मी गांधीवादी!- डॉ श्रीराम लागू

=साभार : सोनाली शिंदे , संकेत मुनोत

डॉ. श्रीराम लागू हे अभिनयाचं विद्यापीठ; तशीच ती एक वैचारिक पाठशालाही होती. नाटकाबद्दलचा त्यांचा विचार अनेक जण जाणतात, पण त्यांच्या विचारांची कक्षा केवळ तेवढीच नव्हती. ते बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ असे जडवादी होते. ते गांधीवादीही होते. गांधींच्या विचारांवर त्यांचे प्रेम होते, तो त्यांच्या चिंतनाचा विषय होता आणि अंमलबजावणीचाही. ते सारे जाणून घेणे हा २०१७ च्या गांधी जयंतीनिमित्ताने घेतलेल्या या मुलाखतीचा हेतू होता. त्या दृक्‌श्राव्य मुलाखतीचा हा संपादित अंश…
———————————————————-
डॉ. श्रीराम लागू यांचे घर. हॉलमध्ये त्यांची वाट पाहत बसलो होतो… समोरच्या भिंतीवरच ‘नटसम्राट’मधले त्यांचे भलेमोठे छायाचित्र होते. ते पाहतच होतो, तोच हळूच त्या छायाचित्राखालचा दरवाजा उघडला गेला… अगदी नाटकाचा किंवा सिनेमाचा पडदा उघडावा तसा… आणि त्यामागे डॉ. लागू दिसले. चेहऱ्यावर हास्य. म्हणाले- आलात का तुम्ही?
आम्ही निःशब्द. छायाचित्रातील लागू बोलताहेत की समोरची जिवंत प्रतिमा? अद्‌भुतसा होता तो क्षण.
डॉ. लागू सोफ्याच्या मधल्या खुर्चीवर आणि आम्ही बाजूच्या सोफ्यावर बसलो… ओळख करून दिली. प्रारंभिक गप्पा झाल्या आणि मुलाखतीला औपचारिक सुरुवात झाली…

सर, तुमच्याकडे जेव्हा ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा प्रस्ताव आला होता, त्या वेळी तुम्ही तो नाकारला होता, असं आमच्या वाचनात आलं आहे… त्यामागे नेमकी काय भूमिका होती?

– हो, तसं झालं, पण माझ्या दृष्टीने ती साधी गोष्ट आहे. मी गांधी विचार मांडणारा माणूस. मी ‘गांधी हलकट माणूस होता’ असं कसं म्हणणार..? नथुराम नाटकाला माझा विरोध नाही. नाटक ही कलात्मक गोष्ट आहे, पण त्यात जो विचार मांडलाय, त्याला माझा सक्त विरोध आहे… मला त्यावरून मग शिविगाळही झाली.

तुमचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. गांधीजींबरोबर त्यांची भेट झाली होती…
– आमच्या सदाशिव पेठेतील घरात महात्मा गांधी दोन दिवस राहायला होते. मी तेव्हा लहान होतो, पण आजही तो दिवस माझ्या लक्षात आहे. गांधीजी आपल्या घरी आले याने मी भारावून गेलो होतो.

नथुराम गोडसेचं मंदिर बांधण्याच्या गोष्टी सध्या सुरू आहेत. त्याबद्दल तुमचं मत काय?
– बांधू द्यावं. काही हरकत नाही. तुमचा जर लोकशाहीवर विश्‍वास असेल, तर तुम्ही या मंडळींचा विचारसुद्धा मांडू दिला पाहिजे, पण तो विचार मला पसंत नाही. हे म्हणायचं माझं स्वातंत्र्य कुणी नाकारू शकत नाही.

तुमच्या दृष्टीने आजच्या काळात गांधी विचारांचं महत्त्व काय? आजच्या पिढीतील अनेक लोक गांधींना तितकं मानत नाहीत, असं दिसतं…
– गेल्या अनेक वर्षांमध्ये आत्यंतिक महत्त्वाचा असा कोणता विचार मांडला गेला असेल तर तो गांधीवाद आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. गांधी हे फॅड असल्याची चेष्टा अजूनही होते, पण गांधी अतिशय महान माणूस आहे. नुसता विचार करून उपयोग नाही, तर तो मांडला पाहिजे. मी गांधीवादी आहे, हे मांडण्याची माझी हिंमत पाहिजे. ती आपल्याकडे नाही.

