सफल प्रेमाच्या असफल गोष्टी-५
–– सानिया भालेराव
तास संपल्याची बेल झाली. तिने लेक्चर संपवलं. तेवढ्यात एक विद्यार्थिनी एक गझल घेऊन आली तिच्याकडे आणि ती गझल आम्हाला अर्थसहित सांगा म्हणून मागे लागली. अदा जाफरी ची गझल … ती नाही कसं म्हणू शकणार होती … तिने वाचायला सुरवात केली.
उजाला दे चराग़-ए-रहगुज़र आसाँ नहीं होता
हमेशा हो सितारा हम-सफ़र आसाँ नहीं होता
रस्त्यामधला दिवा दरवेळेस उजेड देईल हे नेहेमी सहज शक्य नसतं आणि ताऱ्याची नेहेमी सोबत होईल हेही सहजासहजी शक्य नसतं…. आयुष्याच्या प्रवासात आपली साथ देणारा सोबती मिळेलच असं नाही, प्रत्येकाच्या नशिबात तारा येईल आणि तो आयुष्य उजळून टाकेल असं होत नाही.
जो आँखों ओट है चेहरा उसी को देख कर जीना
ये सोचा था कि आसाँ है मगर आसाँ नहीं होता
जो चेहेरा मी माझ्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवला होता फक्त त्यालाच बघून जगायचं असं ठरवलं होतं तेंव्हा वाटलं होतं कि सोपं असेल पण ते तेवढं सोपं नाहीये… कित्येकदा आपण एखादा चेहेरा मनात अगदी कोरून ठेवतो आणि त्याच्याच आठवणीत पूर्ण जीवन व्यतीत करायचं असतं आपल्याला पण हे जे वाटतं तितकं सोप्प नसतं. असं आयुष्य कंठणं म्हणजे खूप यातना घेऊन जगावं लागतं.
बड़े ताबाँ बड़े रौशन सितारे टूट जाते हैं
सहर की राह तकना ता-सहर आसाँ नहीं होता
मोठे मोठे चमकणारे, झगमगणारे तारे तुटून पडतात ,रात्री पासून उजेडाची वाट बघणं सोपं नसतं कित्येकदा आयुष्याच्या प्रवासात आपल्याला वाटत असणारे सहारे गळून पडतात, अश्या वेळेस आपल्याला केवळ उजाडण्याची वाट पाहावी लागते. अधःकारापासून उजेडापर्यंत जाण्याचा हा प्रवास सोपा नसतो.
अँधेरी कासनी रातें यहीं से हो के गुज़रेंगी
जला रखना कोई दाग़-ए-जिगर आसाँ नहीं होता
इथूनच अंधारी रात्र सुरु होते, अश्या वेळेस आपल्या अंतःकरणात एखाद्या व्रणाला तेवत ठेवणं सोपं नसतं. फार सुंदर अश्या ह्या ओळी. कित्येकदा आयुष्यात असे प्रसंग येतात कि सगळ्या बाजूने अंधारून येतं, अगदी आपलं प्रेम आपल्यापासून दूर जायला लागतं.. अश्या वेळी आत्म्यातल्या एखाद्या जखमेच्या व्रणाला धगधगतं ठेवणं आणि त्यातून प्रकाशमान होणं सोपं नसतं. काही दुःख , वेदना सतत धगधगत्या ठेवायच्या असतात कारण त्यांच्यापासून कित्येकदा प्रकाश मिळवायचा असतो.
किसी दर्द-आश्ना लम्हे के नक़्श-ए-पा सजा लेना
अकेले घर को कहना अपना घर आसाँ नहीं होता
कुठल्या तरी दुखऱ्या क्षणाच्या पाऊलखुणा सजवून ठेवणं आणि एकट्या ओसाड घराला आपलं घर म्हणणं सोपं नसतं. दुःखाची नाजूक किनार कित्येकदा यातना देखण्या बनवते. काही दुःख इतकी बेशकिमती असतात कि त्यांना मनाच्या कोंदणात अगदी सजवून ठेवायचं असतं. तसंच काहीसं एकटेपणाचं असतं. आपणच आपली सोबत करणं वाटतं तेवढं सोपं नसतं.
