संजय नहार: सृजनाची स्वप्ने प्रत्यक्षात आणणारा अफलातून माणूस

  काश्मीर , पंजाब व देशातील इतर सीमावर्ती राज्यातील माणसांना भारतासोबत जोडून ठेवण्यासाठी गेल्या २५ वर्षापासून अविरत प्रयत्न करणारे ‘सरहद’ चे संस्थापक संजय नहार यांचा आज वाढदिवस , त्यानिमित्ताने त्यांचे जवळचे मित्र लेखक संजय सोनवणी यांनी रेखाटलेले नहार यांचे शब्दचित्र –

…………………………………………………………………………………………………….

-संजय सोनवणी

आज १५ ऑगस्ट . माझे मित्र संजय नहार यांचा वाढदिवस. ते ‘वंदे मातरम’, ‘सरहद’ संघटना आणि सीमावर्ती राज्यांतील दहशतवादाने बाधित विद्यार्थ्यांसाठीच्या उभारलेल्या सरहद शिक्षणसंस्थेचे संस्थापक आहेत, सीमावर्ती राज्यांतील तणावग्रस्त माणसे जोडत देश जोडण्याचे ते काम करत आले आहेत हे सर्वांना माहीत आहेच. या प्रवासाचा मी जुना साक्षीदार आहे. असा मानवतेचा प्रवास आणि तोही अमानवतेने भरलेल्या जगात सोपा नसतो याची जाणीव सर्वांना आहे.

जेव्हा १९८४ सालच्या दरम्यान आमची पहिली भेट झाली तेव्हा मी ‘आज का आनंद’ या वर्तमानपत्रात काम करत होतो. इंदिराजींची हत्या झालेली होती. शिखांविरुद्ध जनक्षोभ उसळला होता. संपादक श्याम आगरवाल यांच्यासोबत मी सायकल सोसायटी ते अन्य शीखबहुल भागात त्या शोकसंतप्त वातावरणात फिरत होतो. बहुदा दुस-याच दिवशी एक माझ्यासारखाच फाटका पण स्वप्नांचे तेज डोळ्यांत घेऊन एक युवक आज का आनंदच्या कार्यालयात आला एक प्रेसनोट घेऊन…वंदे मातरम अशांत पंजाबमध्ये धावून जाणार होती. पत्रकार म्हणून मी संशयानेच पाहिले. प्रश्न विचारले खूप आणि आम्ही मग शेजारच्याच कुंदन दवेंच्या अमृततूल्यमधील वन बाय टू चहा पीत बोलत राहिलो. आम्ही मित्र झालो. तो हा लक्षात राहिलेला दिवस आमच्या मैत्रीच्या सुरुवातीच्या काळातला.

पंजाब एवढा पेटलेला होता की खरोखर तेथे कोणी महाराष्ट्रीय, प्रामाणिक भावना व इच्छा असली तरी जाईल असे मला खरेच वाटले नव्हते. पण संजय नहार आणि त्यांचे कार्यकर्ते गेले…एकदा नाही …अनेकदा….एका कार्यकर्त्याचे प्राण गेले तर संजय नहार कसेबसे वाचले. अशी प्राणांतिक संकटे त्यांच्यावर पुढेही अनेकदा कोसळली. संत नामदेवांनी पंजाब एके काळी प्रेमाने जिंकला होता. त्यानंतर सातशे वर्षांनी तोच पंजाब महाराष्ट्राच्या संजय नहारांनी पुन्हा एकदा जिंकला. घुमान साहित्य संमेलन ही त्या प्रेमाची सर्वोच्च परिणती होती. आज पंजाब आतंकवादातून बाहेर पडला हे जसे रिबेरो, गिल, विर्क यांसारख्या बहाद्दर पोलिस अधिका-यांमुळे घडले तसेच संजय नहारांच्या रचनात्मक, वैचारिक आणि सहृदयतेच्या संदेशामुळेही घडले. नहारांनी हा इतिहास घडवला. आणि याचा मी साक्षीदार आहे.

पंजाब शांत होतो न होतो तोच १९८९मध्ये काश्मीरमध्ये पंडितांचे हत्याकांड आणि विस्थापन झाले. काश्मीर धुमसू लागला. हा माणूस तेथे धावला. विखारावर प्रेमाची फुंकर घालू लागला. हजरत बल मशिदीत, अगदी स्थानिक सरकारचा विरोध पत्करत शांततेसाठी नमाज पढला. विस्थापित पंडितांना भेटला. त्यांच्या दर्दभ-या कहान्या ऐकल्या. शासनाची बेपर्वाही पाहिली. आल्यावर पुस्तक लिहिले…”उध्वस्त काश्मीर”. तेव्हा मी छोटा का होईना प्रकाशक झालो होतो. ते पुस्तक प्रकाशित केले. महाराष्ट्रात चर्चाही झाली. त्यानंतर नहारांनी आपली रचनात्मक उर्जा काश्मीरकडे वळवली.  ‘सरहद’ संस्थेची पहिली चर्चा आणि तिच्या स्थापनेचा निर्णय नहारांनी माझ्या नळस्टोप येथील कार्यालयात घेतला. पहिले लेटरहेडही छापले. आजही ते पहिले डिझाईन माझ्या स्मरणात आहे.

