मुजरा बंद पडायच्या अखेरच्या काळात बनारसमधल्या सगळ्यात मोठया मुजरा मंडीतल्या ‘चावल की गली’मध्ये अदालती बाई नावाची एक मुजरेवाली होती. तिच्या सौंदर्याच्या आणि नजाकतीच्या इतक्या वदंता आहेत की त्या खऱ्या असतील तर ती स्त्री अप्सरेहून सुंदर असणार, तिलोत्तमेहून देखणी असणार, मेनकेहून मादक असणार. उर्वशीहून कमनीय असणार ! ती देखणी तर होतीच खेरीज सुरेल गायिका होती मात्र ती तवायफ नव्हती. तिने आपला देह कुणाला विकला नव्हता. या अदालतीबाईकडे एका नवाबाचा मुलगा यायचा. या मुलाला जन्म देताच जन्मदात्री आई म्हणजे नवाबाची पत्नी निवर्तली होती. नवाबाने अनेक बायका केल्या होत्या, अनेकींना अंगवस्त्र ‘ठेवले’ होते. मात्र त्याचा वारसदार असणारा हा देखणा युवराज मात्र कोणत्याही बाईच्या जाळ्यात न सापडता थेट अदालती बाईच्या कोठ्यावर यायचा. खरे तर तो तिच्या मुलाच्या वयाचा होता ! मात्र त्याचं तिच्यावर निस्सीम प्रेम होतं.
एके दिवशी नवाबाला ही भानगड कळली. ज्या ताटात आपण हात धुतले, थुंकलो जिथे बनारसच्या अनेक रसिकांनी हात मारला तिथंल्या बंद पडत आलेल्या दुकानात आपलं पोरगं जीव टाकतंय हे त्याला सहन झालं नाही. त्यानं पोराला लाख परीनं समजावलं, पोरगं बधलं नाही. अखेर नवाबाने अदालती बाईला दम दिला. त्याच्या भीतीनं तिनं मुजरा बंद केला. तो तरुण पोरगा तिच्या कोठ्याबाहेर तास न तास येऊन बसायचा. ती बंद दाराआड तगमगत राहायची आणि हा अंधार झेलत पाऊस ,वादळे झेलत बाहेर उभा असायचा. हा सिलसिला काही आठवडे चालला. नवाबाने अनेक उपाय करूनही त्याला गुंगारा देऊन तो कोवळा पोरगा तिथं यायचाच. एके दिवशी नवाबाने त्याला भीती वाटावी, जरब बसावी म्हणून रोज त्याच्यासोबत जाणाऱ्या मित्राचा आपल्या हस्तकाकरवी त्याचा खून करवला. दहशत दूर राहिली, तो पोरगा खचला. रात्री गंगेच्या घाटावर जिथं मित्राला अग्नी दिला तिथंच तो बराच वेळ बसून राहिला. पण तो पुन्हा कुणाला दिसला नाही. लोक म्हणू लागले त्यानं गंगामय्यात उडी मारली, आईच्या कुशीत विसावला.
तो त्या दिवसापासून बेपत्ता झाल्याचं अदालती बाईलाही कळालं. तिचं काळीज तुटलं, आतड्यांना पीळ पडला. अंधाराच्या गर्तेत ढकललं गेल्यासारखं झालं. पण तिनं मनाशी एक कठोर निर्णय घेतला. त्यावर ती ठाम राहिली. तिनं आता आपण अखेरचा मुजरा करणार असल्याचा गवगवा केला. तिचे सगळे आशिक त्या दिवशी गोळा झाले, तिने त्यांचं मन रिझवलं. ती रात्र तिच्या जीवावर उठली होती. सगळे कदरदान परत गेल्यानंतर तिनं तिच्याजवळची उरली सुरली सगळी दौलत तिच्या वादकांत, सहनर्तिकात, गायिकांत वाटून टाकली. ते ही घरी गेले. रात्रीस दाटून आलेलं मळभ पहाटेस निबिड झालं तेंव्हा ती ही गंगेच्या पात्राच्या दिशेने चालू लागली, ती जसजशी पाण्यात जाऊ लागली तसतसा पाण्याचा प्रवाह मोठा होत गेला, वेग वाढत गेला. गंगेनं तिला आपल्या पोटात घेतलं. त्या भयाण रात्रीनंतर ती ही कुणाला दिसली नाही. ती कायमची निघून गेली पण त्या दिवसापासून अदालती बाईनं जिथं गंगेत पाऊल टाकलं होतं त्या पाण्याला कान लावले की घुंगरु किणकिणल्याचा आवाज येऊ लागल्याची चर्चा होऊ लागली.
अदालती बाईच्या काळातली पिढी नामशेष झाली पण तिचं नाव टिकून राहिलं. बनारसपासून जवळ असलेल्या बासूका या तिच्या गावी सगळ्या तवायफ येऊन वसल्या. छोटा पारा आणि बडा पारा अशा त्यांच्या दोन वसाहती तिथं वसल्या. काही लोक म्हणतात ही एक दंतकथा आहे, वास्तवातल्या अदालती बाईला अशा कुठल्या हालअपेष्टांना तोंड द्यावं लागलं नाही. तिला संघर्ष करावा लागला मात्र त्याची किनार वेगळी होती असं त्यांचं मत. असो. मात्र अदालती बाईबद्दल बनारसमध्ये विविध कथा सांगितल्या जातात. अदालती बाईला एक मुलगी होती तिचं नाव होतं रसोलन. १९०२ सालचा रसोलनचा जन्म. आपल्या हरहुन्नरी आईकडून तिने खयाल, दादरा, ठुमरी, टप्पा शिकून घेतला. तिची गायकी अफाट होती.
