शरद जोशी : चैतन्यदायी झंझावात

शेतकरी नेते शरद जोशी यांची २०११ मध्ये हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत 
-हेरंब कुलकर्णी 
……………………………………………
शरद जोशी. नुसतं नावच एका चैतन्यदायी भूतकाळाचं स्मरण जागं करायला पुरेसं आहे. प्रत्यक्षात मी शेतकरी कुटुंबातला नाही. शरद पवारांच्या भाषेत ‘भुईमुगाच्या शेंगा खाली येतात की वर’ हे माहीत नसणार्‍या कुटुंबातला! शरद जोशींच्या आंदोलनाचा सुवर्णकाळ 1980 ते 95. या काळात माझं वय 10 ते 20 वर्षांच्या दरम्यानचं. त्या काळात दूरदर्शन फारसं नव्हतं. पेपरही फारसे नव्हते. त्यामुळे तो थरार अनुभवता आला नाही… आमच्या अकोले तालुक्यात एकेकाळी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला होता. त्यामुळे अनेक आंदोलनांचा प्रभाव त्या वयात पडत राहिला. अनेक आंदोलने बघितल्यामुळे शरद जोशींविषयीचे कुतूहल कायम राहिले.
पुढे समज आल्यावर तालुक्यातल्या इतरांकडून शरद जोशींविषयी कळत राहिले. आमच्या तालुक्याच्या भावविश्वाचाच शरद जोशी भाग असल्याने आमच्या भावविश्वाचे ते भाग बनून गेले. त्यांची भाषणे, लेख, पुस्तके थोडीफार वाचली.
18 वर्षांपूर्वी मी पाचव्या वेतन आयोगाच्या वेतनवाढीला विरोध केला. शरद जोशींना ते समजताच, त्यांनी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व शेतकरी नेते दशरथ सावंत भेटीला गेल्यावर, ‘त्या मुलाच्या सत्काराला मी स्वत: येतो असे सांगितले. शरद जोशी आमच्या गावात आले. केवळ माझ्या सत्कारासाठी आले. त्या काळात मी प्रचंड शिव्या खाताना शरद जोशींसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विचारवंत, कृतिवंत माझ्यासारख्या ऐन पंचविशीतल्या पोराच्या सत्काराला येतो, हे मला भारावून टाकणारं होतं. तेव्हापासून जोशींविषयी एक व्यक्तिगत कृतज्ञतेची भावना नकळत मनात राहिली.
पण नंतर शरद जोशींनी मेधा पाटकरांवर टीका करताच ‘मेधाभक्त’ असल्याने काहीसा दुखावलो. नर्मदा आंदोलनाला त्यांचा विरोध अस्वस्थ करून गेला. खुल्या व्यवस्थेची त्यांची मांडणी समजायचं ते वय नव्हतं किंवा समजही नव्हती (अजूनही नाही!) त्यामुळे समाजवादी छायेत वाढलेल्या आम्हाला शरद जोशी दूरचे वाटू लागले. भाजपासोबत जाणे हा तर टोकाचा निर्णय वाटला आणि हळूहळू शरद जोशी व्यक्तीविषयी प्रेम, आकर्षण आणि विचारांविषयी दुरावा असे होऊन गेले… जोशीसाहेबांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते मित्र असल्याने तो धागा मात्र दुवा ठरला.
श्रीकांत उमरीकरनं शरद जोशींची सर्व पुस्तके नव्याने प्रकाशित केल्यामुळे ती वाचून काढली. शरद जोशी पहिल्यांदा समजल्यासारखे वाटले. गेली पाच वर्षे सरकारी शिक्षणव्यवस्थेचा जवळून अभ्यास करताना नैराश्याने पार झाकाळून गेलेल्या मला त्या दोषांचे विश्‍लेषण करणारी जणू उपपत्तीत सापडल्यासारखी वाटली. त्या प्रकाशात मला देशातील दारिद्य्र, बेकारी, शिक्षण, आरोग्यव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या सर्वांकडे बघण्याची दृष्टीच मिळाली. अर्थात संपूर्ण उत्तरे मिळाली नाहीत. या देशातील असंघटित कामगार, आदिवासी व भटके- विमुक्त हा मला अत्यंत अस्वस्थ करणारा विषय आहे. त्यांच्याबाबतची सर्व उत्तरे अजून शोधतोच आहे.
