९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट

मला (बि)घडवणारे चित्रपट

– सानिया भालेराव

२०१८ सालातला सगळ्यात उत्तम प्रेमपट जर कुठला असेल तर तो म्हणजे प्रेम कुमार दिग्दर्शित विजय सेतुपती आणि त्रिशाचा मूळ तमिळ भाषेतला चित्रपट ‘९६’. गेल्या कित्येक वर्षात इतकी सुंदर लव्ह स्टोरी मोठ्या पडद्यावर बघितल्याचं आठवत नाही. मेलोड्रॅमॅटिक सार्कमस्टेन्सस मुद्दामून टाकून ओढून ताणून प्रेम दाखवायच्या फंद्यात हा चित्रपट पडत नाही. कोणत्याही सिन मध्ये शरीराला साधा स्पर्श न करता, हा चित्रपट पार मनाच्या डोहात खोल जात राहतो.. मोहरुन टाकणारा अनुभव. ज्यांनी प्रेमाच्यापुढे जाऊन प्रेम अनुभवलंय, ज्यांच्या मनात प्रेमाची ज्योत मंदपणे तेवत आहे आणि ज्यांना वेगळं, चौकटीत न बसणारं, शांत आणि संयमी प्रेम कहाणी अनुभवायला आवडेल.. त्या सगळ्यांसाठी हा चित्रपट!

दोन शाळकरी मुलं…मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात. प्रेम म्हणजे काय हे देखील न समजण्याचं ते वय खरंतर. पण बंध जुळायचे असले की मग बाकीचं काही महत्वाचं राहत नाही. पुढे त्यांची ताटातूट होते आणि पुलाखालून पाणी वाहून गेलेलं असतं. राम (विजय सेतुपती) आपल्या लहानपणीच्या गावाला भेट देत असताना .. त्याला त्याची शाळा दिसते आणि जुन्या आठवणी जाग्या होतात. मग शाळकरी मित्रांचा ग्रुप बनतो, आणि रियुनियनचा बेत आखल्या जातो. शाळेतल्या मित्रांची रियुनियन ठरते आणि आपली ओळख होते विजयची. हॅपी गो लकी, सगळ्यांच्या आवडता, एक चांगला फोटोग्राफर, वेगवेगळी ठिकाणं धुडांळणारा, कुल विजय. भेटीत सगळ्यांच्या गप्पा चालू असताना अचानक जानू ( त्रिशा) .. त्यांची मैत्रीण येणार आहे हे समजतं आणि विजयचा चेहेरा मोहरा बदलतो. हा तोच का असा आपल्याला प्रश्न पडावा इतपत. जानू येते, हा तिच्या समोर येण्याचं टाळतो. भेट होते, या वयातही याच्या धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके आपल्याला ऐकू येतात. रियुनियन संपते. हिची फ्लाईट पहाटेची असते , तिकडे नवरा आणि मुलगी वाट पाहत असतात. विजय आणि जानू यांच्याकडे फक्त काही तास असतात गेल्या १५ ते २० वर्षांच्या काळात काय निसटलंय याची पडताळणी करायला… पुढची गोष्ट मी सांगितली तरी समजणार नाही कारण ती फक्त पाहावी आणि अनुभवावी अशीच आहे.

चित्रपट संथ गतीत चालतो, खूप छोट्या छोट्या प्रसंगातून अव्यक्त प्रेम आपल्याला ऐकू येत, दिसतं, फील होतं. तुझ्यावर प्रेम आहे असं एकदा पण सांगता येऊ नये? तिच्या ताटातून जेवताना, तिच्या चमच्याने घास घेताना तो ज्या काही भावाने खातो ते पाहूनच मनात कालवाकालव होते. इतकं निर्मळ प्रेम.. प्रेम असूनही कित्येकदा अशा काही घटना घडतात की अपार प्रेम करणाऱ्या दोन जीवांना ठरवूनही एकत्र होता येत नाही. हे प्रेम भडक, जो भी बीच मैं आयेगा उसको मार गिराऊंगा टाईप्स, प्रेमाचे गोडवे गाणारं, विरहाचं दुःख करणारं, शेवट शरीरापर्यंत होणारं नसतं.. सांगण्या, बोलण्या आणि समजण्याच्या पलीकडचं असतं ते. चित्रपटातली गाणी अप्रतिम आहेत. त्यात ‘इरविंगु थेवाय’ हे चिन्मयी श्रीपदा ने म्हटलेलं गाणं, त्याचा अर्थ हा निव्वळ अप्रतिम असाच आहे. चित्रपटाचं सार याहून चांगल्या पद्धतीने सांगता येणं अशक्य आणि म्हणून हा गाण्याचा स्वैर अनुवाद!

மலைகளின் நதிபோல் மனம் வழிந்து வந்தாய்
வருண்டிடும் நிலத்தில் பல கடல்கள் தந்தாய்….

जशी नदी निखळपणाने पर्वतावरून वाहत येते तसा आनंदाचा झरा घेऊन तू माझ्या आयुष्यात आलास …
आणि माझं आयुष्य जे रखरखीत वाळवंटासारखं होतं त्यात तू आनंदाचा समुद्र घेऊन आलीस…
आता तुझ्याबरोबर घालवलेल्या क्षणांची स्वप्न मला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतील……

काळाने कित्येक अडथळे आणले आपल्या एकत्र येण्यामध्ये …
एक दिवस जरी मी तुझ्याशिवाय जगले तर ते आयुष्य.. आयुष्य म्हणून राहील का?
माझं आयुष्य तू आहेस.. तू जवळ राहा.. माझा आत्मसुद्धा आता तुझ्यात वसला आहे..
मी तुझ्याकडे येऊ शकेल असं कधी होईल का?

