(संजय सोनवणी यांचा खालील लेख “संभाजी…मृत्युंजय पण हतबल” या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वाचकांसाठी तो येथे उपलब्ध करुन देत आहे.)
छत्रपती संभाजी महाराज आज आठवात आहेत ते विविध कारणांनी. त्यांच्यावर बखरी ते नाटक-कादंब-यांत आरंभकाळात बरेचसे विपर्यस्त लिहिले गेले असा आरोप आजही होतो. त्या विपर्यस्त लेखनाला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचेही रुप दिले जाते. कधीकधी बखरकारांनी सुडबुद्धीने संभाजी महाराजांविरुद्ध बखरकारांनी लिहिले असेही दावे सिद्ध केले जातात. महाराष्ट्रात मुळात इतिहासलेखनाला जातीयवादी संदर्भ प्राय: असल्याने सामान्य वाचकाला कोणाचा दावा खरा व कोणाचा खोटा हे ठरविता येणे जवळपास अशक्य असेच असते. या परिप्रेक्षात कोणी समाजगट संभाजीराजांना “धर्मवीर” म्हणवून गौरवतो तर कोणी “शाक्तवीर” म्हणुन गौरवतो. शंभुराजांनी हिंदू धर्मासाठी प्राण दिले हे नाकारणारा, ब्राह्मनांनी मनुस्मृतीनुसार संभाजी राजांना छळ करत ठार मारायला लावले असे मानणारा एक वर्ग जसा अस्तित्वात आहे तसाच संभाजी हे कट्टर हिंदू धर्माभिमानी होते असे मानणाराही मोठा वर्गही महाराष्ट्रात आहे. या दोन्ही पक्षांच्या विरोधाभासी समजुती या इतिहासाला मारक आहेत एवढेच मी येथे नमूद करुन ठेवतो.
बखरींतुन व लोकसमजुतींतुन रुजलेले संभाजी महाराज हे कवि-नाटक-कादंबरीकारांना नेहमीच एक आव्हान वाटत आले आहे. एका स्वप्रयत्नांनी सार्वभौम स्वराज्य स्थापन करणा-या शिवरायांचे पुत्र, पिता-पुत्रातील कलह, दुरावा…पण परस्परांबद्दलची ममता, पुत्राचा व्यसनाधिनतेकडे ओढा, पित्याच्या मृत्युनंतर संघर्ष करत सत्ता मिळवणे, त्याच्याविरुद्ध होणारी कट-कारस्थाने…अनेकांना देहांत प्रायश्चिते, मोगल, पोर्तुगीझ, सिद्दी, स्वकीय…सर्वच आघाड्यांवर उडालेला संघर्ष, त्याचे शाक्त पंथावरील प्रेम…आयुष्यातील खरी-खोटी प्रेमप्रकरणे…तरीही निकराचा पराक्रमी योद्धा…अत्यंत धाडसाने कृर मृत्युला सामोरा जाणारा मृत्युंजय योद्धा…या व अशा अनेक बाबींमुळे संभाजी महाराजांवर लिहायला प्रतिभावंतांना आव्हान वाटले नसते तरच नवल. आजतागायत संभाजी महाराजांवर जेवढ्या कलाकृती निर्माण झाल्या तेवढ्या अन्य कोणावरही नाहीत हे येथे लक्षात घ्यायला हवे. शंभुराजांवर आजतागायत तब्बल ४८ व किमान १२ अप्रकाशित अशी एकुण ६० नाटके लिहिली गेली आहेत. १२ कादंब-या, काही खंडकाव्येही त्यांच्यावर लिहिली गेली. यावरुन साहित्यकारांसाठी “संभाजी” हे केवढे आव्हानात्मक व्यक्तिमत्व साहित्यकारांना वाटले असेल याची कल्पना येते. नाटक-काव्य-कादंबरीकारांकडुन आपण निर्भेळ इतिहासाची अपेक्षा करु शकत नाही. कारण प्रत्येक साहित्यकार हा उपलब्ध इतिहास-माहितीचा आपापल्या मगदुरानुसार उपयोग करत आपापल्या नायकांचे चित्रण करत असतो. इतिहास संशोधन जसजसे पुढे जाते, नवीन पुरावे पुढे येतात तसतसे इतिहासकार (आणि साहित्यकारही) त्या-त्या काळात आपापली मते बदलत पुढे जात असतात.
पण आपल्याकडे दुर्दैवाने कादंबरी-नाटकांतील इतिहासालाच “इतिहास” मानण्याची एक परंपरा आहे. युरोपात शेक्सपियरने ज्युलियस सीझर वा क्लीओपात्राबद्दल नाटके लिहिली म्हणुन लोक त्यात इतिहास शोधत बसले नाहेत तर मानवी मनाच्या व्यामिश्रतेच्या गारुडात अडकत नाटककाराच्या प्रतिभेला सलाम देत राहिले. रोम वा इजिप्तने ही नाटके इतिहासाला सोडुन आहेत म्हणुन अभ्यासक्रमातुन काढली वा त्यांवर बंदी घातल्याचे उदाहरण नाही. पण आपल्याकडे मात्र ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे साहित्यिक चित्रण हे बव्हंशी वादग्रस्त राहिले आहे. आपला समाज आजही पुरानपंथी मानसिकतेत जगतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. म्हणुणच कदाचित खरा इतिहास वा वर्तमानही आपल्या हाती लागलेला नसावा.
संभाजी महाराजांवरचे आक्षेप ऐतिहासिक पुराव्यांनिशी खोडुन काढायचे ऐतिहासिक कार्य वा. सी. बेंद्रे, कमल गोखले, सदाशिव आठवले या व अन्य काही इतिहास संशोधकांनी केले. शंभुराजांच्या चारित्र्यावर उडवले गेलेले शिंतोडे दूर करने हे महत्वाचे कार्य या संशोधकांकडुन झाले. शंभुराजांचे धवल चारित्र्य प्रकाशात आनण्याचे महनीय कार्य त्यांच्याकडुन झाले व शंभुराजांना न्याय मिळाला याबद्दल हे इतिहासकार व अलीकडच्या काही दशकांतील कादंबरीकारही त्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत.
