-मिथिला सुभाष
++++
आपल्या आसपास अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची सयुक्तिक संगती आपल्याला लावता येत नाही. बहुतांश लोक अशा घटनांची नोंदही घेत नाहीत. पण काही घटना एवढ्या एखाद्या मोठ्या धक्क्यासारख्या, शॉकसारख्या येतात आणि आपण त्या विसरू शकत नाही. मी अनुभवलेल्या अशाच या घटना..
एका लोकप्रिय साप्ताहिकाची प्रतिनिधी म्हणून मी मुंबईच्या ‘बॉम्बे हॉस्पिटल’मधे त्या डॉक्टरांच्या भव्य कन्सल्टिंग रूममधे बसले होते. ‘आत्मा, भूत वगैरेचं अस्तित्व असतं का,’ हा माझा विषय होता. ‘हे सगळं खोटं आहे, साफ झूट आहे,’ असं संपादंकांचं मत होतं. मी मात्र माझा विषय लावून धरला होता. अखेरचं हुकमाचं पान म्हणून संपादकांनी सांगितलं की एखाद्या अशा माणसाशी बोलून लेख करा जो माणूस विज्ञानाशी संबंधित काही काम करतोय. मला या डॉक्टरांच्या अनुभवांबद्दल ऐकून माहीत होतं. म्हणून मी गेले होते तिथे. संपादकांना खात्री होती की दोन-चार कडक शब्द बोलून डॉक्टर माझी हकालपट्टी करणार.
आणि इथे हे जगद्विख्यात डॉक्टर त्यांना आलेले ‘अतृप्त आत्म्यांचे’ अनुभव मला सांगत होते..!! ते दोन्ही अनुभव ऐकून त्या वातानुकूलित कॅबिनमधे मी अधिकाची गारठून गेले होते. दोन्ही कथा डॉक्टरांच्या शब्दात…
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
“मी नुकताच मेडिकलची परीक्षा पास झालो होतो. आपलं क्लिनिक सुरु करण्याआधी महाराष्ट्रातल्या एका खेड्यात सहा महिने मेडिकल ऑफीसर म्हणून काम पाहावं लागणार होतं. सगळा सरकारी खाक्या होता. त्या डिस्पेन्सरीत सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, बँडेजचं सामान, धनुर्वाताची औषधं याव्यतिरिक्त काहीही नसायचं. ही औषधं पण अनेकवेळा मागितल्यावर तालुक्याच्या गावावरून आमच्या खेड्यात यायची. गावठी वैद्य, हकीम, देवदेवस्की मात्र जोरदार सुरु होती. मलाही इथे सहा महिने काढून माझा स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्याचं लायसन्स मिळवायचं होतं. त्यामुळे सगळं धकवून घेत होतो मी..
“एका रात्री खूप पाऊस लागला होता. कोकणातला पाऊस. वेडावाकडा वेड्यासारखा कोसळत होता. माझी राहण्याची सोय डिस्पेन्सरीच्या मागेच होती. पावसात मला कुणीतरी दरवाजा ठोठावत असल्याचा आवाज आला. इतक्या धो-धो पावसात व्हिजीटसाठी जावं लागणार होतं. माझी मेडिकलची पोतडी तयारच होती. मी जाऊन दार उघडलं. दारात एक १०-११ वर्षांची मुलगी डोक्यावर प्लास्टिक घेऊन उभी होती. मला पाहताच म्हणाली,
“डॉक्टर काका, माझ्या आयेला जास्ती दुखतंय.. लै कळवळतेय.. तुम्ही चला.”
मी बाहेरचा दिवा लावला. उजेडात मुलगी नीट दिसली. गुडघ्यापर्यंत पोचणारा शाळेचा वाटेल असा निळा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज. डोक्यावरून घेतलेलं प्लास्टिक आणि कपाळावर चिकटून बसलेल्या कुरळ्या बटा. दोन भुवयांच्या मधोमध ठसठशीत गोंदणठिपका. थेट बघणं. मी तिला विचारलं,
“काय झालंय तुझ्या आईला?”
“झालं नाय काय, बाळ होणारे.”
