व्यवहारज्ञानाचे नियम झुगारून प्रेम करणाऱ्या प्रेमिकांसाठी -‘सिड्युसिंग मिस्टर परफेक्ट’

मला (बि)घडवणारे चित्रपट- ७

– सानिया भालेराव

बरेचसे कोरियन चित्रपट अतिशय संवेदनशील आणि वूमन सेंट्रिक आहेत. प्रेम कसं दाखवायचं हे त्यांना पक्कं कळलेलं आहे. रोमँटिक जॉनर मध्ये मोडणारे विंडस्ट्रक, लव्ह फोबिया ,मोर दॅन ब्लू,माय सॅसी गर्ल, माय लिटिल ब्राईड असे कित्येक हाय इमोशनल कोशंट असलेले कोरियन चित्रपट आपल्याला वेडं करून सोडतात. पण आज मी ज्या चित्रपटाबद्दल लिहिणार आहे तो आवडायला एका विशिष्ट वयाच्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये जर आपण आलो तरच हा चित्रपट आवडू शकेल . म्हणजे जर तुमचं दिल पागल आहे आणि तुम्ही १८ ते २५ ह्या यडपट वयात येऊन हा चित्रपट बघू शकलात तर आणि तरच तुम्हाला हा चित्रपट आवडू शकेल. सो जिनका दिल जवान है त्यांनीच हा चित्रपट पाहावा. हा चित्रपट आवडण्याचं एक मोठ्ठ कारण म्हणजे ह्या चित्रपटाचा हिरो – डेनियल हेनी . मला आजतागायत इतका कॅड फक्त “सोमणांचा मिलिंद” वाटायचा. त्यानंतर आता “हेनींचा डेनियल” ! कोरियन ऍक्टर फार रेअरली इंग्लिश मध्ये इतकं छान बोलतात. हा पठ्ठया तर संपूर्ण चित्रपटात डायलॉग्स मस्त इंग्लिश मध्येच म्हणतो. सो सांगायचा मुद्दा असा कि ह्या डेनियलमुळे या चित्रपटाला झुकतं माप मिळालं आहे . चित्रपट आहे “सिड्युसिंग मिस्टर परफेक्ट “!

ही गोष्ट आहे मिस्टर रॉबिन हेडन ( डेनियल हेनी) आणि मिन जून ( Uhm Jung-Hwa) ची . मिन जून हि खूप गोड ,साधी आणि प्रेमळ तरुणी. ती ज्या ऑफिसमध्ये काम करत असते तिथे येणाऱ्या नवीन बॉसबद्दल सगळेच उत्सुक असतात. नेमकी त्याच दिवशी तिच्या आणि एका माणसाच्या गाडीची टक्कर होते , थोडी शाब्दिक चकमक होते . तोच असतो तिचा नवीन बॉस. हुशार , हँडसम आणि कोल्ड ब्ल्डेड रॉबिन! मिन जून च्या आयुष्यात एकच प्रॉब्लेम असतो . तिच्या प्रत्येक रिलेशनशिपमध्ये तिला तिचा पार्टनर दगा देऊन दुसऱ्या मुलीबरोबर जात असतो. ही प्रत्येक वेळेस प्रेमात आकंठ बुडत असते. साधं सुधंप्रेम नसते करत ही बया. पार प्रेमात येडी होत असते . म्हणजे बॉयफ्रेंडसाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवणे , भांडण झालं तर पहिले सॉरी म्हणणे , त्याच्यासाठी नवीन वस्तू , कपडे आणणे , मुव्ही , हॉटेलचे पैसे आपणच देणे , तो तिचा वाढदिवस विसरला तरी त्याचा वाढदिवसाला मस्त साजरा करणे, त्याने नोकरी सोडली तर हिनेच त्याला पैसे देणे आणि अशा अगणित गोष्टी ती प्रेमासाठी करते . तरीही मुलं कालांतराने हिला सोडून जातात आणि ही आपलं टूटा दिल घेऊन रडत बसते. असं नेहेमी होत असतं. तर एक दिवस रॉबिन आणि डेनियल कामावरून एकत्र गाडीने परतत असताना ही सतत कोणाला तरी फोन लावत असते. फोन लागत असतो पण फोन कोणी उचलत नसतो. शेवटी तिचा फोन मुद्दामून कट केला जातो . तिला विचारल्यावर ती सांगते कि मी माझ्या बॉयफ्रेंडला कॉल करते आहे पण तो कदाचित बिझी आहे . ह्यावर रॉबिन म्हणतो कि तो तुला टाळतो आहे एवढं साधं तुला कळत नाही ? हिला राग येतो आणि ती त्याला म्हणते कि त्याचा आज वाढदिवस आहे . मी सगळी तयारी केली आहे तो नक्की येईल आणि चिडून घरी जाते . तो काही येतच नाही .