तुझ्याशिवाय दिवस उगवला की माझं हृदय रोज सकाळी जागं होतं आणि दिवस बुडेस्तोवर कोलमडून पडतं..
पण असं असताना सुद्धा हृदय माझ्या आत्म्याला तुझ्या विचारांनी भरून टाकतं आणि मग तू माझ्या आयुष्यात काही काळासाठी का होईना पण आलास याचा सोहळा माझं मन अनुभवतं..
झाड उन्मळून पडलं, त्यावरचं घरटं देखील तुटलं तरीही पक्षी त्यांचं गाणं गातच राहतात….
रात्र एकटी असली, थकून ती सरून गेली तरी चंद्र तिची वाट बघतच असतो.

समुद्र आणि आकाश कायम दूर असले तरीही त्यांचं धर्तीवरच मिलन पावसाच्या थेंबातुन होणं अटळ आहे
मी जरी तुझ्यासोबत नसले तरीही माझ्या प्रेमाचा प्रवास तुझ्यापर्यंतच येऊन पोहोचणार …
तू जरी गेलास तरीही तू माझ्यासोबत सदैव राहशील… म्हणूनच तू जा तुझ्या मार्गाने.. माझं प्रेम तुझ्याबरोबर सदैव असेल..

एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे दोन जीव एकत्र राहू शकतील असं होत नाही. त्यांच्या नशिबात तळमळत राहणंच असतं. एकमेकांच्या सहवासाला, स्पर्शाला, सोबत असण्याला ते तरसत राहतात…आयुष्यभर…वर्षामागून वर्ष सरत जातात. प्रेम गडद होत जातं. पण ते दोघे त्यांची आयुष्य एकमेकांना समांतर चालत राहतात.

असं प्रेम जे मिळूनही आपलं झालं नाही, नाही मिळालं तरीही खूप काही देऊन गेलं, मिळालं तरी राहिलं नाही, राहिलं तरी टिकलं नाही, टिकलं तरी पुरलं नाही, पुरलं तरीही उरलं नाही, उरलं तरीही सांभाळता आलं नाही, सांभाळलं तरीही घरंगळत गेलं, गेलं तरीही काहीतरी ठेवून गेलं, ठेवून गेलं तरीही ते साठलं नाही, साठलं तरीही तुंबलं नाही, तुंबलं तरीही वाहत राहिलं, वाहत राहिलं तरी स्तब्ध राहीलं , स्तब्ध राहील तरीही गोठलं नाही, गोठलं तरीही ओलावा दिला, ओलावा दिला तरीही जाळत राहिलं, जाळत राहिलं तरीही थंडावा देत राहिलं, थंडावा दिला तरी श्वास अडकवून गेलं, श्वास अडकवला तरी आत्मा मुक्त करून गेलं, मुक्त केलं तरीही गुंतून ठेवलं, गुंतत गेलं तरीही आपल्या मार्गाने पूढे जायचं बळ देत गेलं, बळ दिलं तरीही आता काही तरी तुटत गेलं, तुटलं तरीही विखुरलं नाही, विखुरलं तरी पुन्हा एकसंध केलं, एकसंध केलं तरी एकटं पडलं, एकटं पडलं तरीही साथ नाही सोडली.. मिळूनही नाही हक्काचं राहील नाही.. आणि न मिळूनही गवसलं.. कायमचं!

असं प्रेम असू शकतं? नितळ, निर्मळ? शरीर उपभोगाच्या पलीकडचं? इतकं पारदर्शक? फक्त आठवणींत रमणारं? दुसऱ्याला त्रास नको म्हणून वेळप्रसंगी स्वतःच्या प्रेमाची आहुती देणारं? एकमेकांची ओढ असूनही त्याबद्दल एक अवाक्षर ही न काढणारं प्रेम! आठवण अनावर झाली तरीही साधं हे सांगू न शकणारं.. इतकं खोल असूनही उपऱ्यासारखं वागायला भाग पडणारं? जवळ जाऊन मला मिठीत घे असं साधं बोलून न दाखवता येणारं? असंख्य चौकटींमध्ये अडकूनही मनात कोणत्याही बंधनाशिवाय फुलणारं, खळाळणारं.. बंद कप्प्यांमध्ये साठत जाणारं.. दिवसागणिक वाढत जाणारं.. जळणारं आणि जळवणारं.. अंगाची, मनाची लाही लाही करणारं, आत्म्याला थंडावा देणारं, अपूर्ण असूनही पूर्णत्व देणारं…अशा बेशकिमती प्रेमासाठी, काळीज चिरून टाकणाऱ्या हळुवार अनुभवासाठी, ढसाढसा रडवून आतून रितं होण्यासाठी.. त्या प्रेमासाठी जरूर पाहावा असा ‘९६’….
Cheers to love that goes beyond everything.. Cheers to being in LOVE..Cheers to 96!

’96’ चित्रपटाची लिंक . अवश्य पाहा-  https://drive.google.com/file/d/15_6frqeryTIoKIlMbS97si5FacybsIRb/view?usp=drivesdk

 

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात .  वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

Previous articleभाषिक चकमकींचा किरणोत्सारी कचरा!
Next articleनाफेरवादी नेहरू
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here