– अमित जोशी
चित्रपटात लिबर्टी घेत आहोत असं एकदा सुरुवातीला स्पष्ट केल्यावर काहीही करता येतं, काहीही दाखवायला चित्रपट निर्माते मोकळे. हे एका अर्थानं चूक नाही. मात्र काहीही पण दाखवतांना काही मुलभूत गोष्टी चुकीच्या दाखवू नयेत एवढीच अपेक्षा. जर ‘मंगल मिशन’ हा चित्रपट जर स्वतः मंगळयानाने बघितला तर तो स्वतः मंगळ ग्रहावर आपटून आत्महत्या केल्याशिवाय रहाणार नाही असं चित्रपट बघितल्यावर वाटतं.
अर्थात मंगळ मोहिम ही अभिमानास्प्द आहे यात दुमत असण्याचा प्रश्नच येत नाही. जगांत या मोहिमेचे कौतूक झालं आहे. त्यातच चांद्रयान -२ मोहिम ताजी असतांना या चित्रपटावर आणखी उड्या पडतील. मात्र माझा चष्मा वेगळा असल्यानं अशा मोहिमांबद्दल किंवा इस्त्रोबद्दल कदाचित गैरसमज, एक वेगळंच चित्र इस्त्रोबद्दल लोकांच्या मनात तयार होण्याची भिती वाटते.
सुरुवातीला चित्रपटातील काही चांगल्या गोष्टींवर लिहीतो.
१..प्रत्यक्ष उपग्रह प्रक्षेपण करतानाची प्रक्षेपकाची – रॉकेटची हालचाल वगैरे हे सर्व अत्यंत उत्तम प्रकारे उभं केलं आहे. सर्वसामान्यांच्या भाषेत अगदी हॉलीवुड वगैरे यांच्या तोडीचे.
२.. किमान अशा वेगळ्या विषयांवर चित्रपट होत आहेत याचे स्वागतच केलं पाहिजे.
3.. तुलनेत जास्त वजनाचा उपग्रह मंगळग्रहाकडे कसा पाठवायचा हे ( विद्या बालनने ) गोफणीचा वापर करत अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं – समजावलं आहे याबद्दल चित्रपट निर्मात्यांचे अभिनंदनच. मंगळ मोहिमेच्या वेळी इस्त्रोने साधं अनिमेशन देण्याचे कष्ट घेतले नव्हते. जी चूक आता चांद्रयान -२ मोहिमेच्या वेळी सुधारली आहे. असो…
४..ही मोहिम कशी अत्यंत कमी खर्चात पार पडली हे ठसवण्यात किंवा लोकांना सागंण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे त्याबद्दल कौतुकच केलं पाहिजे.
आता गडबडीच्या गोष्टी….
१.. मुंबई आणि परिसरात लोकलने प्रवास करणारी गृहिणी ही सकाळी लवकर उठून भाजी वगैरे करत जेवण करते, घर आवरते, रिक्षा पकडून रेल्वे स्टेशन गाठते, लोकल पकडते, ऑफिसला पोहचते आणि पोहचल्यावर कॉम्प्युटरचे बटन ऑन करते. कित्ती सोपं ना. तसंच काहीसं विद्या बालन करते. चित्रपटाची सुरुवातच विद्या बालनच्या धावपळीने आहे. म्हणजेच घर आवरुन जेवण तयार करुन धावत धावत स्वतःची गाडी काढत, ट्रॅफिकमधून वाट काढत इस्त्रोचे ऑफिस गाठते आणि रॉकेट ( GSLV MK 3 ) उडवण्याच्या कामाला लागते. Countdown च्या शेवटच्या क्षणी शेवटचे काही सेकंद असतांना घाईघाईने का होईना ओके म्हणते आणि मोहिम पुढे सरकते…..( आणि मग ओम फट स्वाहा ).
इतकं रॉकेट – प्रक्षेपकाचे प्रक्षेपण करणं सोपं असतं का ? GSLV MK3 सारख्या रॉकेटचे प्रक्षेपण हा किमान ४५ दिवसांचा एक मोठा व्यायाम असतो. शास्त्रज्ञ तर शेवटचे काही तास कुटुंबियांपासून कटाक्षाने दूर असतात, २४ तास रॉकेटच्या development कडे लक्ष ठेवले जात असते. एखादा छोटा पक्षी, उंदीरही गडबड करु शकतो. रॉकेटचे प्रक्षेपण हे दिवाळीतला अग्नीबाण सोडल्यासारखे सोप्प दाखवलं आहे.
