नेताजींचा कोट्यवधी रुपयांचा खजिना कोणी हडपला?

गेल्या काही महिन्यांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयात अनेक वर्ष फाईलींच्या आड दडलेली नवनवीन माहिती समोर येत आहे. नेताजींचा मृत्यू १९४६ मध्ये विमान अपघातात झाला नसून १९५३ मध्ये सैबेरियात त्यांना फाशी देण्यात आली या गौप्यस्फोटानंतर आता नेताजींनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या कोट्यवधी रुपयांच्या खजिन्याबाबतची काही माहिती उघड झाली आहे. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात ‘अतिशय गोपनीय’ असा शिक्का मारलेल्या दीडशेपेक्षा अधिक ‘नेताजी फाईल्स’ आहेत. त्यामध्ये नेताजींच्या दोन सहकार्‍यांनी आझाद हिंद सेनेच्या खजिन्याची कशी विल्हेवाट लावली आणि तत्कालीन नेहरू सरकारने त्याकडे कसे दुर्लक्ष केले याबाबत शेकडो अहवाल, कागदपत्रं आणि टेलिग्राम आहेत. नेताजींच्या मृत्यूचं रहस्य अद्यापपर्यंत जसं उलगडलं नाही तसाच काहीसा प्रकार नेताजींच्या खजिन्याबाबत झाला आहे. नेताजी हे अतिशय दूरदृष्टी असलेले नेते होते.
दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर इंग्रजांची भारतावरील राजवट आता फार दिवस नाही, हे त्यांनी हेरलं होतं. त्यामुळे इंग्रजांविरुद्ध निर्णायक लढाई लढण्यासाठी त्यांनी जपान, र्जमनी व इतर राष्ट्रांच्या मदतीने संपूर्ण तयारी केली होती. मात्र ही तयारी करताना आर्थिकदृष्ट्या केवळ या देशांवर अवलंबून न राहता आझाद हिंद सेनेजवळ स्वत:चा निधी असावा या दृष्टीने त्यांनी प्रय▪सुरू केले. त्यासाठी त्यांनी आझाद हिंद बँकेची स्थापना करून जपान, ब्रह्मदेश आणि पूवरेत्तर देशांमध्ये हजारोंच्या संख्येने वास्तव्य करून असणार्‍या भारतीय समुदायाला युद्धनिधीसाठी मदत करण्याचे आवाहन केले. नेताजी त्यावेळी एवढे लोकप्रिय होते की त्यांनी आवाहन करताच लाखो रुपयांचा निधी व सोन्याचांदीचे दागिने आझाद हिंद सेनेजवळ जमा व्हायला लागलेत. मधुश्री मुखर्जी या लेखिकेने ‘चर्चिल्स सिक्रेट वॉर’ या पुस्तकात नेताजींवरील लोकांच्या अफाट प्रेमाचे काही किस्से दिले आहेत. ‘१९४४ मध्ये रंगूनमध्ये झालेल्या नेताजींच्या एका सभेनंतर हिराबेन बेतानी नावाच्या एका महिलेने तेव्हा दीड लाख रुपये किंमत असलेले १३ सोन्याचे हार नेताजींना अर्पण केले. हबीब साहेब नावाच्या एका भारतीय करोडपतीने एक कोटी रुपये युद्ध कोषात जमा केले. सर्वात मोठी देणगी रंगूनचे प्रसिद्ध उद्योजक व्ही. के.चलैया नाडर यांनी दिली. त्यांनी तब्बल ४२ कोटी रुपये आणि सोन्याचे २८00 नाणे आझाद हिंद बँकेत जमा केलेत.’ १९४५ मध्ये अशीच कोट्यवधी रुपयांची देणगी नेताजींना मिळाली. त्यावर्षी नेताजींच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त रंगूनच्या लोकांनी आठवठाभर उत्सव साजरा केला. ‘द स्प्रिपिंग टायगर-द इंडियन नॅशनल आर्मी अँन्ड नेताजी सुभाषचंद्र बोस’ या पुस्तिकेच्या लेखिका ह्यू टोये यांनी त्यावेळच्या वातावरणाचे वर्णन केले आहे. ‘नेताजींनी चलो दिल्लीचा नारा देताच सभेला उपस्थित हजारो लोकांनी सभा संपताच नेताजींची सोनेतुला केली. त्यांच्या वजनापेक्षा कितीतरी अधिक सोने त्यावेळी जमा झाले. याशिवाय २ कोटी रुपये रोख रक्कमही लोकांनी दान केली.’ पूवरेत्तर देशातील भारतीयांनी नेताजींवर पैसे व दागिन्यांचा एवढा वर्षाव केला की, नेताजींसमोरची पैशाची चिंताच मिटली. अनेकांच्या मते २0 व्या शतकात एखाद्या नेत्याने जमा केलेला तो सर्वात मोठा युद्धनिधी होता.

