सौजन्य -लोकसत्ता
मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रिजिजू या दोन नेत्यांच्या दबावामुळे एअर इंडियाच्या विमानांना विलंब होऊन प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. हे असे आपल्याकडे वारंवार होते याचे कारण व्यक्ती ही व्यवस्थेपेक्षा मोठी मानण्याची दळभद्री परंपरा. कायद्यापुढे सर्व समान आहेत वैगरे बाता मारायच्या पण वेळ आली की असमानता दाखवून द्यायची ही वृत्ती, आता बदलणे गरजेचे आहे.
……………………………………………………………………………………….
भारतीय मानसिकतेत पौरुषत्वाची संकल्पना नियमांना कमी लेखण्याशी संलग्न आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीस जितके नियम लागू होत नाहीत, तितकी ती व्यक्ती मोठी असे मानण्याचा प्रघात आपण सहजपणे स्वीकारलेला आहे. जिला वाहतुकीचे नियम लागू होत नाहीत, मोटार त्या व्यक्तीने कोठेही उभी केली तरी कोणी तक्रार करीत नाही, उलट वाहतूक पोलीसच त्यास सलाम करतो, जनसामान्यांना टोल आदी संकटांचा सामना करावा लागला तरी त्या व्यक्तीस करावा लागत नाही, विमानतळावर अन्यांना तासन्तास रखडावे लागत असताना यांना थेट आत प्रवेश दिला जातो, त्यांच्यासाठी इतरांची गरसोय झाली तरी कोणालाही त्यात गर वाटत नाही. अशा व्यक्तींना आपल्या समाजात शूर मानण्याची प्रथा असून ती व्यक्ती वा समाज दोघांनीही ती शिरसावंद्य मानलेली आहे. ही सांस्कृतिक गुलामगिरी अजूनही आपल्या रक्तातून गेली नसल्यामुळेच सध्या घडले तसे प्रसंग आपल्याकडे वारंवार घडतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी, हे परदेशी जायला निघाले आणि व्हिसा असलेला पासपोर्ट घरी विसरले. त्यांच्या जागी अन्य कोणी असता तर त्यास विमानतळावरून घरी पाठवला गेला असता. पण परदेशी पडले मुख्यमंत्र्यांचे सचिव. त्यात दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीच सोबत. त्यामुळे घरून व्हिसाधारी पासपोर्ट मागवून घेण्याची उसंत त्यांना मिळाली. या गोंधळात विमानाच्या उड्डाणास विलंब झाल्याने सर्वच प्रवाशांना मनस्तापास तोंड द्यावे लागले. तिकडे काश्मिरातून परतताना गृहराज्यमंत्री किरण रिजिजू आणि जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांच्यामुळे लेह येथून उड्डाण करणाऱ्या विमानास विलंब तर झालाच, पण या दोघांची सोय करावी लागल्यामुळे विमानात जाऊन बसलेल्या तीन प्रवाशांना खाली उतरवावे लागले. ही अशी वेळ सामान्य प्रवाशांवर अनेकदा येते. परंतु या खेपेचा वेगळेपणा असा की असा अन्याय सहन करावा लागलेली व्यक्तीही ज्येष्ठ सरकारी अधिकारी होती. त्यामुळे या प्रसंगाचा निदान बभ्रा तरी झाला. एरवी अन्य कोणी सामान्य प्रवासी असता तर असे घडल्याचे समाजास समजलेही नसते.
अर्थात ते समजल्यामुळे काही बदल होईल असे नाही. याचे कारण प्रत्येकास अतिमहत्त्वाची व्यक्ती म्हणून मिरवावयाची असलेली असोशी. या भावनेचा अतिरेकी आविष्कार राजकीय व्यक्तींत अनुभवास येत असला तरी ती भावना केवळ राजकारण्यांतच वास करीत असते असे नव्हे. या मातीतील संस्कृतीत सामान्य असणे पाप समजले जाते. त्यामुळे काहीही, कोणतीही सत्ता नसलेला जगण्यास अपात्र मानला जातो. त्यामुळे प्रत्येकाचा प्रयत्न असतो तो सत्ता मिळवण्यासाठी. याचा अर्थ प्रत्येकास आमदार, खासदार वा मंत्रीसंत्रीच व्हावयाचे असते असे नाही. परंतु तरीही अन्य कोणत्या ना कोणत्या मार्गाने सत्ता कशी उपभोगता येईल असाच नागरिकांचा प्रयत्न असतो. ती थेट मिळत नसेल तर सत्ताधारी आपले परिचित तरी असावेत असे नागरिकांना वाटत असते. हे असे वाटते कारण सत्ता असल्याखेरीज आपले जगणे सुकर, सुलभ होऊ शकत नाही, असा अनुभव या नागरिकास पदोपदी येत असतो म्हणून. साधा शाळा प्रवेश असो वा रुग्णालयातील उपचार किंवा अगदी काही किरकोळ काम. येथे ओळखपाळख असल्याखेरीज