दुसऱ्या दिवशी ही एका कॅफेमध्ये रॉबिनची वाट बघत बसली असताना हिला तो बॉयफ्रेंड एका दुसऱ्याच मुलीबरोबर दिसतो . ही संतापाच्या भरात खूप तमाशा करते पण तो तिच्या बरोबर येत नाही आणि सगळ्यांसमोर तिचा हशा होतो . रॉबिन हे सगळं बघतो आणि तिला म्हणतो की तुला प्रेमाच्या खेळातले नियम माहित नाहीयेत . तू प्रेमात गुलाम होऊन जातेस आणि म्हणून मुलं तुझा फायदा घेऊन तुला सोडून जातात. तुझा पायपुसण्या सारखा वापर करतात. हा खेळ जिंकण्यासाठी तू खेळतच नाहीस . पहिला फोन करणारी. गिफ्ट देणारी , जेवणाचे पैसे देणारी, प्रेमाची गरज दाखवणारी नेहेमी तूच ठरतेस. तुला साधे नियम माहित नाहीत . तू तुझी सेल्फ रिस्पेक्ट गहाण ठेऊन डेट करतेस . तू असंच पथेटिक वागत राहिलीस तर पुरुषांकडून अशीच कचऱ्यासारखी वागवली जाशील . ह्यावर रडत रडत मिन जून म्हणते ,माझी माफी माग . तो म्हणतो मी कधीच कोणाची माफी मागितली नाहीये आजवर . मी कशाबद्दल माफी मागू ? ती म्हणते, तू मला हे सगळं बोललास म्हणून ! प्रेमाची कबुली देण्यात काय चूक आहे ? जर त्याला आवडतं म्हणून मी जेवण बनवलं , त्याची आवड लक्षात ठेऊन गिफ्ट दिलं , त्याला गरज असताना त्याला पैसे दिले , भांडण लवकर मिटावं म्हणून मी पहिले सॉरी म्हणाले ..ह्याच्याने मी मूर्ख ठरणार असेल तर आहे मी मूर्ख . मी ठरवलं तर माझ्या बरोबर राहण्यासाठी पुरुषांची लाईन लागेल .पण मी तसं वागत नाही .

ह्यावर तो म्हणतो अस्सं ? मग मला तुझ्याबरोबर राहावसं वाटेल ह्यासाठी मला भाग पाडून दाखव . तू जर असं केलंस तर मी सॉरी म्हणेन तुला!

झालं तर मग . मिन जून बाई लागतात कामाला . चांगले कपडे , मेक अप , केबिनची आवराआवरी , चांगलं जेवण, छोटे कपडे तिचे सगळे डाव असफल होतात. पण हळूहळू रॉबिन तिच्याजवळ यायला लागतो आणि तिचा भोळसट , प्रेमळ स्वभावाचीच त्याला भुरळ पडते . पण तेवढ्यात मिन जूनचा बॉयफ्रेंड परत येतो आणि त्याला जिंकण्यासाठी ती रॉबिनकडेच मदत मागते. तो तिला मदत करतो हि आणि तिचा बॉयफ्रेंड तिला परत मिळतो. इकडे रॉबिनची मैत्रीणही वापस येते आणि मिन जून ला फटकारून टाकते . पुढे काय होतं , रॉबिन आणि मिन जून आपल्या प्रेमाची कबुली देतात का ह्यासाठी हा चित्रपट बघाच. इंग्लिश सबटायटल्स असलेली प्रिंट युट्युबवरआहे . त्याची लिंक कॉमेंट मध्ये देते आहे . वर म्हटल्या प्रमाणे अगर अब भी किसीके लिये आपका दिल धडकता है तो यह मुव्ही आपको अच्छी लगेगी !