जो टपके कासा-ए-दिल में तो आलम ही बदल जाए
वो इक आँसू मगर ऐ चश्म-ए-तर आसाँ नहीं होता
हृदयामध्ये एकदा पडल्यावर पूर्ण मौसम बदलून जाईल पण अनमोल असा एक अश्रू भरलेल्या डोळ्यातून ओघळण सोप्प नाही. सगळीच दुःख माणसाला झळाळून टाकत नाहीत. आयुष्यात एकदाच फक्त असा तो येतो कि ज्याच्या जाण्याने एक अतोनात दुःख मनात कोरल्या जातं. असं दुःख कि ज्यामुळे पाण्याचा एक थेंब जरी डोळ्यातून ओघळून पडला तरीही दुख चार चाँद लावून जातो.
गुमाँ तो क्या यक़ीं भी वसवसों की ज़द में होता है
समझना संग-ए-दर को संग-ए-दर आसाँ नहीं होता
अविश्वास आणि विश्वास ह्या दोनीही गोष्टी लहरीच्या अखत्यारीत असतात. घराच्या उंबरठ्याला तो उंबरठा आहे हे समजून वागणं सोपं नसतं. प्रत्येका नात्याला सीमा असतेच. अगदी जीवापाड प्रेम केलं तरीही त्याच्या मर्यादा असतातच. अगदी जिवाभावाच्या नात्यातही आपली पायरी ओळखून राहता आलं पाहिजे.
न बहलावा न समझौता जुदाई सी जुदाई है
‘अदा’ सोचो तो ख़ुश्बू का सफ़र आसाँ नहीं होता
ना शांतता ना तडजोड वियोग हा फक्त वियोगासारखा असतो. विचार केला तर हा सुगंधाचा प्रवास सोपा नाहीये. इथे शायरा ला म्हणायचं आहे कि ताटातूट ही नेहेमीच जीवघेणी असते. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या पासून दूर राहण्याचं दुःख हे खूप त्रासदायक असतं. पण हा वियोग खऱ्याअर्थाने एक प्रवासच आहे जणू. असा प्रवास जो आत्म्याला सुगंधित करतो. आपल्याला आंतर्बाह्य बदलून टाकतो.
तिचा गळा दाटून आला होता. वर्गात शांतता पसरली होती. जणू कोणाला काळ वेळाचं भान राहिलं नव्हतं. तिच्या डोळ्याची किनार ओली झाली . ती मंद हसली आणि पुढच्या वर्गात तास घ्यायला निघाली.
त्याने बॅग उघडली. त्याच्या आवडत्या ब्लॅक कॉफीचे घुटके घेत त्याने कपडे कपाटात लावायला सुरवात केली. तिला कधीच आवडली नाही ब्लॅक कॉफी. जेव्हा जेव्हा तो कॉफी प्यायचा तेव्हा तेव्हा ती नाक मुरडून कसं काय पितोस बाबा तू हे? असं न चुकता म्हणायची.त्याचा आवडता निळा शर्ट नव्हता त्यामध्ये. त्याने बॅग पूर्ण रिकामी केली. पण शर्ट सापडला नाही. करावा का तिला फोन? कदाचित तिच्याकडे राहिला असेल….. नको.. तिच्याकडे चुकून राहिला असला तरी एव्हाना तिने तो टाकूनही दिला असेल! असं म्हणून स्वतःशीच हसला तो. जाऊदे नवीन शहर , नवीन सुरवात. तो आयुष्य नव्याने जगायच्या तयारीला लागला.
गर बाज़ी इश्क़ की बाज़ी है जो चाहो लगा दो डर कैसा
गर जीत गए तो क्या कहना हारे भी तो बाज़ी मात नहीं
फ़ैज चा शेर पहिल्याच भेटीत तिने म्हटला आणि तो तिच्यावर फिदा झाला होता. ती प्रेमात पडली तेंव्हा सगळं जग तिला निराळं भासू लागलं. सुरवातीला नवीन प्रेम, सगळंच नवं आणि हवं हवंसं वाटणारं! पण कालांतराने हेच प्रेम त्याला जबाबदारी वाटायला लागली. त्याच्या आणि तिच्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज बदलत गेल्या फरक फक्त एवढाच होता की त्याचं जग विस्तारात गेलं आणि तिचं जग त्याच्या भोवती गुरफटत गेलं.