हे सारं मनात चालू असताना शिक्षणावर काही मुलाखती घ्यायला पुण्याला गेलो. काम सुरू केले; पण भूमिकाच काहीशी नक्की नसल्याने म्हणा किंवा नव्या मांडणीनं काहीसं हलवल्यामुळं म्हणा कामात मन लागेना. एखादी गोष्ट कराविशी वाटली नाही, तर नाही करायची हा प्रांजळपणा मदतीला आला. पुन्हा गावाकडं निघालो… सहज वाटलं म्हणून म्हात्रेसरांना फोन लावला. ‘शरद जोशीसाहेब आहेत का?’
उत्तर नाही हे गृहीतच होतं; पण चक्क म्हात्रेसरांनी ‘हो’ म्हटलं आणि यायला सांगितलं. मला तो धक्का होता. शरद जोशी असे एकटे भेटू शकतात हे काहीसं अविश्‍वसनीय होतं.
दिल्लीत केंद्रीय नियोजन आयोगावर  निवड झाली तेव्हा दिल्लीत त्यांना भेटायचा तीन वेळा प्रयत्न केला होता; पण भेट झाली नव्हती. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांचं सहज भेटणं नवं होतं.
रिक्षा, जीप हे कंटाळवाणे टप्पे पार करत पोहोचलो. साहेबांचा ‘अंतरंगीचा साथी’ बबन शेलार आणि म्हात्रेसर भेटले. या दोघांच्या समर्पणाविषयी स्वतंत्र लेख कधीतरी लिहायचा आहे. इतकी ही दोघे शरदजोशींमध्ये विरघळली आहेत.
शरद जोशींच्या खोलीत प्रवेश केला. सिंहाच्या गुहेत जाताना कसे वाटत असेल? याचा थोडाफार अंदाज आला; परंतु त्यांच्या मनमोकळ्या स्वागताने दडपण दूर झालं. जोशीसाहेब काहीसे थकलेले; पण शरीरावरची लकाकी कायम. डोळ्यांतील मिश्कील भाव व बोलण्यातील स्पष्टता कायम. बौधिक अहंकाराबरोबरच चेहर्‍यावरील नम्रताही तितकीच लक्षात येणारी आणि तो अहंकारही आढ्यताखोर नव्हे तर सामर्थ्याची प्रचीती आणून देणारा.
विषय अर्थातच सहाव्या वेतन आयोगावरून सुरू झाला. सहाव्या वेतन आयोगावर मी पुस्तक संपादित केले त्या पुस्तकात जोशीसाहेबांची मुलाखत घेतलेली. जोशीसाहेबांनी पुस्तकावर थोडंफार भाष्य करून ‘शासनानंच आता खिरापत वाटायचं ठरवलं आहे आपण तरी काय करणार?’ असं म्हणताच मी तो विषय वाढवला नाही, कारण गेली 10 वर्षे त्या विषयाचे सर्व पैलू मला आता परिचित झालेत!
त्यांची पुस्तकं नव्याने वाचून काढली हे सांगताच ते मिश्किलपणे म्हणाले, ‘‘वेळ जायला तशी ती पुस्तकं चांगली आहेत’’ आणि खळखळून हसले. मी ‘अंतर्नाद’ मधील त्यांच्या ‘पुरे करा हे समाजसेवेचे ढोंग’ या लेखावर बोललो. त्या लेखात शरद जोशींनी काम करण्यामागच्या स्वकेंद्रित व उथळ प्रेरणांची खिल्ली उडवली आहे.