बाळंतपणाची केस होती. मी निघालो. पोरीला माझ्या छत्रीत घ्यायचा प्रयत्न केला. पण ती थोडं अंतर राखून डोक्यावर प्लास्टिक पांघरून चालली होती. थोडी लंगडत चालत होती. दहा मिनिटं त्या चिखलमातीतून आम्ही रस्ता तुडवत होतो. काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं,
“नाव काय ग तुझं?”
“सुमन”
“कितवीत आहेस?” उत्तर आलं नाही. मी पुन्हा विचारलं, “जातेस ना शाळेत?”
“होय.. पाचवीत होते..”
मुलगी चुणचुणीत होती. पण ही गावातली माणसं..!! पोरीला काढून टाकलं असेल शाळेतून असा अर्थ घेतला मी.
“तुझे बाबा काय करतात?”
“मोठं शेत आहे आमचं. भात पेरतो आम्ही. पेरण्या सुरु आहेत ना, बाबा तिथेच आहे शेतात. त्याचं काय काम नव्हतं, त्याला काय सुधरणार नव्हतं. म्हणून मी तुमच्याकडे आली. चुलीवर पाणी ठेवलं गरम करायला आणि आली.”
मला तिच्या हुशारीचं कौतुक वाटलं. एवढं बोलेपर्यंत मुलीचं घर आलं. आवाराला असलेलं कुडाचं दार उघडून सुमनने मान उंचावून माझ्याकडे पाहिलं,
“डॉक्टर काका, माझी बकरी भिजत असेल पावसात. तिच्यावर आडोसा करून येते,” असं म्हणून, मी काही बोलायच्या आत सुमन घराच्या मागे पळून गेली.
मी ओटीवरून आत आलो. कानोसा घेतला. आतल्या एका खोलीतून बाईच्या विव्हळण्याचा क्षीण आवाज येत होता. मी अंदाजाने पोचलो. खाटेवर एक तिशीतली बाई प्रसूतीकळा देत होती. गावातलीच असल्यामुळे आणि गांव तसा लहान असल्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना ओळखत होतो. मी तिला तपासलं, काही जुजबी प्रश्न विचारले. बाळाचं डोकं मोठं होतं. घरात बाळंतपण करतांना Cuts देण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे forceps delivery करायला लागणार होती. सुदैवाने माझ्याकडे सगळी तयारी होती. सुमनने पाणी तापवायला ठेवलं होतं ते मला आठवलं. स्वयंपाकघर कुठेय विचारून मी गेलो. चुलीतली आग विझत आली होती, पण पाणी चांगलं कढत झालं होतं. एका परातीत भाकरीचं पीठ काढलेलं दिसत होतं. याचा अर्थ बाई भाकरी करायला बसली आणि तिला कळा सुरु झाल्या होत्या. मी तिथल्याच एका फडक्याने धरून ते भांडं बाळंतीणीच्या खोलीत आणलं. शक्य तेवढं हायजीन पाळून त्या बाईची डिलीवरी करून घेतली. पुढचे सगळे सोपस्कार तिच्याच मदतीने पार पाडले. अजून सुमनचा पत्ता नव्हता. पण मला तिकडे लक्ष देण्याचं कारण नव्हतं आणि तेवढा वेळही नव्हता. त्या लहान मुलीला माझ्या मदतीला घेण्याचा प्रश्नच नव्हता. तिने पाणी तापवून ठेवलं होतं तेच खूप. कदाचित आईने सांगितलं असेल तिला. सगळं झाल्यावर मी पाहिलं, बाई फारच शिणल्या होत्या. मी निघतांना म्हंटलं, “काहीतरी गरम पेज वगैरे करून द्यायला हवी तुम्हाला. कुणी आहे का आसपास?” पण वाहणाऱ्या वाऱ्याशिवाय कुणीच नव्हतं घरात. वारं मात्र झपकन माझ्या कानाकडून गेल्याचा भास झाला मला. बाई म्हणाली, “घरात कुणीच नाही. आता जराशाने पहाट होईल, शेजारच्या घरातली माणसं उठतील. शेतावर पण सांगावा धाडायला पाहिजे!” मी म्हंटलं, “सुमनकडून भरपूर साखरेचा चहा तरी करून घ्या. मी येतो आता!”
“सुमनकडून?? तुम्ही कसे ओळखता डाक्टर तिला??”
