भारतातील चांगल्या व वाईट गोष्टी कुठल्या, असा थेट प्रश्नही सना अहमद त्यांना विचारते. भारतातील लोकशाही, हवं ते बोलण्याचं स्वातंत्र्य, ताजमहाल, फिल्म इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्री, बॉलीवूडच्या नट-नट्या, विविधांगी संस्कृती पाकिस्तानच्या तरुणांना खुणावतात. मात्र भारतात श्रीमंत आणि गरीबांमध्ये असलेली मोठी दरी, विषमता, जातिव्यवस्था, काश्मिरच्या जनतेवर भारत करत असलेले अत्याचार आणि भारताचा मीडिया या भारतातील वाईट गोष्टी असल्याचे तेथील तरुण सांगतात. भारतापासून काही मागायचं असल्यास काश्मीर, ताजमहाल, शाहरुख खान, आमिर खान, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर … आणि काही द्यायचं असल्यास नवाज शरीफ आणि इतर भ्रष्टाचारी नेते, असे नमुनेदार उत्तरं तेथील तरुण देतात. (पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी आणली असली तरी पाकिस्तानी तरुणांची पहिली पसंती भारतीय चित्रपटांनाच आहे. वेगवेगळ्या मार्गाने ते हे चित्रपट मिळवितात. भारतीय सिनेमातील गाणे, डॉयलॉग त्यांना तोंडपाठ असतात) भारतात फिरायला जाण्याची संधी मिळाल्यास राजधानी दिल्ली, फिल्म इंडस्ट्री असलेली मुंबई, मुघल वास्तुकलेची केंद्र असलेली शहरे, व गोव्याचे समुद्रकिनारे पाहायला आवडेल, असे तेथील तरुणाई सांगते.