मी म्हणालो, ‘‘त्या लेखाचे वैशिष्ट्य असे, की आम्हा प्रत्येकालाच त्या आरशात आमचा चेहरा बघता आला.’’
ते हसले आणि प्रश्नार्थक बघू लागले.
मी म्हणालो, ‘‘त्या लेखामुळे आमच्या समाजकारणात येण्याच्या प्रेरणा नेमक्या काय आहेत याचा आम्हीच शोध घेऊ लागलो आणि आमच्या उथळपणाची आम्हालाच लाज वाटू लागली. अपराधी भावनेतून मी समाजकारणात आलो आहे असे मला वाटते.’’
शरद जोशी म्हणाले, ‘‘अपराधी भावनेनं सामाजिक जाणीव येणं हे अनैसर्गिक नाही, कारण दु:खिताच्या जागी आपण स्वत:ला समजणं हे अगदीच स्वाभाविक आहे.’’
‘‘पण तरीही नेमकेपणाने मुळातून समस्यांचा अभ्यास नसल्याने आम्ही केवळ भावनिक लाटेवर हिंदकळत राहतो. आम्ही केवळ कोणत्यातरी विचारसरणींच्या प्रेमात पडतो आणि बाहेर होतो याबाबत काय निर्णय करावा, हेच कळत नाही. तुम्हीच मार्गदर्शन करा…’’ असे म्हणताच ते हसले व म्हणाले,
‘‘राजवाडेंना एक 40 वर्षांचा माणूस मी काय करावे, असे विचारायला गेला. तेव्हा राजवाडे म्हणाले- एक धोंडा बांधून विहिरीत उडी मार, कारण 40 वर्षे निर्णय घेता आला नाही, तर हाच पर्याय आहे…’’ माझेही वय 40च्या उंबरठ्यावर असल्यामुळे मला नकळत ती टोपी फिट्ट बसली. नंतर गंभीर होत ते म्हणाले, ‘‘शेवटी आपला निर्णय आपणच घ्यायचा असतो; पण खूप पुढचा विचार करण्यापेक्षा फक्त एका पावलाचा विचार करायचा असतो. One Step is enough for me  तुम्हा तरुणांना समाजसेवेचे इतके वेड का? त्यापेक्षा उद्योजक होऊन पैसा कमवा व गरिबांना वाटा. गरिबांसाठी रोजगार निर्माण करावा, असे तुम्हाला का वाटत नाही? तात्त्विक वटवट करण्यात रस का वाटतो? उद्योजक होणे ही समाजसेवा वाटली पाहिजे…’’ माझ्या अहंकाराच्या ठिकर्‍या उडताना केवळ शांतपणे बघत राहणं एवढंच माझ्या हातात होतं… जगण्याचा आधारच कुणीतरी काढून घेतय असं वाटलं. समाजसेवेची प्रेरणा ही करुणेतून येता कामा नये. करुणेतून समाजसेवा करणार्‍यांच्या चेहर्‍यावरील भाव प्रचंड उर्मट असतात. ते बघवत नाहीत. ते तडक प्रेषिताच्या भूमिकेत सरकतात.
खुल्या व्यवस्थेत गरिबांची संख्या वाढतच आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत एक कोटी गरीब वाढले. सक्सेना समितीने 48% गरीब तर तेंडुलकर समितीने 38% गरीब दाखविले आहेत, हे सांगितल्यावर ते हसले. ते म्हणाले, ‘‘हा फक्त रेषा हलवण्याचा खेळ आहे. खरा अभ्यास करायचा असेल तर 1971 पासून ‘गरिबी हटाव’ योजनेपासून आजपर्यंत दारिद्य्ररेषेच्या सर्व योजनांचं काय झालं याचा अभ्यास करायचा हवा, त्यातून गरिबी हटावमधून झालेल्या श्रीमंतांचा शोध लागेल!’’ थोडं गंभीर होत ते म्हणाले, ‘‘ मुळात गरिबी हटविण्याचं केंद्र, त्याबाबत निर्णय घेणारं ठिकाण हे नियोजन आयोग असण्यापेक्षा गरिबाचं घर असलं पाहिजे. तरच योग्य निर्णय होण्याची शक्यता आहे. समूहाचा निर्णय हा कधीच बरोबर असू शकत नाही. व्यक्ती हेच निर्णयाचं केंद्र असू शकते. खिशातल्या थोड्या पैशातून सिनेमा बघायचा, की हॉटेलात जायचं? याचा योग्य निर्णय वसतिगृहातील मुलगाच करू शकतो… होस्टेलचा रेक्टर तो निर्णय करू शकत नाही. याचे कारण आनंदाची मात्रा कशातून किती याची अनुभूती तो विद्यार्थीच घेऊ शकणार आहे. तेव्हा दारिद्य्रनिर्मूलन, निर्णयप्रक्रिया या सर्व गोष्टींकडेच नव्याने बघण्याची गरज आहे.