मी तेव्हा गडचिरोली येथे कारखाना काढला होता. कारखाना नक्षलवादी भागात काढला तर काश्मीरला का नको ? हा प्रश्न संजय नहारांनी मला विचारला आणि त्यातूनच मी तिकडेही धाव घेतली. तेथेही कारखाना झाला असता पण मला व्यावहारिक ज्ञान कमी. स्वभाव एवढा संतापी की मी फारुक अब्दुल्लांविरुद्धच ‘काश्मीर टाईम्स’ला मुलाखत दिली. ती दुस-या दिवशी पहिल्या पानावर छापून आली. अब्दुल्लांच्या महाराष्ट्रातील इतर सहका-यांनी त्याची दखल घेतली आणि आपल्याच पक्षाच्या नेत्याकरवी मला पुढच्या तीन वर्षांत पूर्ण संपवण्याचा प्रयत्न केला. नहारांनाही माझ्यामुळे त्यांच्या रचनात्मक सामाजिक कार्यात त्रास झाला. पण नहारांनी तोही माझ्यासाठी झेलला आणि आपले कार्य नव्या दमाने चालूच ठेवले.

तर तसे एक पुस्तक होईल एवढे विस्ताराने सांगण्यासारखे आहे. पण या माझ्या मित्राच्या अलीकडेही हत्येचा प्रयत्न होऊनही महाराष्ट्र तसा गप्पच बसला. संत नामदेवांना या माणसाने पुन्हा राष्ट्रीय पटलावर आणले. काश्मीरमध्ये पर्यटन वाढावे, तेथील इतिहास, संस्कृती जगासमोर जावी, तेथील बेहालीतील नागरिकांना रोजगार तर मिळावाच पण त्याच बरोबर मुख्य भूमीतील लोकांचे प्रेमही मिळावे यासाठी जीवाच्या आकांताने त्यांनी  प्रयत्न केले.  ते प्रयत्न अविरत सुरूच आहेत . दहशतवाद्यांनी ठार मारलेल्या काश्मीरीच् नव्हे तर ईशान्य राज्यांतील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शाळा-महाविद्यालयही काढले. आमच्या  सुषमा वहिनी तर काश्मीरी मुलांची ‘माय’ बनल्या.

संजय नहार यांच्याबद्दल काश्मीरी लोकांना काय वाटते याचे उत्तर माझ्या अलीकडच्या काश्मीर भेटीतील  दोन प्रसंगात मिळाले. ज्या वाहनातून मी परिहासपुरला जायला निघालो त्या वाहनाचा चालक म्हणाला, “नहारसाब यहां चुनाव लडेंगे तो उन्हे बिना किसी तकरीर या प्रचार के चून दिया जायेगा.”. असाच अनुभव परिहासपूरच्या भग्नावशेषांमधेही मिळाला. एक मराठी माणूस काश्मीरमध्ये केवळ सहृदयतायुक्त मानवतेच्या जीवावर लोकांच्या हृदयात स्थान मिळवतो हे अद्भूत आहे. अनेक काश्मीरी मुले शुद्ध मराठी बोलतात हेही त्यांचे यश. येथील मराठीप्रेमींनी हे लक्षात घेतले पाहिजे.

संजय नहारांचे मस्तक हे आजही रोज नव्या रचनात्मक संकल्पना, कल्पना. योजना आणि अजरामर उत्साह यांनी भरले असते . हा माणूस म्हणजे उसळणारा ज्वालामुखी आहे. हे झोपतात तरी कधी? या माणसात  एवढी उमेद कुठून येते ? स्वप्ने अनेकदा विस्कटलेत.  हत्येचे प्रयत्न झालेत . तरीही कोणती उमेद या माझ्या मित्राला अजरामर मानवतेची स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देते?

अशी कोणती उर्जा आहे जी विपरित स्थितीतही नाउमेद न होता चिरंतन उत्साहाने विपरिततेही सृजनाचे स्वप्न पाहते…कृती करते?

तसा मी त्यांच्यापेक्षा एक वर्ष एक दिवसाने थोरला. खरे तर थोरला भाऊ म्हणून मी त्यांची जपणूक खूप शक्तीने करायला हवी होती. मला ते जमले नाही. त्यांच्या हत्येचा प्रयत्न होऊनही जेवढे रान उठवायला हवे तेवढे उठवता आले नाही. उलट त्यांनाच माझ्या थोरल्या भावाच्या भूमिकेत अनेकदा जावे लागले. याचा खेद आहे. पण पण नियती असते यावर माझा आता विश्वास बसू लागलेला आहे. आणि ती नियती आहे ती सर्जनाची, मानवतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची.

महावीर, बुद्ध आणि गांधीजींच्या तत्वज्ञानाला जगण्यातून नवे रुप देत नवा मार्ग संजय नहार बनवताहेत. आज ते कदाचित आपल्याला समजणार नाही. पण शेवटी आमचा महाराष्ट्र तिरडीवर पाय ताणल्याखेरीज कोणाला ओळखले हे मान्यच करत नाही. ही महाराष्ट्राची नियती आहे. तीही कधीतरी बदलेल.

आशा अनंत आहेत मित्रा…आणि स्वप्नेही
स्वप्न न पाहणारा माणूस आणि समाज मृतवतच असतो
आणि तू तर स्वप्ने रोज पाहतोस
आणि ती स्वप्ने सत्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करतो आहेस…
आशा आहे समाजही असेच करेल…
स्वत:च्या चिरंतन सुखासाठी!

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मित्रा!

संजय नहार यांचे मोबाईल नंबर -९९७५६ ५६६६६/94216 56666

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….

(संजय सोनवणी हे नामवंत लेखक व संशोधक आहेत )

9860991205

Previous articleअभिनेत्री स्वरा भास्करने घेतलेला रवीश कुमार यांचा इंटरव्यू
Next articleएका मध्यमवर्गीय पिढीची आयडॉल !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here