-सुनील तांबे
युरोपियन तत्वज्ञानाच्या अनेक संस्थापकांमध्ये सॉक्रेटीसचं नाव घेतलं जातं. सॉक्रेटीसबद्दल त्याच्या समकालीनांनी जे काही लिहीलं आहे त्यावरून आपल्याला सॉक्रेटीसची माहिती मिळते. ही माहितीही पुरेशी विश्वासार्ह नाही कारण संवाद आणि नाटक ह्या स्वरुपात ती उपलब्ध आहे. एरिस्टोफेनिसच्या एका नाटकात सॉक्रेटीसचं चित्रण हेराफेरी करणारा आणि तरुणांना फसवाफसवीचं तंत्र शिकवणारा असं करण्यात आलंय. सॉक्रेटीसचा शिष्य प्लेटो. त्याने सॉक्रेटीसबरोबरचे संवाद लिहून ठेवले आहेत. झेनोफेन आणि प्लेटो ह्यांनी केलेलं सॉक्रेटीसचं चित्रण ठसठशीतपणे वेगळं आहे. तत्कालीन अथेन्समधील सर्वात शहाणा आणि न्यायी पुरुष म्हणजे सॉक्रेटीस असं वर्णन प्लेटोने केलं आहे.
पाश्चात्य तत्वज्ञानाचा संस्थापक अशी सॉक्रेटीसची ख्याती आहे. मात्र सॉक्रेटीसने कधीही एक ओळही लिहीलेली नाही. त्याने कधीही उपदेशही केला नाही. तो फक्त प्रश्न विचारायचा. उत्तरांमधील तार्किक विसंगतीवर तो बोट ठेवायचा. शिक्षणाच्या ह्या पद्धतीला सॉक्रेटीसची पद्धत म्हटलं जातं. आजही शिक्षणाच्या ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो कारण त्यामधून शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचंही शिक्षण होतं.
सॉक्रेटीसचा बाप शिल्पकार किंवा दगडफोड्या होता. सॉक्रेटीसही ही कामे करत असे. अथेन्समधील पार्थेनान ह्या मंदिराच्या उभारणीत त्याच्या बापाने काम केलं होतं. त्याशिवाय सॉक्रेटीसने तीन युद्धातही भाग घेतला होता. निवृत्त झाल्यानंतर सॉक्रेटीस शिक्षक म्हणून काम करू लागला.
सॉक्रेटीस हा अथेन्समधील सर्वात शहाणा मनुष्य आहे ही घोषणा केली डेल्फीच्या ओरॅकलने. अपोलो देवतेच्या मंदिरातील ही पुजारीण देवांचा संदेश लोकांना सांगत असे. अवघ्या युरोपातून या मंदिरात भाविक येत असत. ह्या देवतेने असं जाहीर केलं की कोणीही माणूस सॉक्रेटीस एवढा शहाणा नाही. त्यामुळे सॉक्रेटीसची ख्याती वाढली.
मात्र दस्तुरखुद्द सॉक्रेटीस त्यामुळे हुरळून गेला नाही. पुजारणीने केलेली घोषणा हे कोडं आहे अशी त्याची धारणा होती. शहाणा माणूस कोणाला म्हणायचं, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. त्यावेळच्या अथेन्समधील शिक्षक, राज्यकर्ते, कलावंत ह्यांना तो भेटला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सॉक्रेटीस अशा निष्कर्षाला आला की ह्या सर्व पुरुषांची अशी धारणा आहे की ते ज्ञानी आहेत. मात्र त्यांना जे माहीत नाही ह्याबाबत ते पूर्णपणे अज्ञानी आहेत. मला जे माहीत नाही, ते विचार करूनही मला कळत नाही, असं सॉक्रेटीस म्हणत असे. सर्व पामरांप्रमाणेच आपणही अज्ञानी आहोत ह्याबद्दल सॉक्रेटीसची खात्री होती. मात्र आपण अज्ञानी आहोत हे त्याला कळलेलं होतं म्हणून तो शहाणा माणूस ठरला, असं त्याचं म्हणणं होतं.