उस से मत कहना मिरी बे-सर-ओ-सामानी तक
वो न आ जाए कहीं मिरी परेशानी तक… (इन्दिरा वर्मा)
कोणतीही अडचण ती आधी स्वतःवर घ्यायला तय्यार होती. जणू काही मार्गात येणारं प्रत्येक दुःख, यातना तिला स्वतः चाळून मग त्याच्या पर्यंत पोहोचवायच्या होत्या. त्याला एका शब्दाने सुद्धा दुखवायला तिला आवडायचं नाही. पण कदाचित तिचं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. तो एकदिवस अचानक सगळं मोडून निघाला. ती आतून कोलमडून पडली. खरंतर त्याने जाऊ नये म्हणून ती काहीही करायला तयार होती. पण आपल्यात आता प्रेम उरलं नाही असं तो कोरडेपणाने म्हणला आणि ती जागीच खिळून राहिली.
उस के यूँ तर्क-ए-मोहब्बत का सबब होगा कोई
जी नहीं ये मानता वो बेवफ़ा पहले से था
परवीन शाकिर चा हा शेर नव्याने जणू कळला होता तिला. कधी कधी एखाद्यावर आपण एवढं प्रेम करतो कि त्याचे सगळे गुन्हे आपण माफ करतो. तसंच तिचं काहीसं झालं होतं. तिला कळत होतं कि इतकं प्रेम करणं काही फायद्याचं नाही पण अगदी तरीही प्रेम करण्यावाचून दुसरं काही येतंच नव्हतं तिला जणू. तिला त्याला सांगावसं वाटलं होतं कि मला तुझ्याकडून कधीच कुठलीच अपेक्षा नव्हती. अगदी तू माझ्याबरोबर राहावं ही देखील नाही. पण तो तिचं प्रेम समजू शकलाच नाही. आपण नात्याच्या जंजाळात अडकू शकतो ही भीती त्याला वाटायला लागली कदाचित. आणि म्हणूनच तिचं प्रेम त्याला ओझं वाटायला लागलं. कधी कधी आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो पण त्याची गेहराई त्याला सुद्धा समजत नाहीच. अश्या वेळेस हातात काहीही उरत नाही. रस्ते वेगळे झाले, सोबत संपली तरीही प्रेम राहतंच आणि दोघांपैकी एक जर त्याच्या वाट्याचं प्रेम रस्त्यात टाकून गेला आणि दुसऱ्याने ते प्रेम आपल्या ओंजळीत भरलं तर ते अधिकच गडद होत जातं.
आज रविवार. ती बाल्कनीमध्ये येऊन बसली आणि नेहेमीप्रमाणे हळुवार हाताने निळा शर्ट हँगर ला अडकवला. त्याच्यावरून सवयीप्रमाणे हात फिरवला. त्याच्या सुताचा स्पर्श आता तिच्या अंगवळणी पडला होता आता. ब्लॅक कॉफीचे घुटके घेता घेता परवीन शाकिरची गझल ऐकत ती सूर्यास्त पाहत राहिली.
दुआ का टूटा हुआ हर्फ़ सर्द आह में है
तिरी जुदाई का मंज़र अभी निगाह में है [हर्फ़- दोष/ ठपका]
तिरे बदलने के बा-वस्फ़ तुझ को चाहा है
ये ए’तिराफ़ भी शामिल मिरे गुनाह में है [ ए’तिराफ़-कबूल करणे ]
अज़ाब देगा तो फिर मुझ को ख़्वाब भी देगा
मैं मुतमइन हूँ मिरा दिल तिरी पनाह में है [अज़ाब- पीडा /क्लेश, मुतमइन- स्थिरचित्त, समाधान ]
जिसे बहार के मेहमान ख़ाली छोड़ गए
वो इक मकान अभी तक मकीं की चाह में है [ मकीं- निवासी/रहिवासी]
यही वो दिन थे जब इक दूसरे को पाया था
हमारी साल-गिरह ठीक अब के माह में है
मैं बच भी जाऊँ तो तन्हाई मार डालेगी
मिरे क़बीले का हर फ़र्द क़त्ल-गाह में है [ फ़र्द- प्रत्येक जण, क़त्ल-गाह- कत्तलखाना]
-लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे .)
[email protected]
……………………………………………………………………………………………………
हे सुद्धा नक्की वाचा –
कुछ दर्द कलेजे से लगाने के लिए हैं… http://bit.ly/2W9rbdN
बे-मोहब्बत ख़ुदा नहीं मिलता…. http://bit.ly/2DpsbCS
दिल धडकने का सबब याद आया http://bit.ly/2D28ktu
कुछ लोग बिखर कर भी तमाशा नहीं होते http://bit.ly/2X9YRIa