ह्याच धर्तीवर ह्या आधीही चित्रपट निघाले होते . त्यातला माझ्या मिलिंद सोमणचा “रुल्स” हा एक . त्यात तर सरळ सरळ वशीकरणाचे नियमच दिले होते . तनुजाने मस्त दादी रंगवली होती . विल स्मिथचा हिच होताच . असं जरी असलं ह्या चित्रपटात मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे प्रेमाबद्दल दाखवलेला दोघांचा परस्पेक्टिव्ह! रॉबिन म्हणतो तसं खरंच प्रेमाच्या ह्या खेळात नियम असतात का? कोण पहिले हत्यार टाकतं ह्या वरून कोणाचं नाणं चालणार हे ठरतं का? आपली अगतिकता दाखवली तर आपलं प्रेम गृहीत धरलं जातं का ? अगदी प्रेम मुरलं , लग्न वगैरे झालं तरी आपण कित्येकदा पाहतो कि दोघांमधला एक गिव्हर असतो आणि एक टेकर असतो. एक पार्टनर सतत देत राहिला कि त्याचं देणं , प्रेम करणं गृहीत धरलं जातं . हे काय नेहेमीचंच असं हळूहळू वाटायला लागते . त्या देण्याची , प्रेमाची सवय होऊन जाते. मग त्याबद्दल पहिले असलेलं अप्रूप कमी होत जातं आणि प्रेम अंगवळणी पडून जातं. हेच बघा ना … जर दोन जोडपी आहेत . त्यातलं पाहिलं जोडपं . नवरा खूप जॉली . बायकोबरोबर मस्त फिरतो , बाहेर खातो मज्जा करतो . याउलट दुसरं जोडपं . नवरा खडूस . नवसाने बाहेर नेणारा . त्याने सहा महिन्यात एकदा जरी बाहेर जेवायला नेलं तरी बाई धन्य! मग अश्या वेळी असं वाटतंच ना कि हातचं राखून प्रेम केलेलं बरं. जास्त करू नकोस नाहीतर डोक्यावर चढेल असं वाक्य सर्रास बोलल्या जातं . मला फार नवल वाटतं ह्याचं. हे जास्त म्हणजे नक्की काय असतं? झोकून देऊन प्रेम करणं,स्वतःहून जास्त दुसऱ्याचा विचार करणं, देव, धर्म , पैसा हे सगळं दुय्यम वाटावं असं प्रेम करणं खरंच अगतिक बनवतं का ? रंग रूप ह्या पलीकडे जाऊन आपला जोडीदार जसा आहे तसं त्याला स्वीकारणं ह्याला प्रेम न म्हणता निव्वळ मूर्खपणा म्हणणारे बरोबर आहेत का?

व्यवहार ज्ञानाचे, सामाजिक स्थैर्याचे,सो कोल्ड सौंदर्याचे , सोशिकतेचे नियम लावून ठरवलेली नाती खऱ्या अर्थाने टिकतात का? शेवटी आत्म्यापर्यंत पोहोचतं ते काय असतं? तुमच्या जोडीदाराचा बँक बॅलेन्स , घर -गाडी , सौंदर्य – फिजिकल अपिअरन्स की त्याने तुमच्यावर केलेलं निस्सीम प्रेम? जर मनाच्या आनंदाच्या कप्प्यांमध्ये आठवणींच्या कुप्या शोधायच्या झाल्या तर अनुभूतीची कुठली कुपी सापडेल?… एका पॉश रेस्टरॉंटमध्ये खाल्लेलं चविष्ट जेवणं की भल्या मोठ्या गाडीतून मारलेली चक्कर की महागड्या शोरुम मधून घेतलेली साडी, शर्ट,दागिने की जोडीदाराच्या मिठीत घालवलेले ते क्षण, नुसताच हातात हात धरून केलेला संवाद, बोलताना ओघळलेला अश्रू त्याने चटदिशी पुसलेला तो क्षण आणि दुसऱ्या सेकंदाला आपल्या ओठावर पसरलेलं ते हसू … ह्यातलं काय बरं सापडेल त्या कुपीत? एखाद्या जीवाला पॉश हॉटेलातलं जेवण किंवा दागिनाही सापडू शकतो. त्या गरीब बिचाऱ्या जीवाला प्रेम गवसलंच नसणार कधी! पण ज्यांना गवसलं आहे त्यांना आलेल्या अनुभूती वेगळ्याच! प्रेमातही नियम लावणाऱ्या, प्रेमात हृदयाने परत मार न खावा ह्या साठी धडपडण्याऱ्या रॉबिनला भावतो तो मिन जून चा साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव. प्रेमाने सगळ्या गोष्टी जिंकता येतात असं म्हणतात ते उगाच नाही. खरं प्रेम कधीच दुर्लक्षित राहत नाही. कदाचित ते त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला वेळ लागेलही पण निस्वार्थी मनाने केलेलं प्रेम हे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं हे नक्की. ती व्यक्ती कदाचित ते कबूलही करणार नाही. पण ते प्रेम त्या व्यक्तीच्या आत्म्याभोवती रुंजी घालत राहील हे नक्की. प्रेम हे युनिवर्सल सोल्युशन आहे सगळ्या अडचणींसाठी! किती आणि काय काय लिहावं ह्या प्रेमावर! सो नीतिमत्ता, आर्थिक आणि व्यवहारज्ञानाचे सगळे नियम झुगारून प्रेम करणाऱ्या पागल जीवांसाठी हा चित्रपट.  Cheers to those who breaths love and lives on love!

‘सिड्युसिंग मिस्टर परफेक्ट’ चित्रपटाची लिंक- click कराhttp://bit.ly/2QcghSf

हे सुद्धा नक्की वाचा-

अस्तु-समाधानी आणि शांत जगण्याचा मंत्रhttp://bit.ly/2VPJKXv

नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषे– http://bit.ly/2LgHILE

जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’! http://bit.ly/2VVvmcR

‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी–  http://bit.ly/2UAWW2m

९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट http://bit.ly/2G2DlQ1

Previous articleकोलकात्यातील कांगावा
Next articleखोट्याची कलाकुसर करण्याचा उद्योग
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here