पान हलत नाही. या मार्गास पर्याय एकच. तो म्हणजे लाच देणे. एका मोठय़ा वर्गास तेही शक्य नसते. या वर्गाचा जगण्याचाच संघर्ष इतका तीव्र असतो की लाच देण्याएवढी आíथक उसंत त्यास नसते. मग हा वर्ग शक्तिमान म्हणता येईल अशांना लोंबकळण्याची संधी शोधतो. हे असे होते कारण प्रामाणिकपणे, जगण्याचे सर्व नियम पाळून जगणे हे आपल्या व्यवस्थेत नेभळटपणाचे मानले जाते. ही मानसिकता विशेषत: सांस्कृतिकदृष्टय़ा मागास उत्तरेत आढळून येत असली अन्य प्रगत प्रदेशांतून तिचे पुरते उच्चाटन झाले आहे असे नाही. तेव्हा या अशा मानसिकतेत केवळ सत्ता असून चालत नाही. ती गाजवावी लागते. त्यासाठी आसपास पुढेमागे भालदार चोपदारांचा लवाजमा हवा, आसपासच्या वाहतुकीला तुच्छ लेखत रोरावत जाणारी लाल दिव्याची गाडी हवी आणि सुरक्षा रक्षकही हवे. पुन्हा ते साधे सुरक्षा रक्षक नकोत. चांगले झेड प्लस अशा अतिउच्च दर्जाचे हवेत. खरे तर सत्तेची ऊबदार खुर्ची यांच्या खालून एकदा गेली की यांच्याकडे कोणीही ढुंकूनदेखील पाहणार नाही, अशी परिस्थिती. कदाचित ती माहीत असल्यामुळेच या मंडळींना जमेल तेवढी सत्ता गाजवावी असे वाटू लागते. यास कोणीही अपवाद नाही. राष्ट्राची सेवा, त्याग, साधनशुचिता वगरे सांगणाऱ्या रा. स्व. संघाशी असलेली नाळ मिरवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे उदाहरण हे समजून घेण्यासाठी पुरेसे आहे. या दानवे महाशयांना अतिमहनीय व्यक्तींसाठी असलेली सुरक्षा हवी होती, म्हणे. हे दानवे असे कोणते दिवे लावणार आहेत कोण जाणे. परंतु तरीही राज्य सरकारने ही सुरक्षा त्यांना पुरवली. आता त्याच राज्य सरकारच्या प्रमुखावर विमानास विलंब झाल्याची टीका होत आहे. सध्याच्या राजकीय संस्कृतीशी हे सुसंगतच ठरते. आपल्या औटघटकेच्या सत्तेची इतकी मिजास बाळगणाऱ्या आपल्या या नेतेमंडळींनी विकसित देशांकडून जरूर काही शिकावे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी धाकले जॉर्ज बुश असताना त्यांच्या कन्येने चुकीच्या ठिकाणी आपली मोटार उभी केली, म्हणून तिला स्थानिक हवालदाराने दंड ठोठावला असता तिचे अध्यक्ष तीर्थरूप तो वाचवण्यासाठी मध्ये पडले नाहीत. वा माझ्या मुलीवर कारवाई होतेच कशी असे म्हणत पोलिसांवर डाफरले नाहीत. इंग्लंडचे तेव्हाचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या चिरंजीवावर मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल कारवाई झाली आणि ती कोणीही थांबवली नाही वा ती केली म्हणून पोलिसाची बदलीही झाली नाही. त्याच देशाच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी निवडणुकीत पराभव होतोय असे दिसताच एक क्षणभरही सरकारी निवास राखले नाही आणि लाल दिव्याची गाडी सोडून देत स्वत:च्या मोटारीने प्रवास केला. अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल् गोर यांनी पराभूत झाल्यावर पुन्हा आधी करत होते तसे अध्यापनाचे काम सुरू केले. विकसित देशांतील असे अनेक दाखले देता येतील. डावे पक्षीय सोडले तर असे दाखले आपल्याकडे फार काही सापडणार नाहीत. अलीकडच्या काळात नाही म्हणायला आम आदमी पक्षाने असा प्रयत्न करून पाहिला. परंतु त्यांनी दुसरे टोक गाठले आणि साधेपणा टिंगलीच्या पातळीवर नेऊन ठेवला. तोही अतिरेकच. पण दुसऱ्या टोकाचा.
हे असे आपल्याकडे वारंवार होते याचे कारण व्यक्ती ही व्यवस्थेपेक्षा मोठी मानण्याची दळभद्री परंपरा. कायद्यापुढे सर्व समान आहेत वगरे बाता मारायच्या पण वेळ आली की असमानता दाखवून द्यायची ही वृत्ती. तेव्हा व्यवस्थेला कमी लेखणारी ही पोरकटांची पौरुष परंपरा खंडित करावयाची असेल तर आधी आपल्याला ही वृत्ती सोडावी लागेल. ती सोडली की कोणत्याही अतिमहनीय व्यक्तीसाठी विमाने थांबणार नाहीत वा रेल्वे गाडय़ा वळवल्या जाणार नाहीत.
सौजन्य -लोकसत्ता