मात्र नेताजींच्या दुर्दैवाने काही दिवसांतच परिस्थिती बदलली. अमेरिकेने जपानवर Azad hind sena अणुबॉम्ब टाकताच दुसर्‍या महायुद्धाचे चित्रच बदलले. मित्र देशाच्या सैन्याने जपान आणि ब्रह्मदेशात जोरदार मुसंडी मारली. आझाद हिंद बँकेचं मुख्यालय असलेल्या रंगूनमध्येही मित्र देशाचं सैन्य घुसलं. नेताजींनी २४ एप्रिल १९४५ ला लढाईतून माघार घेऊन बँकॉक गाठलं. तेव्हा त्यांनी आपल्यासोबत काही रोख रक्कम व दागिने आणले होते. ते नेमके किती होते याची माहिती मिळत नाही. मात्र युद्धानंतर ब्रिटिश अधिकार्‍यांनी आझाद हिंद बँकेचे अध्यक्ष दीनानाथ यांची चौकशी केली तेव्हा ६३.५ किलो सोने सोडून बाकी खजिना नेताजी स्वत:सोबत घेऊन गेले होते, अशी माहिती त्यांनी दिली होती. पुढे १९५६ मध्ये नेताजींच्या मृत्यूची चौकशी करणार्‍या शाहनवाज आयोगासमोर साक्ष देताना इंडियन इंडिपेंडंस लीगचे प्रमुख देवनाथ दास यांनी नेताजींनी १ कोटी रुपयांची संपत्ती घेऊन रंगून सोडलं होतं, अशी माहिती दिली होती. आझाद हिंद सेनेचे सेनापती जगन्नाथराव भोसले यांनी सहा स्टीलच्या बॉक्समध्ये सोने, दागिने आणि नगदी घेऊन नेताजी बँकॉकला आले होते, असे सांगितले होते. नेताजी स्वत:सोबत किती संपत्ती घेऊन गेलेत याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. पुढे काही दिवसांतच १५ ऑगस्ट १९४५ मध्ये जपानने मित्र देशांसमोर आत्मसर्मपण केलं. आझाद हिंद सेनेनेही शरणागती पत्करली. १८ ऑगस्टला नेताजी आपले सहकारी हबीबुर रहमानसोबत सायगोनवरून जपानी विमानाने मंचुरियाला जायला निघाले. त्याच विमानाच्या अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. त्या विमानाने प्रवास करताना नेताजींनी चामड्याच्या दोन सुटकेसमध्ये सोन्याचे दागिने सोबत घेतले होते आणिअपघातानंतर जपानी सैन्याने ११ किलो सोने जप्त करून जपानच्या सैन्य मुख्यालयात पाठविले होते, असे सांगण्यात येते. या सगळ्या विषयात प्रचंड गोंधळ आहे.