परंतू इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते किंवा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात. या लेखाचे प्रयोजन हे मुकर्रबखानाने १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे “बेसावध” संभाजीराजांना व कलशाला पकडले ते ११ मार्च १६८९ रोजी संभाजीराजांची झालेली हत्या या काळात मराठे नेमके काय करत होते याबाबत चर्चा करणे हे आहे. याचे कारण म्हणजे छ. संभाजी महाराजांबदल मराठी इतिहास असाच मौन पाळुन बसला आहे. ढोबळ व संक्षिप्त माहिती व्यतिरिक्त हातात काहीच लागत नाही. एका सार्वभौम राजाची अटक ते निघृण हत्या घडल्याची अति-अपवादात्मक घटना घडली असतांनाही असे घडावे याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. असो. तरीही आपल्याला कालक्रमानुसार ही संपुर्ण घटना नजरेखालुन घालायची आहे व तदनुषंगिक उपस्थित होणा-या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. या उत्तरांतुन अजुन काही प्रश्न निर्माण होतील याची मला जाणीव आहे…पण उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एक अभ्यासक म्हणुन निकोपपणे करणे मला आवश्यक वाटते.
मराठी रियासत भाग दोनमद्धे येणारा कालक्रम असा…
१) २१–४-१६८० रोजी राजारामास गादीवर बसवण्यात आले
(२) ६-५-१६८० राजारामाचे मंचकारोहण
(३) १८-६-१६८० संभाजी रायगडावर आला
(४) २०-७-१६८० संभाजीने मंचकारोहण केले
(५) १६-१-१६८१ संभाजीचा राज्याभिषेक
हा झाला संभाजी राजे छत्रपती बनले तो कालखंड. शिवाजी महाराजांचा ३ एप्रिल रोजी मृत्यु झाल्यानंतर संभाजी महाराजांना पन्हाळ्यावरच कैद करण्याची मुत्सद्द्यांची योजना होती, पण ती फलद्रुप झाली नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्युची बातमी त्यांना देण्यात आली नव्हती. अंत्यसंस्कारही परस्पर उरकले गेले. राजाराम महाराजांचे मंचकारोहणही केले गेले. दरम्यान संभाजी महाराजांनी सासरे पिलाजी शिर्के यांना पन्हाळ्याचे खबरदारीस नेमून म्हाळोजी घोरपडे यांस सरनौबती देवून मग रायगडास प्रतापगडमार्गे गेले. यात जवळपास तीन महिन्यांचा कालावधी गेल्याचे दिसते. संभाजी महाराज रायगडावर आले तेंव्हा संभाजी महाराजांसोबत दोन हजारांचे सैन्य होते असे म्हणतात. तत्कालीन राजकीय परिस्थिती पहाता संभाजी महाराजांसोबत एवढे अल्प सैन्य असावे हे संभवनीय वाटत नाही. १८ जुनला शंभुराजे रायगडावर आले. कार्यभार हाती घेत त्यांनी राजारामास प्रथम नजरकैदेत टाकले. मोरोपंत व अण्णाजींना आणि अन्य अनेक मंत्र्यांनाही कैदेत टाकले. सोयराबाईंना त्यांनी लगोलग कैदेत टाकले असावे. सोयराबाईंचा मृत्यु वीषप्रयोगाने अथवा भिंतीत चिणुन मारुन झाला याबाबत कोलाबा ग्यझेटियर (१८८३) ठाम आहे. मराठी बखरीही वेगळे सांगत नाहीत. सोयराबाईंनी संभाजी महाराजांच्या हत्येचा दुसरा कट उघडकीस आल्यानंतर विष घेवून आत्महत्या केली असे मत कमल गोखलेंनी व्यक्त केले आहे. यात अस्वाभाविक असे काही नसून सत्तासंघर्षातील एक अपरिहार्य भाग म्हणुन याकडे पहाता येते. राजाराम महाराजांचे संभाजीराजांच्या अनुपस्थितील मंचकारोहण हेच मुळात वादग्रस्त/आक्षेपार्ह आहे. संभाजी महाराजांना शिवराज्याभिषेकसमयी युवराज्याभिषेक झाला होताच. त्यामुळे तेच स्वराज्याचे उत्तराधिकारी होते. अशा स्थितीत, राजारामांचा मंचकारोहण समारंभ होणे याचाच अर्थ असा होतो कि संभाजी महाराजांना छत्रपती पदावरून डावलायचे होते. या विचारांमागील मुत्सद्द्यांची अथवा सोयराबाईंची कारणे काहीही असोत, विधीवत युवराज बनलेल्या युवराजाला पित्याच्या मृत्युनंतर राज्याभिषेक/सत्ता नाकारणे हे धर्मशास्त्रानुसारही पातकच होते! परंतु असे घडले आहे हे उघड आहे. अन्यथा संभाजीराजांना वगळुन राजारामांचे मंचकरोहन झालेच नसते.
येथे गैरसमज नको म्हणुन एक बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे. ती ही कि मंचकारोहण म्हणजे राजा म्हणुन अधिकृतपणे सत्तासुत्रे ताब्यात घेणे. आणि राज्याभिषेक म्हणजे विधीवत प्रजेतर्फे परमेश्वराचा प्रतिनिधी म्हणुन सत्ता स्वीकारणे. तसा दोहोंत फारसा (धार्मिक विधी वगळता) फरक नाही. संभजी महाराजांना अगदी पित्याच्या मृत्युचे खबरही लागू न देता परस्पर राजाराममहाराजांचा मंचकारोहण समारंभ उरकला गेला याचा एवढच अर्थ निघतो कि संभाजी महाराज छत्रपती असू नयेत असे मानणारा मोठा गट अस्तित्वात होता व तो नंतरही कार्यरत राहिला. असो.
यानंतरची संभाजी महाराजांची ९ वर्षांची कारकीर्द अत्यंत वादळी राहिलेली आहे. गृहकलह ते अनेक आघाड्यांवरील सातत्याची युद्धे हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव राहिलेला दिसतो. परंतु आपल्याला येथे त्याबाबत तपशीलात येथे जायचे नसून १ फेब्रुवारी ते ११ मार्च हा काळच आपल्या चर्चेचा गाभा राहणार असल्याने तिकडेच वळुयात!