२..मंगळयान मोहिम ही इस्त्रोची एक दुय्यम मोहिम होती असं या चित्रपटात दाखवलं आहे. जे अत्यंत चुकीचं आहे. इस्त्रो ही अत्यंत professional पद्धतीने काम करणारी सरकारी संस्था आहे हे सर्वात आधी लक्षात घेतलं पाहिजे. एखादी मोहिम जाहिर करतांना तिचे लक्ष्य, दुरगामी परिणाम, भविष्यातील उपाययोजना यांचा अत्यंत काटेकोर असा विचार केलेला असतो. त्यामुळे ही एक दुय्यम मोहिम नव्हती तर एक पृथ्वीपासून अत्यंत दूर – परग्रहावरची पहिली मोहिम होती, एक महत्वकांक्षी अशी इस्त्रोसाठी मोहिम होती.
३.. या चित्रपटात मंगळयान मोहिमेला बजेट खूपच कमी देण्यात आले होते किंवा कमी पैशात काहीही करुन भागवा असं सांगितल्याचं दाखवलं आहे. हे एक दुसरं माझ्या मते Disaster आहे. उलट चांद्रयान -१ मोहिमेचा एक यशस्वी टप्पा पार पाडल्यावर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडयात २००८ ला तत्कालिन इस्त्रोचे प्रमुख जी माधवन नायर यांनी मंगळ ग्रहावर उपग्रह पाठणार असल्याचं जाहिर केलं होतं. पुढील ३ वर्ष या मोहिमेचा अत्यंत काटोकर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासासाठी आवश्यक बजेट देण्यात आले होते. त्यानंतर १५ ऑगस्ट २०१२ ला लाल किल्ल्यावर भाषण करतांना तत्कालिन पंतप्रधान मनोमहन सिंह यांनी ही मोहिम २०१३ मध्ये प्रत्यक्ष होणार असल्याचं जाहिर केलं. लगेचच या मोहिमेसाठी आवश्यक पैसेही देण्यात आले. कमी बजेटमध्ये भागवा असं दाखवल्यानं लोकं काय बोध घेत असतील, त्याच्या मनांत आपण काय ठासवत आहोत याची मला भिती वाटते.
चांद्रयान -२ मोहिम जी आत्ता सुरु आहे ती त्यावेळी म्हणजे २०११-१२ होणं अपेक्षित होतं, जी काही कारणांनी पुढे ढकलण्यात आली. तेव्हा चांद्रयान -२ मोहिमेसाठी असलेला पैसा हा मंगळयान मोहिमेसाठी वळवण्यात आला असं चित्रपटांत दाखवण्यात आलं. हे अत्यंत हास्यास्पद आहे. हे काही PWD खातं नाही की इकडच्या रस्त्यासाठी दिलेला पैसा हा दुसऱ्या रस्त्याच्या कामासाठी वळवून वापरला गेला.
४..आणखी एक…चित्रपटांत मंगळयान ही दुय्यम मोहिम दाखवली असल्यानं या मोहिमेवर काम करण्यासाठी मळकट-कळकट-प्रचंड धुळ असलेली जागा देण्यात आली. मग महिला शास्त्रज्ञांनी पदर कंबरेला कोसत जागा साफ केली. सर्व शास्त्रज्ञांनी रंगरंगोटी करत जागा चकाचक केली, एवढी केली की तिथे आलेला ( मंगळयान मोहिमचा प्रमुख ) अक्षय कुमारला धक्का बसतो. वगैरे वगैरे……हे बघुन मी खाली पडायचाच बाकी होतो. ही साफसफाई बघितल्यावर मंगळयान प्रकल्पावर प्रत्यक्ष काम केलेल्या शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला आवडेल.. पण त्यापेक्षा आपण लोकांच्या मनांत किती चुकीचं भरवत आहोत, एक चुकीचं मत तयार करत आहोत याची भिती वाटते.