“तीच आली होती ना मला बोलवायला, तुम्ही तिच्याकडून पाणी तापवून घेतलं हे फार बरं झालं. मला काही चूल पेटवता आली नसती.”
बाईंचे डोळे पाण्याने भरले. मला काही कळेना..
“तरीच मी म्हंटलं एकदम तुम्ही कसे आलात..!!”
“म्हणजे..??”
“डाक्टर, सुमन जिवंत नाहीये. माझी लेक ती. चार वर्षापूर्वी शाळेतून येतांना पायाच्या घोट्याला साप चावला आणि त्यातच गेली. खूप उपचार केले. पण तालुक्याच्या गावी नेण्याआधी विष भिनलं आणि माझी पोर..!”
“हे कसं शक्य आहे?? तुम्हाला कळा सहन होत नाहीएत हे सांगायला तीच आली होती. चुलीवर पाणी तापवून ठेवलं होतं. आणि तुम्ही म्हणता…”
“माझं एक काम करता डाक्टर?” बाईंनी माझ्याकडून एका लोखंडी ट्रंकेतून एक प्लास्टिकची पिशवी काढून घेतली. त्यातले काही फोटो काढून माझ्या हातात दिले. आई-बाबांच्या मधे उभी छोटी सुमन. शाळेच्या गणवेशातली सुमन. एक फोटो तिच्या चेहऱ्याचा, क्लोज फोटो. बर्फाचा गोळा खात खिदळणारी सुमन. कपाळावर आलेल्या कुरळ्या बटा आणि दोन भुवयांच्या मधोमध असलेला गोंदणठिपका. माझा थरकाप झाला. पाचवीत ‘होते’ असं सांगणारी सुमन.. लंगडत चालणारी सुमन.. कदाचित साप चावल्यामुळे का?? मला काही सुचेना. बाई रडत होत्या. मी त्यांना म्हंटलं,
“रडू नका. तुमची मुलगी आहे आसपास. वाईट वाटेल तिला..” आणि मी निघालो. स्वयंपाकघरातून धूर येतांना दिसला. मी तिथे डोकावलो. मघाशी विझलेली चूल आता पेटलेली होती. त्यावर ठेवलेल्या भांड्यात भाताची पेज रटरटत होती..!! ओह्ह..!!
त्यानंतर डॉक्टरांनी गावात अधिक चौकशी केली. सुमनच्या आईने सांगितलेली हकीगत शंभर टक्के खरी होती.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
डॉक्टरांनी सांगितलेली सत्यकथा ऐकून मी स्तब्ध झाले होते. अजून दुसरी एक गोष्ट ऐकायची होती मला. तीही डॉक्टरांच्याच भाषेत सुरु करू..
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
“मुंबईत माझी प्रॅक्टिस उत्तम सुरु झाली होती. हृदयरोगतज्ज्ञ म्हणून माझा नावलौकिक झाला होता. पण सुमन मनात ठाण मांडून बसलेली होती. गावाकडून आलेला एखादा रुग्ण, कपाळावर गोंदण असलेली एखादी बाई पाहिली की माझ्या डोळ्यासमोर सुमन यायची. पण एरवी आयुष्य नीट सुरु होतं.
“माझे एक गुजराथी पेशंट होते. बडी असामी. अश्वशर्यतींचे शोकीन. मुंबईतल्या शर्यतींच्या हंगामात शनवार-रविवारी ते रेसकोर्सवर असायचेच. पण बंगलोर आणि पुण्याच्या हंगामात तिथेही जायचे.
“असाच एकदा पुण्याच्या अश्वशर्यतीचा हंगाम सुरु झाला. शेठजींच्या हृदयाची परिस्थिती फारशी बरी नव्हती. मी त्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला. पण ते कसले ऐकतात. माझा सल्ला धुडकावून लावून ते एका शुक्रवारी उशिरा रात्री मुंबईहून स्वत:च्या मोटारीने निघाले. ते आणि त्यांचा चालक असे दोघेच होते. आणि घडू नये ते घडलं. घाट चढत असतांना त्यांच्या छातीत दुखायला लागलं. त्या काळात मोबाईल वगैरे नसायचे. शेठजी घाबरेघुबरे झाले. चालकाला काही सुचेना. मुंबई-पुणे जुना रस्ता. रात्रीची दोन-अडीचची वेळ. रहदारी अजिबात नाही. एवढ्यात शेठजींना दूर एका बंगल्यात दिवा दिसला. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं, ‘त्या बंगल्यात जा आणि तिथे टेलिफोन असेल तर मुंबईला आपल्या डॉक्टरांना फोन कर.’’