संभाजी महाराज संगमेश्वर येथे पकडले गेले तेथपासुनचा रियासतीनुसार आलेला कालक्रम असा:
(१) १-२-१६८९ संगमेश्वर मुक्कामी असताना छत्रपती संभाजी महाराज व कवि कलशास शेख निजाम यांनी ( जवळच्याच खटोले गावी ) पकडले.
(२)९-२-१६८९ राजारामाचे मंचकारोहण रायगडावर
(३ शेख निजाम याने संभाजी महाराज व कलुशास १५ फेब्रुवारी १६८९ रोजी बहादुरगड (पेडगांव, जि. अहमदनगर) येथे औरंगजेबासमोर उपस्थित केले.
(४) ११-३-१६८९ संभाजीचा वध कोरेगावच्या छावणीत
(५) २५-३-१६८९ झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा
(६) ५-४-१६८९ रायगड सोडून राजारामाचे प्रतापगडास आगमन
(७) ऑगस्ट १६८९ राजारामाचे प्रतापगड सोडून पन्हाळ्यास प्रयाण
(८) ३-११-१६८९ रायगड किल्ला झुल्फिकारखानास हस्तगत
संभाजीमहाराजांविषयी जेधे शकावली आणि करीनामध्ये आलेली माहिती खालीलप्रमाणे :-
१) जेधे शकावली
(१) वैशाख शुध ३ त्रितीयेस राजारामास आनाजी पंत सुरणीस यांनी मंचकी बैसवीले
(२) आशाड शुध २ शुक्रवारी संभाजी राजे रायेगडास आले राज्य करू लागले राजाराम कैदेत ठेविले
(३) श्रावण शुध ५ पंचमी संभाजी राजे मंचकाराहोन जाले
(४) माघ सुध ७ रायेगडी संभाजी राजे सिव्हासनी बैसले
(५) माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजीराजे व कविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास आले असता सेक निजाम दौड करून येऊन उभयेतांस जिवंतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले
(६) फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किल्लेदार चांगोली काटकर व येसाजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काढून बाहेर आणून मंचकी बैसविले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कार्य भाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले
(७) फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कवि कलश यास जिवे मारून सिरच्छेद केले
(८) चैत्र शुध १५ अवरंगजेब जुलपुकारखानास पाठऊन रायगडास वेढा घातला चैत्र वद्य १० शुक्रवारी राजाराम पळोण प्रतापगडास गेले.
२) जेधे करीना
(१) ….. शेख निजाम यास फौजेनसी राजश्री संभाजी राजे याजवरी रवाना केले त्याणे संगमेश्वरास येऊन राजश्री संभाजी राजे व कविकलश यास माघ वद्य ७ शुक्रवारी सेख निजामाने धरून तुलापुरास नेले तेथे पातशाहानी उभयतांस जिवे मारिले राजश्री राजाराम रायेगडी अटकेत होते ते बाहेर काढून मंचकावारी बैसऊन राज्याभिषेक केला शके १६११ शुक्ल संवछरी जुलपुकारास रवाना केले राजश्री राजाराम निघोन रायेगडीहून प्रतापगडास आले.
शकावली व रियासती तसेच मुस्लिम साधनांतील माहितीनुसार वर येणारा कालक्रम बरोबर आहे असे दिसते.
वरील घटनाक्रमावरुन पहिली ठळक नजरेत भरणारी बाब म्हणजे इकडे संभाजी महाराज अटकेत पडले असतांनाही मंत्री व अन्य सरदारांनी राजाराम महाराजांची तात्काळ सुटका करुन ९ फेब्रुवारी रोजी त्यांचे मंचकारोहन केले. म्हणजे ही सुटका संभाजी महाराजांच्या अटकेनंतर दोनेक दिवसांतच झाली असण्याची शक्यता आहे. मंचकारोहनचा सरळ अर्थ असा कि राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात आले. या समारंभास अर्थातच सर्व मंत्री व महत्वाचे सरदार हजर असले पाहिजेत. १ फेब्रुवारीला संभाजी महाराजांना झालेल्या अटकेची बातमी रायगडावर पोहोचायला फार तर दोन दिवस लागले असतील. संभाजी महाराजांबरोबर संगमेश्वरला असलेले बव्हंशी सैनिक व सेनानी पळुन रायगडावरच आश्रयाला गेले होते. त्यानंतर लगोलग राजाराम महाराजांची सुटका केली गेली. सर्व मुत्सद्दी व सरदारांच्या उपस्थितीत राजाराम महाराजांचा मंचकारोहण समारंभ झाला.
याचा अर्थ असा होतो कि संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा राजाराम महाराजांना नवा राजा म्हणुन घोषित करण्यात मंत्रीगण व सरदारांना अधिक रस होता. राजाराम महाराजांनी सिंहासनावर बसताच येसाजी व सिदोजी फर्जंद या संभाजी महाराजांच्या समर्थकांना कडेलोट करण्यात आले. सिदोजी फर्जंद हा संभाजी महाराजांचा विश्वासु अधिकारी होता. त्याने संभाजी महाराजांच्या वतीने पोर्तुगीजांना अंजदीव द्वीपाच्या ताब्याबाबतची पाठवलेली दोन पत्रे (२४ डिसेंबर १६८४ व १० मार्च १६८५ ) उपलब्ध आहेत.
म्हणजेच राजा म्हणुन राजाराम महाराजांनी कार्यभार तर घेतलाच पण संभाजी महाराजांच्या विश्वासु अधिका-यांना ठार मारले व ज्यांना संभाजी महाराजांनी अटकेत टाकले होते त्या मानाजी मोरे व सरकारकुनांना मुक्त केले व स्वतंत्र कारभार सुरु केला. बखरकार संभाजी महाराजांवर अन्याय करतात हे खरे मानले तरी राजाराम महाराजांचे हे दिलेले दोन हुकुम (बखरकार राजाराम महाराजांचे पक्षपाती असल्याचा आरोप खरा मानला तरी) तत्कालीन वास्तवाकडे बोट दाखवतात. तेंव्हा संभाजी महाराज हयात होते. कैदेत असले तरी त्यांना अद्याप औरंगजेबाच्या गोटात पोहोचवण्यात आले नव्हते. संगमेश्वर ते अकलुजच्या मार्गाच्या अधे-मधेच ते असतांना हा मंचकारोहण समारंभही उरकला गेला होता. यावेळी मुकरबखानाची सेना होती अवघी तीन हजार. तो संभाजी महाराजांना घेवून चालला होता मराठ्यांच्या मुलुखातुन…रायगडावर मात्र धामधुम होती ती संभाजी महाराजांचे निकटवर्तीय विश्वासू अधिकारी संपवायची व ज्यांना कैदेत टाकले होते त्यांना सोडवायची.