गरिबी निर्मूलनाबाबत तुमच्या डोक्यातले डॉन क्वीझोट काढून टाका. स्वातंत्र्याच्या भूमिकेतून विचार करा. त्या गरिबांच्या तात्कालिक फायद्यांपेक्षा दीर्घकालीन लाभाचा विचार करा. केरळात शेतकर्‍यांपेक्षा शेतमजुरांच्या हिताचा जास्त विचार केला, त्यामुळे केरळातील शेतीच आज अडचणीत आली. महाराष्ट्रात तुम्ही हमालांच्या हितासाठी कायदे केले, तर ग्राहकांनी चाकाच्या बॅगा घेऊन घेऊन हमालांचा रोजगार मारला. तेव्हा असंघटितांसाठी आपली करुणा दीर्घकालीन नुकसान तर करत नाही ना? याचा विचार करायला हवा. तुमची विचारसरणी ही गरिबांना अपंग करणारी नसावी. त्याच्यातील पुरुषार्थ जागविणारी असावी. त्यांचे कर्तृत्व कसे फुलवता येईल, या दृष्टीने विचार करा. आपल्या मनात पहिला विचार त्याला काय भीक घालता येईल हा येतो. हे जास्त घातक आहे.’’
हे ऐकताना गेली 20 वर्षे ऐकलेली विविध भाषणे, परिषदा, पुस्तके, मासिके यातून ऐकलेली साचेबद्ध मांडणी प्रश्नांकित होत होती. अस्वस्थता वाढत होती.
मनात कुठेतरी शरद जोशी खुल्या व्यवस्थेतील अन्यायांकडे कसे बघतात? ही उत्सुकता होती. सेझमधील जनसुनवाईचा दिल्लीचा अहवाल वाचला होता. शेतकर्‍यांच्या जमिनी कशा सक्तीने ताब्यात घेतल्या गेल्या याच्या विषण्ण करणार्‍या कहाण्या वाचल्या होत्या. त्यांच्यात मात्र स्पष्टता होती. ते शांतपणे म्हणाले, ‘‘ज्याला जमीन विकायची नाही, त्याची कोणत्याही स्थितीत जमीन ताब्यात घ्यायची नाही आणि ज्याला जमीन विकायची आहे. त्याला जमीन विकू दिली पाहिजे…’’ मी तोडत म्हणालो, ‘‘पण शेतकर्‍याला नाहीतरी त्या जमिनी परवडत नाहीत, नापीक आहेत असे सांगून ते जमिनी ओढतात… शरद जोशींमधील मिश्किलता जागी झाली.
ते म्हणाले- ‘‘आम्ही फक्त नापीक जमिनीच घेऊ असे म्हणणे म्हणजे सुलतानाने आम्ही केवळ गावातील कुरुप मुलीच उचलून नेऊ असे म्हणणे आहे.’’ मी त्यांच्या तिरकस भाष्यावर खूप हसलो. मी म्हणालो, ‘‘पण जमिनी विकून माणसं ते पैसे उडवून टाकतात.’’ ते म्हणाले, ‘‘प्रत्येकाचा निर्णय प्रत्येकाला घेऊ द्या. हा प्रश्न मुळातच प्रॉपर्टीचा हक्क मूलभूत नाही त्यातून आला आहे.’’
