–प्रा. प्रसेनजित एस. तेलंग
आपण नाहीत तर,
खोपटातून झिरपणाऱ्या हसऱ्या प्रकाशातून
कोण डोकावतो मग?
आपण नाहीत तर,
पाळण्यातल्या गुलाबी मुठींत
कोणी पेरलीत स्वप्न मग ?
आपण नाहीत तर,
तृणपात्यांनाही खड्गाची आली धार कोठून?
.आपण नाहीत तर,
कातळकाळ्या दगडी कंठाला आला पाझर कोठून?
आपण नाहीत तर,
कशी निनादते झोपड्या झोपड्यांतून निळाईची धून?
आपण नाहीत तर,
कशी सळसळते वेदनांतूनही ताठ कण्याची खूण?
आपण नाहीत तर,
का थरथरतो हा शतकांचा मस्तवाल अंधार?
आपण नाहीत तर,
कसा चेतला धमन्यांमधून आवेशाचा अंगार?
बाबा !
आपण नाहीत तर,
रस्त्यावरच्या आवळलेल्या मुठींतून कोण प्रकटतो मग?
आपण नाहीत तर,
निस्तेजल्या राखेतही का जाणवते धग?
(प्रा.प्रसेनजित तेलंग लेखक व कवी आहेत)
+91 99609 10240