हे सगळे संभाजी महाराज अटक झाल्यापासुन अवघ्या नऊ दिवसांत झाले आहे हे विशेष. वरील निर्नय तात्काळ घेणा-या राजाराम महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी सरदारांना कसलाही हुकूम दिलेला दिसत नाही. त्याची कसलीही नोंद नाही.झुल्फिकारखानाचा रायगडास वेढा २५-३-१६८९ रोजी पडलेला आहे. संभाजी महाराजांची हत्या तत्पुर्वीच झालेली होती. तोवर रायगडाच्या भवताली शत्रुचे अस्तित्वही नव्हते. त्यामुळे मोगलांच्या कोकणातील प्राबल्यामुळे मराठ्यांना हालचाल करायला अवधी मिळाला नाही या म्हनण्यात तथ्य नाही.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुकर्रबखान अवघ्या तीन हजार सैन्यानिशी संभाजी महाराजांना घेवून घाटावर औरंगजेबाकडे निघाला होता. वाटेत अन्यही असंख्य किल्ले सह्याद्रीच्या रांगांत मराठ्यांकडे होते व प्रत्येक किल्ल्यावर सैन्य-शिबंदी होतीच. शिवाय हा मुलुख मराठ्यांच्या पायतळी भिनलेला. रुळलेला. मराठे त्यात गनीमी काव्यासाठी प्रसिद्ध. तरीही संगमेश्वर ते घाटमाथा या वाटेत मराठ्यांनी स्वयंस्फुर्तीने का होईना संभाजी राजांच्या मुक्ततेसाठी मुकर्रबखानावर एकही हल्ला चढवला नाही. एक-दोन अयशस्वी हल्ल्यांचे दावे केले जातात पण त्याला एकही पुराव्याचा आधार आजतागायत मिळालेला नाही. खरे तर एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या काळात, जेंव्हा मुकर्रबखान संभाजीराजांना घेवून घाटावर पोहोचत होता त्या काळात संभाजीराजांना मूक्त करण्याची संधी मराठ्यांकडे अनायसे होती. मराठे गांगरुन गेले होते, त्यामुळे असे काही करण्याची बुद्धी त्यांना सुचली नाही असे दावे केले जातात, पण त्यांना अर्थ नाही याचे कारण म्हणजे शिवकाळापासुन असे अनेक अनपेक्षीत प्रसंग मराठ्यांनी अनुभवले होते. खुद्द शंभुकाळातही मराठ्यांनी अनेक तातडीच्या मोहिमा करुन शत्रुला माती चारली होती. त्यामुळे शंभुराजांच्या अटकेमुळे मराठ्यांची मती गुंग झाल्याने त्यांना काही सुचेना झाले या दाव्यात अर्थ नाही.
आणि ज्या मराठ्यांची मती गुंग झाली ते मात्र राजारामांचा मंचकारोहण समारंभ ९ फेब्रुवारीलाच करुन मोकळे होतात…याचा अर्थ काय?
वास्तव एवढेच आहे कि शंभुराजांना मराठेशाहीने वा-यावर सोडुन दिले होते. १ ते १५ फेब्रुवारीच्या काळात शंभुराजे मुकर्रबखानाचे कैदी होते व प्रवासात होते. या कालात शंभुराजे व मुकर्रबखानात काय बोलाचाली झाल्या याचे कसलेही संदर्भ आज आपल्याला उपलब्ध नाहीत. परंतु शंभुराजे व कलश आपल्या सुटकेचा प्रयत्न होईल या आशेत नक्कीच असनार. मुकर्रबखानाला रायगडावरील बातम्या मिळत असाव्यात अथवा त्याला त्या थेट औरंगजेबाकडुन कळवल्या जात असाव्यात. त्यामुळे राजाराम महाराजांच्या मंचकारोहनाची बातमी त्याला मिळाली असणार व त्याने ती, हिणवण्यासाठी का होईना, शंभुराजांना दिली असनार. याला पुरावा नसला तरी औरंगजेबाचे तरबेज हेरखाते व खुद्द अनेक मराठे सरदार त्याचे खबरे बनले असल्याने असंभवनीय म्हनता येत नाही.
काय वाटले असेल शंभुराजांना? सुटकेची आशा वाटेतच मावळली असनार…स्वत: असहाय्य…कैदी…
आता महत्वाचा दुसरा मुद्दा असा, कि समजा मराठ्यांना युद्ध करुन संभाजी राजांना सोडवणे अशक्य होते. पण तरीही तह-तडजोडीचा मार्ग उपलब्ध होता. सर्वनाशे समुत्पन्ने…हा शिवरायांनी जयसिंगाच्या वेळीस घालून दिलेला आदर्श मावळ्यांसमोर होताच. शंभुराजे कदाचित तोही मार्ग अवलंबत काव्याने आपली सुटका करुन घेवू शकत होते. शंभुराजांनी औरंगजेबाशी उद्धटपणे वर्तन न करता शांत डोक्याने व मुत्सद्दीपनाने वागुन आपली सुटका साधुन घ्यायला हवी होती असेही काही जसवंत मेहतांसारख्या इतिहासकारांचे मत आहे.
पण प्रश्न असा आहे कि आता शंभुराजे तहाची बोलणी मुळात कोणाच्या जीवावर करणार होते? ९ फेब्रुवारीला राजाराम महाराज स्वत:च सत्ताधीश बनल्यामुळे औरंगजेबाशी स्वराज्याच्या वतीने संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी वा अन्य कोणतेही तह करण्याचे अधिकार आता सरळ राजाराम महाराजांकडे आले होते. संभाजी महाराजांच्या हाती, आता ते राजेच उरले नसल्याने, काही उरलेलेच नव्हते, हे येथे लक्षात घ्यायला हवे. शंभुराजे राजेच नव्हते तर ते काय स्वत:साठी वा स्वराज्यासाठी बोलणी करणार…आणि केली तरी औरंगजेब काय ऐकून घेणार?
त्यामुळेच किल्ल्यांची व खजिन्याची औरंगजेबाची मागणी याबाबत फारसी साधनांनी जे लिहुन ठेवले आहे ते विश्वसनीय मानता येत नाही. शंभुराजांनी किल्ले द्यायचे ठरवले असते तरी त्यांना एकही किल्ला देता आला नसता…खजिन्याची गोष्ट तर दुरच राहिली. कारण त्यांचा अधिकारच नष्ट झाला होता.. पुन्हा जिंकून घेवून देतो असे शंभुराजे म्हणाले असते तरी त्याचाही काही उपयोग नव्हता. औरंगजेबाला शंभुराजांची विकल परिस्थिती (जी कदाचित कुटील बुद्धीने त्यानेच निर्माण केली असेल…) माहित असने स्वाभाविक आहे कारण त्याचे हेर रायगडापर्यंतही कसे प्रवेशले होते हे शंभुराजांच्या अटकपुर्व काळापासुनही सिद्ध होते. राहिली धर्मांतराची गोष्ट…औरंगजेब त्या क्षणी तेवढेच करवून घेवू शकला असता. नव्हे तसा प्रयत्न त्याने केलाही…
आणि आपले उरलेले एकमेव स्वत्व म्हणजे आपला स्वाभिमान आणि धर्म हे कळुन चुकलेल्या शंभुराजांनी धैर्याने परधर्म नाकारला आणि कृरातिकृर मृत्युचा सामना केला.
अटकेआधी…
औरंगजेबाचे हेरखाते प्रबळ होते. मराठ्यांच्या गोटातील खडा-न-खडा माहित्या त्याच्याकडे जमा होत असत. काही मराठा सरदारही त्याचे हेर म्हणुन काम करत होते. रायगडावरुन संभाजी महाराज कलशासाठी शिर्क्यांसोबतचा तंटा मिटवायला गेले आहेत ही बातमी त्याला फारच वेगाने समजलेली दिसते. असदखानाला औरंगजेब लिहितो कि….”मुकर्रबखानास पन्हाळा घ्यायला पाठवले आहे. त्यास ताबडतोब कळवा कि त्यांनी ताबडतोब तेथील जहागिरदारावर (संभाजीवर) चालुन जावे. तो जहागिरदार एकटाच रायरीवरुन खेळण्यास गेला आहे. त्याचे कारण म्हणजे शिर्क्याशी भांडण देणे हे आहे…..” (रुकायत-ई-आलमगिरी)
म्हणजे औरंगजेब संभाजी महाराजांच्या हालचालींची प्रत्येक खबर ठेवत होता. एवढी संवेदनशील माहिती त्याच्यापर्यंत पोहोचत होती याचाच अर्थ असा कि रायगडावरही घरभेदे होते. जेधे शकावलीनुसार खेम सावंत, शिर्के, नागोजी माने ई. मंडळी औरंगजेबाला सामील झाली होती व तेच संभाजी महाराजांची वित्तंबातमी औरंगजेबाला पुरवत होते. येथे हे नमूद केले पाहिजे कि शिर्क्यांशी कलह झाला होता तो कलशामुळे. त्यामागील नेमके कारण इतिहासाला अज्ञात आहे. कलशाचा कारभार चोख होता व त्यामुळेच शंभुराजांचा त्याच्यावर अधिक विश्वास होता असे मत अलीकडचे इतिहासकार व्यक्त करतात. कलशामुळेच न्यायाधिश प्रल्हादपंत व सरकारकुन यांना १६८८ मद्धे कैद झाली कारण ते शिर्क्यांच्या बाजुने होते असेही इतिहासावरुन कळते. १६८८ च्या आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शिर्के आणि कलशात तीव्र झगडा झाला आणि कलश पळून खेळणा किल्ल्याच्या आश्रयाला गेला होता, शंभुराजांनी जातीने खेळण्यावर जावून कलशाला मदत पुरवली होती. येथे आश्चर्य या बाबीचे वाटते कि तोवर मोगली फौजा कोल्हापुर परिसरात आल्या असुनही आपल्या एका मंत्र्याच्या आपल्याच निकटतम नातेवाईकाशीच्या भांडनात शंभुराजे व्यग्र का राहिले हा. पण हा प्रश्नच आहे. याचे उत्तर कदाचित आपल्याला कधीही मिळणार नाही.
असो. खेळण्यावरुन शंभुराजे संगमेश्वराला आले १ फेब्रुवारीला…किंवा तत्पुर्वी तीन दिवस आधी. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या सोबत फक्त ४०० ते ५०० भालाईत होते. मुकर्रबखान अवघ्या ६०-७० मैलांवर कोल्हापुरी आहे हे संभाजी महाराजांना माहित असावे. पण तरीही एवढ्या अल्प सैन्यासह ते कसे हा महत्वाचा प्रश्न उद्भवतो. मोगल येथवर येणार नाहीत एवढे गाफिल संभाजी महाराज राहतील असे वाटत नाही कारण शिवाजी महाराजांच्या निधनापासुन अनेक कटकारस्थानांचा त्यांना सामना करावा लागला होता. बरे खुद्द कोकनात महाराजांचे शत्रू कमी नव्हते. अचानक हल्ला कोठुनही व कोणाकडुनही होवू शकत होता. त्यात ही तुकडी होती फक्त भालाइतांची. मोठ्या लढाईला अनुपयुक्त. त्यांच्या सोबत सरसेनापती म्हाळोजी व संताजी घोरपडॆ हे पितापुत्र व खंडोजी बल्लाळही होते. (यात जेधे शकावली समजा फारशी विश्वसनीय धरता येत नसली तरी संताजी राजांसोबत होता हे स्पष्ट दिसते.) असे सेनानी बरोबर असतांना त्यांचे सैन्य मात्र बरोबर नव्हते, असे कसे? संगमेश्वरचा परिसर हा दुर्गम असल्याने तेथे शत्रुची धाड पडणे अशक्य होते असे मत जे काही इतिहासकार व्यक्त करतात ते मुर्खांच्या नंदनवनात निवास करत असतात. रायगड अभेद्य असुनही तेथील सैन्यसंख्या ही कधी ही पाच हजाराच्या खाली नसे. संगमेश्वर तर भूइसपाटीवर…अरण्याने वेढलेले एवढेच…पण दुर्गम नव्हे. मग सोबत सैन्य कमी ठेवण्याचा निर्णय कोणाचा होता? स्वत: राजांचा कि सेनापतींचा?
हा मराठी इतिहासातील एक गहन प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीगत रक्षक दलच मुळात किमान दोन हजार लढवैय्या अंगरक्षकांचे असे. संभाजी राजे अभिषिक्त सम्राट होते. त्यांच्या जिवितरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी सेनापती व मंत्रीमंडलाची होती. संभाजीराजेंवरील सर्व आक्षेप क्षणभर मान्य जरी केले तरी या जबाबदारीतुन त्यांची मुक्तता होवू शकत नव्हती. नावडत्या राजाला पदच्य़ुत करण्याच्या घटना भारतीय इतिहासालाही नवीन नव्हत्या व नाहीत. आवडते व नावडते पुन्हा परिस्थितीसापेक्ष असते. परंतु येथे काहीतरी विलक्षण घडलेले दिसते. एक विलक्षण कट शिजला होता आणि त्याची परिणती कशी करायची हे आधीच ठरलेले होते. अन्यथा शंभुराजे खेळणा किल्ल्यावर गेलेत ही बातमी औरंगजेबाला समजते…तो तातडीने मुकरब्खानाला आज्ञा पाठवून शंभुराजांवर चालुन जायला सांगतो….
मुकर्रबखान आज्ञा मिळताच पन्हाळ्यावरुन संगमेश्वरला एक हजार पायदळ आणि दोन हजार घोडदळ घेवून निघतो…
मुकर्रबखान एवढे सैन्य घेवून निघतो…सत्तर मैलांचे (१२२ किमी) अंतर तो तीन दिवसांत काटतो….
मुकर्रबखानाच्या वेगाला दाद दिली पाहिजे. पण या अंतरात कितीक मराठी किल्ले होते. पण त्याला अडवण्याचा कोठेही प्रयत्न नाही. ते जावूद्यात…पण एवढे सैन्य कोठेतरी चालुन जाते आहे हे मराठ्यांच्या एरवी तरबेज मानल्या गेलेल्या हेरखात्याला तर सोडा पण सामान्य गांवक-यांच्याही लक्षात येत नाही! कितीही आडवळणाच्या बिकट मार्गाने मुकर्रबखान संगमेश्वरपर्यंत पोहोचला असला तरी ते कोणाच्याही लक्षात येत नाही, शंभुराजांना सावध केले जात नाही याचा अर्थ काय होतो?
अचानक हल्ला
मुकर्रबखानाने दोन हजार घोडदळ व हजार पदाती यांच्या बळावर एक फेब्रुवारीला संभाजी महाराजांच्या तळावर अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षीत हल्ल्यामुळे राजांचे अल्पसे सैन्य फारसा प्रतिकार करु शकले नाही. ते पळुन गेले. सोबतचे मुख्य सेनानीही पळुन गेले. कलशानेच तेवढा काय एकट्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला…अटक झाले ते संभाजी महाराज आणि कवि कलश व काही वरकड लोक. यात संताजीचे नांव दिसत नाही म्हणजे तेही पळुन जाण्यात यशस्वी झाले असे दिसते. ही पळालेली मंडळी सरळ आसपसच्या किल्ल्यांच्या आश्रयाला निघुन जाण्यात व मग रायगडावर पोहोचण्यात यशस्वी झाली.
आता संभाजी महाराज मद्याच्या वा कवि कलशाच्या अनुष्ठानाच्या नादात पकडले गेले हे बखरकारांचे म्हणणे मान्य करताच येत नाही. संभाजी राजांना मुकर्रबखान एवढ्या जवळ येवून ठेपला आहे ही माहिती सेनानींना, भालाइतांना नसणे वा ती माहिती राजांना दिली न जाणे, अशी वस्तुस्थिती असेल तर संभाजी राजे कसल्याही बाबींत समजा व्यस्त असते तरी कसल्याही परिस्थितीत ही अटक अपरिहर्यपणे अटळ बनली होती.
दुसरी बाब अशी कि राजांच्या सैन्याने कितपत प्रखर प्रतिकार केला? एकंदरीत उपलब्ध माहितीवरुन कसलाही प्रतिकार झाल्याचे दिसत नाही. राजांचे सैनिक लगोलग पळुन गेल्याचेच दिसते. अगदी संताजी सारखा पुढे नांवारुपाला आलेला योद्धाही. पळुन जाणा-या मराठी सैन्याचा पाठलाग करण्याच्याही भानगडीत मुकर्रबखान पडला नाही. त्याचे लक्ष फक्त संभाजी राजांना जीवंत कैद करणे हाच होता. सारे सैन्य डोळ्यादेखत पळुन गेल्यावर संभाजी राजे हतबल झाले असणे स्वाभाविक होते. कलश हा प्रतिकार करत असतांना मोगलांचा बाण लागुन जखमी झाला होता व लगोलग पकडलाही गेला होता. मुकर्रबखानाच्या इखलासखान या मुलाने संभाजीराजांना हवेलीत घुसुन पकडुन केस धरुन ओढत मुकर्रबखानासमोर आणले अशी माहिती तेथे हजर असलेला लेखक साकी मुस्तैदखान देतो. म्हणजे संभाजीराजांच्या रक्षनाचा, त्यांना लगोलग सुरक्षीत ठिकाणी हलवण्याचा कसलाही प्रयत्न केला गेला नाही. अल्प असले तरी, आपल्या राजाच्या रक्षणाबाबत सैनिक स्वत:हुन दुर्लक्ष करतील असे संभवत नाही. मग पळुन जायचे आधीच ठरले होते कि काय? त्यामुळेच कसलाही रक्तपात न होता ते सहजी पळु शकले असतील काय?
यामुळेच संभाजी महाराजांना सापळ्यात तर अडकावले गेले नाही ना हाच प्रश्न उपस्थित होतो.
.
खरे तर रायगडावर व सह्यद्रीच्या रांगांतील किल्यांच्या किल्लेदारांपर्यंत ही बातमी अवघ्य दोनेक दिवसात पोहोचली असनार. मुकर्रबखानाचे एकुण सैन्य होते फक्त तीन हजार. बादशहा त्यावेळी होता तीन-चारशे किलोमीटर दुर अकलुजला. संगमेश्वरपासुन राजांना घेवून मुकर्रबखान बहादुरगड्ला (पेडगांव, जि. अहमदनगर) पोहोचला तो १५ फेब्रुवारीला. हे अंतर काटायला त्याला तब्बल पंधरा दिवस लागले. हा प्रवास त्याने चिपळुन, खेळना, पन्हाळा ते बहादुरगड असा पुर्ण केला. या मार्गावर मराठ्यांच्या ताब्यात अनेक किल्ले होते. सह्याद्री घाटात तर गनीमी काव्यात तरबेज असलेल्या मराठ्यांना मुकर्रबखानावर हल्ला चढवण्याची संधी होतीच. पण असा एकही प्रयत्न झाला नाही. कि त्यांनी तसा काही प्रयत्न करुच नये अशी काही आज्ञा तर नसेल?
आपल्या राजाचे सर्वतोपरी रक्षण करणे व त्याला योग्य ते संरक्षण पुरवणे ही जबादारी प्रधानमंडळाची असते. बखरी विश्वसनीय मानल्या तर सेनापती म्हाळोजी (मालोजीराजे) राजांसोबतच होते…आणि फक्त चार-पाचशे भालाइत? तेही ते शिर्क्यांचा तंटा सोडवायला गेले असतांना? छ. शिवाजी महाराजांचे स्वत:चेच अंगरक्षक दल हे दोन हजार कसलेल्या सैनिकांचे असायचे. यातुन दोनच तर्कनिष्ठ अर्थ निघू शकतात…एक म्हणजे संभाजी महाराजांना मुकर्रबखान चालुन येतो आहे ही बातमीच एरवी चाणाक्ष व तरबेज असलेल्या हेरखात्याने काही कारणास्तव दिली नाही. अरण्यातुन कितीही लपत प्रवास केला तरे हा प्रवास तीन हजार शत्रूसैन्याचा होता…तोही तीन दिवस चाललेला….त्यांचे अस्तित्व हालचाल कोणाच्याही लक्षात येणार नाही हे मला तरी संभवनीय वाटत नाही.
दुसरा म्हणजे संभाजी महाराज पकडले जावेत हीच सरदार-मंत्रीगणाची इच्छा होती म्हणुन हा घटनाक्रम घडवण्यात आला असे समजायला बराच वाव आहे. अगदी समजा संभाजी महाराज नशेच्या अंमलामुळे बेसावध राहिले…पण त्यांचे हेरखाते वा सरदार वा अगदी भालाइतही अचानक हल्ला होईपर्यंत बेसावध होते असे मुळीच म्हणता येत नाही. राजाराम महाराजांनी तात्काळ सिंहासनावर बसणे, अधिकार वापरायला सुरुवात करणे पण संभाजी राजांच्या सुटकेसाठी एकही युद्धाची आज्ञा जारी न करणे, औरंगजेबाकडे एकही मुत्सद्दी व वकील तडजोड/तहासाठी न पाठवणे या गोष्टी काय सुचवतात? राजाराम महाराज ५ एप्रिल १६८९ रोजी झुल्फिकारखानच्या वेढ्यातुन निसटतात पण महाराणी येसुबाईं व संभाजीपुत्र बाल शिवाजी (शाहु महाराजांचे मुळ नांव) मात्र झुल्फिकारखानाने रायगड जिंकल्यावर ३ नोव्हेंबर १६८९ पर्यंत रायगडावरच अडकुन पडतात व शेवटी मोगलांचे कैदी होतात….त्यांना मात्र आधीच किल्ल्याबाहेर काढले जात नाही वा तसा एकही प्रयत्न होत नाही याचाही अर्थ कसा लावायचा?
असे का घडले असावे?
या संदर्भात ग्यझेटियर ओफ बोम्बे- पूना (१८८५) म्हणते “The Marathas made no effort to rescue Sambhaji. Kalusha’s oppression and Sambhaji’s misconduct had made them hateful to the bulk of tho people, and even had his army been disposed to undertake any enterprise in his favour…”
संभाजी महाराज व कवि कलश प्रजेत अप्रिय होते म्हणुन मराठ्यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला नाही असा वरील विधानाचा मतितार्थ आहे. अलीकडच्या इतिहासकारांना वरील विधान सहसा मान्य होणार नाही. संभाजी महाराज हे प्रजाहितदक्ष होते व अगदी संगमेश्वरीही त्यांनी निवाडे केल्याचे सज्जड पुरावे त्यांनी दिलेले आहेत. संभाजी महाराजांच्या नैतीक वर्तनावरही उभी केली गेलेली प्रश्नचिन्हे आता समाजमनातून पुसली गेली आहेत. त्यामुळे संभाजी महाराज प्रजेत अप्रिय असतील असे वाटत नाही. मग असे का?
संभाजी महाराज योगायोगाने मोगलांच्या हाती लागलेले नाहीत. गणोजी शिर्क्याने शंभुराजांना पकडुन दिले हे मतही अत्यंत अवास्तव असेच आहे. रायरीवरुन राजे खेळण्याला गेलेत ही माहिती मुळात आधीच औरंगजेबाला होती. परततांना ते संगमेश्वर मार्गेच रायगडावर जाणार हे उघड होते. त्यासाठी औरंगजेबाला गणोजीची मुळात गरज नव्हती.
त्यामुळे रायगडाकडेच रोख वळवावा लागतो. राजाराम महाराज नजरकैदेत होते. म्हणजे इतर मंत्रीगण-सरदार त्यांना भेटु शकत होते. खुद्द संभाजी महाराजांचे रायगडावरील वास्तव्य अत्यंत कमी काळासाठी राहिले. पन्हाळा व संगमेश्वर हीच त्यांच्या निवासाची महत्वाची मूख्य स्थाने होती. (कोलाबा ग्यझेटियर-१८८३) अशा स्थितीत रायगडावरील अंतस्थ घटना राजांपर्यंत पोहोचण्याचे साधन नव्हते असे म्हटले तरी चालेल. तसाही शिवाजी महाराज, मंत्री व हंबीरराव मोहिते वगळले तर बव्हंशी सरदार शंभुराजांना सिंहासनाचे वारस मानायला तयार नव्हते. त्याची परिणती शंभुराजांवर दोनदा वीषप्रयोग करण्यात झाली. दुस-यांदा वीषप्रयोग झाल्यानंतर संभाजी राजांनी अण्णाजी दत्तो, सोमाजी, हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी प्रभु, सोमाजी नाईक बंकी वगैरे २०-२५ लोक मारले. या संदर्भात मराठा सरदारांची काय भुमिका होती? काय भावना होती? याबाबत तपशील आज तरी आपल्याला उपलब्ध नाही.
राजाराम महाराजांचे छ. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काही काळातच मंचकारोहण झाले होते. बव्हंशी सरदारांचा त्यांना पाठिंबा होता असे म्हणता येते. त्या वेळीस राजारामांचे वय अवघे दहा वर्ष होते. ते त्यामुळे आपल्या मर्जीत राहतील असा कयास मुत्सद्दी व सरदारांचा असू शकेल. मराठा सरदारांना जहागिरदा-या-वतनदारीचे पुनरुज्जीवन हवे होते, त्यासाठी ते राजारामांच्या गोटात गेले कि अन्यही कारणे होती?
शंभुराजे पकडले गेले तेंव्हा राजारामांचे वय होते १९ वर्ष. म्हणजे ते स्वतंत्र निर्णय घेण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले होते. सर्वांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कल आपल्या बाजुने आहे हे समजल्यावर कोणताही राजकीय मुत्सद्दी जी हालचाल करील तीच त्यांनी केली असली तर नवल नाही. संभाजी महाराज विषप्रयोग करुनही मारले गेले नाहीत म्हटल्यावर संधीची वाट पहात त्यांना संपवणे हेच कटकर्त्यांचे ध्येय असनार हे उघड आहे. ही आयती संधी त्यांना औरगजेबामुळे व शिर्क्यांमुळेही मिळाली. मुकरबखान आयता पन्हाळ्याच्या परिसरात होताच. कलशामुळे शिर्क्यांशी कलह सुरु होताच. संभाजी महाराजांना कसल्याही वास्तवाची माहिती न देता बेसावध ठेवता येणे मुत्सद्द्यांना सहज शक्य होते. खेळण्यावरुन संगमेश्वरी येत असतांना राजांसोबत एवढे कमी सैन्य ठेवले जाणे, तेही सेनापतीही सोबत असतां एरवी कसे शक्य झाले असते? राजाराम महाराजांना हा कट माहित नसेल का? किंबहुना त्याला मुक संमती असेल का? नसती तर मग मंचकारोहण होताच त्यांचे राजादेश वेगळे झाले नसते काय?
शंभुराजांच्या मुक्ततेसाठी शक्य असतांनाही एकही प्रयत्न केला गेला नाही हे वरील विवेचनावरुन स्पष्टच आहे. ते सोडा, औरंगजेबाच्या दरबारी एकही वकील अथवा मुत्सद्दी तह/तडजोड/खंडणी इ. बोलणी करायलाही आला नाही. औरंगजेबाच्या तळावर हल्ला करणे तर खुप दुरची गोष्ट. काही इतिहासकार म्हनतात कि औरंगजेबाची एकुण फौज पाच लाखांची होती, पण ते वास्तव नाही. औरंगजेबाची फौज दोन लाख एवढीच होती व विविध मोहिमांवर ती विखुरलेली होती. (औरंगजेबांच्या बुणग्यांनाही सैन्य समजायचे असेल तर गोष्ट वेगळी.) १ फेब्रुवारी ते ११ मार्च एवढा काळ हाती असतांना सर्व मराठी फौजा एकत्र होत विविध बाजुंनी औरंगजेबाच्याही छावणीवर हल्ला चढवू शकत होत्या. संताजी-धनाजीने नंतरच्या काळात तसे यशस्वीरित्त्या करुन दाखवलेच आहे.
परंतु एकुण घटनांवरुन संभाजी राजांची अटक व नंतर हत्या या बाबी मराठ्यांनी अत्यंत सहज घेतल्याचे दिसते. संभाजी महाराजांच्या कृर हत्त्येने समग्र मराठे पेटुन उठले व स्वातंत्र्याचा लढा सुरु केला या आपल्याला हव्याशा वाटना-या मतांनाही अर्थ नाही कारण राजाराम महाराज सुरक्षितपणे जिंजीला पोहोचेपर्यंत औरंगजेबाशी मराठ्यांनी मुळात लढा सुरुच केला नाही. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर तब्बल एक वर्षांनी म्हणजे मार्च १६९० मद्धे संताजी-धनाजीने हा लढा सुरु केला.
मला असे वाटते संभाजी महाराजांना आपल्याला सर्वांनी त्यागल्याचे अटकेच्या काही दिवसांतच समजुन चुकले असावे म्हणुन ते मृत्युला धीरोदात्तपणे सामोरे जायला सज्ज झाले. एक निधड्या छातीचा, कोणाला प्रिय वाटो कि अप्रिय, मनसोक्त जीवन जगत अतीव धैर्याने मृत्युला सामोरा जानारा असा पुरुष झाला नाही. काय वाटले असेल त्यांना जेंव्हा स्वकियच शत्रु झालेले वारंवार पाहुन?
संजय सोनवणी, पुणे
09860991205
वास्तव ।।
Very Good Descriptive information about Chhatrapati Sambhaji Maharaj and his empire