‘‘या बाबत तुम्ही पहिल्या पंतप्रधानांना दोषी ठरवाल का?’’ थोडसं थांबून ते म्हणाले, ‘‘मुळातच स्वातंत्र्य ही माझ्या सर्व मांडणीची मध्यवर्ती कल्पना आहे. त्या स्वातंत्र्याच्या आधारावरच अर्थशास्त्र, राज्यशास्त्राची रचना करायला हवी.’’
मी विचारलं, ‘‘खुल्या व्यवस्थेला आता 20 वर्षे पूर्ण होतील. 1993 मध्ये डंकेलचे स्वागत करताना तुम्ही जी गृहीतकं मांडली. ती आता कितपत खरी ठरलीत? याचा हिशेब मांडायचा का? खुल्या व्यवस्थेत बहुराष्ट्रीय कंपन्या शेवटी नैसर्गिक लूट करायलाच धावल्या. जल, जंगल, जमीन हेच त्यांनी पादाक्रांत केले. इथली व्यवस्था सहज विकली जाईल? असे वाटले नव्हते का?’’
त्यांना बहुधा हे प्रश्न अनेकदा विचारले गेले असावेत. ते म्हणाले, ‘‘खुली व्यवस्था या देशातच खरंच आली का? शासनाचा हस्तक्षेप किती कमी झाला? व्यवस्था जर पूर्णपणे राबवली नाही तर त्याचा परिणाम कसा तपासणार? तेव्हा अंमलबजावणी तपासायची तर कार्यवाही प्रामाणिक झाली का? हे बघायला हवे. मी म्हणालो, ‘‘याचा अर्थ सर्व खुलीकरण एकाचवेळी का सुरू करायला हवे होते… पूर्ण सेट स्वीकारला तसं परवानगी द्यायला हवी होती.’’
ते म्हणाले, ‘‘असे होत नसते. असे कोणत्याच देशात घडलेले नाही. टप्प्याटप्प्यानेच होत असते.’’
प्राथमिक शिक्षण हा माझ्या अभ्यासाचा विषय. ‘शेतकरी संघटक’च्या मुखपत्रात मी शिक्षणाच्या रचना बदलाविषयीची, उदारीकरणाविषयी लेख लिहिला होता. चिली, स्वीडन या देशातील ‘व्हाऊचर सिस्टिम’ अशी आहे की सरकार प्रत्येक मुलावर जितका शाळेसाठी खर्च करते तो खर्च व्हाऊचर्स स्वरूपात पालकांना दिला जातो. पालकांनी शाळेची निवड करून त्या शाळेत व्हाऊचर्स जमा करायचे. त्या रकमेतून शाळेने शिक्षकांचे पगार करायचे.
शरद जोशींना या कल्पनेवर छेडले. ते म्हणाले भारतीय परंपरेतील गुरुदक्षिणेशी ही कल्पना जोडता येईल. विद्यार्थ्यांनीच आपल्या शिक्षकाची निवड करावी, विद्यापीठे ही कल्पना व्यक्तीपातळीपर्यंत सीमित करावीत. मी शरद जोशींचा अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे’ इथपर्यंत विकेंद्रीकरण झाले पाहिजे. ग्राहक हा विद्यार्थी असल्याने तोच सक्षम झाला पाहिजे. शिक्षण हे खुल्या व्यवस्थेने झाले तरच ते प्रभावी होईल. शिक्षणाविषयी ते बोलू लागताच माझ्यातील तथाकथित शिक्षणतज्ज्ञही गडबडून गेला. ते म्हणाले, ‘राज्यसभेतील भाषणात मी म्हणालो, की उच्चशिक्षणात फक्त 12 विद्यार्थी पोहोचतात, यात परिस्थितीमुळे जे ड्रॉपआऊट होतात त्यात सुधारणा झाली पाहिजे; परंतु सर्वांनीच अंतिम बिंदूपर्यंत पोहोचले पाहिजे अशी अपेक्षा करणे म्हणजे दुसरीकडून पाणी उसणे आणून जमिनी बागायती करा, असा आग्रह धरण्यासारखे आहे. शिक्षणात नकळत वगळण्याची प्रक्रिया असणारच. त्या वगळण्याच्या प्रक्रियेमुळेच शेवटच्या टोकावर पोहोचण्याला अर्थ प्राप्त होतो.
