कादंबरीची सुरवातच रावण-लक्ष्मण संवादाने होते. युद्धानंतर रावण मरणासन्न स्थित पडलेला असतो. राम लक्ष्मणाला आदेश देतो की, सकल विश्वातील समग्र ज्ञान एकत्रित करून जी गुटिका तयार होईल, तशी गुटिका रावणाने सेवन केली होती. रावण वेदवेदांगांचा आणि शास्त्रांचा प्रकांड ज्ञाता होता. तू लगेच रावणाकडे जाऊन ते ज्ञान आत्मसात करून घे. कारण रावणाच्या मृत्यूबरोबर त्या ज्ञानाचाही आता अस्त होणार आहे. लक्ष्मण रावणाजवळ जाऊन विनंती करतो. रावण लक्ष्मणाला त्याच्या आयुष्यातील घटनांची उदाहरणे देत राजनीती, अर्थनीती, धर्मनीती आणि मनुष्यनीती सांगतो. पण रावण हेही सांगतो की, जीवनाचे परम ज्ञान प्राप्त केल्या नंतरही माणसाला जाणवत राहते की, त्याच्या पुढयात अद्यापही केवळ निस्सीम अज्ञानच पडले आहे. आपल्याला जे माहीत असते, त्यापेक्षाही जे माहीत नसते, ते अति-विशाल, अफाट असते.’’
१९४९ मध्ये प्रसिद्ध संशोधक डॉ. वि. भि. कोलते यांनी एक खळबळजनक निबंध लिहिला होता. ‘महात्मा रावण!’ डॉ. कोलते यांच्या मते राम-रावण संघर्ष म्हणजे आर्य आणि दंडकारण्यातील आदिम जमाती (तथाकथित राक्षस) यांच्यातील संघर्ष होय. दंडकारण्यावर त्यावेळी वस्तुतः रावणाचेच राज्य होते. हा भाग अनार्यांच्या मालकीचा होता आर्य व राक्षस या जमातीतील संघर्षाचे मूळ असे की, आर्यांना दक्षिणेकडील दाट अरण्यात राक्षसांच्या प्रदेशात जाऊन, त्यांच्यावर प्रभुत्व गाजवावयाचे होते. आर्य व राक्षस या जमातींचे जे वारंवार संघर्ष होत, त्यांचे स्थान म्हणजे दंडकारण्याचा परिसर होता. तत्कालीन आर्यावर्ताच्या राजकीय रंगभूमीवर रामाचे पदार्पण झाले आणि या आर्य-राक्षस संघर्षाला तीव्र स्वरूप प्राप्त झाले. तथाकथित ‘नरभक्षक राक्षसांच्या’ जाचाला भ्यालेल्या दंडकारण्यातील ऋषि समाजाला रामाच्या येण्याने आनंद झाला. लक्ष्मणाने शूर्पणखेला दिलेली क्रूर शिक्षा आणि कठोर वागणूक आणि त्याचा परिणाम म्हणून रावणाने केलेले सीतेचे अपहरण या घटना म्हणजे आर्य व राक्षस या जमातीतील संघर्षाचा कळस होय. आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी म्हणून रामाने लंकेवर केलेली चढाई व रावणाशी झालेले भीषण युद्ध या घटना त्या संघर्षाचा उत्तरभाग होत. ( संदर्भ: डॉ. सिंधू डांगे, ‘भारतीय साहित्याचा इतिहास, भाग-1’ महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ, नागपूर, १९७५)