“ड्रायव्हर धावतपळत तिथे पोचला. बंगल्याच्या वरांड्यातच एक वयस्कर गृहस्थ आरामखुर्चीवर बसून काही वाचत होते. ड्रायव्हरने त्यांना सगळं सांगितलं आणि त्यांच्याकडे मदत मागितली. गृहस्थ म्हणाले, “तू अगदी योग्य माणसाकडे आलायस. मी हृदयरोगतज्ज्ञ आहे. चल, त्यांना घेऊन येऊ.”
“तोपर्यंत इथे शेठजी हवालदिल झालेले होते. ड्रायव्हर त्या गृहस्थांना घेऊन आला आणि दोघांनी मिळून शेठजींना बंगल्यात नेलं. तोपर्यंत शेठजींची शुद्ध हरपली होती. त्या तथाकथित डॉक्टरांनी शेठजींना तपासले आणि ड्रायव्हरला सांगितलं की यांचं तातडीने ऑपरेशन करायला पाहिजे.. ड्रायव्हर काय बोलणार. त्या डॉक्टरांनी त्यालाच हाताखाली घेतलं आणि बंगल्याच्या आतल्या भागात असलेल्या एका सुसज्ज ऑपरेशन थियेटरमधे त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करायला घेतली. दोन-अडीच तासांनी त्यांनी ओपन केलेल्या छातीवर टाके घातले.
तोपर्यंत त्या ड्रायवरची अवस्था काय झाली होती, ते काही मला आपल्या कथानायक डॉक्टरांनी सांगितलं नाही. ते पुढे बोलायला लागले..
“शेठजींना शुद्ध आली तेव्हा दिवस पूर्ण उगवला होता. मॉर्निंग वॉकसाठी म्हणून गेलेले डॉक्टर अजून परत आले नव्हते. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेचे तपशील आणि काही औषधं लिहून तो कागद चालकाकडे दिला होता. शुद्धीवर आलेल्या शेठजींना जेव्हा हे कळलं की आपल्यावर शस्त्रक्रिया झालीये, तेव्हा ते हादरले. कारण, शरीरावर ऑपरेशनच्या सगळ्या खुणा, बँडेज वगैरे सगळं होतं पण डॉक्टर गायब होते आणि…
“त्या बंगल्यात ऑपरेशन थियेटरच नव्हतं..!”
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
… पण ऑपरेशन तर झालं होतं.. शेठजी समोर बसले होते. डॉक्टरांनी टाके बघण्यासाठी त्यांचं बँडेज उघडलं. डॉक्टर हैराण झाले. जुन्या पद्धतीने केलेली शस्त्रक्रिया होती. मागच्या दहा वर्षात हृदयाच्या शस्त्रक्रियेत झालेली सुधारणा आणि बदललेली पद्धत अजिबात दिसत नव्हती. एक्सरेजचे रिजल्ट उत्तम होते. पण या पद्धतीने हृदयावर शस्त्रक्रिया हल्ली होत नव्हती. डॉक्टरांनी शेठजींना त्या डॉक्टरचं नाव विचारलं. शेठजी म्हणाले,
“मला नेलं तेव्हा मी बेशुद्ध होतो आणि सकाळी मी शुद्धीवर आलो तेव्हा डॉक्टर मॉर्निंग वॉकला निघून गेले होते.. कधी विचारणार नाव. आणि त्या तशा परिस्थितीत माझ्या ड्रायव्हरलाही ते सुचले नसावे. आम्ही त्यांची खूप वाट पहिली. पण उन्हं चढली तरी त्यांचा पत्ताच नव्हता. मग माझ्या ड्रायव्हरने बंगालाभर शोध घेतला. तेव्हा त्याला कळलं की त्या बंगल्यात रात्री पाहिलेलं ऑपरेशन थियेटर कुठेच नव्हतं!”