नेताजींच्या त्या तथाकथित विमान अपघातानंतर कोट्यवधी रुपयांच्या आझाद हिंद सेनेच्या खजिन्याचे नेमके काय झाले, याबाबत वेगवेगळ्या कहाण्या आहेत. नेताजींच्या आझाद हिंद सरकारमध्ये प्रचार मंत्री असलेले एस. ए. अय्यर व इंडियन इंडिपेंडंस लीगचे पूर्वाध्यक्ष एम. राममूर्ती यांनी मिळून हा खजिना दडपला असा या दोघांवर संशय आहे. नेताजींच्या शेवटच्या काळात त्यांच्यासोबत असलेल्या अय्यर यांनी राममूर्ती यांना सोबत घेऊन जपानच्या सैन्य मुख्यालयातून नेताजींचा खजिना प्राप्त केला, असे ठोस पुरावे आता समोर आले आहेत. टोकियोतील इंडियन मिशनचे पहिले प्रमुख सर बेनेगल रामा यांनी ४ डिसेंबर १९४७ ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला पाठवलेल्या एका गोपनीय पत्रात राममूर्ती यांनी आझाद हिंद सेनेच्या खजिन्यातील बहुमोल वस्तू हडपल्या आहेत, असे कळविले होते. त्यावेळी जपानच्या वर्तमानपत्रात राममूर्ती व त्यांचे लहान भाऊ जे मूर्ती यांच्या आलिशान राहणीमानाच्या बातम्याही छापून आल्या होत्या. युद्धामुळे संपूर्ण जपान दैन्यावस्थेत असताना मूर्ती बंधू आलिशान सेडान कारमध्ये फिरून मोठय़ा प्रमाणात खर्च करत असल्याने जपानी मीडियाचे लक्ष त्याकडे वेधले गेले होते. मात्र बेनेगल रामांनी पाठविलेल्या पत्राकडे भारत सरकारने काहीही लक्ष दिले नव्हते. आझाद हिंद सेनेच्या खजिन्याबाबत सरकारला काही रस नाही, असे त्रोटक उत्तर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यांना प्राप्त झाले होते. पुढे चार वर्ष हे प्रकरण थंडबस्त्यात होते. त्यानंतर बेनेगल रामा यांच्या जागेवर के. के. चेट्टर हे अधिकारी बदलून आलेत. त्यांनी या प्रकरणाचा तडा लावण्याचा निर्णय घेतला. टोकियात त्यांना आझाद हिंद सेनेशी संबंधित अनेकांनी राममूर्ती व अय्यर यांनीच नेताजींचा खजिना हडपला, असे सांगितले. त्याचदरम्यान १९५१मध्ये अय्यर पुन्हा एकदा टोकियोत आले. भारत सरकारने आपल्याला रेनकोजी मंदिरात ठेवलेल्या अस्थी नेताजींच्याच आहे की नाही याची खात्री करण्यासोबतच अपघातग्रस्त विमानातील आझाद हिंद सेनेच्या खजिन्याचं काय झालं आहे याची माहिती घेण्यासाठी पाठविलं आहे, असे त्यांनी चेट्टर यांना सांगितले. मात्र चेट्टर यांचं यामुळे समाधान झालं नाही. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला लगेच पत्र पाठविले. ‘अय्यर यांच्या जपान दौर्‍याबाबत स्थानिक भारतीयांमध्ये प्रचंड संताप आहे. अय्यर हे राममूर्ती यांच्याकडे ठेवलेल्या खजिन्यातील आपला वाटा मागण्यासाठी आले आहेत, अशी येथील भारतीयांची भावना आहे. या दोघांनी मिळून नेताजींचा खजिना हडपला असे येथील भारतीयांना वाटते,’ असे त्यांनी कळविले. अय्यर यांना या पत्राचा लगेच सुगावा लागला. त्यांनी एक हुशारी केली. त्यांनी चेट्टर यांना सांगितले की, ‘आझाद हिंद सेनेच्या खजिन्याचा काही भाग राममूर्ती यांच्याकडे आहे. तो भारतीय दूतावासाने जप्त केला पाहिजे.’ त्यांच्या सूचनेनुसार राममूर्ती यांच्या घरी धाड टाकण्यात आली. तेथून थोडेफार दागिने मिळाले. मात्र अय्यर यांची ही एक चाल होती, असा चेट्टर यांना ठाम विश्‍वास होता. राममूर्तीवर संशय घेऊन थोडीफार रक्कम जप्त करायची आणि बाकी कोट्यवधी रुपयांची संपत्ती दोघांनी मिळून वाटून घ्यायची, असा डाव या दोघांनी रचला होता, असे चेट्टर शेवटपर्यंत सांगत होते. त्यांनी याबाबत अनेक चिठ्ठय़ा व टेलिग्राम परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठविले. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, असे पत्रही त्यांनी नवी दिल्लीला लिहिले होते.