५.. या चित्रपटांत दुय्यम ठरवलेल्या मंगळयान मोहिमेकरता इस्त्रोच्या विविध विभागाकडून ज्युनियर शास्त्रज्ञ दिले जातात. हे सुद्धा एक हास्यास्पद गोष्ट आहे. मंगळ ग्रहावर यान पाठवण्याचा अनुभव अर्थात इस्त्रोकडे कोणाकडे नसला तरी विविध मोहिमांमध्ये गेली काही वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी शास्त्रज्ञ या मोहिमेकरता वळवण्यात आले हे सत्य आहे.
६.. आता एक तांत्रिक गोष्ट. विद्या बालन ही मंगळयान हा उपग्रह बनवणाऱ्या प्रकल्पाची प्रमुख म्हणून या चित्रपटात दाखवली आहे. म्हणजेच उपग्रह कसा असला पाहिजे, त्यावर कोणती उपकरणे असली पाहिजेत, उपग्रहांत इंधन किती असलं पाहिजे, उपग्रहात काय सुधारणा केल्या पाहिजेत वगैरे वगैरे यावर लक्ष ठेवणार. यासाठी विद्या बालनच्या हाताखाली वेगवेगळ्या टीम आहेत.
तर अक्षय कुमार हा संपुर्ण मंगळयान प्रकल्पाचा प्रमुख आहे. म्हणजेच हा उपग्रह कसा असला पाहिजे, या प्रकल्पाचे बजेट कसं असलं पाहिजे, कोणत्या रॉकेटद्वारे हा उपग्रह सोडला पाहिजे, नेमकी तारिख वेळ काय असली पाहिजे, आवश्यक कोणत्या पुरक यंत्रणा या मोहिमेसाठी विकसित केल्या पाहिजेत वगैरे वगैरे गोष्टी अक्षय कुमार बघणार असतो.
त्यातच उपग्रहाचे रॉकेटद्वारे प्रक्षपित करणे ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. रॉकेट तयार कऱणे, त्याची जोडणी करणे, इंधन भरणे आणि योग्य वेळी प्रक्षेपित करणे यासाठी एक वेगळी यंत्रणा राबत असते. नेमकी याच ठिकाणी एक गल्लत या चित्रपटात करण्यात आली आहे.
विद्या बालनचे काम हे उपग्रह बनवून तो रॉकेटच्या निर्मात्यांकडे सोपवणे आणि उपग्रह अवकाशात गेल्यावर त्याच्याकडून काम करवून घेणे एवढं आहे.
इथे रॉकेटच्या प्रक्षेपणाच्या प्रक्रियेत उगाचच विद्या बालन आणि तिच्या टीमला मध्ये घुसवण्यात आले आहे. हे बघिल्यावर इस्त्रोच्या टीमने, मंगळयानच्या टीमने कपाळावर नक्कीच हात मारला असेल. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जर उद्या डंपिंग ग्राऊंडला जाणाऱ्या गाड्यांची मोजदाद करायला सुरुवात केली तर कसं वाटेल तसंच काहीसं इथे दाखवण्यात आलं आहे.
७..आणखी एक भयानक तांत्रिक चूक….उपग्रहाचे रॉकेट – प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण करतांना हवामानाचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसारच नक्की वेळ ठरवली जाते. अगदी खूप धुवाधार पाऊस पडत असेल, सुर्यप्रकाश नसल्यानं अंधार झाला असेल, जोरदार वारे वाहत असतील तर फारतर फार वाऱ्याचा वेग कमी होण्याची वाट बघितली जाते. सुर्यप्रकाश नाही, जोरात पाऊस पडत आहे म्हणून प्रक्षेपण कधी थांबवलं जात नाही. नेमकं हेचं इथे दाखवलं आहे. म्हणजे पाऊस पडत आहे, सुर्यप्रकाश नाही म्हणून मंगळयानचे प्रक्षेपण थांबवले जाते आणि सर्वजण आपापल्या घरी जायला निघतात, अक्षय कुमार गाडीत बसतो आणि अचानक पाऊस थांबतो – सुर्यप्रकाश अवतरतो आणि मग पुन्हा सर्वजण धावाधाव करत कंट्रोल रुममध्ये येतात आणि रॉकेटचे प्रक्षेपण करतात. हे बघितल्यावर हसावं की रडावं अशी अवस्था माझी झाली होती. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी काय झाली असेल कल्पना पण करवत नाही.
