जी माहिती हाती आली ती ‘दिवे पाजळले’ या सदरात मोडणारी आहे . या पीठात संत वाङ्मय आणि विचार नव्हे तर एखाद्या महाविद्यालयात चालवले जातात तसे कला शाखेचे अभ्यासक्रम सुरु करण्याची योजना होती म्हणे , हे म्हणजे वरुन कीर्तन आतून तमाशा झालं ! संतपीठ म्हणजे संत वाङ्मय , त्यांचे विचार हा अभ्यास या मूळ विषयाला ही तिलांजलीच होती . या वर्षी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी सरकार गंभीर आहे ,असं उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे खात्याचे मंत्री उदय सामंत यांच्या प्रतिक्रियेवरुन दिसतं . संतपीठाला गेली ३९ वर्ष लागलेलं ग्रहण सुटणार असल्याचं हे सुचिन्ह आहे . त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरु डॉ . प्रमोद नेवले आणि त्यांच्या सहकार्यांवरची जबाबदारी मोठी आहे . प्रशासकीय शिस्त , कामाचा वकूब असलेला आणि महत्वाचं म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा व चारित्र्याचा कुलगुरु या विद्यापीठाला खूप वर्षानी डॉ. प्रमोद येवले यांच्या रुपात मिळाला आहे . डॉ. येवले यांनी एक प्राचार्य आणि प्र-कुलगुरु म्हणून बजावलेली कामगिरी मला चांगली ठाऊक आहे ; त्यांनी वर्ध्याचं फार्मसी महाविद्यालय राज्यात नंबर एकचं करतांना घेतलेले श्रम , त्या महाविद्यालयाला लावलेली शिस्त ज्ञात आहे . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संत तुकडोजी महाराज अध्यासनाला आकार देण्यात डॉ . येवले यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे . तो अनुभव संतपीठाला निश्चित आकार देतांना नक्कीच कामी येईल . संत तुकडोजी महाराज अध्यासनाचं मॉडेल शिक्षण क्षेत्रात आदर्श समजलं जातं . त्या मॉडेलचा विस्तार करत पैठणचं संतपीठ केवळ संत वाङ्मय केंद्रीत असेल , हे आव्हान डॉ . येवले आणि त्यांच्या सहकार्यांना पेलावं लागेल . सरकारला संबंधित इमारती , जागा तातडीने विद्यापीठाकडे हस्तांतरित कराव्या लागतील . त्यासाठी ठिय्या मारुन , अक्षरश: दररोज रेटा लावून काम करवून घेण्याची धमक मंत्री उदय सामंत यांना दाखवावी लागेल .
हे संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र म्हणून चालवलं जाण्यापेक्षा त्याला एक स्वायत्त दर्जा देण्याची औदार्याची भूमिका स्वीकारण्याच्या कुलगुरु प्रमोद येवले यांच्याकडून दाखवण्यात आलेल्या म्हणण्याचंही स्वागत करायला हवं . देशातील बहुसंख्य विद्यापीठांचा कारभार सुमारांच्या हाती आणि बहुसंख्य विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा अतिसुमार अशी एकंदरीत अवस्था आहे ; बहुतेक सर्व विद्यापीठे कोणत्या-ना-कोणत्या तरी राजकीय विचारांचे, जाती-धर्मांचे अड्डे झालेले आहेत . कुलगुरु म्हणून डॉ . येवले यांची आतापर्यंतची कामगिरी वगळता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कारभाराबद्दल तर बोलावं तितकं कमीच आहे . तसा कांही ‘चिवडा’ होऊ नये म्हणून संतपीठासाठी प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी नियुक्त करतांना मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे .