जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग १५
साभार – साप्ताहिक साधना
– सुरेश द्वादशीवार
१९३७ च्या निवडणुका जाहीर होण्याची कल्पना येताच काँग्रेस वर्किंग कमिटीने नेहरूंची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड केली. यावेळी त्यांच्या स्पर्धेत स्वत: पटेल आणि राजाजीही होते. परंतु निवडणूक लढवायची तर पक्षाचे नेतृत्व त्याच्या सर्वाधिक लोकप्रिय व तरुणांना आवडणार्या नेत्याकडे जावे हीच भूमिका अखेर महत्त्वाची ठरली व नेहरूंची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या अध्यक्षपदाची सूचना प्रत्यक्ष पटेलांनी मांडली व ती मांडताना ते म्हणाले, ‘जवाहर हा पक्षाचा सर्वाधिक लोकप्रिय नेता आहे आणि तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. निवडणुका जिंकायच्या तर पक्षाचे नेतृत्वस्थानी आपण त्यालाच आणले पाहिजे.’ प्रत्यक्ष नेहरूंना मात्र काँग्रेसचे याहीवेळचे अध्यक्षपद अमान्य होते. एक तर त्यांचा १९३७ च्या निवडणुकांनाच विरोध होता. या निवडणुकीत भाग घेऊन आपण असहकाराच्या भूमिकेकडे पाठ फिरवतो व ब्रिटिशांच्या तालावर चालू लागतो, असे ते म्हणाले. निवडणुकीत मिळणार्या विजयाहून पक्षाने पूर्वापार घेतलेल्या भूमिका त्यांना अधिक आवडणार्या होत्या. शिवाय निवडणुकांचे राजकारण आपल्या पक्षात बेदिली माजवणारे व सत्तालोलुप लोकांचा भरणा करणारे ठरेल अशीही भीती त्यांना वाटत होती. नेहरूंचा हा विरोध गांधींनी त्यांची समजूत काढून निकालात काढला.
प्रत्यक्ष निवडीची वेळ हीदेखील नेहरूंची परीक्षा पाहणारी होती. ते युरोपात होते आणि आपल्या आयुष्याचे अखेरचे दिवस मोजत असलेल्या कमला नेहरूंच्या सुश्रुषेत ते गढले होते. त्यांच्या अखेरच्या काळात चौदा महिने तुरुंगात राहिलेल्या नेहरूंना सरकारनेच पॅरोलवर सोडले होते. तेथून ते प्रथम बर्लिन व नंतर स्वित्झर्लंडमध्ये राहिले. सारा काळ पत्नीचा येणारा मृत्यू पाहात व अनुभवत आणि तो आपल्या डायरीत ते नोंदवीत राहिले. प्रत्यक्षात तो काळ २८ फेब्रुवारी १९३६ या दिवशी आला तेव्हा नेहरू कोसळल्यागत झाले.
‘कमलाच्या मृत्यूने नेहरूंचा कणाच हरवल्यागत झाला आहे’ हे त्यांना भेटल्यानंतरचे रजनी पाम दत्त या कम्युनिस्ट विचारवंताचे मत. कमलाची रक्षा नेहरूंनी नेहमी आपल्या शयनकक्षात ठेवली. ती माझ्या रक्षेसोबतच विसर्जित व्हावी असेही ते म्हणत राहिले. याच सुमारास ते लिहीत असलेले आत्मचरित्र पूर्ण करून ते त्यांनी ‘कमलाला, जी आता नाही..’ असे अर्पण केले आहे. याचकाळात अगाथा ख्रिस्ती या प्रसिद्ध लेखिकेला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘मृत्यूने आमच्यात अंतर आणले असेल पण आजवर कधी नव्हतो तेवढे आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आहोत..’ या काळात बापूच तेवढे माझ्या पाठीशी राहिले. अशीही त्यांची एक नोंद आहे.
कमला नेहरूंची रक्षा घेऊन परतणारे जवाहरलालांचे विमान रोममार्गे भारतात यायचे होते. ते निघण्याआधीच इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याचा त्यांना सांत्वनपर संदेश मिळाला होता. तो पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काही बसला होता. मुसोलिनीशी त्यांना पूर्वपरिचय वा पत्रव्यवहार नव्हता. रोममधील त्यांच्या एका मित्राने मात्र त्यांना पत्र लिहून मुसोलिनी तुम्हाला भेटू इच्छितो असे कळविले होते. नेहरूंनी त्याला आपला नकारही कळवला होता.
मात्र रोमच्या विमानतळावर त्यांचं विमान दुपारी उतरण्याआधीच मुसोलिनी सरकारातील एक वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला उपस्थित होते. त्यांनी मुसोलिनींचे ‘सायंकाळी ६ वाजता भेटीला येण्याचे’ निमंत्रणही सोबत आणले होते. त्यालाही नेहरूंनी नकार दिला. तेव्हा तो विनवणी करीत म्हणाला,‘मी हा नकार असाच पोहोचविला तरी माझी नोकरी जाऊ शकते.’ त्यावर तोडगा काढीत नेहरूंनी विमानतळावरूनच मुसोलिनीला फोन लावला व ‘आपल्या भेटीचे गैरअर्थ काढले जातील’ असे सांगून त्याला आपला स्पष्ट नकारही कळवला. (त्याआधी मुसोलिनीचे असे निमंत्रण गांधीजींनी नाकारले तर गुरुदेव टागोरांनी स्वीकारले होते.)
आपला स्वातंत्र्यलढा एकाच वेळी साम्राज्यवादाविरुद्ध व वर्णवर्चस्वाविरुद्ध लढविला जात असताना फॅसिस्ट हुकूमशहाला दिलेल्या भेटीचा दोन्ही बाजूंनी गैरअर्थ काढला गेला असता. ‘आम्ही फॅसिझमविरुद्ध आहोत. तसे तुमच्या साम्राज्यवादाविरुद्धही आहोत.’ हे त्यांनी अनेकवार इंग्लंडमधील समाजवादी पक्षाच्या पुढार्यांनाही बजावले होते. फॅसिस्टांचा वर्णवर्चस्ववाद जेवढा अमानवी तेवढीच साम्राज्यवाद्यांची गुलामगिरीही अमानुष आहे ही नेहरूंची भूमिका केवळ वाचन व अध्ययनातून आली नव्हती ती त्यांच्या जीवननिष्ठेचीच बाब होती. तरीही या दोन वादात युद्ध उद्भवले तर आपल्याला त्यापासून दूरही राहता येणार नाही वा तसे राहू दिले जाणार नाही हे नेहरू जाणत होते. त्यातून त्यांची नवी भूमिका पुढे आली. ‘इंग्लंडला फॅसिझमविरुद्ध भारताची मदत लागणार असेल तर त्या देशानेही त्याचा साम्राज्यवाद संपविला पाहिजे.’ असे ते म्हणाले. हीच भूमिका त्यांना पुढे लखनऊ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून १९३६ मध्ये मांडली. त्यावर सुभाषबाबू कमालीचे नाराज झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना फॅसिस्टांचीही मदत चालणारी होती. परिणामी येथूनच त्यांच्यातील सौहार्द कमी होत गेले. १९३८ (हरिपुरा) व १९३९ (त्रिपुरी) च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषबाबू होते. त्या पदावर असताना त्यांनीही त्यांची भूमिका जाहीर केली. परिणामी काँग्रेस वर्किंग कमिटीने १९३९ मध्ये त्यांचे पक्षसदस्यत्व रद्द करणाराच ठराव केला. त्याआधी नेहरूंनी त्यांना समजावणारी जी पत्रे पाठवली ती आता प्रकाशित आहेत. ‘तुम्ही तुमच्या भूमिकेचा फेरविचार करा. पक्ष आणि गांधी यांचे वैर धरू नका. त्यातून तुम्हीच देशापासून तुटाल.’ इ.इ. सांगणारी पत्रे सुभाषबाबूंनी फारशी मनावर घेतली नाही. उलट त्यांनी नेहरूंवरच भित्रेपणाचा आरोप केला. नेहरूंनी त्यांच्या आरोपांना उत्तरे दिली नाहीत. ते फक्त म्हणाले, ‘मी सुभाषच्या विचारांचा असतो तर कदाचित मीही त्याच्यासारखाच वागलो असतो.’
नेहरूंचे वेगळेपण व स्वतंत्र भूमिका अनेक पक्षनिष्ठांना न आवडणारीही होती. १९२९ मध्ये महम्मद अलींनी त्यांना ऐकविलेले शब्द त्यांच्या कानात होते. ‘एक दिवस तुमचे सगळे सहकारी तुम्हाला सोडून जातील आणि तुम्ही तुमची भूमिका कायम राखली तर तुमचा पक्षच एक दिवस तुम्हाला फासावर चढवेल..’ तेव्हा त्या भविष्यवाणीवर नेहरू केवळ प्रसन्न हसलेच तेवढे होते. त्याआधीही त्यांच्या एका स्नेह्याने ‘तुमचा शेवट ट्रॉटस्कीसारखा होईल’ असे त्यांना ऐकविले होते.
लखनऊ काँग्रेसच्या अध्यक्षपदालाही नेहरूंनी त्यांच्या मताविरुद्ध जाऊन होकार दिला होता. यावेळी राजाजींचे व पटेलांचेही नाव पुढे आले होते. काही प्रांतिक समित्यांनी गांधीजींचेही नाव त्यासाठी सुचविले होते. मात्र ३७ च्या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व जनतेच्या लाडक्या नेत्यानेच करावे असे अखेर ठरले. त्याविषयीचा एक प्रसंग येथे नोंदविण्याजोगा-
नेहरू, पटेल व राजेंद्रप्रसाद याविषयीचे गांधीजींचे मत समजून घ्यायला सेवाग्रामला गेले. त्यांच्या येण्याच्या सुमारास गांधीजी दोन रुग्णांची सेवा करण्यात मग्न होते. बराच वेळ वाट पाहूनही गांधीजी येत नाहीत म्हणून सरदार नाराज झाले व गांधीजींच्या कुटीजवळ जाऊन ते म्हणाले, ‘आम्ही परत जावे काय?’ त्यावर गांधींनी रुग्णसेवा महत्त्वाची असल्याने त्यांना थांबायला आतूनच सांगितले. प्रत्यक्ष भेटीत एकाएकी नेहरू त्यांना म्हणाले, ‘जनतेत असंतोष वाढता आहे आणि त्यांना तुमचा अहिंसेचा मार्ग पुरेसा वाटत नाही. तुम्ही समुद्राच्या लाटा थोपविण्याचा त्या वेड्या राजाचा (काऊंट) प्रयत्न करीत आहात.’ त्यावर हसून गांधीजी म्हणाले, ‘त्यासाठीच तर तुला राजा करायचे आम्ही ठरविले आहे.’ त्यावर पुढची सारी चर्चाच संपली व नेते परतले. (बाराव्या शतकात झालेल्या हेन्री या हटिंग्टनच्या लेखकाने काऊंट राजाची ही कथा लिहिली आहे. हा राजा समुद्राच्या लाटांना परत जाण्याचा आदेश देत होता. मात्र त्या लाटा त्याच्या अंगावर येतच राहिल्या तेव्हा आपली राजमुद्रा राजवाड्यात टांगून तो म्हणाला, ‘राजाच्या शक्तीहूनही एक मोठी शक्ती जगात आहे. तिच्यावर राजाचे नियंत्रण नाही. ती शक्तीच या लाटांना बळ देणारी आहे.’)
आधीची पाच वर्षे तुरुंगात व विदेशात घालविलेल्या नेहरूंना त्यावेळी देशातले इंग्रजी राज्य आणखी बळकट व मजबूत झाल्याचे दिसले. आंदोलने मंदावली होती. समाजवाद्यांचा वर्ग पक्षात आल्याने त्यात काही चैतन्य येईलसे वाटले पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्या वर्गाने पक्षात गटबाजीच अधिक वाढवली. जुने काँग्रेसनिष्ठ, समाजवादी आणि डावे असे तीन गटच त्यात भांडताना व परस्परांवर कुरघोडी करताना अधिक दिसले. जगात धनवंतांचे भांडवलशाही वर्चस्व वाढत असलेले व काँग्रेसच्या अशा अवस्थेमुळे देशात धर्मांध शक्ती बळावत असल्याचेच नेहरूंनी पाहिले.
नेहरू हा लोकशाहीवादी नेता आहे आणि बहुमताचे म्हणणे तो स्वत:ची इच्छा बाजूला सारून स्वीकारतो हे त्यांच्याविषयीचे घनश्यामदासजी बिर्ला यांचे मत याही वेळी खरे ठरले. आपली इच्छा बाजूला सारून त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व निवडणुकीतील नेतृत्वाची सूत्रे स्वीकारली. या निवडणूक प्रचाराचा आरंभ करताना त्यांनी राष्ट्राला उद्देशून एक भाषण रेकॉर्ड केले. भारताच्या राजकारणातला तो पहिला प्रयोग होता. तसे करण्याची कल्पना त्यांना मिनू मसानींनी दिली. मसानींनी त्यांना कॅमेरासमोर बसवून ते भाषण चित्रित केले. त्यात नेहरू म्हणाले,
‘आजचे जग दोन गटात विभागले आहे. एका गटाला हे जग साम्राज्यवाद आणि भांडवलशाहीच्या विळख्यातून सोडवून पुढे न्यायचे आहे. दुसर्या गटाला मात्र ते तसेच ठेवून त्याचा फायदा मिळवत राहायचे आहे. या गटांच्या संघर्षात भारताने कोणत्या बाजूने जायचे हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. माझा विश्वास आणि श्रद्धा ही की आपल्याला स्वातंत्र्याच्या आणि समाजवादाच्या मार्गाने जायचे आहे व तसेच आपण जाणारही आहोत.’
स्वातंत्र्याएवढीच समाजवादी विचारसरणीवरची आपली निष्ठा नेहरूंनी लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाषण करतानाही जाहीर केली होती. उत्तर प्रदेशातील शेतकर्यांसोबत दीर्घकाळ राहिल्याने व त्यांची गरिबी आणि त्यांची जमीनदारांकडून होणारी पिळवणूक पाहिल्याने त्यांची ती श्रद्धा आणखीही बळकट झाली होती. त्यासाठी त्यांना गांधीजींकडूनही अनेकदा बोलणी ऐकावी लागली. मात्र नेहरूंच्या समाजवादात बाकीच्या समाजवाद्यांचे उतावळेपण नव्हते. कम्युनिस्टांना असलेली घाई नव्हती. शिवाय त्यांच्या मनात गांधीजींविषयीची निष्ठा होती. ‘हा देश जेवढा गांधींना कळला तेवढा दुसर्या कोणालाही तो कळला नाही, त्याचे प्रश्नही त्यांनाच समजले आणि त्या प्रश्नांची उत्तरेही त्यांच्याच जवळ आहेत’ असे ते नेहमी म्हणत राहिले. त्याचमुळे एका ज्येष्ठ पत्रकाराने नेहरूंच्या समाजवादाला ‘खादीचा समाजवाद’ (खादी सोशॅलिझम) असे म्हटले आहे.
समाजवाद्यांमधील उताविळांना नेहरूंचे हे समंजसपण कधी लक्षात घ्यावेसे वाटले नाही. त्या भाषणानंतर काही काळातच ते जयप्रकाशांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये सामील झाले. मात्र तसे होताना त्यांनी आपला ‘काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टी’ हा गट वेगळा राहील याची काळजी घेतली. त्या गटाची स्वतंत्र अधिवेशनेही ते घेत. २० जून १९३६ ला मिरतमध्ये भरलेल्या त्यांच्या अधिवेशनात त्यांनी सरळसरळ मार्क्सवादी क्रांतीचा ठरावच केला. ‘साम्राज्यवादाविरुद्ध लढा देण्याची क्षमता फक्त मार्क्सच्या विचारसरणीत आहे, त्यामुळे पक्षाच्या सभासदांनी मार्क्सचा विचार आणि त्याचे क्रांतितंत्र समजावून व शिकून घेतले पाहिजे…’ समाजवाद्यांनी कम्युनिस्टांना दिलेले ते निमंत्रणच होते. कम्युनिस्ट पक्षावर देशात बंदी असल्याने ते निमंत्रण स्वीकारून तो वर्गही काँग्रेस समाजवादी पक्षात तात्काळ सामील झाला. मात्र त्यांचे मैत्र तीन वर्षेही टिकले नाही. १९३९ मध्ये दुसर्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाले. समाजवाद्यांनी इंग्रजानुकूल तर मार्क्सवाद्यांनी रशियानुकूल भूमिका घेतली. त्यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान समाजवाद्यांनी कम्युनिस्टांना पक्षाबाहेर घालविण्यात झाले.. पुढे तीच गत समाजवाद्यांच्याही वाट्याला आली. १९४८ मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना असेच पक्षाबाहेर घालविले.
समाजवादी विचारसरणी आणि आर्थिक नियोजन याविषयीचा नेहरूंचा आग्रह स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा नव्हता. १९३८ मध्ये सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष असतानाच त्यांनी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली. ते स्वत: तिचे अध्यक्ष होते आणि शेती व उद्योगापासून लष्करी उत्पादनाच्या आखणीसाठी त्यांनी तिच्या २९ उपसमित्या नेमून त्यांना त्यांचे अहवाल शक्य तेवढे लवकर सादर करण्याची सूचना केली होती. यात भूसुधारणेचा भाग समाविष्ट होता. ग्रामीण भागातील २२ टक्के लोक भूमिहिन होते. ३५ टक्के शेतकर्यांजवळ दोन एकराहून कमी शेतजमीन होती. १४ टक्के शेतजमिनीवर व्यवसाय उभे होते आणि केवळ ८ टक्के बडे शेतकरी ६० टक्के जमिनीचे मालक होते. तेव्हापासूनच नेहरूंचा शेतीसुधारावर भर होता. त्यांचा ग्रामीण जनतेशी असणारा संबंधही जिव्हाळ्याचा होता. नेहरूंच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेने याच क्षेत्राला बळकटी दिली. अन्नधान्याचे उत्पादन तीत २० टक्क्यांनी वाढले. दीड कोटी एकर नवी जमीन सिंचनाखाली आली. राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी दर दरडोई उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. त्रृटी होत्या. पण त्याहून यशाचे माप मोठे होते. १९३८ मध्ये सुरू केलेले त्यांचे हे काम युद्धामुळे व नंतर काँग्रेस नेत्यांच्या वाट्याला आलेल्या तुरुंगवासामुळे थांबले होते. मात्र स्वराज्य जवळ येताच नेहरूंनी नियोजन समिती व तिच्या उपसमित्यांना पुन्हा कामाला लावून आपल्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकालात ही किमया घडवली होती. देशातला दुष्काळ संपला होता. प्रसंगी नेहरूंनी या समित्यांना तांदळाऐवजी गहू लावण्याचा सल्ला दिला. जगभर हिंडून अन्नधान्य आणले. तांदूळ, गहू आणि मिळेल तिथून मिलोही आणला आणि देश उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली.
मात्र याही काळात नेहरू यंत्रासारखे निष्ठूर नव्हते. त्यांच्यातले माणूसपण सदैव सारखेच टवटवीत होते. हे माणूसपण १९३७ च्या निवडणुकीत काँग्रेससह सार्या देशाने अनुभवले. प्रत्यक्षात ही निवडणूक नेहरू आणि जिना यांच्यातच झाली. यावेळी जिनाही इंग्लंडमध्ये वास्तव्याला गेले होते. भारताचे राजकारण आपल्या मर्जीनुसार चालत नाही आणि देशातला मुसलमानही त्याची धर्मांधता सोडत नाही हे पाहून निराश झालेले जिना इंग्लंडमध्ये वकिलीसाठी गेले होते. तेथे त्यांनी प्रिव्ही कौन्सिलसमोर श्रीमंती वकिलीला सुरुवात केली. ही वकिली करीत असतानाच त्यांच्या कानावर नेहरूंचे उद्गार आले. एका बारमध्ये पत्त्यांचा डाव मांडून बसले असताना कोणीतरी त्यांना म्हणाले, ‘नेहरू म्हणतो जिना आता संपले आहेत.’
ते ऐकून संतापलेल्या जिनांनी हातची पाने खाली टाकली आणि ‘दाखवतोच त्या नेहरूला’ असे म्हणून तात्काळ विमानतळ गाठले आणि ते भारतात लिगच्या प्रचारासाठी सिद्ध झाले.
ही निवडणूक नेहरूंनी सार्या शक्तिनिशी व मिळेल त्या साधनानिशी लढविली. त्यासाठी त्यांनी देशात ६५ हजार मैलांचा प्रवास केला. रेल्वेने, मोटारीने, बस वा घोडागाडीने कधी हत्तीवरून, कधी बैलगाडीतून तर कधी पायी व सायकलने शेकडो सभांमधून ते बोलले. हजारो लोकांना त्यांची भाषणे ग्रामीण भागात ऐकता आली. त्यांच्या सभांना येणारा वर्गही मोठा होता आणि त्यात तरुणांची गर्दी फार मोठी होती. प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल आले तेव्हा देशातील ११ पैकी ६ प्रांतात काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळाले. दोन प्रांतात त्याला मित्रांच्या मदतीने सरकारे स्थापन करावी लागली तर पंजाब व बंगाल हे दोन प्रांत मुस्लिम लिगच्या ताब्यात गेले.
या निवडणुकीने काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिला व त्या पक्षाची जनमानसावरील पकड सिद्ध केली. मात्र त्याच वेळी तिने देशातील जनतेचे धार्मिक कसोटीवर विभाजनही केले. हिंदुबहुल क्षेत्रात काँग्रेसचे तर मुस्लिमबहुल क्षेत्रात मुस्लिम लिगचे उमेदवार विजयी झाले. हे विभाजनच अखेर देशाच्या फाळणीला कारण झाले.
(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)
9822471646
जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला– जुने सगळे लेख वाचण्यासाठी क्लिक करा- http://bit.ly/2IALWvx