असं अचानक वाटलं म्हणून धावत धावत जाऊन रॉकेटचे प्रक्षेपण कधी केले जात नाही.
या सात गंभीर चुका आहेत पण त्याचबरोबर या चित्रपटात ज्युनियर शास्त्रज्ञ शर्मन जोशी कसा कुंडलिवर विश्वास ठेवणारा आहे, त्याच्या लग्न पत्रिकेत मंगळ ग्रह कसा मारक आहे हे दाखवण्यात आले आहे. हे कशासाठी…हवामाना विभाग जसा एक टिंगल टवाळीचा विषय झाला आहे तसं इस्त्रोबाबात करायचं आहे का असा प्रश्न पडतो.
या चित्रपटात मंगळयान उपग्रहाची प्रमुख विद्या बालन देवाची प्रार्थना करतांना दाखवली आहे. अर्थात सर्वापलिकडे देव असतो, श्रद्धा नावाचा भाग असतो वगैरे सांगण्याचा हा साळसूद असा प्रयत्न आहे. नास्तिक असल्यानं मला हे सर्व हास्यास्पद वाटते.
चित्रपटात एक सिन आहे ज्यामध्ये एक बैठक सुरू असते, इस्रोचे प्रमुख ही बैठक घेत असतात. बैठकीत अचानक मंगळयान प्रकल्पाचा प्रमुख अक्षय कुमार घुसतो आणि TV वर सुरू असलेली ब्रेकिंग news दाखवतो. चीनचा मंगळ ग्रहासाठी असलेला उपग्रह हा उड्डाण करतानाच रॉकेटचा स्फोट झाल्याने नष्ट झालेला असतो. तेव्हा चीन स्पर्धेत नाहीये आता भारताला चांगली संधी आहे असं अक्षय कुमार पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हे सर्व हास्यास्पद आहे. मुळात इस्रो ही संस्था चीनबरोबर स्पर्धा करत आहे ना कोणत्या देशाशी. जगात अवकाश तंत्रज्ञानामध्ये जे बदल विकास होत आहे त्यामध्ये मागे रहाता कामा नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पद्धतशीरपणे पावले टाकत आहे. एखाद्या घटनेने किंवा ब्रेकिंग news ने असं काही धोरण लगेच ठरवले जात नसते.
अपोलो -१३ सारखा अप्रतिम चित्रपट, नुकताच आलेला The martian, Gravity सारखे चित्रपट असो किंवा इतर अवकाश मोहिमांवर आधारलेले हॉलीवूडचे चित्रपट असो यामध्ये मसाला जरुर मारला आहे, मात्र हे चित्रपट साकारतांना मुळ अवकाश तंत्रज्ञानातील संकल्पनांना, नियमांना कुठेही धक्का लावलेला नाही. उलट ज्या संकल्पना सर्वससामान्यांच्या कल्पनेच्या पलिकडे आहेत, डोक्याचा भुगा होईल अशा गोष्टी सांगणारे Interstellar सारखे चित्रपट तर अप्रतिमच म्हणावे लागतील.
आपल्याकडे अवकाश तंत्रज्ञानाच्या ज्ञानाबद्दल तशी बोंब आहे. इस्त्रोला तर आजही अशा गोष्टी सर्वसामान्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत. किमान ही चूक चांद्रयान २ मोहिमेच्या निमित्ताने सुधारली गेली आहे असं म्हणावं लागेल. जी काही अवकाश तंत्रज्ञानाबद्दल माहिती लोकांकडे उपलब्ध आहे ती केवळ खगोल मंडळ सारख्या विविध संस्थांच्या कामामुळे किंवा मोहन आपटे यांच्यासारख्या काही लेखकांमुळे.
असं असतांना मंगल मिशनसारखे चित्रपट काही चुकीच्या संकल्पना ठोकपणे दाखवत असतील तर अशा चित्रपटांवर टीकाच केली पाहिजे.
तुम्हाला काय वाटते ?
(लेखक झी -२४ तास या वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत)
98332 24281