“काय??” डॉक्टर बिथरले, “अहो, तुमचा ड्रायव्हर अडाणी. त्याला काय कळतंय? बरं, काही औषधं दिली आहेत का तुम्हाला?”
शेठजींनी त्यांच्या हातात प्रिस्क्रिप्शन दिलं. त्यावरचं नाव वाचून डॉक्टरांची बोबडी वळली. काही वर्षापूर्वी मानसिक संतुलन ढळलेल्या एका निष्णात डॉक्टरला मुंबईहून पुण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात नेले जात असतांना वेडाच्या भरात त्यांनी अॅम्ब्युलंसमधून उडी मारली होती. त्यात त्यांचा अंत झाला होता. तेच डॉक्टर होते हे.
शेठजींची तब्येत बरी होईपर्यंत त्यांना काहीही सांगायचं नाही असं डॉक्टरांनी ठरवलं. शस्त्रक्रिया उत्तम पार पडली होती. फक्त लिहून दिलेली औषधं आता बाजारात उपलब्ध नव्हती. डॉक्टरांनी ती बदलली. शेठजी यथावकाश बरे झाले.
दरम्यान, डॉक्टर त्या जागी जाऊन आले. सोबत शेठजींचा ड्रायव्हर होता. त्याने दाखवलेल्या स्पॉटवर तसा कुठलाही बंगला नव्हता. आसपास कुठे एखाद्या बंगल्यात एखादा डॉक्टर राहतो का, त्याचीही चौकशी केली. सगळे म्हणाले, हे तर जंगल आहे. इथे कसलीच मनुष्यवस्ती नाही. काही ठाकरपाडे आहेत. पण डॉक्टर नाही इथे कुणीच.
या घटनेतून अर्थ काढण्यासाठी अंदाज बांधायची काही गरज नाहीये. वेडाच्या भरात ज्या डॉक्टरांनी त्या स्पॉटवर उडी घेतली होती, ते निष्णात हृदयरोगतज्ज्ञ होते. आपल्या व्यवसायात काहीतरी करत राहण्याची त्यांची इच्छा अपुरी राहिली होती. ती त्यांनी शेठजींवर शस्त्रक्रिया करून पूर्ण केली.
किंवा…
शेठजींचे आयुष्य शिल्लक होते आणि काळ आला, पण वेळ आली नव्हती. त्यामुळे जगाचे व्यवहार पाहणाऱ्या त्या अज्ञात शक्तीने सगळी सोय केली आणि शेठजीला त्याचे उर्वरित आयुष्य परत दिलं. त्यासाठी आत्महत्त्या केलेल्या डॉक्टरांचे नाव, रूप, आणि लेटरहेड वापरलं. काहीही असलं तरी हे आहे चित्तथरारकच.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
अशा गोष्टी सृष्टीत सतत घडत असतात. आता मी पुन्हा एकदा स्वानुभव सांगते. १९८१ साली माझ्या वडलांना कॅन्सर झाला. माझ्या माहेरची आर्थिक स्थिती यथातथा. मी लग्न होऊन इंदौरला गेले होते. वडलांच्या तब्येतीबद्दल भावाचं पत्र आलं आणि मी माझ्या लेकीला घेऊन मुंबईत आले. ’८२ च्या जानेवारीचा दुसरा आठवडा होता तो. वडलांचं खाणं कमी झालं होतं, बोलणं तर संपूनच गेलं होतं. खाणाखुणा करून बोलायचे. तेही फार कमी. एरवी डोळे मिटून पडून असायचे. झोपेत आहेत की गुंगीत आहेत हेच नाही कळायचं. आणि अशातच एक दिवस त्यांना उचकी लागली आणि ते गेले. म्हणजे आम्हाला असं वाटलं की ते गेले. मरण अनपेक्षित नव्हतं. त्यामुळे नातेवाईकांना कळवणे, डॉक्टरांना बोलावणे वगैरे सोपस्कार सुरु झाले. डॉक्टरांनीही घरी येऊन, त्यांना तपासून डेथ सर्टिफिकेट लिहायला घेतलं. आणि वडलांनी एकदम एक आचका दिला आणि खाडकन डोळे उघडले. आम्ही सगळेच सुशिक्षित, सोबत डॉक्टर होतेच. त्यामुळे आम्ही घाबरलो नाही, आनंद झाला आम्हाला. डॉक्टर मात्र अतिशय खजील झाले. त्यांनी वडलांच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले, “सॉरी मिश्राजी, मुझसे गलती हो गई!”
