सफल प्रेमाच्या असफल गोष्टी-२
–– सानिया भालेराव
कभी कभार उसे देख लें कहीं मिल लें
ये कब कहा था कि वो ख़ुश-बदन हमारा हो।
परवीन शाकीर ची गझल ती ऐकत होती. डोळयांतून वाहणाऱ्या पाण्याला तिला थांबवता येत नव्हतं. किती वर्षांनी मनाचा तो कप्पा तिने उघडला होता जो मोठ्या जिकीरीने कित्येक वर्ष बंद करून ठेवला होता. असं नाही कि त्याची आठवण तिला कधी आली नाही. तो कायम तिच्या आसपास असायचाच. तिच्या अंतरंगाचा तो कायम एक भाग होताच. अगदी तिच्याही नकळत. पण तिने आयुष्याची चौकट बांधून घेतली होती. जे काही आहे ते आपल्या मनात दडवून ठेवलं होतं तिने. आज इतक्या वर्षांनी तो भेटला. त्या दोघांची नजरानजर झाल्यावर एक फॉर्मलिटी म्हणून कसनुसं स्मित चेहेऱ्यावर आणलं खरं पण त्याच्या नजरेत ती अजूनही स्वतःला शोधू पाहत होती.
आ देख कि मेरे आँसुओं में
ये किस का जमाल आ गया है।
अदा जाफ़रीचा शेर तिला आठवला आणि स्वतःचीच कमाल वाटायला लागली तिला. वर्ष सरून गेल्यावर प्रेमाला एक वेगळीच झाक येते असं तिला कायम वाटायचं. तो तिच्यापासून दूर गेला असला तरीही तिने त्याला स्वतःपासून कधीच दूर जाऊ दिलं नाही.
बरसों हुए तुम कहीं नहीं हो
आज ऐसा लगा यहीं कहीं हो।
जेहरा निगाह ह्यांची गझल ती जेंव्हा गुणगुणायची तेव्हा तोच तिच्या समोर यायचा. त्यामुळे आज त्याला बघितल्यावर मध्ये इतकी वर्ष सरली आहेत हे तिला जाणवलंच नाही. पण तो मात्र खूप तुटक तुटक वागत होता. आणि मग जुने दिवस, जुन्या आठवणींवर बोलता बोलता विषय त्या दिवसांतल्या प्रेमावर येऊन पोहोचलाच . बायकांना प्रेम करताच येत नाही! तो तावातावने बोलत होता.. त्या फक्त स्वतःचा विचार करू शकतात. एका झटक्यात सगळं विसरून जाऊन भातुकलीचा नवीन खेळ बिनदिक्कत रचू शकतात त्या. किती आणि काय काय बोलत होता तो. काही जणं माना डोलवत होते, काही नुसतंच ऐकल्यासारखं करत होते पण त्याची तळमळ पोहोचत होती ती फक्त तिच्याचपर्यंत. केवळ तिलाच त्याच्या शब्दांमधली धग समजत होती आणि गंम्मत म्हणजे जणू तिलाच शब्दांनी घायाळ करण्यासाठी तो आसुसलेला होता. कारण त्याच्या लेखी तिला त्याचे प्रेम कधी समजलेच नाही. सोप्प असतं म्हणे पुन्हा नव्याने भातुकलीचा डाव मांडणं! तिचं मन विचार करायला लागलं. एकदा का साधी भांड्यांवर नावं कोरल्या गेली कि सहजासहजी मिटवता येत नाहीत मग मनावर कोरल्या गेलेलं नाव मिटवता थोडीच येणार आहे ? पण हे सांगूनही त्याला समजणार नव्हतं.. तेव्हाही नाही आणि आत्ताही नाही.
बरंय… इतकी वर्षं माझा द्वेष करण्यात घालवली त्याने. हे प्रेमात झुरण्यापेक्षा बरं आहे .असं म्हणत तिने डोळे पुसले. शांतपणे डोळे मिटले आणि अदा जाफरी ची गझल ऐकत ती बिछान्यावर पडून राहिली.
अचानक दिलरुबा मौसम का दिल-आज़ार हो जाना
दुआ आसाँ नहीं रहना सुख़न दुश्वार हो जाना।
तुम्हें देखें निगाहें और तुम को ही नहीं देखें
मोहब्बत के सभी रिश्तों का यूँ नादार हो जाना।
इकडे तो हॉटेलवर परत आला. जरा जास्तच बोललो आपण असं राहून राहून त्याला वाटतं राहिलं. इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेलं प्रेम कोणाला दिसू नये म्हणून किती धडपड करत होता तो. ते बाहेर जाहीर होऊ नये म्हणून असं उलटं बोलला तो. हेच बरंय.. स्वतःलाच म्हणाला तो. आपण अजूनही तिच्यावर जीवापाड प्रेम करतो हे कळल्यावर अजून त्रास होईल तिला. त्यापेक्षा हे ठीक आहे. रात्र अधिकच गहिरी होत चालली होती. त्याने रोजच्या सवयी प्रमाणे आपली डायरी काढली. त्यात ठेवलेल्या तिच्या जुन्या फोटोवरुन हलकेच एक हात फिरवला. खाली तिच्या आवडत्या जेहरा निगाह यांची एक नज्म लिहिली होती. तो त्यातल्या एक एक शब्दावरून हळुवार बोटं फिरवत राहिला….
वहशत में भी मिन्नत-कश-ए-सहरा नहीं होते
कुछ लोग बिखर कर भी तमाशा नहीं होते।
जाँ देते हैं जाँ देने का सौदा नहीं करते
शर्मिंदा-ए-एजाज़-ए-मसीहा नहीं होते।
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे .)
……………………………………………………………………………………………………..
हे सुद्धा नक्की वाचा -दिल धडकने का सबब याद आया http://bit.ly/2D28ktu
Very good