प्रयोगशील शिक्षणात मुलांना हळुवार पद्धतीने शिकवण्याला महत्त्व आहे. शिक्षा न करता मुलांना फुलविणे महत्त्वाचे मानले जाते. याला शरद जोशींचा जोरदार विरोध आहे. ते म्हणाले, हळुवार हाताळून मुलांना पंगू बनविणार्‍या या पद्धती आहे. हीच विचारसरणी पुढे गरिबी हटविण्यापेक्षा गरिबांना कुरवाळण्यात रूपांतरित होते. अशा प्रकारची कमजोर मुलेच पुढे आत्महत्येकडे ढकलली जातात का? याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे 1 ली ते 8 वी परीक्षाच नको. या विचारसरणी मला मान्य नाहीत. नापास होणं हा शिक्षणप्रक्रियेचाच एक भाग आहे. इतक्या स्वच्छपणे त्याकडे बघता आले पाहिजे. शिक्षणात खूप काही वाचूनही इतकं ठामपणे मत मांडणार्‍या जोशींपुढे मला काही काळ निरुत्तर झाल्यासारखं वाटलं.
महिलांच्या विधेयकावर शरद जोशींनी विरोधी मतदान केलं. त्यावर समजून न घेता टीका झाली. शरद जोशींनी तीन मतदारसंघ एक करून तीन प्रतिनिधींमध्ये एक महिला प्रतिनिधी असावी असा प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव वास्तववादी होता. त्याविषयी विचारलं, तेव्हा ते हसले… म्हणाले, की चांदवडला लाखो महिलांनी 20 वर्षांपूर्वी स्वातंत्र्याची शिदोरी देणार्‍या मला महिलाविरोधी जरूर म्हणा; पण तेथून पुन्हा निवडणूक लढवायची नाही, मग मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले तरी चालेल हा या विधेयकातला सर्वांत क्रिटिकल भाग आहे, हे लक्षात कसे येत नाही. बिजिंग महिला परिषदेच्या अगोदर महिला प्रश्नाची केलेली मांडणी अधिक द्रष्टेपणाची होती. ते म्हणाले, की तुम्हाला स्त्रीचा पुरुष बनवायचा आहे का? की तिची स्वत:ची काही बलस्थाने आहेत त्याचाही विचार करायचा आहे की नाही? एक सुशिक्षित तरुणी मला म्हणाली, की मला नटायला आवडते. खूप आनंद मिळतो. तिला तुम्ही प्रतिगामी ठरवणार का? शिक्षणात स्वयंपाक करण्याचे कौशल्य ठेवले तर गदारोळ का होतो?