आजच्या आमच्यासारख्या तरुणांनी नेमकं काय केलं पाहिजे? म्हणजे कोणती भूमिका घेतली पाहिजे?
– एक तर विचार करून स्वत:चं मत ठरवलं पाहिजे. मग वाट्टेल ते झालं तरी त्याच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. प्रलोभनं आली किंवा धमक्‍या आल्या तरी आपला विचार सांगायचं धाडस पाहिजे. मार खायची तयारी पाहिजे, पण निराश होण्याचं काही कारण नाही. कोणताही काळ समान विचारांचा नव्हता.

‘देवाला रिटायर करा’ असं तुम्ही म्हणाला होता. एका पुस्तकाला तशी प्रस्तावना लिहिली होती तुम्ही. त्यावरून खूप गदारोळही झाला होता, तर ते नेमकं प्रकरण काय होतं?
– समाजात धार्मिक कारणांसाठी मुलीचा गळा हाताने दाबणारे बाप पाहिले, त्याची प्रतिक्रिया होती ती… जशी घटना होती, प्रतिक्रियाही तितकीच तीव्र होती. मी तेव्हा तसे म्हणालो आणि आजही तेच म्हणेन.

ज्याप्रमाणे त्या काळात तुम्ही आणि इतर काही कलाकार भूमिका घेत होते. आजचे कलाकार तशी भूमिका घेताना दिसत नाहीत…
– आजच्या कलाकारांबाबत खरंच माझा अभ्यास नाही. एखादी गोष्ट मनापासून
करावीशी वाटली तर करायलाच पाहिजे. ती समाजोपयोगी असेल तर वाट्टेल ते झालं तरी
करत राहिली पाहिजे. कलाकारांनीही भूमिका घ्यायला पाहिजे… तुमची मानसिक तयारी नसेल तर समाजात विचार मांडण्याची तुम्हाला मुभाच राहत नाही.
(आता महिलांच्या मंदिरप्रवेशाचा प्रश्‍न गाजतोय, पण तेव्हा निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आदींनी पुढे येऊन शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं. दोघेही नास्तिक असूनही महिलांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन केलं होतं. त्याबद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या नाहीत, पण निळू फुलेंचं नाव काढताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले… पुढे त्यांच्या अभिनयाकडे वळलो.)

एक थोडा वेगळा प्रश्‍न… सर, तुम्ही इतक्‍या महान भूमिका साकारल्यात… रसिक प्रेक्षक तुमच्या अनेक भूमिकांवर प्रेम करतात, पण तुम्ही साकारलेल्या भूमिकांमधली तुमची सर्वांत आवडती भूमिका कोणती?
– डॉ. श्रीराम लागू…

हे आमच्या शेवटच्या प्रश्‍नाचं उत्तर होतं. प्रश्‍न काहीच नाहीत आता… लागूंच्या उत्तरांतून… आपल्या प्रश्‍नांची उत्तरं आपणच शोधायची… दिशा तर डॉ. लागूंनी दिली होती आणि प्रचंड आशावादही…
त्यांच्या घरातून निघताना त्यांच्या पत्नी दीपाताईंशीही थोडं बोलणं झालं. लागू देव मानत नाहीत, पण दीपाताई दीड दिवसांचा
गणपती बसवतात. लागूंनी त्याला विरोध केला नाही. ते गणपतीच्या पाया पडत नाहीत, पण मोदक मात्र आवडीने खातात. दीपाताई आम्हाला हसून सांगत होत्या…! हा खरा लोकशाहीवादी विचारी माणूस… खरोखरच ‘सूर्य पाहिलेला माणूस’!

-(ही मुलाखत knowing Gandhism Global Friends समूहाने घेतली आहे.)

संकेत मुनोत 8087446336

साभार: esakal

Previous articleतुमच्या या सुंदर बिनडोकपणाचं रहस्य काय?
Next articleगांधी घराण्याचे नाव आता पुरे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here