त्यावर वडील हसले आणि खणखणीत आवाजात म्हणाले, “आपसे कोई गलती नहीं हुई है, मैं जा के वापस आया हूं!” डॉक्टरांनी ते थट्टेवारी नेलं आणि ते गेले. आम्हाला मात्र आश्चर्य वाटलं की बोलणं बंद झालेले वडील इतके कसे खणखणीत बोलायला लागले??
त्याच रात्री दादांनी, म्हणजे आमच्या वडलांनी आम्हा तिघा भावंडांना आणि आईला जवळ बसवलं. आम्हाला म्हणाले,
“मी खरोखर मेलो होतो. मला इथून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने सूर्याच्या किरणांमधून मला कुठेतरी नेलं. तिथे त्याचं आणि दुसऱ्या एका व्यक्तीचं भांडण झालं. ती दुसरी व्यक्ती मला वाटतं यमराज होती.”
त्यानंतर ही दादा खूप बोलत राहिले. त्यांनी तिथल्या वातावरणाबद्दल सांगितलं, तिथे उजेड कशा पद्धतीचा होता ते सांगितलं. तिथे जाण्याच्या प्रवासाबद्दल बोलतांना ते म्हणाले,
“आम्ही सूर्याच्या किरणांवर स्वार असलो तरी मधे एक मोठा अंधारा बोगदा आला होता. त्यातून जातांना मला आईच्या गर्भातून पृथ्वीवर येतांना जे वाटलं होतं, तसं वाटलं.”
दादा बोलत होते आणि आम्ही आपसात खाणाखुणा करत होतो. आम्हाला वाटलं त्यांना भ्रम झालाय. हिंदू धर्माचे अभ्यासक. यम हा सूर्यपुत्र आहे असं कुठल्यातरी पुराणात लिहिलं आहेच. त्यामुळे ती सूर्याची किरणं वगैरे आलीएत डोक्यात. पण गप्पं बसून ऐकणं भाग होतं. ते बोलत राहिले.
“मला चुकून तिथे नेलं होतं. दुपारी आपले डॉक्टर जे बोलले ना तेच तिथला तो मुख्य माणूस मला म्हणाला की, मिश्राजी, गलती हो गई. मेरा दूत आपको भूल से ले आया. आपकी मृत्यू-तिथी तो वसंत पंचमी की है…
“त्यावर मी त्याला म्हंटलं की तुझ्या माणसाने चूक केलेली आहे, त्याची भरपाई तू द्यायला पाहिजे. त्याने मला सांगितलं, ‘आयुष्य सोडून काहीही माग. तुझं आयुष्य ठरलेल्या दिवशी संपायचे आहे आणि त्यात मी ढवळाढवळ करू शकत नाही.’ मी म्हंटलं, मला माझ्या मुलांना काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, मला माझी गेलेली वाणी परत दे. त्याने होकार दिला. म्हणून मी नीट बोलतोय हो. पण वसंत पंचमीच्या पहाटे मी जाणार!”
त्यांचं पूर्ण आयुष्य आमच्यासमोर होतं. त्यांना येणारे गूढ अनुभव, त्यांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास, त्यांना असलेले अज्ञाताचे आकर्षण आणि त्यासाठी ते करत असलेला अभ्यास, चिंतन-मनन हे सारे आमच्या परिचयाचे होते. तरी त्यावेळी मात्र आम्हाला असंच वाटत राहिलं की ते भ्रमात बरळत आहेत.