मला ते सारं ऐकताना चांदवडला लाखो महिला ‘डोंगरी शेत माझं गं’ हे गाणं म्हणताना आठवत होत्या आणि फ्रेंच बोलणारा, धड मराठीही न येणारा हा टी शर्ट, जीनमधील शरद जोशी त्या निरक्षर बायकांचा भाऊ झाला होता. मला उत्सुकता त्या मांडणीची नव्हती. वर्षानुवर्षे कुटुंबात राहून नवर्‍याशीही मनातलं न बोलणार्‍या या अडाणी महिला शरद जोशींसारख्या पाश्चात्य वळणाचं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या माणसाशी इतकं मनमोकळं कसं बोलल्या असतील? शरद जोशींना त्यात विशेष काहीच वाटत नव्हतं. ते म्हणाले, मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्या उत्तरे देत. काहीच लपवत नव्हत्या. कदाचित माझ्याविषयी त्यांना अधिक विश्वास वाटत असावा. फ्रेंच बोलणारे जोशी आणि निरक्षर महिला हे अंतर एक विश्वास, प्रामाणिकता भेदून पार जाऊ शकतो. ते म्हणाले, ‘‘महिला स्वातंत्र्याच्या भुकेल्या आहेत. ती स्वातंत्र्याची प्रेरणा जागवायला हवी. कमला दाससारखी जन्मभर बंडखोर म्हणून जगलेली लेखिका आयुष्याच्या संध्याकाळी मुस्लिम धर्म स्वीकारते व तो धर्म स्वातंत्र्याला सर्वांत पोषक असल्याचा तिला साक्षात्कार होतो… हे कसं समजावून घ्यायचं? स्वातंत्र्याचा शोध हेच स्त्री चळवळीचं सूत्र असलं पाहिजे.
आमची चर्चा सुरू असताना म्हात्रेसर ‘लोकायत’ हे 500 पानांचं इंग्रजी पुस्तक घेऊन आले. दुपारपासून जोशींचा पाठपुरावा चालला होता आणि म्हात्रेसर त्यांच्या नेहमीच्या चिकाटीने शोधत होते. ते पुस्तक सापडल्यावर शरद जोशींना खेळणी सापडल्यावर आनंद व्हावा तसा आनंद झाला… ते भराभरा पुस्तकाची पाने उलटू लागले… मला 75 वयाच्या व्यक्तीची ती ज्ञानलालसा, उत्कंठा थक्क करून गेली.
अलीकडे शरद जोशी धर्म, अध्यात्म, जडवाद, चैतन्यवाद, लोकायत हा सारा अभ्यास करताहेत. त्यांच्यावर पटकन शिक्काही मारता येत नाही. ते संस्कृतचे पंडित आहेत इथपर्यंत माहीत असते; परंतु जडवाद-चैतन्यवाद यात ते कुठे? हे कळत नाही. ते हसून म्हणाले, ‘‘घाबरू नका… मी अजून जडवादीच आहे! दलित, बहुजनांचा कैवारी असणार्‍या कुणीही अध्यात्म परंपरा अभ्यासली नाही, त्यामुळे ती एका विशिष्ट वर्गाचीच परंपरा झाली. मी शेतकर्‍यांच्या नजरेतून हे सारे विश्‍लेषण करू इच्छितो.’ पुढे ते म्हणाले, की मी मूळचा शंकराचार्यांचा अद्वैत तत्त्वज्ञानी होतो. तिथून मी दूर गेलो. या अज्ञात पोकळीतला लेपीलर्ळेीी नाही या मुद्यावर मी 20 वर्षे अडून होतो; पण आता उत्तराच्या जवळ आहे. तरीसुद्धा एका भिंतीजवळ मी उभा आहे.
पण मुळात धर्म, अध्यात्म, चैतन्यवादाचे आकर्षण का वाटते?
‘‘त्याचे कारण सोपे आहे. मी जेव्हा चळवळीत आलो तेव्हा तंत्रज्ञान आणि जेनेटिक्स या दोनच गोष्टी माझ्यासाठी अज्ञात होत्या. पैकी तंत्रज्ञानाचा अभ्यास बर्‍यापैकी केला. एका वनस्पतीवर रोपणाने जर परिवर्तन होते, तर माणसात जेनेटिक्सने बदलाची शक्यता आहे का? हे मी शोधतो आहे. आपले जर मन:पटल आहे तसे एक उेीाळल मन:पटल आहे. या दोन्ही पटलांच्या नात्याचा मी शोध घेतो आहे… ते जे बोलत होते त्यातले खूप काही कळाले नाही, कारण ते संत्रात्मक शब्द होते. फक्त मनात विचार आला, की जडवाद, चैतन्यवाद या हजारो वर्षांच्या अनियंत्रित कसोटी सामन्याचा शरद जोशी निर्णय लावतील तेव्हा शेतकरी अर्थशास्त्राइतकेच ते देशाला योगदान असेल; पण तो अभ्यास करताना त्यांच्यातील ‘विद्यार्थी’ बघणं लोभसवाणं असतं.