रसोलनची कीर्तीही आईसारखीच होती पण कदरदान आकसत गेले आणि तिला वाईट दिवस आले. १९४७ च्या सुमारास स्वातंत्र्य लढा परमोच्च टोकास पोहोचला होता आणि त्याच सुमारास या बायकांचे कोठे अखेरचा घटका मोजीत होते. अनेकींनी गायकीचा पेशा सोडून वेश्या व्यवसाय पत्करला. रसोलन त्याला अपवाद होती. १९४८ च्या सुमारास रसोलनबाईने मुजरा आणि गायकी दोन्ही सोडून दिलं. त्याच साली म्हणजे वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी तिने एका साडीविक्रेता असणाऱ्या सुलेमानशी निकाह लावला. त्याच्यापासून तिला पुत्ररत्नप्राप्ती झाली. वजीर त्याचं नाव. देशाला स्वातंत्र्य मिळालं मात्र फाळणीची जखम जिव्हारी लागली. अनेक कुटुंबांची यात वाताहात झाली. रसोलनबाई देखील यास अपवाद नव्हती.
मुलगा वजीर याला सोबत घेऊन तिचा पती सुलेमान पाकिस्तानला निघून गेला, रसोलनच्या कुटुंबाची फाळणी झाली. ती मात्र भारतात राहिली. नवरा आणि मुलगा गेल्याचा विरह तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी होता. रसोलनने अहमदाबादला स्थायिक व्हायचं ठरवलं. तिला स्थिरस्थावर व्हायला बराच मोठा काळ जावा लागला. कशीबशी ती सावरली देखील. परंतू नियतीला तिचं इतकंसं सुख देखील बघवलं नाही. सप्टेंबर १९६९ च्या सुमारास गुजरातमध्ये भयंकर हिंदू मुस्लिम दंगे उफाळून आले. त्यात रसोलनच्या घराची राखरांगोळी झाली. अत्यंत खिन्न मनाने तिने गुजरात सोडलं आणि ती उत्तरप्रदेशकडे रवाना झाली.
नवरा आणि मुलगा सोडून देशावरल्या प्रेमापोटी भारतात राहिलेल्या रसोलनला मुसलमान असल्याची भयंकर किंमत मोजावी लागली. युपीत अलाहाबादमध्ये तिने अत्यंत हलाखीत दिवस काढले. विशेष गोष्ट म्हणजे अलाहाबाद आकाशवाणी केंद्रानजीक तिची लहानशी टपरी होती. तिच्या दुर्दैवाच्या दशावताराची भनक लागल्यानंतर तिला योग्य ते स्थान देण्याचा प्रयत्न झाला. तिचे छायाचित्र अलाहाबाद आकाशवाणी केंद्रात लावण्यात आलं. त्या प्रसंगी तिने मार्मिक उद्गार काढले होते. तिचे छायाचित्र जिथे लावण्यात आलं होतं त्याच्या आजूबाजूस तत्कालीन विख्यात गायिकांची छायाचित्रे होती. त्या तसबिरींना पाहून रसोलन बोलली, “या सगळ्या देवी होत्या आणि आता मी अखेरची बाई उरली आहे !” १९७५ च्या सुमारास रसोलनचं निधन झालं आणि खऱ्या अर्थाने भारतातला मुजरा मृत्यूमुखी पडला. रसोलनला आपलं बाई असण्याचं दुःख सांगायचं नव्हतं तर आपल्या मादीपणाच्या टोकदार इतिहासाची व्यथा सांगायची होती पण तिची व्यथा ऐकायला कुणी पैदा झाला नव्हता. अदालती बाई आणि रसोलन यांची दास्तान अभ्यासताना हुरहूर लागून राहते की माझा जन्म त्यांच्या काळात झाला असता तर माझ्या खांद्यावर त्यांचे दुःख हलकं केलं असतं….
अशा कित्येक कथा कहाण्या आपल्या मातीत दफन असतील नाही का ? ज्या बायकांचं जगणं समाजाने कधी मोजलंच नाही त्यांच्या आयुष्यातला दर्दच इतका टोकदार आणि धारदार आहे की त्यापुढे जगातली सगळी दुःखे फिकी पडावीत !
………………………………………………….
नोंद – मला कुठेही अदालतीबाईचे छायाचित्र मिळाले नाही. युट्यूबवरती रसोलनबाईची गाणी आहेत, काही तसबिरी आहेत. सोबतचे चित्र अशाच एका मुजरेवालीचं आहे जिची कोणतीच नोंद नाही…
छान , हृदयस्पर्शी ! धांडोळा घेतला तर इतिहासात अशा अनेक कहाण्या मिळतील .सुंदर लिहिलं ! धन्यवाद .