माझे बंधू विज्ञानवादी. त्यांनी या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. मी माहेरवासाला आलेली मुलगी. मला फार काही काम वगैरे नसायचं. आणि तसंही माझ्या लहानपणापासून ते माझ्यावर आणि मी त्यांच्यावर प्रसन्न होतो. ते नेहमी म्हणायचे की माझी ही मुलगी माझ्या विद्येची, माझ्याकडे जे काही ज्ञान-माहिती आहे त्याची वारसदार आहे. त्या काळात माझे वडील माझ्याशी इतकं काही आणि इतकं खोलात जाऊन बोलले आहेत की ते मला जन्मभर पुरतंय. देव, धर्म, त्यातल्या अनेक संकेतिक गोष्टी, सृष्टीचं गूढ, माणसाचं आयुष्य, त्याचा जन्माला येण्याचा हेतू… अशा अनेक विषयांवर ते माझ्याशी बोलायचे. माझ्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या अनेक घटनांबद्दल त्यांनी मला सावध केलं. अर्थात तो त्यांच्यातला निष्णात ज्योतिषी बोलत होता हे मला कळत होतं. कुंडली पाहून समजलेल्या काही गोष्टी आपल्याच मुलीला कशा सांगायच्या म्हणून त्यांनी पूर्वी मला किंवा घरातल्या कुणालाच सांगितल्या नव्हत्या. माझ्या मोठ्या बहिणीच्या अकाली निधनाबद्दल कल्पना दिली. भावाबद्दल सांगितलं की आज तो जगण्यासाठी संघर्ष करत असला तरी एक दिवस तो खूप मोठा होईल. मी गेल्यावर त्याला अतिशय मानाची नोकरी लागेल. बौद्धिक समाजात त्याचं नाव गाजेल. या आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, ज्या इथे लिहिणं योग्य ठरणार नाही. पण त्या सगळ्या गोष्टी नंतर खऱ्या झाल्या. तेव्हाही, त्या दादांनी मला आधीच सांगितल्या होत्या हे मी घरी बोलले नाही. मात्र, मला आयुष्यभराचे मार्गदर्शन केलं त्यांनी.
याच गप्पांच्या दरम्यान एकदा मी त्यांना विचारलं की, दादा, तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला ‘त्या’ प्रवासात आईच्या गर्भातून पृथ्वीवर आलो तेव्हाचा प्रवास आठवला होता. त्यावर दादा म्हणाले,
“आईच्या गर्भातून पृथ्वीवर केलेला प्रवास कुणालाच आठवत नाही. मलाही ‘मरण्या’आधी कधीच नव्हता आठवला. पण त्यावेळी आठवला हे खरंय.”
घरच्यांना बरं वाटत होतं की त्यांच्या या अवस्थेत त्यांना अटेंड करणारं घरचं मायेचं माणूस मिळालंय. बोलतांना ते दमायचे, धाप लागायची त्यांना. मी त्यांना थांबा म्हणून सांगायचे. फार बोलू नका असं विनवायचे, कधी दटावायचे. पण याबाबतीत त्यांनी कधीच माझं ऐकलं नाही. रोज सकाळी उठून, ‘आजची तिथी काय,’ हे मात्र न चुकता विचारायचे.
आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की दादांची तब्येत सुधारते आहे. त्यांचं ते वसंत पंचमीचं आम्ही काही फार मनावर घेतलं नव्हतं कारण त्यांच्यात लक्षणीय सुधारणा दिसत होती. वय देखील फार नव्हतं. त्रेसष्टावं सुरु होतं. कॅन्सरसह अनेक वर्षे जगणारी माणसं आम्ही पाहत होतो. त्यांची औषधं व्यवस्थित सुरु होती. आता ते हळूहळू पलंगावरच उठून बसायला लागले होते. पण घरातल्या इतरांशी ते कधीच एवढ्या तपशीलात बोलले नाहीत. आई गमतीत म्हणायची, या एकाच लाडक्या मुलीशी गप्पा मारण्यासाठी यांना यमराजाने यांची वाणी परत दिलीये.
एकदा रात्री दहा-साडेदहाच्या सुमाराला त्यांनी मला हाक मारली. मला म्हणाले, बस माझ्याजवळ, कंटाळा करू नको. मी बसले. त्या रात्री त्यांनी मला सांगितलं, तू फक्त माझी मुलगी नाहीएस, शिष्या आहेस माझी. आणि शिष्य हा रक्ताच्या मुलांपेक्षा जास्त जवळचा असतो. तू तर मुलगीही आहेसच. मला तुझी काळजी वाटते.