पुराणकथातील कथांचा अर्थ आजच्या जगण्याला ते लावतात तेव्हा ती त्यांची प्रतिभा वाटते. अध्यात्मावर बोलताना ते म्हणाले, की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी त्याचे दर्शन घ्यायला सहा साधू निघाले. पाच साधू पोहोचले; पण सहाव्या साधूला दरोडेखोरांनी पकडून गुलाम केले आणि आफ्रिकेत विकले. तेथून सुटका करून तो जेव्हा ख्रिस्ताच्या गावाला पोहोचला तेव्हा ख्रिस्ताला त्याच दिवशी क्रूसावर चढवले होते. त्याला उतरावयाचे काम या साधूला करावे लागले. शरद जोशी किंचित थांबतात आणि म्हणतात, या साधूशी माझी नाळ जोडलेली मला वाटते… माझी नियतीच मला या साधूची वाटते. स्वगत बोलावे तसे शरद जोशीबोलू लागतात. लहानपणीच्या शारीरिक आजारातून स्वातंत्र्याची प्रेरणा माझ्या आली असेल; पण वेदनेशी नाते त्या ख्रिस्ताचे शव उतरविणार्‍या साधूशीच माझे आहे… मी काहीसा उद्विग्न आहे. दुसर्‍याच्या जगण्यात हस्तक्षेप करण्याचा मला काहीच अधिकार नाही, असे मला वाटते.
दीड लाख शेतकरी आत्महत्या करतात हा पराभव वाटू लागतो. आपण मानसिक बळ, लढण्याची ताकद दिली नाही, असे वाटू लागते…
ते सारं ऐकताना गलबलून येतं. स्वत:च्या आयुष्याची इतकी कठोर मीमांसा आजकाल कोण करतय? प्रत्येक क्षणाक्षणाला स्वत:कडे इतक्या तटस्थपणे बघणं आणि प्रांजळपणाने सत्याला सामोरे जाणे हे करणारे शरद जोशी. 75 व्या वर्षीही एखादे पुस्तक सापडल्यावर लहान मुलासारखे हुरळून जाणारे.
व्यक्तिगत आयुष्याची होरपळ करून सन्मान तर सोडाच; पण ‘अमेरिकेचा एजंट’पासून जातीवाचक शिव्या झेलून, मतदारांची कृतघ्नता पचवून, शारीरिक आघात झेलूनही ही ज्ञानलालसा नि:शब्द करून टाकते… पृथ्वीवरून नष्ट होणार्‍या दुर्मिळ डशिलळशी कडे जसे बघावे, तसे आपण त्यांच्याकडे बघू लागतो…
रोज नवं पुस्तक वाचून… नवं भाषण ऐकून नव्या नव्या विचारसरणीवर हिंदकाळत केवळ चर्चा करणारे आपण आणि स्वित्झर्लंडच्या बर्फापासून आंबेठाणच्या शेतातील ढेकळं तुडवत, राज्यसभेपासून गावच्या चावडीपर्यंत आणि जागतिक बँकेतल्या एखाद्या विदुषीपासून चेहर्‍यावर पदर ओढलेल्या खेड्यातल्या मायेपर्यंत फिरणारा हा झंझावात हिमनगासारखा फक्त जाणवत राहतो…
शरद जोशीना आम्ही बघितलंय आणि ऐकलंय’ एवढीसुद्धा आपली उपलब्धी खूप झाली.

(लेखक सामाजिक , शैक्षणिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत)

8208589195 

Previous articleशरद जोशी: सत्यशोधनाच्या वाटेवरील यात्रिक
Next articleकलम 370! आता पुढे काय?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here