सॉक्रेटीस ठेंगणा आणि लठ्ठ होता. आपले बटबटीत डोळे बाहेर काढून पुढच्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून तो प्रश्न विचारत असे, अशी नोंद प्लेटोने केली आहे. सतत प्रश्न विचारून दुसर्यांना भंडावून सोडणार्या या कुरुप अजागळ माणसाला अथेन्समध्ये फारसे मित्र नसावेत.
सॉक्रेटीस सोफीस्ट पंथाचा आहे अशीही वदंता होती. तरुणांना बंडाची शिकवण देणारे सोफीस्ट समजले जात. अथेन्समधील तरुणांना बहकवण्याचा, त्यांना नास्तिक बनवण्याचा आरोप सॉक्रेटीसवर ठेवण्यात आला.
अथेन्सच्या तीन नागरीकांनी हा खटला दाखल केला.
आपला दावा मांडण्यासाठी या तीन नागरिकांना प्रत्येकी एक तास देण्यात आला.
त्यांच्या दाव्याला उत्तर देण्यासाठी सॉक्रेटीसला तीन तास देण्यात आले.
दोन्ही पक्षांनी आपली भूमिका मांडल्यानंतर सॉक्रेटीस दोषी आहे की निर्दोष, हे ठरवण्यासाठी अथेन्सच्या कायद्याप्रमाणे गुप्त मतदान घेण्यात आलं.
ह्या खटल्यात सॉक्रेटीसने आपली बाजू मांडली. आपण नास्तिक असल्याचा आरोप त्याने नाकारला. अथेन्समधील उन्नत आचरणाचा पक्ष मी नेहमीच घेतला आहे, असं त्याने ठासून मांडलं.
मात्र त्याने युक्तिवाद केला नाही. निवाडा करणारे पंच विचार करण्यात अतिशय सुमार बुद्धिचे आहेत असं त्याने आपल्या खास शैलीत मांडलं.
सॉक्रेटीस दोषी आहे असं लिहीलेल्या थाळीत २८० मतं पडली.
२२० मतं सॉक्रेटीस निर्दोष आहे या थाळीत पडली.
पंचानी सॉक्रेटीसला दोषी ठरवलं आणि देहांताची शिक्षा फर्मावली.
त्यावेळच्या अथेन्सच्या कायद्यानुसार गुन्हेगाराला पर्यायी सजा सुचवता यायची. सॉक्रेटीसलाही ही संधी मिळाली. तो म्हणाला देहान्त शासनाऐवजी अथेन्सने त्याला मेजवानी द्यावी. केवळ आदरणीय आणि थोर पुरुषांनाच अशी मेजवानी देण्याची रीत होती. टिंगल करण्याची एकही संधी सॉक्रेटीस सोडत नसे. मात्र त्यामुळे पंचांनी देहदंडाची सजा कायम केली.
सॉक्रेटीसच्या अनुयायांना रडू कोसळलं. तुरुंगातून पळून जाण्याची गळ त्यांनी सॉक्रेटीसला घातली. देहांताची शिक्षा ठोठावलेला गुन्हेगार पळून जाणं ही स्वाभाविक बाब मानली जात असे. मात्र सॉक्रेटीसने ती सूचना धुडकावून लावली. मी नेहमीच अथेन्सच्या कायद्याचं पालन केलं आहे, असं तो म्हणाला.
पृथ्वीवरील आपला अल्पकालीन मुक्काम आनंदी व्हावा, दफनानंतरही आनंदात असावं यासाठी आपण देवाची प्रार्थना करतो एवढं बोलून सॉक्रेटीसने प्रार्थना केली आणि हातातला विषाचा प्याला ओठाला लावला.
विषाचा प्याला ओठाला लावताना तो किंचितही थरथरला नाही. एका घोटात त्याने विषाचा प्याला रिता केला.
(लेखक नामवंत पत्रकार आहेत)
9987063670