पण काय कोण जाणे चेट्टर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतरही पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र विभाग या विषयात काहीच रस घेत नव्हते. एकटे चेट्टरच नाही तर अनेकांना अय्यर व राममूर्ती यांच्याबाबत संशय होता. परराष्ट्र मंत्रालयाचे तत्कालीन अवर सचिव आर. डी. साठे यांनी १ नोव्हेंबर १९५१ ला ‘NA Tresure and their handling by M/s Ayyar and Rammurti’ या शीर्षकाखाली एक टिपणी तयार करून पंतप्रधानांना पाठवली होती. त्या टिपणीत नेताजींना रंगून व इतर ठिकाणच्या भारतीयांनी देणगी म्हणून दिलेले कोट्यवधी रुपयांचे दागिने व रोख रकमेचे तपशील देऊन नेताजी सायगोनवरून जेव्हा रवाना झाले तेव्हा त्यांनी तिथेच कोट्यवधी रुपयांचा खजिना मागे सोडला होता, असेही नमूद केले होते. या टिपणीत अय्यर यांच्याबाबत ठोस शंका व्यक्त करण्यात आली होती. एका प्रत्यक्षदश्रीच्या सांगण्याप्रमागे सायगोनला अय्यर यांच्या खोलीत त्याने वेगवेगळ्या पेट्यांमध्ये बंद असलेला हा खजिना पाहिला होता. ही बाबही नमूद करण्यात आली. मात्र ही टिपणीही गांभीर्याने घेण्यात आली नाही. ‘पंतप्रधानांनी ती पाहिली आहे आणि संबंधित फाईलमध्ये ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे,’ एवढेच उत्तर साठे यांना मिळाले. आगामी काही दिवसांतच चेट्टर यांनी अय्यर यांच्याबाबत ज्या शंका व्यक्त केल्या होत्या त्या खर्‍या निघाल्या. १९५१ मध्ये अय्यर जपानमध्ये भारत सरकारच्या गुप्त मिशनवर आले होते. नेताजींचा विमान अपघातातच मृत्यू झाला आणि रेनकोजी मंदिरातील अस्थी नेताजींच्याच आहेत, हे ठासून सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यानुसार अय्यर यांनी नवी दिल्लीला गेल्यावर सरकारला अहवाल दिला होता. याचं बक्षीस म्हणून अय्यर यांच्या संशयास्पद कारवायांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं. काही दिवसांतच अय्यर यांची नियुक्ती सरकारच्या एकीकृत प्रचार कार्यक्रमाच्या सल्लागारपदी करण्यात आली आणि त्यांच्या खजिन्याच्या विषयातील फाईल बंद करण्यात आली. नेताजींच्या मृत्यूच्या रहस्याप्रमाणेच त्यांच्या खजिन्याचे प्रकरणही आतापर्यंत गुलदस्त्यातच होते. मात्र आता थोडीफार जी गोपनीय कागदपत्रे बाहेर येत आहेत त्यावरून आझाद हिंद सेनेचा कोट्यवधी रुपयांचा खजिना नेमका कुठे गेला आणि तो गायब होण्याकडे का दुर्लक्ष करण्यात आले याची संपूर्ण कहाणी उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleसर्वांनी श्रीमंत व्हावे की सर्वांनी सुखी व्हावे ?
Next articleआम्ही कवीच्या बाजूचे..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here