपण दिग्रस मतदारसंघात ताईंना मताधिक्य मिळावे म्हणून कोणतीही कसर बाकी सोडणार नाही. मात्र इतर मतदारसंघाची जबाबदारी घेऊ शकत नाही, असा सावध पवित्रा घेतला आहे. यामुळे भावना गवळी यांच्यासमोरील आव्हानं वाढली आहेत.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात असलेली आदिवासी समाजाची ६० हजारांवर मतेही दरवेळी निर्णायक भूमिका वठवितात. त्यामुळे माणिकराव ठाकरेंनी काँग्रेसमधील अंतर्गत विरोध थोपविल्याचे चित्र दिसत असले तरी आजपर्यंत त्यांच्यामुळे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष  दुखावलेले शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके हे दोन्ही नेते आदिवासी मतांसाठी आतून काय भूमिका घेतात, हेही महत्वाचे ठरणार आहे. हे दोन्ही नेते आपल्या राजकीय भवितव्यासाठी यावेळी पक्ष किंवा माणिकरावांना दगा देणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवाय गेल्या १० वर्षांपासून परजिल्ह्यातील उमदेवारालाच खासदार बनविले, यावेळी गृहजिल्ह्यातील उमेदवाराला संधी देऊ, असा मतप्रवाह यवतमाळ जिल्ह्यात वेगाने पसरत आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील राजकारणातून हद्दपार झालेले कुणबी नेतृत्व माणिकराव ठाकरे यांच्या संसदेतील प्रवेशाने पुन्हा जिवंत करण्याचा मनसुबाही कुणबी, मराठा समाजातून व्यक्त होत आहे. त्यामुळे सध्यातरी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात आघाडी विरूद्ध युती आणि कुणबी विरूद्ध कुणबी उमदेवार अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत.

(टीम मीडिया वॉच)

Previous articleनागपूरच्या लढतीकडे देशाचे लक्ष
Next articleकारावासातून कारावासाकडे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here