मी अवाक झाले. काळजी करण्यासारखं काहीही नव्हतं माझ्या आयुष्यात. चांगला नवरा, चांगलं घर, छान मुलगी. मी त्यांना सांगितलं, “दादा, तुम्ही असं निरवानिरवीचं बोलू नका. अजून माझी तिशी पण नाही झालेली. मी पन्नास वर्षांची होईपर्यंत तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाहीये.”
यावर ते हसले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि पाणी मागितलं. मी त्यांना पाणी दिलं. ते पाणी प्यायले आणि तो घोट त्यांनी तोंडातच ठेवला. मी म्हंटलं, दादा गिळा ना पाणी. पण ते तो घोट गिळत नव्हते. माझ्याकडे पाहून हसत होते फक्त. रात्र खूप झाली होती. आईने मला झोपण्यासाठी हाक मारली. स्वत: येऊन दादांना झोपवलं, त्यांच्या अंगावर पांघरूण घातलं. तरीही ते तोंडात पाण्याचा घोट ठेऊन माझ्याकडे बघत होते. मी आईलाही सांगितलं. आई त्यांना प्रेमाने म्हणाली, मिश्राजी घोट गिळा तो. पण छे.. ते तसेच झोपले.
सकाळी नेहमीप्रमाणे सहाच्या सुमाराला आम्ही उठलो. चहा झाल्यावर आईने त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या अंगाला हात लावला. पण त्यांचं शरीर बर्फाहून गार झालं होतं.
तो दिवस होता, वसंत पंचमी, ३० जानेवारी १९८२.
सगळे म्हणायचे, घरात मुलगा असतांना पाण्याचा घोट काही मागितला नाही मिश्राजींनी. तेव्हा आई माझ्याकडे पाहायची. मी दिलेला आणि त्यांनी तोंडातच ठेवलेला तो पाण्याचा घोट त्यांनी कधी गिळला असेल? माहीत नाही.
ते गेले आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी भावाला टाईम्स ऑफ इंडिया’मधून पत्र आलं. त्याने मुलाखत दिली आणि तो नोकरीवर रुजू झाला, ते अगदी काल-परवा निवृत्त होईपर्यंत तो तिथे होता. उत्तम पत्रकार, उत्तम लेखक म्हणून बहुत नाव झालं त्याचं. २००० च्या जानेवारीत माझी मोठी बहीण अनपेक्षितपणे व्यतीत झाली. त्यांनी मला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी एक-एक करून खऱ्या झाल्या, होत आहेत.
काय आहे हे?? फक्त ज्योतिष?? की आणखी काही?? आधीच्या, डॉक्टरांनी सांगितलेल्या दोन्ही घटनांत आणि माझ्या वडलांच्या या, मृत्यूला हात लावून परत येण्याच्या आणि नंतर अक्षरश: ‘विद्यादान’ केल्यासारखे माझ्याशी बोलण्यामागे कुठल्या अज्ञात शक्तीचा हात आहे?? माहीत नाही. पण मी त्या शक्तीला सपशेल शरण आहे..!!
(-पूर्वप्रकाशन: ग्रहसंकेत, एप्रिल २०१८.)
साभार : संदीप खाडिलकर , संपादक , ग्रहसंकेत
(आपल्या प्रतिक्रिया लेखाखाली comments मध्ये लिहू शकता किंवा mediawatch777@gmail.com यावर ईमेल वर पाठवा)
श्वास रोखुन वाचावं हे इतकं सुंदर होतं. थरारक म्हणु की काय कळेना.पण काहीवेळ हृदयाला गती देणारं सारं.
मिथिला ताई, विश्वास असला की असे अनेक अनुभव येत असतात. आपल्या आजूबाजूला अश्या गोष्टी आहेत पण म्हणून त्या सगळ्यांनाच दिसत नाहीत. तुम्हाला तुमचे वडील गुरु म्हणून लाभले हे भाग्यच तुमचं.
मिथिला ताई, विश्वास असला की असे अनेक अनुभव येत असतात. आपल्या आजूबाजूला अश्या गोष्टी आहेत पण म्हणून त्या सगळ्यांनाच दिसत नाहीत. तुम्हाला तुमचे वडील गुरु म्हणून लाभले हे भाग्यच तुमचं.